मी एक अर्धवटराव - 12 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 12

१२) मी एक अर्धवटराव !
सकाळची वेळ होती. मी बायकोसोबत तिनेच केलेल्या चहाचा आस्वाद घेत बसलो होतो. लग्न झाल्यापासून आम्ही एक शिस्त म्हणा, नियम म्हणा केला होता अर्थातच मी घरी असेल त्यादिवशी चहा, नाष्टा, जेवण दोघांनी मिळून एकत्र करायचे. त्यादिवशी चहा घेताना सौ. म्हणाली,
"अहो, तुम्ही एकानंतर एक अशी अर्धवट कामे करता त्यामुळे मला ना राग येतो आणि मग मी तुम्हाला रागारागाने बोलते. ह्याचा तुम्हाला राग येत नाही का हो?"
"व्वा! क्या बात है! बाईसाहेबांचा मूड चांगला दिसतोय. वातावरणही पोषक आहे. कधीही पाऊसधारा कोसळू शकतात. काय भजे बिजे करायचा विचार आहे की काय?" मी लाडात येत विचारले.
"झाले. थोडे गोड बोलले की गेले खाण्यावर. विषय कसा बदलावा ह्यात तुमचा हात कुणी धरू शकणार नाही हो." पत्नी हसत म्हणाली.
"कसे आहे, मीही मानवप्राणी आहे. त्यातच कुटुबवत्सल! काम, क्रोध,मोह, मत्सर, माया अशा साऱ्या गुणांनी परिपूर्ण आहे. त्यात पडलो नवरा! त्यामुळे आलेला राग बायकोवर काढणार नाही तर कुणावर काढणार? पण जिथे बायको माझा राग चालवून घेत नाही म्हणण्यापेक्षा मी तिच्यावर रागावूच शकत नाही तिथे इतर व्यक्तींवर मी कसा काय राग काढू शकतो? नाही का? म्हणून बसतो आपला बायकोची टरटर ऐकत..."
"चला. म्हणजे तुम्हाला राग येतो, माझाही राग येतो हे तरी समजले. पण का हो, आलेला राग कधी उफाळून आल्याचे मला तरी आठवत नाही."
"काय झाले, लग्न ठरल्याबरोबर आमच्या साहेबांना लग्नासाठी सुट्टी मिळावी आणि त्यांनी आपल्या लग्नाला यावे म्हणून पत्रिका घेऊन गेलो. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, बाबा रे, लग्न झाल्यावर बायकोच्या काही गोष्टी पटणार नाहीत. तिच्याकडून अनेक चुका होतील. तुम्हाला पत्नीचा भयंकर राग येईल, चिडचिड होईल. रागारागाने बायकोला खूप काही सुनवावेसे वाटेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा. अर्थात हा माझा अनुभव आहे. म्हणतात ना, केस उगाच काळ्याचे पांढरे होत नाहीत. तुमच्यापेक्षा मी चार पावसाळे जास्त पाहिलेत म्हणून सांगतो, भविष्यात जेव्हा जेव्हा बायकोचा खूप राग येईल. कदाचित राग अनावरही होईल. प्रत्येकवेळी आलेला राग गिळून घ्या नाही तर अन्नाचा कण काय पण पाण्याचा थेंबही मिळणार नाही..." मी बोलत असताना बायको हसून हसून लोटपोट, लालेलाल होत, भिंतीवरचे घड्याळ बघत म्हणाली,
"अरे, बाप रे! आठ वाजत आहेत. लवकर आटपावे लागेल. आत्ता बाईसाहेब कामाला येतील. तुम्हाला कपडे भिजवायला सांगितले होते भिजवले का?"
"तर मग! आप की आज्ञा सर आँखोपर मॅडम ! तू चहा करीत असतानाच कपडे भिजवले..."
"तरीही मला पाहावेच लागेल. अहो, मी कपड्याचे बघते. तुम्ही की नाही, तापायला ठेवलेल्या दुधाकडे बघा ना... प्लीज!..." बायको खास अंदाजात म्हणाली. तिचा तो अंदाज माझ्यासाठी नेहमाच 'मार डाला' असाच असतो.
"ओ. के. डियर!..." असे म्हणत मी वर्तमानपत्र उचलत असल्याचे पाहून ती म्हणाली,
"अहो, आधी स्वयंपाक घरात जा. वर्तमानपत्रासाठी ऊतू जात असलेल्या तुमच्या प्रेमाला आवरा. नाही तर तिकडे माझे दूध ऊतू..." ती बोलत असताना मी हसत सुटल्याचे पाहून तिने विचारले,
"आता काय झाले हसायला?"
"त..त.. तू काय म्हणालीस?"
