मी एक अर्धवटराव - 20 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 20

२०) मी एक अर्धवटराव!
त्यादिवशी आम्ही दोघे टीव्हीवरील एक मालिका बघत होतो. खरे तर आजकालच्या मालिका मी बघत नाही पण सौभाग्यवती एकूणएक मालिका पाहात असल्यामुळे मलाही पकडून आणल्याप्रमाणे सायंकाळी सात ते रात्री साडेदहापर्यंत टीव्हीसमोर बसावेच लागते. टीव्हीचा आणि माझा संबध फक्त क्रिकेटचे सामने, बातम्या आणि काही आवडीचे सिनेमा लागले तर पाहणे इतकाच! क्रिकेटचे मला एवढे प्रचंड वेड आहे की, जेव्हा कुठलाही सामना सुरू नसतो, कोणत्याही सामन्याचे थेट प्रक्षेपण नसते तेव्हा कुठल्या ना कुठल्या खेळाच्या वाहिनीवर मागच्या कुठल्या तरी सामन्यांची क्षणचित्रे दाखवत असतात तीच मी तासनतास पाहात बसतो. मला कंटाळा येत नाही. तितक्यात मालिकेत 'क्षणभराची' विश्रांती घेतोय असे लिहून येताच पत्नी म्हणाली,
"म्हणे आम्ही आत्ता आलो. तुम्ही कुठेही जाऊ नका. आम्हाला कशाची आलीय बाप्पा विश्रांती? स्त्रियांना विश्रांती म्हणजेच ती शेवटची... चार जणांनी खांद्यावर उचलून पोहोचवलेली! चला. मालिकेत ब्रेक आहे तोपर्यंत भाजी चिरावी..." असे म्हणत ती स्वयंपाक घराकडे निघाली पण दोन-चार पावले जाताच मागे वळून मला म्हणाली,
"अहो, मी की नाही दहा मिनिटात शेजारी जाऊन येते. प्लीज एक काम करा ना. पाच मिनटांनी देवाजवळचा दिवा लावा ना गडे..." बोलण्यात आदेश तर होता पण एक लडिवाळपणा होता त्यामुळे नाही म्हणू शकलो नाही किंबहूना ती माझ्या होकार-नकारची वाट न पाहता निघूनही गेली. मी आपला बिच्चारा केविलवाणे सोफ्यावर बसून राहिलो. एक प्रश्न मनात घोळत होता की, 'हिच्या आवडीची मालिका सुरू असतानाही हिला काय काम आले असावे? का गेली असावी? मला का सांगितले नसावे? काय काम असावे?' अशा विचारात किती वेळ गेला कुणास ठाऊक? मी भानावर आलो तोच बायकोच्या आवाजाने. चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे ती म्हणाली,
"अहो, मोबाईलवर खेळत बसलात, तिकडे टीव्ही सुरू आहे. थोडे तरी भान आहे का? दिवेलागण झालीय. देवाजवळ दिवा लावला नाही, लाइट लावले नाहीत. अंधाराचे जाळे..."
"फिटे अंधाराचे जाळे! हे गाणे तरी म्हण ना. हे गाणे मला की नाही खूप आवडते पण अंधार आहेच कुठे? बघ तर कसा मंद मंद प्रकाश पडलाय. जणू पोर्णिमेचे चांदणे पसरलेय. आज आपण मंद मंद प्रकाशात धुंद होऊनी मस्तपैकी कँडल डिनरचा आस्वाद..."
"ओ, कविमहाशय, तो मंद मंद प्रकाश तुमच्या मोबाईलचा आणि टीव्हीचा आहे. त्या धुंद दुनियेत कायम डोके घालून बसत असल्यामुळे तुम्ही दिवसेंदिवस मंद होताय. त्या धुंदफुंद जगाला सोडून बाहेर या. मग तुम्हाला घरात पसरलेला घनघोर अंधार दिसेल. काय बाप्पा, तुमचे काम. पाच मिनिटे कुठे बाहेर गेले नाही तर घरात सारा काळाकुट्ट अंधार.सारी बोंबाबोंब..." असे ओरडत ती देवाघराजवळ गेली आणि तिथूनच म्हणाली, "दिवा लावला होता काय?"
"हो ना. तू गेल्यावर दिवा लावला होता. पण तू माझे ऐकून घेशील तर सांगेन ना. तुला मी केलेली कामे दिसतच नाहीत. मला कामे येत नाहीत. मी मुद्दामहून कामे करीत नाही. असा तुझा गैरसमज पक्का झालेला आहे."
"बाकी सारे राहू द्या पण दिवा लावताना त्यात तेल टाकावे लागते..."
"हात्तीच्या मारी! मला वाटले सकाळी तू टाकलेले तेल असेल. तेल टाकावे लागते असे आहे का? मला काय माहिती... मी पडलो अर्धवटराव..." मी म्हणालो तसे आम्ही दोघेही हसत असताना मी पुढे म्हणालो,
"अग, एक करु या का ग? कसे आहे, नाही तरी तू माझे अर्धवटराव हे नाव ठेवलेच आहे तर त्यास समाजमान्यता देऊया का म्हणजे माझे नाव बदलून अर्धवटराव हे जाहीर करु या का?"
"हे काय नवीन खूळ? या वयात हे काय नवीन डोहाळे लागले ?"
"अग, खूळ नाही ग. खरेच ग. त्यानिमित्ताने माझे पुन्हा बारसे करूया. कसे आहे, आपण लहान असताना एक तर आजच्यासारखे हे वाढदिवस वगैरे काही नव्हते. ऐनकेनप्रकारे तू सातत्याने उच्चारतेस आणि महत्त्वाचे म्हणजे तू फार वर्षांपूर्वी चुकून का होईना एका समारंभात उखाणे घेताना 'अर्धवटरावांचे' नाव घेते असे म्हणाली होतीस की..."
