मला काही सांगाचंय...- १६-२ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय...- १६-२

इकडे रुग्णवाहिका कुमारला घेऊन पोहोचली .... वॉर्डबॉय त्याला चाकांच्या बेडवर ठेवून आत न्यायला लागले सोबत त्याचे वडील आणि सुजीतचे वडील मागे मागे जात होते ... दवाखाना अगदी स्वच्छ आणि सर्व सोयीसुविधायुक्त असल्याचे त्यांना दिसून आले .... त्याचे रिपोर्ट डॉक्टर वैद्य यांनी आधीच पाहिले होते म्हणून त्याला ICU मध्ये दाखल करण्याचे सांगितले होते .... त्याला ICU मध्ये दाखल केले तोच डॉक्टर , नर्स यांनी त्याला तपासून त्याची अवस्था समजून घेत त्याला आवश्यक ते इंजेक्शन , सलाईन लावून ते बाहेर आले . कुमारच्या वडिलांची भेट घेऊन त्याला निरीक्षण करण्यासाठी आज रात्रभर ठेवू आणि उद्या सकाळीच ऑपरेशन करू काळजीच कारण नाही ... सर्व ठीक होईल...असे डॉक्टर वैद्य यांनी सांगितले ...

थोड्याच वेळात कुमारची आई, प्रशांत आणि आकाश सुध्दा दवाखान्यात पोहोचले ... सरकारी आणि खाजगी यातील फरक पायरी चढून तिथल्या फरशीवर पाय ठेवताच त्यांना जाणवला . पुढे जात असता प्रशांत आणि आकाश समोरच inquiry counter आणि आजूबाजूला केलेली उत्तम रंगरंगोटी , waiting करीता हॉलमध्ये TV लावलेला असून बसण्याची केलेली सोय हे सगळं त्यांच्यासाठी नवीन होतं... समोर चालत जात असता मध्येच नर्सनी त्यांना थांबवून कुणाला भेटायचं आहे असा प्रश्न विचारला .... तेव्हा कुमारचं नाव सांगितल्यावर नोंदवहीत त्यांची नावे लिहून त्यांना आत प्रवेश दिला....


मग पाच दहा मिनिटांनी सुजित , तिला घेऊन तिथे पोहोचला पण आत प्रवेश केला आणि त्यांना waiting करिता थांबवून ठेवलं ... एकाचवेळी इतके जण रुग्णाला भेटायला जाऊ शकत नाही ...!

असा नियम असल्याचं नर्सने सांगितलं ... मग काही वेळानंतर सुजितने कॉल करून प्रशांत आणि आकाशला बोलवून घेतलं .... ते परत आल्यावर यांना कुमारला भेटायला ICU कडे जाता आलं ... सुजित आणि ती तिथं आले , बाकी सर्व तेथून थोड्या दूर खुर्चीवर बसून होते ... ते दोघे जण ICU च्या दाराजवळ गेले , तिथे खुर्चीवर एक नर्स बसून होती . तिने त्या दोघांना तिथेच थांबवलं ....

" कुणाला भेटायचं आहे तुम्हाला ..? "


" कुमार ... ज्याला आत्ता थोड्यावेळापूर्वी दाखल केलं .." सुजित


" सॉरी पण तुम्ही त्याला भेटू शकत नाही , त्याची कंडिशन सिरीयस आहे प्लिज ... इथूनच पहा हवं तर "


आता काय करावं त्यांना काही सुचेना दाराच्या काचेतून नीटसं काही दिसत नव्हतं .... त्यात सुजितने त्याला पाहिलं होतं पण ती इतक्या दुरून आली आणि तिला कुमारला असं दुरून पाहावं लागणार हे काही त्याला पटलं नाही ... म्हणून तोच सुजित पुढे होऊन -


" मॅडम , प्लिज हिला आत जाऊ द्या मी नाही भेटत हवं तर ..."


" नाही , नाही म्हटलं ना मी . "


" प्लिज मॅडम ती खूप दुरून आली आहे त्याला पहायला , तिला परत जायचं आहे आजच .. प्लिज प्लिज ..."


त्याच्या विनवण्या ऐकून त्या नर्सने परवानगी देत .. " जा पण लगेच परत या जास्त वेळ आत थांबू नका आणि त्याला त्रास होईल असं काही करू नका "

त्यावर दोघांनी मानेनेच होकार दिला , ती आत त्याला पाहायला गेली ... चार वर्षे झाली , तिने त्याला शेवटचं पाहिलं होतं पण आज असं अचानक त्याला भेटावं लागेल आणि ते हि अश्या अवस्थेत ... असं मनातच स्वतःशी म्हणत ती त्याच्याजवळ गेली ... कितीतरी दिवसांनी ती त्याचा चेहरा पाहत होती , बहुदा हा तो नसावा असं तिला वाटून गेलं ... चार वर्षे लोटली सगळंच बदललं होतं , आजूबाजूचे वातावरण, वेळ, परिस्थिती, नातं आणि बरंच काही , मग चेहरे सुध्दा बदलणार .... असे विचार मनात येत असता ती त्याला न्याहाळून पाहत होती त्याची झालेली अवस्था तिला बघवत नव्हती ... समोरच जरा धूसर दिसत असल्याचं तिला जाणवलं तर पापण्या ओल्या होऊन आसवं डोळ्यात तरळत असल्याचं तिला कळलं ... लगेच आसवं टिपत ती हलकेच त्याच्या हाताला स्पर्श करून , त्याच्या प्रतिसादाची वाट पाहत होती पण तो काहीएक हालचाल करत नाही तिला समजलं आणि ती बाहेर आली ...


