मी एक अर्धवटराव - 11 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 11

११) मी एक अर्धवटराव!
मध्यमवर्गीय विवाहित पुरुष आणि ऊतू जाणारे दूध यांचा काय ऋणानुबंध आहे हे कदाचित देवालाही ठावूक नसावे. मध्यमवर्गीय स्त्रीयांकडून नवऱ्याला हमखास सांगितले जाणारे एक काम म्हणजे, 'अहो, मी जरा अमुक तमुक काम करतेय किंवा मी स्नानाला जातेय गॅसवर दूध ठेवलेय तिकडे जरा लक्ष द्या...' कोणताही नवरा हे काम मी यशस्वीपणे केलेय हे छातीठोकपणे सांगू शकत नाही आणि कुणी असा यशस्वीतेचा झेंडा अटकेपार रोवला असेल तर अशा पतीराजांना 'दूधसम्राट' या पदवीने गौरविण्यात यावे. प्रत्येक वेळी मी स्वतःलाच तेही स्वगत (कारण हा प्रश्न बायकोला विचारायची हिंमत माझ्याजवळ तरी नक्कीच नाही.) विचारतो की, नेमके दूध तापायला ठेवल्याबरोबर स्त्रीयांना इतर कामांची आठवण कशी काय येत असावी? गॅसच्या ओट्याजवळ पाच-सात मिनिटे थांबून दूध व्यवस्थित तापल्यावर बाई दुसऱ्या कामाला का जात नसावी? महत्त्वाचे म्हणजे, नवऱ्याला तापणाऱ्या दुधाकडे लक्ष द्यायला सांगितले की, दूध ऊतू जाणारच ह्याची शंभर टक्के खात्री असतानाही बायको ती जोखीम नवऱ्यावर का सोपवत असावी आणि तशी जोखीम स्वतः का स्वीकारत असावी? बरे, गॅसवरील दूधही इतकी कठोर परीक्षा घेते की नाही विचारू नका. दोन-पाच-दहा-पंधरा कितीही वेळा पाहिले आणि दुधाकडे पाहताना कळ लागली म्हणून एका पायावर उभे राहण्याची शिक्षा मिळाली तरी गॅसवरचे दूध एकदम शांत असते, स्थिर असते, अचल असते. जेव्हा नवरा 'दूध आता वर येत नाही. थोडावेळ वर्तमानपत्र वाचावे, टीव्ही पाहावा, मोबाईल उघडून बसावे किंवा असे कोणतेही क्षणभराचे काम करावे' या विचाराने दुधासमोरून बाजूला होतो न होतो तोच दूध वैऱ्याप्रमाणे वागते. जन्मोजन्मीच्या शत्रुप्रमाणे डाव साधते. बरे, जोपर्यंत दूध वर येत नाही तोपर्यंत बायकोचेही काम आटोपत नाही. दूध ऊतू जायला सुरुवात होते न होते तोच बायकोचे काम संपते आणि तिला लगेचच तापायला ठेवलेल्या दुधाची आणि तिनेच गौरवान्वित केलेल्या 'वेंधळ्या' नवऱ्याची आठवण येते. ती लगबगीने स्वयंपाक घरात प्रवेश करते.तिच्या दृष्टीस तिला अपेक्षित असलेले दृश्य पडते. गॅसवरील दुधाला जणू पान्हा फुटतो आणि दुधाची तिला भेटण्याची प्रबळ झालेली तळमळ पाहून तिच्या रागाचा पारा चढतो. बरे, हे दूधही एवढी परीक्षा घेते ना की, जेव्हा नवरा दुधाकडे लक्ष देऊन उभा असतो ना तेव्हा ते दूध मनोमन म्हणत असते, 'बरा सापडलास रे!' दुधावर लक्ष ठेवताना पाय गळून येत असताना गॅस मोठा करून दूध उकळून घेतलेले बायकोला मुळीच आवडत नाही. मंद आचेवर दूध उकळले पाहिजे हा तिचा दंडक तापणाऱ्या दुधाला मंद-मंद हसवतो. काही क्षणासाठी पतीराज दुधासमोरून दूर होत नाहीत तोच बायकोचे आगमनाची चाहूल लागताच माकडाने झाडावर सरसर चढावे तसे दूध पातेल्याच्या बाहेर पडू पाहते. बायको येत असल्याचे टायमिंग ते अचूकपणे साधते. त्याच्या त्या उत्कृष्ट टायमिंगचे फटके नवऱ्याला दिवसभर सहन करावे लागतात...