"अय्या! इश्श! ते अजून तुमच्या लक्षात आहे? "
"तर मग? बायकोने प्रेमाने, तेवढ्या लोकांसमोर दिलेले नाव मी कसा विसरेन? बरे, एकदा सर्व नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांना बोलावून धम्माल करुया. कुणी केला नसेल असा हा प्रयोग करुया..."
"तुमचे आपले काही तरीच... बरे, ठीक आहे. करुया तुमचे बारसे पण अडचण येईल की तुमच्या एवढ्या अगडबंब देहाला सामावून घेणारा पाळणा मिळेल का? हां. हां थांबा. आले लक्षात. आपण की नाही तुमचे बारसे आपण एखाद्या मोठ्या लॉन्समध्ये... बागेमध्ये ठेवू या म्हणजे तिथे असलेल्या झोक्यामध्ये तुम्हाला झोपवता येईल आणि मग तुमचे नाव ठेवता येईल. पण तुमची एखादी आत्या आहे का जिवंत? असली तरीही नाव ठेवत असलेल्या बाळाला पाळण्याखालून वर करावे लागते त्यावेळी तुमचा भार त्यांना सोसवला नाही तर? धडाधड सारे खाली पडतील. कसे करायचे मग अर्धवटराव?" असे विचारत ती आत गेली...
त्यादिवशी अशाच काहीशा वातावरणात आमची जेवणे झाली. आता वेळ औषधी घेण्याची. मी जादूची पेटी अर्थात औषधीची छोटी पेटी घेऊन बसलो. दोन-तीन प्रकारच्या गोळ्या घ्यावा लागत. एक-दोन प्रकारच्या गोळ्या संपल्यामुळे त्यांची रिकामी झालेली पाकिटे मी फरशीवर टाकली न टाकली तशी बायको भुकंप झाल्याप्रमाणे ओरडली,
"अहो, औषधं, गोळ्या घेताय तर त्याची कागदं, वेष्टनं उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकत जा. हे असे कुठेही टाकू नका. तिकडे स्वयंपाक घरात जाऊन चूर्ण घेताय ना ते जरा व्यवस्थित घेत जा. सांडत जाऊ नका. रोज सकाळी गॅसच्या ओट्यावर चुर्णाच्या रांगोळ्याच रांगोळ्या! ओटा स्वच्छ करता करता माझ्या नाकीनऊ येतात. अहो, जरा व्हीक्सची बाटली द्या ना..."
"का ग डोके दुखतय का?व्हीक्स चोळून डोकं दाबून देऊ का?" मी विचारले
"नको बाप्पा नको. विचारले हेच खूप झाले. डोके दाबता दाबता वेंधळेपणाने माझा गळाच दाबाल."
"मी काही तितका वेंधळा नाही हं..." मी हसत म्हणालो. औषधाचा विषय निघालाच आहे म्हणून एक आठवण सांगतो त्यावरून माझी बायको गुगली टाकून माझी विकेट कशी घे असे ते लक्षात येईल. त्यादिवशी आम्ही अशाच गोष्टी करीत बसलेलो असताना बायको अचानक म्हणाली,
"अहो, आजकाल तुमचा बी. पी. वाढतोय बरे..."
"माझा बी. पी.? तुला कसे कळाले ग? तू अंतर्ज्ञानी आहेस की काय?"
"अहो, ते बी. पी. नाही म्हणत नाही हो. तर बी. पी. म्हणजे बावळटपणा हो..."
"काय? मी बावळट? वेंधळा, अर्धवटपणा ही विशेषणं कमी पडलीत की गुळगुळीत झालीत म्हणून ही नवीन पदवी बहाल करतेस. काय पण माझी बायको आहे, हे..हे.. असे बोल ऐकण्यापेक्षा एखाद्या राक्षसिनीसोबत संसार थाटला असता तर..."
"तुमचा संसार सुखाचा झाला असता पण बॅडलक! बट फॉर युवर काईंड इन्फर्मेशन अर्धवटराव,आपल्याकडे सजातीय गोत्रामध्ये लग्न होत नाही..."
"बघ रे देवा, बघ. माझी लग्नाची बायको मला काय काय विशेषणं लावत आहे..." मी म्हणालो तशी ती खळाळून हसत म्हणाली,
"चला. पुरे झाला पदवीदान समारंभ. जेवायला उशीर झाला तर माझ्याच नावाने शिमगा सुरू होईल." असे म्हणत ती उठून गेली...
त्याच रात्री मला कशाच्या तरी आवाजाने जाग आली. सवयीप्रमाणे मी घड्याळ बघितले. रात्रीचा दीड वाजत होता. येत असलेल्या आवाजाचा मी अदमास घेतला. शेजारी झोपलेली सौभाग्यवती झोपेत बरळत होती, ' सकाळी उठल्यावर घर झाडून कचरा व्यवस्थित एका कोपऱ्यात लावा. ती महामाया दहा वाजता झाडायला येते. तुम्ही झाडता खरे पण कचरा सारा कुठेही पसरवून टाकता आणि मग आपल्याच पायाला लागून तो घरभर पसरतो. तेव्हा नीट एका कोपऱ्यात जमा करा. अर्धवट कामे करत जाऊ नका...' लगेच घोरण्याचा आवाजही येऊ लागला. मी मात्र दिङंमुढ अवस्थेत पलंगाच्या एका कोपऱ्यात बसून राहिलो... अर्धवट टेकून!
@ नागेश सू. शेवाळकर