मी एक अर्धवटराव - 21 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 21

२१) मी एक अर्धवटराव!
सकाळी सकाळी गरमागरम पोहे म्हणजे व्वा! क्या बात है। अशी स्थिती! पूर्वीपासूनच गरम पोहे हा पदार्थ माझ्यासाठी जीव की प्राण! त्यादिवशीही आम्ही दोघे पोह्यावर ताव मारीत असताना सौ. म्हणाली," का हो, मंदिरात जाणार असालच तर चार-पाच भाज्या घेऊन या ना. अरे, हो. बघा. मी सारखी आठवण करते, पिच्छा करते ते तुम्हाला पटत नाही. पण मी सांगितले नाही तर एक तरी आठवण तुम्ही आठवण ठेवून करता का हो?"
"काय झाले आता?" मी विचारले. तिने इकडेतिकडे पाहात शक्य तितक्या हळू आवाजात विचारले,
"अहो, लॉकरचे काम केलेत का?"
"तू दागिने दिल्याशिवाय मी बँकेत जाणार कसा?" मी उलट विचारले
"तेच ते. करावे, द्यावे तर मीच. तुम्हाला माहित नव्हते का? तुम्ही आठवण केली असती तर काही बिघडले असते का? थांबा. आधी आणून देते. नाही तर गडबडीने निघून जाल आणि वर पुन्हा म्हणाल की, तुच आठवण केली म्हणून..." असे म्हणत ती आत गेली. आलमारीत ठेवलेले सराफा दुकानातून मिळालेले छोटे कापडी पाकीट घेऊन आली आणि म्हणाली,
"हे घ्या. एकदाणी आणि बांगड्या आहेत. नीट लक्ष ठेवून जा. नाही तर मागच्या वेळी केले तसे करू नका..."
"काय केले होते मी?" मी विचारले
"तेही मीच सांगू का? मागच्या वेळी हीच पिशवी घेऊन बँकेत गेलात आणि पैसे जमा करायची पावती भरून या पिशवीसह खजिनदाराकडे दिली..."
"अग, हो खरेच की. काय झाले, त्या स्लीपवर की नाही, मी रकमेचा आकडा टाकतात ना तिथे चक्क एक एकदाणी, चार सोन्याच्या बांगड्या असे लिहिले. ते वाचून तो कॅशियर असा पोट धरून, नाका-तोंडातून पाणी येईपर्यंत हसत सुटला."
"हसणार नाही तर काय करेल. तुम्ही वागलातच तसे की कुणीही आडवे पडून हसेल..."
"तुला एक गोष्ट तर सांगितलीच नाही..."
"ती कोणती? अजून कुठे आणि कोणता गोंधळ घातलात?"
"काय झाले, महालक्ष्म्या झाल्यावर मी हेच पाकीट ठेवायला बँकेत गेलो. लॉकर उघडले. पाकीट आत ठेवले आणि निघालो..."
"निघणारच की. तिथली शांतता, शितलता पाहून झोप काढायचा तर विचार नव्हता ना? अरे, हो. दुपारच्या अकरा वाजण्याची वेळ म्हणजे तुमच्या अतिप्रिय डुलकीची वेळ! काहीही झाले, कुठेही असलात तरी त्यावेळी डुलकी घेणारच..."
"अहो, डुलकीबाई, ऐका तर मी बाहेर आलो. पासबुकवर नोंद करावी म्हणून तिथेच थांबलो तर काही कामानिमित्त लॉकर रुममध्ये गेलेला बँकेचा कर्मचारी धावतच बाहेर आला नि मला म्हणाला,
"काका,काका, पटकन इकडे या..." काही तरी वेगळे घडले हे त्याच्या चेहऱ्यावरून मी ओळखले आणि त्याच्या पाठोपाठ पुन्हा लॉकररुममध्ये गेलो. त्यामुलाने इशाऱ्याने मला आपले लॉकर दाखवले आणि दुसऱ्याच क्षणी मी घामाने अक्षरशः ओलाचिंब झालो."