सकाळची वेळ होती. माझी स्नान, पूजा, जप ही कामे आटोपली होती. नाष्टा करायला थोडा वेळ होता कारण सौभाग्यवतीची आंघोळ अजून व्हायची होती. एकत्र बसून केल्याशिवाय नाष्टा केल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे बायकोची आंघोळ होईपर्यंत मारोतीरायाचे दर्शन घेऊन यावे या विचारात मी असताना बायको म्हणाली,
"अहो, मी स्नानाला जातेय. दूध तापायला ठेवलेय. तापत आलेय. तापले की, गॅस तेवढा बंद करा. आणि हो, आज मला डोके धुवायचे आहे तेव्हा थोडा वेळ लागेल..." असे बजावून ती न्हाणीघरात गेली. माझी अवस्था काही ऐकले, काही न ऐकले अशी झाली. कारण मी हातातील भ्रमणध्वनीशी चाळा करीत होतो अर्थात 'चाळा करणे' आणि 'मोबाईल वेडे' ही विशेषणेही बायकोनेच प्रदान केली होती. मी बाहेर जायचे कपडे घातलेच होते. मनाशी विचार केला की, हिला आंघोळीसाठी वेळ लागणार आहे. तेव्हा देवळात जाऊन मारोतीरायाचे दर्शन घेऊन यावे. असा कितीसा वेळ लागणार आहे? त्याचवेळी लक्षात आले की, हिने काही तरी बंद करायला सांगितले आहे. पण काय? आठवत नाही बुवा! हिला विचारावे म्हणून मी न्हाणीघराजवळ गेलो परंतु पुन्हा मनात विचार आला की, याक्षणी हिच्या कार्यात व्यत्यय आणला तर ते हिला आवडणार नाही. दिवसभर सारखी भुणभुण ऐकावी लागेल. तितक्यात माझे लक्ष न्हाणीच्या दाराकडे गेले. मी विचार केला, काही तरी बंद करायला सांगितले आहे, नक्कीच न्हाणीची कडी बाहेरून लावायला सांगितली असणार कारण मी देवळात जातोय. घरी कुणी नाही. विशेष म्हणजे आमच्या न्हाणीला आतून कडीच नव्हती. आंघोळीसाठी पाणी घेतलेली बादली दाराला लावणे हा सर्वोत्तम मार्ग आम्ही शोधला होता. अशा विचाराने मी न्हाणीची कडी बाहेरून लावली. 'दर्शन घेऊन लवकर परत यावे' म्हणून मी घाईघाईने मंदिरात पोहोचलो. पटकन दर्शन घेतले. दर्शन घेताना हनुमंताच्या चेहऱ्याकडे पाहत असताना का कोण जाणवले की, आज अंजनीसुत आपल्याकडे बघून मुरक्या मुरक्या हसत आहेत. तिकडे दुर्लक्ष करीत मी उलट पावली घराच्या दिशेने निघालो. अर्ध्या रस्त्यात आलो न आलो तोच एक जुने स्नेही भेटले. मग काय? बोलण्या - बोलण्यात भरपूर वेळ गेला. काही वेळाने मी घरी परतलो. दिवाणखान्यात प्रवेश केल्याबरोबर जाणवलं की, काही तरी वाजतेय. काय वाजतेय? अरे, हां कुणी तरी दार ठोठावतय. मी आवाज कुठून येतोय हा कानोसा घेतला. आवाज न्हाणीघरातून येत असल्याचे लक्षात येताच अंगातले त्राणच गेले. बायको न्हाणीघरात असताना मी बाहेरून कडी लावून गेलो होतो. धडपडत, स्वतःला सावरत, समोर काय वाढून ठेवले असेल ह्याचा अंदाज बांधत मी न्हाणीघराची कडी काढली. आणि काय सांगू... सौभाग्यवतीचा तो रौद्रावतार पाहण्याचे धाडस, तिच्या डोळ्यात पेटलेल्या इंगिताचा सामना करण्याचे अवसान नसल्यामुळे काहीही न बोलता मी माघारी फिरलो. एखाद्या अपराध्याप्रमाणे सोफ्यावर टेकलो. समोर बायकोच्या रुपात कोणती त्सुनामी येणार आहे, त्याचा सामना कसा करावा? आपण केलेल्या चुकीचे काय स्पष्टीकरण द्यावे असे विचार मनाची घालमेल वाढवत होते. तशा अवस्थेत जाणवले की, कशाचा तरी करपट, जळकट वास येतोय. कशाचा असेल? तसाच पुन्हा धडपडत, हातपाय