"काय म्हणाले? तिकडे माझे दूध..." यावेळी तिच्याही आपण काय बोलतो ते लक्षात आले तशी ती लाजताना पाहून मी तिला खिजवत स्वयंपाक घराकडे आणि बायको न्हाणीकडे निघाली. मी पटकन मागे वळून तिला न कळत माझा भ्रमणध्वनी उचलून गडबडीत स्वयंपाक घरात जाऊन दुधाकडे पाहिले तर ते बिचारे अशांतपणे तळमळत होते. अनेक दिवसांनी प्रियेला पाहताच धावणाऱ्या प्रियकराच्या गतीने ते वर येत होते. त्याच्या तशा अचानक केलेल्या आक्रमणाने मी बावरलो, घाबरलो. काय करावे ते मला सुचत नव्हते. गोंधळलेल्या अवस्थेत मी स्वतःशीच संवाद साधला.
'काय करावे बाप्पा? कधी नव्हे ते दूध माझ्यासमोर पातेल्याच्या बाहेर येण्यासाठी तडफडत, धडपडत आहे. गॅस बंद करू की दूध उतरून ठेवू? उतरून ठेवू तर कसे? चिमटाही दिसत नाही आणि फडके पण नाही इथे. अरे, हां काय मी पण वेंधळा आहे. दूध उतरून खाली घ्यायची गरज नाही किंवा गॅस बंद करायचीही गरज नाही. ही काय म्हणालीय तर दूध ऊतू जाईल तिकडे लक्ष ठेवा. चला. बघू या तर दूध कसे ऊतू जाते ते...' असा विचार करीत मी चक्क ऊतू जाणाऱ्या दुधाकडे फक्त पाहात बसलो. तितक्यात न्हाणीघरातून बायकोने सोडलेले शब्दास्त्र घणघण आवाज करीत माझ्या कानात शिरले,
"अ.. हो, हे काय करून ठेवलेत?" ते शब्दास्त्र झेलत काही तरी बिनसलेय, आपल्या हातून काही तरी अर्धवट काम झालेय याची जाणीव झाली आणि मी धावतच न्हाणीत गेलो. मला पाहताच तिच्या रागाचा पारा सर्रकन वर चढला. ती म्हणाली,
"अहो, अर्धवटराव, तुम्हाला कपडे सर्फमध्ये भिजवायला सांगितले होते."
"अग, मग मी सर्फमध्येच भिजवलेत की. तू या इथे फेकलेले लहानमोठे मिळून पंचवीस कपडे आहेत! भिजवलेल्या कपड्यांची बादली तुझ्यासमोरच आहे ना..."
"आहे. बकेट माझ्यासमोरच आहे आणि तुमची उजळणी किती पक्की आहे तेही समजले. पण डोक्याचे काय? ते तर कायम मोबाईलमध्ये बुडलेले असते त्याचे काय?"
"आता काय झाले? व्यवस्थित भिजवलेत ना? तुला की नाही मी केलेली कोणतीही गोष्ट पटतच नाही. सारखी चुका काढत राहतेस. तू माझी बायको आहेस की सासू... सारखी सुचना करणारी ती सासू..."
"पुरे झाली वटवट! तुमचा व्यवस्थितपणा मला चांगलाच माहिती आहे बरे. मला सांगा, पाण्यात सर्फच टाकलाय ना?"
"मग काय साबणाचे पाणी टाकलेय का? बरे, ते पाणी तरी तू कुठे तयार करून ठेवले होतेस?"
"कमाल झाली बाई तुमच्या अर्धवट कामांची. अहो, एक वेळ साबणाच्या पाण्यात कपडे भिजवले असते तर चालले असते. आता काय डोके फोडू तुमच्यासमोर. अहो, तुम्ही पाण्यात फरशी पुसायचे ऍसिड टाकलेय. त्यामुळे कपड्यांना छिद्रं पडली असतील हो. अहो, परवाच माझ्या दादांनी घेतलेली भारीची साडी दिली होती हो भिजवायला..."
"आठवं आश्चर्य? भारीची साडी आणि तुझ्या दादांनी घेतलेली? घेतली तेव्हा तर किती ओरडली होतीस की, नुसते पोतेरे घेतले म्हणून..."
"ओरडली असेल पण शेवटी ती 'माहेरची साडी' होती हो. तिचे अप्रूप काही वेगळेच असते हो. तुम्हाला सांगून काय उपयोग म्हणा. बसा तिकडे. मी पाहते आता काय करायचे ते..." ती बडबडत असताना पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी बैठकीत आलो. हातातील भ्रमणध्वनी दिवाणवर ठेवला. वाटले, याक्षणी भ्रमणध्वनीवर खेळत बसलेले शत्रूपक्षाने पाहिली तर मग काही खरे नाही. एकामागोमाग एक तोफा धडाडतील. 'तोफा' हा शब्द उच्चारला आणि मला काही दिवसांपूर्वीचा एक प्रसंग आठवला...
