मी एक अर्धवटराव - 19 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 19

१९) मी एक अर्धवटराव!
सायंकाळ होत होती म्हणजे चार वाजत होते. चहाची वेळही झाली होती. परंतु सौभाग्यवतीचा आराम चालू होता. 'कंटाळलेल्या पुरुषाला फेसबुकचा आधार' याप्रमाणे मी माझा भ्रमणध्वनी उचलून सुरू केला. फेसबुकवर जावे म्हणता भ्रमणध्वनीवर कुणाचा तरी संदेश प्राप्त झाला. शेजारच्या अण्णांनी पाठविलेल्या संदेशात लिहिले होते, 'येता का बाहेर? सहज.' मी लगेच 'आलोच' असे उत्तर पाठवून उठलो. शयनगृहात डोकावले. सौभाग्यवतीचा सप्तसूर लागला होता. मी कपडे चढवून बाहेर पडलो. मला पाहताच अण्णा म्हणाले,
"या. या. "
मी त्यांच्या दिवाणखान्यातील सोफ्यावर बसत म्हणालो,
"अण्णा, वहिनींचा आराम चालू असेल. झोपमोड होईल त्यांची."
"अहो, ती घरात आहेच कुठे? ती गेलीय तिच्या बहिणीकडे पाच वाजेपर्यंत येईल. म्हणून म्हटले, चहाची वेळ होतेय. तुमची कंपनी होईल वाटलं म्हणून फोन केला. बसा. मस्तपैकी चहा करतो..." असे म्हणत आत गेले आणि काही क्षणातच पाण्याचे प्याले आणि चहाचे कप घेऊन आले. मी येतोय म्हटल्यावर त्यांनी आधीच चहा करून ठेवला होता. चहाचा पहिला घोट घेताच मी म्हणालो,
"व्वा! अण्णा, सुरेख! एक नंबर चहा केलात हो."
"मला सवय आहे हो. लग्न झाल्यापासून मीच दोन्हीवेळा चहा करतो. त्याचे काय झाले, सुरुवातीला बायकोच्या हातचा चहा घेतला परंतु तिने केलेल्या चहाने माझी तल्लफ काही केल्या भागेना. योगायोगाने नोकरीनिमित्ताने आम्ही दोघांनी इथेच संसार थाटला. सुरुवातीला गंमत म्हणून आणि महत्त्वाचे म्हणजे 'मी तुझे किती लाड करतो, माझे तुझ्यावर किती प्रेम आहे' हे दाखविण्यासाठी आणि मला असा चहा आवडतो, दररोज असाच चहा हवाय हे तिच्या गळी उतरावे म्हणून मीच चहा करू लागलो परंतु ते म्हणतात ना, 'दुसऱ्यासाठी केलेल्या खड्ड्यात आपणच पडावे' त्याप्रमाणे मीच माझ्या जाळ्यात अडकलो. दररोज चहा करण्याचे काम स्वतःच्या अंगावर घेऊन बसलो."
"अण्णा, आमच्याकडे उलटेच आहे. हिच्या हातचा चहा म्हणजे अमृततुल्य! झक्कास, फक्कड अशी कोणतीही विशेषणे थिटी पडावीत असा चहा करते ही. स्वयंपाकाचेही तसेच जणू अन्नपूर्णा! पदार्थ बिघडला, जमला नाही असे होणारच नाही. शिवाय आदिरातिथ्य म्हणजे काय ते आमच्या बायकोकडून शिकावे. अगदी रात्री बारा वाजता जरी पाहुणा काय पण कुणी परिचित आला तरी ताजा, गरम, चारीठाव स्वयंपाक करून वाढते..."
"असे का? म्हणूनच चमचमीत खाऊन तुमचे पोट नेहमी बिघडते वाटते. तसे नाही, तुम्ही पोट बिघडल्याची तक्रार नेहमी करता..."
