उद्धव भयवाळ
औरंगाबाद
बाबूची रागदारी
स्वभावाने थोडा विक्षिप्त असलेला, तरीही आम्हा साऱ्या मित्रांना आवडणारा औरंगाबादच्या आमच्या दोस्त कंपनीतला आमचा दोस्त बाबू लामतुरे हा एके काळी शास्त्रीय संगीतातला नावाजलेला गायक होता, हे आज कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही. "रागदारी ऐकावी तर ती बाबूचीच" असे त्यावेळचे दर्दी रसिक आवर्जून एकमेकांना सांगायचे. बाबूचे शास्त्रीय गायन म्हटले की, रसिकांची गर्दी झालीच म्हणून समजा. शास्त्रीय गायनाचे अनेक पुरस्कार मिळवलेला आणि एकापेक्षा एक अवघड राग आपल्या सुरेल आवाजाने गाऊन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आमचा हा कलंदर मित्र मागील अनेक वर्षांपासून मात्र संगीत क्षेत्रापासून शेकडो कोस दूर आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. असे काय घडले की ज्यामुळे बाबूला आपले आवडते संगीत क्षेत्र सोडून द्यावे लागले, तसेच शास्त्रीय गायनाच्या आपल्या छंदाला तिलांजली द्यावी लागली? हा प्रश्न जसा आज तुम्हाला पडला तसाच बाबूने जेव्हा गाण्यापासून फारकत घेतली असे कळले, त्या वेळी आम्हा मित्रांच्या कंपूमध्येसुद्धा हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण या प्रश्नाचे उत्तर आम्हाला बाबूच्या काही वर्षांपूर्वीच्या शेवटच्या, (हो, दुर्दैवाने अगदी शेवटच्याच) गायनाच्या कार्यक्रमानंतर काही महिन्यांनी मिळाले. बाबूचा "तो" गायनाचा कार्यक्रम रत्नागिरीला झाला आणि तो शेवटचाच ठरला. त्या कार्यक्रमानंतर अनेक महिने बाबू आम्हाला कुणालाच दिसला नाही. तो तिकडेच कोकणदर्शन करीत फिरत असेल असे समजून आम्ही सारे त्याचे मित्र गप्प बसलो आणि आपापल्या दैनंदिन व्यवहारास लागलो. पण योगायोगाने आमच्या मित्रकंपनीतला एक मित्र भीमराव मध्यंतरी मुंबईला जाऊन औरंगाबादला परत आल्यानंतर आम्हाला भेटला आणि त्याची आणि बाबूची मध्यंतरी मुंबईमध्ये भेट झाल्याचे भीमरावने आम्हा मित्रांना सांगितले.
"पण त्यावेळी बाबू जरा गप्प गप्पच वाटला, तो कुठल्या तरी विचारामध्ये हरवल्यासारखा दिसला, माझ्याशी धड नीट बोललाही नाही," भीमराव पुढे म्हणाला.
आम्हा सर्व मित्रांची नेहमी चेष्टा मस्करी करणारा, आम्हाला नवनवीन आयडिया सांगणारा आणि मुख्य म्हणजे पट्टीचा गाणारा बाबू असा एकाएकी कसा काय बदलला असेल या चिंतेने आम्हा सर्वांना ग्रासले. पुढे काही दिवसांनी बाबू औरंगाबादला परत आल्याचे कळले. आम्ही तर त्याची वाटच पाहत होतो. त्याला भेटण्याची, त्याच्याशी गप्पा मारण्याची आम्हा सर्वांनाच खूप ओढ लागली होती. तशातच एक दिवस त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याने आम्हा सर्व मित्रांना नेहमीच्या कट्ट्यावर बोलावले. (बाबूच्या शब्दात "अड्ड्यावर" बोलावले.) तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता. तो म्हणजे 'बाबू आता काय सांगणार आहे?' त्यामुळे सर्वांच्या नजरा बाबूच्या चेहऱ्यावर स्थिरावल्या. बाबू बराच वेळ शून्यात पाहत राहिला आणि नंतर त्याने घसा साफ करून बोलायला सुरुवात केली.