लटपटत असल्याच्या अवस्थेत वासाच्या मागावर स्वयंपाक घरात पोहोचलो. तिथे गॅसच्या ओट्यावरील दृश्य नजरेत पडताच सारे स्वयंपाक घर गरगर फिरत असल्याचा भास झाला. स्वयंपाक घरातील प्रत्येक वस्तू माझ्याकडे बघत 'हिपीप... भुर्रे ' असे ओरडत असल्याचे जाणवले. तोल सावरत गॅस बंद केला. पातेल्यात पाहिले. दुधाचा कोळसा झाला होता. पातेलेही काळेभोर पडले होते. माझे शरीर बर्फाप्रमाणे थंडगार पडले होते. तसाच झोक सावरत दिवाणखान्यात आलो. धप्पकन सोफ्यावर बसलो. आपादमस्तक घामाघूम झालो होतो. कपडे बदलून सौभाग्यवती शयनगृहातून बाहेर आली. माझ्याकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहत असतानाच तिच्या लक्षात माझी अवस्था आली. तसे घाबरून तिने विचारले,
"काय झाले हो? काही दुखतय का? असे काय करता? किती घाम आलाय?..." असे म्हणत ती माझ्याजवळ आली. काही वेळेपूर्वी मी तिला न्हाणीत कोंडले होते हे ती विसरली होती. काही क्षणापूर्वी डोळ्यात पेटलेल्या निखाऱ्याच्या जागी काळजीचे ढग दाटून आले होते. स्वतःच्या काळजाचे पाणी पाणी झालेल्या अवस्थेत तिने साडीच्या पदराने माझ्या कपाळावरचा घाम पुसला. त्यावेळी मला जाणवले की, 'पत्नी ही अनंतकाळाची माता असते.' असे म्हणतात ते खरेच आहे. पटकन स्वयंपाक घरात जाऊन तिने माझ्यासाठी पाणी आणले. माझ्या अवस्थेमुळे ती एवढी चिंताग्रस्त झाली होती की, स्वयंपाक घरात जाऊनही तिला ना करपट वास आला, ना जळालेले पातेले दिसले. तिने आणलेल्या पाण्याचे दोन घोट घेऊन मी थोडा सावरलो. तिच्या वागणुकीमुळे थोडी हिंमत आली आणि मी जे घडले, जसे घडले तसे तिला सारे खरेखरे सांगून टाकले. ते ऐकून ती गडगडाटी हास्य करत, भलत्याच लाडाने म्हणाली,
"तुमचे आपले काही तरीच बाई! काय हा धांदरटपणा! अहो, दूध करपले तर करपले. आणता येईल दुसरे. भांडेही घासता येईल. मी न्हाणीघरात काही क्षण अडकले तर अडकले त्यात काय एवढे? लिफ्ट बंद पडल्यावर पडावेच लागते की अडकून. अहो, तुम्हाला आपली आकाशपाळण्यात झालेली गंमत आठवते का हो?" तिचा बदलेला मूड पाहून मी आश्चर्यात पडलो आणि त्याच अवस्थेत विचारले,
"गंमत? आकाशपाळण्यात? कधी?"
"अहो, आपले लग्न झाले तेव्हा आपण आपल्या गावच्या जत्रेत गेलो होतो. तिथे आलेल्या आकाशपाळण्यात बसण्याचा मी हट्ट केला तर तुम्ही चळचळ कापत नको म्हणत होता..."
"ते होय? आठवते की. मला आजही आकाशपाळण्याची भयंकर भीती वाटते..."
"पण माझ्या हट्टामुळे, मला आकाशपाळण्यात बसायला आवडते म्हणून तुम्ही माझ्यासोबत आलात आणि आपला आकाशपाळणा म्हणजे आपण बसलेला पाळणा एकदम वर गेला की, लाईट गेले. आपण अर्धा तास अडकून पडलो होतो. अवकाशात कुणाला मिळाला नसेल असा एकांत आपल्याला मिळाला होता. काळाकुट्ट अंधार सर्वत्र पसरला होता. एखादा नवरा असता तर त्या तशा वातावरणाचा, संधीचा फायदा घेत... पण भर हिवाळा असूनही तुम्हाला चक्क घाम फुटला होता..."
"तो तर आताही फुटलायच की... " मी हसत म्हणालो तशी बायकोही खळाळून हसत सुटली आणि त्यामुळे तिच्या गालावर पसरलेल्या आणि मला नेहमीच वेड लावणाऱ्या लालीकडे आणि खळीकडे मी भान हरपून पाहात राहिलो...
@ नागेश सू. शेवाळकर