मी एक अर्धवटराव - 24 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 24

२४) मी एक अर्धवटराव!
सकाळी सकाळी माझ्या भ्रमणध्वनीवर वेगळ्याच प्रकारची घंटी वाजली. अर्धवट झोपलेल्या अवस्थेत मी घड्याळात पाहिले. सकाळचे सहा वाजले होते. तसा मी मनाशीच म्हणालो,'ही विशेष धून वाजतेय म्हणजे आज कुणाचा तरी वाढदिवस असणार. कुणाचा बरे! हे आठवणीत राहिले असते तर भ्रमणध्वनीवर गजर ठेवायची गरज का भासली असती? चला पाहू तरी..' म्हणत मी पडल्या पडल्याच भ्रमणध्वनी उचलला. भ्रमणध्वनीचा एक एक खटका दाबत मी त्या विशेष ठिकाणी पोहोचलो. मीच आठवणीसाठी लिहिलेला संदेश असा होता,
'उठा. असे पाहताय काय नवरोबा? आज तुमच्या लाडक्या बायकोचा वाढदिवस आहे. 'चाखायची असेल गोड डिश, तर बायकोला लवकर करा विश!...' चला. बायकोला विश करूया.' म्हणून मी नेहमीप्रमाणे बायकोच्या दिशेने वळलो. पण आश्चर्य म्हणजे शेजारी माझी पत्नी नव्हती. 'आँ! असे कसे? कुठे गेली ही? दररोज सात नंतर उठणारी ही सहा वाजताच उठली? बरोबर आहे! आज बाईसाहेबांचा वाढदिवस आहे ना, मग मनसोक्त देवपूजा करीत असतील. चला. नाश्त्याला आज काही तरी विशेष डिश मिळणार नक्की. चल. उठ रे, बाबा! अभिनंदन कर, शुभेच्छा दे!' अशा विचाराने मी लगबगीने दिवाणावरून उतरायला गेलो आणि आपण उतारवयाकडे झुकतोय हे माझ्या गुडघ्याने माझ्या लक्षात आणून दिले. पंचेचाळीस वर्षे मी ओलांडली आणि अधूनमधून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव गुडघे स्वतःच करून देत होते. बायकोला विश करण्याच्या नादात घाईघाईने उतरत असताना गुडघ्यात अशी सणकन कळ आली म्हणता मला दुसऱ्या क्षणी पुन्हा दिवाणवर टेकावे लागले. त्यामुळे बायकोला विश करून सरप्राईज द्यावे या माझ्या विचारातला सारा जोम, जोश, उत्साह मावळला. काही क्षणांनी गुडघ्याला हाताने आधार देत कण्हत कुंथत उठलो. हलके हलके पावले टाकत दिवाणखान्यात आलो तिथे बायको नव्हती. स्वयंपाक घरात गेलो. पत्नी देवासमोर हात जोडून उभी होती. मी तसाच मांजराच्या पावलांनी फ्रीजजवळ गेलो. रात्रीच उशिरा आणून ठेवलेला मोगऱ्याचा गजरा हळूच काढला. पाठमोऱ्या उभ्या असलेल्या बायकोच्या गुंडाळलेल्या केसांवर हलकेच ठेवला. तोपर्यंत मोगऱ्याचा वास सर्वत्र पसरला. तो बायकोलाही जाणवला ती गर्रकन वळली. केसांवरचा गजरा हातात घेऊन मनसोक्त वास घेतला. फुलं त्यातही मोगऱ्याचा फुलं म्हणजे तिचा जीव की प्राण! रोज जरी मोगऱ्याचा गजरा आणला तरी तिला कंटाळा यायचा नाही.
"अय्या! मोगऱ्याचा गजरा! आज काय विशेष, अर्धवटराव?"
"तसे काही विशेष नाही पण आज कुणाचा तरी म्हणजे अगदी जवळच्या माणसाचा वाढदिवस आहे. म्हणून म्हटलं..."
"वाढदिवस? जवळच्या माणसाचा? कुणाचा बरे?"
"बाईसाहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..."
"अग बाई, नशीब माझे! तुमच्या लक्षात राहिले म्हणायचे. आणि व्वा! क्या बात है, अगदी टवटवीत, ताज्या, स्वच्छ मोगऱ्यांचा गजरा आणलात. नाही तर..."
"तुला काय वाटले मागे आणला होता तसा कणेरीच्या फुलांचा गजरा आणला? बाईसाहेब, आजच्या दिवशी तरी ती आठवण कशाला? अरे हो, आजही सकाळी सकाळी अर्धवटराव या नावाला जागलोच की. अग, आज मी स्नान केलेले नाही आणि तू अशा सुस्नान अवस्थेत..."