"दोस्तांनो," बाबूने बोलायला सुरुवात केली. "मी एका गायनाच्या कार्यक्रमासाठी रत्नागिरीला गेलो आणि लवकर इकडे परतलो नाही यामुळे तुम्ही सर्व जण काळजी करीत होतात हे मला मुंबईला भीमराव भेटला तेव्हा त्याच्याकडून कळले. पण काय सांगू मित्रांनो, रत्नागिरीला माझा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमानंतर 'आता गाणे कायमचे बंद' असे मी ठरवून टाकले." हे ऐकताच सर्वांच्या भुवया उंचावल्या.
"काय सांगतोस बाबू हे तू? जराही पटत नाही. इतका पट्टीचा गायक तू अन् असा विचार करतोस हे पटतच नाही बघ." पक्या म्हणाला.
"पटत नसलं तरी हे खरं आहे मित्रांनो. आता गायनाला कायमची सुट्टी."
"असं का केलंस बाबू तू?" शिवाने विचारले.
"त्याला कारणही तसंच झालं," बाबू पुढे सांगू लागला.
"रत्नागिरीमध्ये त्या दिवशी मी अगदी भान हरपून गात होतो. तितक्यात अचानक तबलजीने ताल सोडला आणि माझं डोकं सटकलं. खचाखच भरलेल्या त्या हॉलमधल्या मैफलीत माझं गाणं रंगात आलेलं असतांना असा प्रकार घडल्यामुळे माझा खूप विरस झाला. मला त्या तबलजीचा प्रचंड राग आला आणि माझं गाणं अर्धवट सोडून मी खाड्कन तबलजीच्या मुस्कटात लगावली. माझा राग अनावर झाला होता. मग काय, सारे श्रोते भराभरा निघून गेले. नंतरही त्या तबलजीची चांगलीच हजेरी घेतली मी. त्या प्रसंगानंतर मात्र मी खूप नर्व्हस झालो किंवा अंतर्मुख झालो म्हणा. पुन्हा असा अनवस्था प्रसंग भविष्यात ओढवू नये म्हणूनच गाण्याला कायमची सुट्टी देण्याचा कठोर निर्णय घेतला. तुम्ही सर्वजण मला पहिल्यापासून शीघ्रकोपी म्हणता ते थोडं थोडं पटू लागलं. पण मित्रांनो, तरीही माझा असा दावा आहे की, मला राग येतच नाही."
बाबूच्या तोंडून "मला राग येतच नाही" हे वाक्य ऐकताच सर्वजण एकदम फस्सकन् हसले. कारण बाबूचा रागीट स्वभाव आम्हा सर्वांनासुद्धा चांगलाच परिचयाचा होता.
"काहीही ठोकू नकोस बाबू. तू रागीट आहेस हे काय आम्हाला माहित नाही काय? तसं नसतं तर तू त्या तबलजीशी असा वागलाच नसता." गजानन पटकन म्हणाला.
"अरे, हा तुमचा गैरसमज आहे. मी मुळात खूप शांत स्वभावाचा आहे. पण कुणी मला राग येईल असं वागलं तर मात्र मी माझा राहात नाही हे मात्र खरं आहे." बाबू म्हणाला.
"आम्ही ऐकून घेत आहोत म्हणून काहीही सांगू नकोस. तू कसा आहेस हे आम्ही सारे चांगलेच जाणतो." विनू बोलू लागला, "त्या दिवशी मी आणि पक्या तुझ्या घरी आलो तेव्हा तुझा चष्मा सापडत नव्हता म्हणून सारं घर डोक्यावर घेतलं होतंस तू. वहिनींवर किती चिडला होतास तू! त्याचप्रमाणे एकदा तू आणि वहिनी पुण्याहून 'विना थांबा' एक्सप्रेस बसने औरंगाबादला येत असतांना त्या प्रवासादरम्यान लागणाऱ्या गावांची नावं कोणती हे तुला हवं होतं पण त्या गावांमधील कुठल्याही पाटीवर गावाचं नाव लिहलेलं नाही हे बघून तुझा रागाचा पारा कसा चढला होता हेसुद्धा वहिनींनी सांगितलं आम्हाला. कारण काय तर म्हणे, कोणतं गाव मागे पडलं हे तुला कळेना. तू शेजारच्या सीटवरील प्रवाशाला विचारलं तर त्यालाही माहित नव्हतं कुठलं गाव गेलं ते. तर तू त्याच्यावरच भडकला. काय तर म्हणे रस्त्याने कुठली कुठली गावं लागतात हे तुला कळायलाच हवं. मी म्हणतो, कशाला कळायला हवं? मी तर बसमध्ये बसलो की, सरळ डोळे मिटून घेतो आणि आपलं गाव आल्यानंतरच डोळे उघडतो. मध्ये कोणकोणती गावं गेली याची माहिती घेऊन करायचं काय? पण तुझं तसं नाही. तुला सगळं कळायलाच हवं." विनू म्हणाला.