प्रसंग म्हणजे काय तर नेहमीच माझ्या हातून घडणाऱ्या अर्धवट कामामुळे घडलेली घटना! पण यावेळी माझ्या न घडलेल्या अर्धवटपणामुळे घडलेला विनोद होता तो. आम्हा नवराबायकोचा मस्तपैकी गप्पांचा फड रंगलेला असताना बायको जबरदस्त मूडमध्ये असताना मी म्हणालो,
"अग... अग, तू मला इकडे गप्पांमध्ये रगवून, गुंतवून ठेवलेय आणि मग तापायला ठेवलेल्या दुधावर मी कसे काय लक्ष देऊ? ऊतू गेले तर माझ्या नावाने शिमगा करू नकोस हं. एकदा बघ ना, प्लीज!"
"तुम्ही की नाही असे आहात ना?" असे लटक्या रागाने म्हणत ती आत गेली आणि मी वर्तमानपत्रात तोंड खुपसून बसलो. काही क्षणातच बायकोचे गडगडटी हसणे कानावर आले आणि पाठोपाठ बाहेर येत ती म्हणाली,
"आई ग्गं माय! बाई ग! काय पण माझी खोडी काढलीत,खोड मोडली हो..."
"ऐन दुपारी गॅसच्या ओट्याजवळी, खोडी कुणी काढली, बाई माझी खोड कुणी मोडली!..."
"अहो, शीघ्रकवी उगीच प्रसिद्ध असलेल्या गीताची शस्त्रक्रिया करु नका... खोडी नाही तर तुमच्या भाषेत माझी विकेट घेतलीत की. नुकतेच दूध तापवून मी इथे येऊन तुमच्या सोबत गप्पा मारत बसले होते. तुमच्या सहवासात आणि गप्पांमध्ये मी ते चक्क विसरून गेले की. काय पण तुम्ही आहात हो..." असे म्हणत तिचा लाजून लालसर छटा पसरलेल्या चेहऱ्याकडे मी भान विसरून पाहातच राहिलो...
तिकडे काही क्षणातच सौभाग्यवती बडबडत न्हाणीघरातून बाहेर आली. माझ्याकडे न पाहता ती स्वयंपाक घरात गेली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. पाचावर धारण बसलेल्या अवस्थेत मला गॅस आणि दूध आठवले. ऊतू जाणाऱ्या दुधाला तसेच सोडून मी न्हाणीत गेलो होतो.
'बाप रे! हिने आवाज दिला आणि आपण तसेच पळत तिच्याकडे गेलो होतो. गॅस बंद केला नाही, दूध उतरवून ठेवले नाही. सगळे दूध ऊतू गेले असणार. आता आपली खैर नाही. चूक तर झालीच आहे तर आलीया भोगासी असावे सादर..." असा मी विचार करीत असताना स्वयंपाक घरातून तिची डरकाळी कानावर आली,
"अहो, हे काय करून ठेवलेत? वाटलेच होते मला. एक काम धड करता येत नाही ग बाई या बुवाला. मी तुम्हाला दुधावर लक्ष ठेवायला सांगितले होते ना?"
"मग मी वेगळे काय केले? तू दूध उतरवून ठेवा किंवा स्टोव्ह बंद करा असे कुठे सांगितले होते? मी दुधावर लक्ष ठेवुनच होतो तितक्यात तू कपडे पुराण सुरू करून ते ऐकायला मला बोलावले आणि मी तुझी आज्ञा शिरसावंद्य मानून ऊतू जाणारे दूध तसेच सोडून तुझ्या सेवेत हजर झालो..."
"व्वा! व्वा! वर हा आज्ञाधारकपणा! आज्ञा काय, शिरसावंद्य काय आणि सेवेत काय कसे जमते हे सारे तुम्हाला? दोन लिटर दूध ऊतू गेले, तिकडे तुमच्या हलगर्जीपणामुळे सारे कपडे जळून गेले त्याचे काहीच कसे वाटत नाही हो?"
"व्वा! चला. अर्धवटराव, वेंधळे, बावळटपणा, कामचुकार यासोबतच आज नवीन नामकरण झाले... हलगर्जीपणा!"
"वर हा असा तोंडचोंबडेपणा! शीः बाई, काय ध्यान पदरात पडलय..."
"आता पदरात पडलच आहे तर पवित्र मानून घ्या..." मी साळसुदपणे म्हणालो तशी ती लटक्या रागाने माझ्याकडे पाहात शयनगृहात निघून गेली...
@ नागेश सू. शेवाळकर