"जाऊ देत ना. एखाद्या दिवशी... त्यात आजच्या विशेष दिनी चालते सारे..."
"अरे, व्वा! ही उपरती कशी म्हणायची? बरे, माझ्या शुभेच्छा स्वीकारल्या ना? नाही तर बोलताना मी विसरून जाईल आणि मग पुन्हा वर्षभर मला तुझी अमृत वचनं ऐकावी लागतात...
"ह्याच का तुमच्या शुभेच्छा?"
"नाही ग. वाढदिवसानिमित्त खूप खूप खुपच शुभेच्छा!"
"धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!!!..." बायको बोलत असताना तिचा भ्रमणध्वनी वाजला. मी बैठकीत आलो. तिचा भ्रमणध्वनी उचलला. त्यावर मुलीचे नाव पाहताच बायकोला स्वयंपाक घरात नेऊन दिला. तिने तो उचलला.
"आई, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! मग आज काय विशेष... स्पेशल डिश!"
"नो स्पेशल डिश! ओन्ली कोरडे विश! अग, मला साखर, आंबट, तिखट जमत नाही आणि तुझ्या बाबांचे तेल- तुपाशी वैर! त्यामुळे काढू काही तरी सुवर्णमध्य!..." ती मुलीशी बोलत असताना दारावरची घंटी किणकिणली.
'यावेळी कोण? ' असे पुटपुटत मी दार उघडले. दारात उभ्या असलेल्या अनोळखी माणसाकडे मी प्रश्नार्थक नजरेने पाहात असताना तो म्हणाला,
"कुरिअर! बाईंसाहेबांच्या नावे आहे."
"इतक्या सकाळी?"
"होय साहेब. पार्टीने ह्याच वेळी डिलिव्हरी द्यायला सांगितली आहे. वॉशिंग मशीन आहे."
"काय? वॉशिंग मशीन?..." असे विचारत त्याने पुढे केलेला कागद घेऊन मी बायकोला सही करायला सांगितले. तोपर्यंत त्याच्या सोबत आलेल्या मुलांनी वॉशिंग मशीन हळूवारपणे आत आणले. आम्ही दोघे आश्चर्याने त्यांच्या हालचाली न्याहळत असताना पुन्हा तिचा फोन खणखणला. तिने उचलताच तिकडून मुलाचाआवाज आला. हिच्या फोनचा स्पिकर नेहमीच चालू असतो.
"आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा! वॉशिंग मशीन मिळाले का?" मुलाने विचारले
"अरे, एकदम मस्त आहे. बाळा, कशाला एवढा खर्च केलास रे? तुझ्या नोकरीला असे किती महिने झालेत बरे. बाबांशी बोल..." असे म्हणत तिने भरलेल्या डोळ्यांनी भ्रमणध्वनी माझ्या हातात दिला.
"हां बेटा. एकदम छान आहे.रंगही खूप सुरेख आहे. ठीक आहे. आईकडून थँक्स! ती तसे खुणावून सांगते. बरे ठेवतो." असे म्हणत मी भ्रमणध्वनी बंद केला. मुलांनी त्यांचे काम संपविले होते. त्यांना बक्षीस दिले तसे ते खुश होत आनंदाने निघून गेले. दार लावून मी बायकोकडे पाहिले. डोळे वाहत असल्याच्या स्थितीत ती वॉशिंग मशीनजवळ गेली. त्या मशिनला मागून पुढून पाहताना ती मशीनवर ओठ टेकवणार तितक्यात मी ओरडलो,
"अग...अग, थांब..." तसे बायकोने घाबरून जागेवरच थांबत विचारले,
"क..क..काय झाले?"
"शॉक लागेल ग?"
"अर्धवटराव, हा पी. जे. खूप जुना झालाय. मला माहिती आहे, की अजून वॉशिंग मशीनची पीन बोर्डात नाही बसवली..."
"बाईसाहेब, पूर्ण ऐकून तर घ्या. अर्धवट ऐकलेले वाक्य पी. जे.असू शकेल. पण शॉक तुला नाही ग वॉशिंग मशीनला बसेल... तुझ्या ओठांचा..."
"महाराज, तुम्ही की नाही, कधी कधी असा काही वात्रटपणा करता ना...जाऊ देत..." असे म्हणत बायकोने वॉशिंग मशीनच्या पूजेची तयारी सुरू केली...
वाढदिवसानिमित्त घरीच जेवणे केली. आराम झाला तशी बायको म्हणाली, "चला. आज बागेत जाऊया. येताना देवदर्शन करून येऊया..."