"तू म्हणतोस ते खरं आहे. प्रवासामध्ये असतांना कोणकोणती गावे गेली हे माहित करून घेण्याचा मला छंदच आहे. गावाचं नाव नाही कळलं की मी परेशान होतो. मला हे समजत नाही की, वेगवेगळ्या व्यवसायाच्या इतक्या पाट्या प्रत्येक गावात प्रत्येक दुकानासमोर असतात पण नेमकं गावाचं
नावच टाकलेलं नसतं. मग माझं डोकं भडकतं. त्यामुळेच तर त्या दिवशी मी त्या सहप्रवाशावर भडकलो. कारण बस ज्या गावावरून जात होती, त्या गावाचं नाव त्याला विचारलं तेव्हा तो पेपरात डोकं खुपसून बसला होता आणि वर मला म्हणतो कसा, 'मला नाही माहित. मी पेपर वाचतोय हे दिसतंय ना?' मग मी जाम भडकलो त्याच्यावर. पण मुळात मी शांत स्वभावाचाच आहे असा माझा दावा आहे."
"अशी सगळी तुझी कीर्ती तूच सांगतोस आणि पुन्हा वर म्हणतोस की तू शांत स्वभावाचा आहेस. तुझी पण कमालच आहे बाबू." विनू म्हणाला.
"त्याचं काय आहे, मी स्वभावाने शांतच आहे. पण मला जर कुणी इरीटेट केलं, तर मात्र माझं डोकं फिरतं. एक उदाहरणच देतो. आता हेच बघा ना, एक दिवस मला माझं "पॅन कार्ड" कुठे ठेवलं तेच आठवेना. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मनात म्हटलं, उद्या शोधू. त्यानुसार रविवारी सकाळी नित्याची सर्व कामं आटोपून, जेवण करून दुपारी "पॅन कार्ड" शोधण्याची मोहीम हाती घेतली. सौ.ला सुद्धा मी या कामाला लावलं. आम्ही दोघेजण "पॅन कार्ड" शोधीत होतो. या शोधकार्यामुळे सगळ्या वस्तू घरामध्ये अस्ताव्यस्त पडल्या होत्या. साधारणत: दुपारचे दोन वाजले असतील. "पॅन कार्ड" काही सापडत नव्हतं. त्यामुळे आम्ही दोघेही अगदी मेटाकुटीला आलो होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. 'इतक्या भर दुपारी कोण कडमडलं?' असे मी मनाशी म्हणत दार उघडलं, तर समोर रंगा म्हणजे आपला रंगनाथ उभा. तुम्हाला तर सर्वांनाच माहित आहे की, रंगा कुणाकडे कधी जाईल याचा नेमच नसतो. वेळी अवेळी दुसऱ्याकडे जाणं हा त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे जणू. मी दार उघडताच रंगाने अगदी सहज विचारले,
"आराम चालला होता वाटतं? मी तुमच्या आरामात व्यत्त्यय तर नाही ना आणला?" हे ऐकताच माझा असा संताप झाला म्हणून सांगू. मी मनात म्हटलं, आम्ही कोणत्या परेशानीत आहोत आणि हा काय मूर्खासारखं विचारतो की, "आराम चालला होता वाटतं? मी तुमच्या आरामात व्यत्त्यय तर नाही ना आणला?"