"का हो, काय झाले होते?"
"काय झाले म्हणून सांगू? अग, मी लॉकरचे दारच लावायला विसरलो होतो..."
"माय गॉड! केवढा हा वेंधळेपणा नाही हा तर चक्क महामुर्खपणा आहे. मग?"
"मग काय? त्या मुलाने सांगितले म्हणून मी हे पाकीट बाहेर काढले. आतला ऐवज तपासला.पुन्हा व्यवस्थित जागेवर ठेवून दिला. दार लावले. चार चार वेळा किल्ली लावून कुलूप तपासले. त्या मुलाचे आभार मानत त्याला काही बक्षीस द्यावे म्हणून खिश्यात हात घालत असताना तो म्हणाला,
"काका, तसा विचारही करु नका. सीसीटीव्ही सुरू आहे. तुमच्याकडून घेतलेले बक्षीस लाच समजली जाईल आणि त्यामुळे नोकरी जाईल..."
"भले होवो त्या मुलाचे! अहो, मग ही गोष्ट तिथल्या अधिकाऱ्याच्या कानावर घालायची. मुलाला तिथे बोलावून अधिकाऱ्यासमोर त्याला बक्षीस द्यायचे ना. अहो, थोडाथोडका नाही तर दीड-दोन लाखाचा फायदा केला त्याने. साधी गोष्ट कशी लक्षात आली नाही तुमच्या..."
"अग, खरेच की. तेव्हा हे लक्षातच आले नाही ग, परिस्थिती कशी वेगळीच झाली होती ग. जाऊ देत. जाऊन येतो बँकेत..."
"नीट काम करा बरे. अर्धवटपणा, वेंधळेपणा करू नका. का मी येऊ?"
"कशाला? बँकेत मी काही चूक केली तर तिथेच या पदव्यांनी गौरवशील. काही होत नाही. नेहमी होत नसते तसे..." असे म्हणत मी निघालो. आधी देवदर्शन घेतले. मंदिराच्या शेजारी असलेल्या भाजीच्या गाड्यावरून भाज्या घेतल्या. पण का कोण जाणे, माझा हात सारखा माझ्या पँटच्या चोर कप्प्याकडे जात होता. वारंवार तिथे ठेवलेले पाकीट सुरक्षित असल्याची खात्री करून घेत होता.
काही क्षणातच बँकेत पोहोचलो. अधिकाऱ्याजवळ रीतसर नोंदणी करून त्याच मुलासह लॉकर रुममध्ये गेलो. लॉकर उघडून देत बाहेर पडताना मुलगा म्हणाला,
"काका, व्यवस्थित बंद करा बरे."
"हो. होते एखादे वेळी. पण ती एखादी वेळच फार भारी पडते बरे. प्रत्येक वेळी तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस थोडीच भेटणार आहे..." म्हणत मी लॉकर उघडले. माल व्यवस्थित आत ठेवला. लॉकर बंद केले. अनेकदा तपासणी करून बाहेर पडलो. कसे हलके हलके वाटत असले तरीही काही तरी चुकल्यासारखेही वाटत होते. तसे मी मनाशीच म्हणालो,
'काय झाले? असे का होतेय? लॉकरच्या बाबतीत काही गडबड झाली नाही ना? जावे का पुन्हा? पहावे का तपासून? नको. नको. खूप वेळा लॉक तपासून आलोय. काही झालेले नाही. आपण नेहमी काही ना काही चूक करतोय म्हणून तसे वाटत असावे...'
काही क्षणात घरी पोहोचलो. माझी चाहूल लागताच सौभाग्यवतीने विचारले,
"आलात का? चहा टाकू का? झाली ना सारी कामे? व्यवस्थित केली ना सारी कामे? खजिनदाराकडे पावती भरून पॉकेट दिले नाही ना? लॉक बरोबर लावले ना?"