"मी काय म्हणतो. बागेत जाऊया. देवदर्शन करूया. एखादा मस्त सिनेमा पाहूया आणि सायंकाळचे जेवणही बाहेरच करून येऊया. कसे?" मी लाडात येत विचारले
"व्वा! व्वा! अर्धवटराव! आज बरेच जोशात आलात की."
"फिर आज मेरी बिवी का बर्थ डे जो है।..." मी म्हणत म्हणत तिच्याकडे खास अंदाजात बघत असताना ती लाजून म्हणाली,
"इश्श बाई! असे काय पाहता? कसे तरी होते?..." ती तोंडावर हात देत बोलत असताना तिचा तो कातिलाना अंदाज मी बघत असताना बाहेरून आवाज आला,
"काय चालले आहे? आहात ना घरात?" असे म्हणणाऱ्या माझ्या एका मित्राचे त्याच्या पत्नीसह आगमन झाले. त्यांना पाहताच मी म्हणालो,
"ये. ये. अरे, वहिनी, आज आमचे भाग्य थोर. असा लक्ष्मीनारायणाचा जोडा आमच्या घरी आला. बसा..." असे म्हणत मी माझ्या बायकोकडे पाहिले. तिचा चेहरा थोडा उतरलेला पाहून मीही थोडासा मनोमन उदास झालो.
"का रे, कुठे जायचे होते का? काही विशेष..."
"काही नाही भाऊजी, माझ्यासोबत कुठे बाहेर जायचे म्हटले की यांच्यावर महासंकट कोसळते."
"याचा अर्थ तुम्हाला नक्कीच बाहेर जायचे होते." मित्राची पत्नी म्हणाली
"बसून बसून कंटाळा आला म्हणून बागेत जावे म्हटले तर तुमचे मित्र तयारच होत नाहीत." सौभाग्यवती म्हणाली
"बागेत जाणार ?" असे म्हणत मित्राने त्याच्या बायकोकडे पाहिले आणि दोघेही हसत सुटले. आम्हाला काहीच समजत नव्हते. काही क्षणात हसतच वहिनी म्हणाली,
"बागेत नाही हो...स्.. स्मशा..." ती बोलायचा प्रयत्न करीत होती पण शब्द फुटत नव्हता.
"अरे, हिची आज बागेत जायची इच्छा झाली. मी एका क्षणात तयार झालो पण मनात एक ठरवले की, हिची आज चांगलीच फिरकी घ्यायची." मित्र म्हणाला
"फिरकी? ती कशी?" मी विचारले
"काय झाले भाऊजी, आम्ही तयार होऊन निघालो तेव्हा म्हणाले की, आज तुला नवीन तयार झालेल्या बागेत घेऊन जातो. पण एका अटीवर..."
"कसे होते, हिला मला ज्या ठिकाणी न्यायचे होते त्या ठिकाणी ती सहजासहजी आली नसती म्हणून हिला म्हणालो की, तुला जिथे नेणार आहे, ते सरप्राईज आहे तेव्हा तुझ्या ओढणीने तुझे डोळे बांधूया. मी असे म्हणताच ही थोडी कुरकुर करीत खाली उतरली. मी हिच्या डोळ्यावर ओढणी बांधली. काही क्षणातच आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो..."
"वेळ थोडाच लागला पण मला काहीच दिसत नव्हते, समजत नव्हते. यांचा हात हातात होता म्हणून मी निर्धास्त होते. तिथे पोहोचताच यांनी माझ्या डोळ्यावरची पट्टी काढली. मी हळूच डोळे उघडून आजूबाजूला पाहिले आणि मी हरखून गेले. आम्ही एका अत्यंत सुंदर, आकर्षक अशा ठिकाणी होतो. मी इकडून तिकडे, तिकडून इकडे पाहिले. सर्वत्र फुलांची तऱ्हेतऱ्हेची, मनमोहक अशी झाडे होती. रंगीबेरंगी चित्ताकर्षक फुले होती..."
"ते सारे बघत असताना हिने विचारले की, एवढी सुंदर, लोभस बाग असताना इथे गर्दी का नाही..."
"असे मी विचारत असताना माझे लक्ष एका ठिकाणी गेले. आमच्यापासून थोड्या अंतरावर अंत्यसंस्कार चालू होते..."
"क.. क...काय? म्हणजे ते..." मला पूर्ण बोलू न देता तो म्हणाला,
"होय. ती स्मशानभूमी होती..." म्हणत तो पुन्हा हसत असताना आम्ही सारेच मनमोकळेपणाने हसत सुटलो. मी बायकोकडे पाहिले. तीही हसत असताना मी मनात म्हणालो,
'बायकोबाई, मी पण आज वाढदिवसानिमित्ताने तुम्हाला त्याच बागेत ... स्मशानात नेणार होतो...'
@ नागेश सू. शेवाळकर