मी पण मग मला आलेला सगळा राग गिळून, दिलं ठोकून, " नाही, तसं काही नाही. मी आणि माझी बायको पतंग खेळत आहोत घरात." तर तो लागला फिदीफिदी हसायला अन् मलाच उलट विचारू लागला, "बाहेर ऊन आहे म्हणून घरातच पतंग खेळताय वाटतं?" हे ऐकताच मात्र माझ्या रागाचा पारा चढला. मी त्याला घरामध्ये येऊ दिला आणि मग अशी घेतली त्याची हजेरी की काही विचारू नका. आता मला तुम्ही सांगा की यात माझं काय चुकलं. माझ्या जागी कुणीही असता तर हेच केलं असतं ना? आधी आपणच काहीतरी समोरच्याला रागात आणण्यासारखं बोलायचं आणि समोरचा रागावला म्हणजे तो फारच रागीट आहे असं त्याला लेबल चिकटवून मोकळं व्हायचं. हा कुठला न्याय? बरोबर बोलतोय ना मी?"
"अरे, हो रे बाबा, खरंय तुझं सगळं. पण कसं आहे, तुझं आतापर्यंतचं आमच्याशी किंवा कुणाशीही वागणं कसं असायचं याचा जरा विचार कर. थोड्या थोड्या गोष्टीवरून चिडणं, पटकन रागात येणं आणि रागात आला म्हणजे तोंडाला येईल ते बोलणं या गोष्टी काय आम्हाला माहित नाहीत? त्यामुळेच तुला आम्ही सर्वांनी 'शीघ्रकोपी' ही पदवी प्रदान केलेली आहे, हे विसरलास वाटतं. म्हणूनच या केसमध्ये तुझं कितीही खरं असलं तरी "शीघ्रकोपी' हा शिक्का तुझ्यावर बसल्यामुळे, तू रागीट आहेस हेच सारेजण म्हणणार. नाही का? त्या रागीटपणामुळे तू स्वत:चं किती नुकसान करून घेतो आहेस हे तुला कळतं का?" शिवा बोलला.
"त्याला सारं कळतं पण वळत नाही. म्हणूनच तर त्याने त्या रत्नागिरीच्या कार्यक्रमात तबलजीच्या श्रीमुखात भडकावली अन् रागारागात गाणंही सोडून दिलं अन् रागदारीला कायमचा रामराम ठोकला." रघू म्हणाला.
" बाबू, तू काही म्हण, पण तुझ्या रागाने तुझ्या रागदारीचा जीव घेतला आणि महाराष्ट्र एका चांगल्या गायकाला मुकला." गजा म्हणाला.
अशा प्रकारे बाबूच्या रागीट स्वभावाबद्दल एकानंतर एक सर्वांनीच आपापली मते मांडायला सुरुवात केली, तेव्हा मी सहज बाबूकडे बघितले तर त्याच्या चेहऱ्याचे रंग बदलू लागलेले होते. त्याचा क्रोधाग्नी केव्हाही बाहेर पडेल हे मी ताडले. काही अनर्थ घडण्यापूर्वीच मी एक वाक्य बोललो आणि त्या माझ्या वाक्याने जादूच केली. मी म्हणालो, "पुरे करा रे, का छळता त्या बिचाऱ्याला? का तुम्हालासुद्धा त्या तबलजीसारखा प्रसाद हवाय बाबूकडून?" मी असे म्हणताच सारेजण एकदम गप्प झाले अन् बाबूच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. पण कसा कोण जाणे, बाबू एकदम नॉर्मल झाला अन् म्हणाला, "अब क्या मुझे रुलाओगे क्या यार? चला मस्त चहा घेऊ. आजचा यजमान मात्र मी आहे हे लक्षात ठेवा नाहीतर...."
"नाहीतर त्याला पुन्हा राग येईल. हो ना बाबू?" रघू म्हणाला; अन् बाबूसकट सगळेच जोरात हसू लागले.
**********
उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००५
मोबाईल: ८८८८९२५४८८
email: ukbhaiwal@gmail.com