"हो ग. सारे बिनचूक केलेय. तू काही तरी करायचे का म्हणालीस ना? हां. चहा करतेस ना? कर. त्यात विचारायचे काय ? माझा एकमेव अतिप्रिय मित्र म्हणजे वन अँड ओन्ली चहा! अर्ध्या रात्रीही कुणी चहा घेऊन समोर आले तरी मी ना म्हणणार नाही किंवा तशावेळी चहा घेतला म्हणून माझी झोपमोड होणार नाही. आण लवकर." मी म्हणालो. बायको मंद हसत आत गेली...
दुसऱ्या दिवशीची सकाळ एक महाभयंकर प्रलय घेऊन आली. मी पूजा करीत असताना काम करणारी बाई आली. हिने मला विचारले,
"तुमचे काही कपडे धुवायला टाकायचे का?"
"काल घातलेले कपडे टाक."
"बरे..." म्हणत ही बाहेर गेली. कपडे धुवायला टाकून आली. माझी पूजा आटोपून मी दिवाणखान्यात बसलो असताना कामवालीबाई घाबऱ्या घाबऱ्या बाहेर येऊन थरथर कापत म्हणाली,
"ताई...ताई, हे काय? माझी परीक्षा घेत होतात का? काकांच्या पँटच्या खिशात हे...हे..."त्या बाईने दाखवलेली वस्तू पाहताच जिथे मला दिवाणखाना गरगरत असल्याचा भास झाला तिथे सौभाग्यावतीचे डोळे मात्र आग ओकत असल्याचे जाणवले. त्या बाईच्या हातात मी आदल्या दिवशी बँकेत ठेवायला नेलेले पाकीट होते.
"ताई, घ्या. नीट तपासून घ्या. नाही तर माझ्यावर आळ येईल..."
"नाही हो. तुमच्यावर कसा...?" असे म्हणत बायकोने पाकीट उघडले. त्यातला मुद्देमाल जसाचा तसा पाहून ती म्हणाली,
"मावशी,खरेच तुमचे उपकार कसे फेडू आणि आभार किती मानू ते कळत नाही हो..." लगेच माझ्याकडे बघत तिने विचारले,
"का हो, काल तुम्ही बँकेत गेला होतात ना..." ही मला रागाने विचारत असताना ती बाई बाहेर निघून गेली.
"हो. बँकेतच गेलो होतो. लॉकरही उघडले. बंद केले...अरे, बाप रे!..."
"काय झाले? काय घोळ घातलात हो?"
"अग... अग.. लॉकरमध्ये मी .. मी चुकून भाजीची पिशवी ठेवून आलो..."
"काय? भाजीची पिशवी? लॉकरमध्ये?..." असे विचारत ती खीः खीः करीत हसायला लागली. त्यावेळी मला ते हसणे शोले सिनेमातील गब्बरच्या हसण्याप्रमाणे वाटले आणि काही क्षणातच मीही तिच्या हसण्यात सामील झालो. हसण्याचा एक अंक पूर्ण होत असताना दम लागलेल्या अवस्थेत मी तिला म्हणालो,
"मला हसतेस, चिडवतेस, ताणे मारतेस, ओरडतेस आणि तुला तुझा हा धांदरटपणा दिसत नाही?"
"म.. म.. मी काय केले?" हसण्यावर ताबा मिळवत बायकोने विचारले.
"अग, तू मला भाज्या आणायला सांगितले होते पण कालपासून एकदा तरी विचारलेस?"
"अय्या! खरेच की. मी चक्क भाज्यांचे विसरूनच गेले हो..."
"मग? आत्ताही तुझा वेंधळेपणा दिसलाच की. माझे कपडे भिजवताना माझ्या खिशातील पॉकेट तुला कसे दिसले नाही? आता काय म्हणशील..."
"धांदरटपणा! फार तर 'ढवळ्या शेजारी बांधली पवळी, वाण नाही पण गुण लागला.' असे झाले म्हणा हवे तर..." म्हणत पुन्हा स्वतःच हसू लागली...
@ नागेश सू. शेवाळकर