"तसे नाही म्हणता येणार. कसे आहे, स्वयंपाक चांगला झाला म्हणून काय झाले? जीभेवर ताबा ठेवणे तर माझे काम आहे ना. हिचेही तुमच्यासारखेच मत आहे. त्यावर आमचीही चर्चा, वाद होतातच. अण्णा, खरे सांगा, तुम्हा दोघांमध्ये वाद, भांडणे होतात का?"
"अगदी माझ्या दुखत्या नसेवर बोट ठेवले बघा. लग्नानंतर एक-दोन महिन्यातच मी हिचा स्वभाव ओळखला आणि फुकटचे वाद होऊ नयेत म्हणून मी त्याचवेळी ठरवून टाकले की,तिला तिच्या मनाप्रमाणे वागू द्यायचे... चूक तिची असली तरीही तिच्या मताप्रमाणे आपण वागायचे! शिवाय त्याच काळात हिने माझ्या मनात एक कायमस्वरूपी असे ठसवले की, जो नवरा आपल्या बायकोचे ऐकून वागतो तो स्वर्गात जातो. मुळात ना कुणी स्वर्ग पाहिला, ना कुणी नरक! पण म्हणतात ना, माणूस हावरट असतो. स्वर्गात जायला मिळणार म्हटले की, तात्काळ माझ्यासमोर फेर धरून नाचायला लागल्या त्या स्वर्गपऱ्या! त्या मोहाने, लालसेने मी बायको म्हणेल तसे वागत गेलो..."
"काय कमाल आहे..." मी बोलत असताना अण्णा पुढे म्हणाले,
"दुसरे असे म्हणतात की, बालपणी जे संस्कार होतात ते कायम टिकतात. त्याप्रमाणे संसाराच्या सुरूवातीला आपण जसे वागतो तसेच शेवटपर्यंत..."
"पण अण्णा, भांडणाशिवाय संसार म्हणजे अळणी..."
"बिघडले कुठे? त्या अळणीपणामुळे वैवाहिक जीवनात एक नवीन गोडवा निर्माण होत असेल तर काय हरकत आहे? मधुमेह झालेल्या लोकांना नाही का, सारे अळणीच घ्यावे लागते म्हणून त्यांचे आयुष्य वाढतेच की. मी केलेली तडजोड माझ्या संसारात झालेला मधुमेहच समजा ना त्यामुळे आमच्या संसाराचे आयुष्य वाढले ना. तुम्हाला दुसरे एक सांगू का, मी वाघ बनून राहण्याचा कधीच प्रयत्न केला कारण मला माहिती होते की, नवरा शेर बनण्याचा विचार करत असेल..."
"बायको सव्वाशेर बनते." मी पटकन म्हणालो.
"ते तर आहेच पण प्रसंगी ती दुर्गा बनून पाठीवर बसायला मागेपुढे बघत नाही."
"खरे आहे तुमचे अण्णा." मी म्हणालो तसे अण्णा पटकन म्हणाले,
"अरे, बाप रे! गप्पा मारता मारता पाच वाजले. गृहमंत्र्यांचे कधीही आगमन होईल. कसे आहे, बाईसाहेब आज बासुंदी करणार आहेत..."
"मग बासुंदी घोटण्याची पाळी तुमची आहे की काय?"
"ते तर आहेच पण ती येईपर्यंत खोबऱ्याचे, खारकेचे, काजूचे, बदामाचे तुकडे करून ठेवायचे आहेत. तसे बजावून गेलीय. तुम्हाला सांगतो, आम्ही त्या काळात 'सुधारणावादी' या व्याधीने ग्रस्त होऊन आमच्या जन्मपत्रिका न पाहता लग्न करण्याचा मुर्खपणा केला. त्याचीच फळे भोगतोय..."
"म्हणजे? मी नाही समजलो..."
"अहो, तिची रास आहे, सिंह आणि माझी मीन! ह्या दोन राशींचे षडाष्टक आहे म्हणे. या दोन राशींमध्ये विवाह होऊच नये म्हणे..."
"बाप रे, अण्णा! येतो हो..." असे म्हणत मी तिथून निघालो...
अण्णांसोबत रंगलेल्या गप्पांमध्ये बराच वेळ गेला होता. घरी पोहोचलो तर बायको माझ्यासाठी चहा घ्यायला थांबली होती. विशेष म्हणजे मला झालेल्या उशिराबद्दल किंवा तिला न सांगता अण्णांकडे गेलो म्हणून तिने आकांडतांडव केले नाही उलट अण्णांच्या सिंह-मीन या कथेवर ती हसत सुटली. आम्ही दोघे चहा घेत असताना तिने भल्या पहाटे आलेले वर्तमानपत्र उचललेले पाहताच मी म्हणालो,
"अग, सकाळी आलेला पेपर संध्याकाळी वाचणे म्हणजे..." मला पूर्ण बोलू न देता ती म्हणाली,
"मग काय करु? तुम्हाला सगळे ताजे ताजे करून घालताना वेळ कुठे मिळतो? वर्तुमानपत्र कामाच्या घाईत शिळे होऊन जाते. बरे, काम सोडून पेपर वाचावा तर आजकाल पेपरात असतेच काय? खून, दरोडा, विनयभंग, बलात्कार आणि राजकारण... आणि क्रिकेट!"
"अग,दुपारची झोप थोडी कमी करावी. कसे आहे, आवड असली की सवड मिळतेच..."
"वाटलेच मला. तुमच्या डोळ्यात माझी दुपारची पाच मिनिटांची झोप सलत असणार..."
"तस नाही ग पण बरीच चांगली माहिती असते..."
"डोंबल्याची चांगली माहिती. दिवसभराच्या कामाचा ताण घालवावा म्हणून पेपर वाचावा म्हटला तर आपल्या घरी पेपर कधी चांगल्या स्थितीत एकत्र सापडेल तर शपथ! एक पान टेबलावर, दुसरे पान खुर्चीवर, तिसरे पान रद्दी पेपरवर. इतर पाने यत्र-तत्र-सर्वत्र पसरलेले..." असे म्हणत ती पेपरमध्ये डोकावली. काही क्षणातच अचानक म्हणाली,
"अहो, ही बातमी वाचली का?"
"पेपर तुझ्या हातात असताना मी कशी काय बातमी वाचू?"
"सकाळपासून रवंथ झाले असेल ना?ऐका ना, काय तर म्हणे आता पाण्याला मिटर बसवणार."
"कमालच आहे ना, सरकारची! काही पण करते ना सरकार. उद्या कदाचित बायकांच्या तोंडालाही मिटर बसवायला मागेपुढे पाहणार नाही. किती छान आहे ना..."
"व्वा! तेवढेच राहिलय आता. आणून द्या सरकारच्या लक्षात. सगळे नवरे आरती करतील तुमची. कुणीतरी पुरुष सरकारकडे तुमचे हे अलौकिक, अद्वितीय कार्य पोहोचवील. मंत्रिमंडळात बहुतांश पुरुष सदस्य असल्याने हा कायदा पास होईल या कायद्याचे जनक म्हणून तुम्हाला 'भारतरत्न' आणि 'नोबेल' पारितोषिकही मिळेल..." असे म्हणत ती स्वतःच खदाखदा हसू लागली. मी तिच्याकडे आश्चर्याने पाहात असताना ती म्हणाली,
"आजच्या बायका पण काय करतील याचा नेम नाही. हा विनोदच बघा ना... एक माणूस कार्यालयातून घरी येताच त्याच्या अंगावरील कपड्यांचे बारकाईने निरीक्षण करीत त्याची बायको कडाडत म्हणाली, 'आज तुम्ही टक्कल पडलेल्या बाईकडे गेला होतात ना? असे वेंधळ्याप्रमाणे पाहता काय? आज तुमच्या कपड्यावर एकही केस नाही..." त्या विनोदावर आम्ही दोघेही खळाळून हसत असताना ती अचानक म्हणाली,
"चला. पुरे झाली हसवणूक! जेवायला उशीर झाला तर आरडाओरड सुरु होईल ती स्वयंपाक घराकडे कुच करती झाली...
@ नागेश सू. शेवाळकर