ती बाहेर आल्याचं पाहून सुजित तिच्याजवळ गेला ... तिने आसवं जरी पुसले पण त्यांनी स्वतःचं अस्तित्व अजून तिच्या पापण्यांखाली टिकवून ठेवलं होतं , तिला जरा बोलतं करावं असं वाटून तो म्हणाला ....


" पाहिलं त्याला ? " तिच्या नजरेला नजर देत


त्यावर तिने नुसतं मान हलवून " हं " इतकंच म्हटलं .

मग तो तिला घेऊन कुमारच्या आईजवळ आला , ती माऊली समोरच एक मुलगा आणि त्या मुलाची आई त्याला भरवत असल्याचं पाहून मनातच कुमारला जेवू घालता यावं या कल्पनेने कदाचित ... तिला पुन्हा गहिवरून आलं ... त्याने जवळ जाताच ....


" काकू , काकू ..." सुजित आवाज देत


आसवं पदराला पुसून वर पाहत " सुजित आलास तू ? " ती म्हणाली


" हो काकू , अन सोबत बघा कोण आहे ते .... " तो म्हणाला


तिने बाजूला पाहिले ... " तू कधी आलीस ? तुला कस कळलं ? "


" आत्ताच आले काकू , सुजितने फोन करून मला सांगितलं ... "


मग तिला बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगून त्याने पाठीवरची बॅग दुसऱ्या बाजूला ठेवली ... तो त्याच्या वडिलांजवळ गेला ...


ती कुमारच्या आईजवळ बसली आणि तिला धीर देत ...


" लवकरच बरा होईल कुमार . तुम्ही सांभाळा स्वतःला ... "


" हो पण कसं सांभाळू मी मला ? कालपासून पोरं तसंच झोपून आहे . साधा डोळा त्यानं अजून उघडला नाही की शब्दानं बोलला नाही ..."


आता मात्र काय बोलावं तिला कळत नव्हतं . तिने खांद्यावर हात ठेवून थोपटत तिला जवळ घेतलं ...

तसा हुंदका देत ती आणखी व्याकुळ झाली आणि अनावर होऊन रडत , सांगू लागली .... माझा कुमार अगदी साधा आहे कधी कुणाशी भांडण नाही की दोनदोन शब्द म्हणून कुणाचं मन दुखावत नाही , आम्हाला वर आवाजात कधी बोलला नाही , का म्हणून ही वेळ आमच्यावर आली ते कळत नाही .... बरं ' तो ' परीक्षा पाहतो कि काय नियतीला ठाऊक , पण मी काय काही कमी करते ' त्याच ' .. तरी माझा कुमार आज असा पडून आहे ...


असं बरंच काही ती मनमोकळं बोलत होती ... तिला आता कुठे जरा आधार मिळाला होता , त्यामुळं तिचं मन हलकं झालं ... प्रशांत आणि आकाश समोरच्या बाजूला एका रांगेत ठेवलेल्या खुर्चीवर बसून होते.... ते जवळ येऊन तिला धीर देत होते ...


अर्धा पाऊण तास झाला , डॉक्टर देवांश वैद्य कुमारला तपासून परत जात असतांना... त्याचे रिपोर्ट कुठे आहेत ? असं डॉक्टर वैद्य यांनी विचारलं ... तेव्हा सुजित कुमारचे रिपोर्ट बॅगमधून काढून घेऊन आला त्यावेळी बॅगमधून डायरी खाली पडली तर घाईघाईत ती डायरी आकाशला बॅगमध्ये ठेव असं सांगून त्याने ते रिपोर्ट डॉक्टरांना दिले ... अन तो तिथंच बाजूला उभा राहिला , डॉक्टर त्यावर एक नजर फिरवून ....


" सगळं नॉर्मल आहे , उद्या सकाळी कुमारचं ऑपरेशन होईल . ठीक आहे , तुम्ही २५००० हजार रुपये जमा करून घ्या बाकी ऑपरेशन झाल्यानंतर , सुटी व्हायच्या आधी द्यावे लागतील ..." असं म्हणत डॉक्टर वैद्य ते रिपोर्ट सोबत घेऊन केबिनमध्ये गेले ...

कुमारचे वडील जरा खाली बसले , सुजितचे वडील त्यांच्या जवळ येऊन म्हणाले...

" चला , पैसे जमा करून घेऊ "


" हे तर २५००० हजार रुपये जमा करा म्हणताहेत ... तुम्हाला माहिती आहे जवळ फक्त २०००० च आहेत ... आता काय करायच ? "


त्यांना धीर देत " तुम्ही काळजी करू नका , मी सोबत आणले आहेत काही तुम्ही चला तर खरं ... "


मग दोघे सुजितला सोबत घेऊन काउंटर जवळ आले ... आवश्यक ती माहिती भरून सुजितने फॉर्म सबमिट केला तर त्याच्या वडिलांनी ५००० रुपये खिश्यातून काढून कुमारच्या वडीलांना दिले असे २५००० रुपये त्यांनी जमा केले ... तिघे ICU कडे परतले ...


ते दोघे जरा हॉलकडे जायला निघाले तर सुजित त्या दोघी बसल्या होत्या तिथं येऊन त्यांच्या बाजूला उभा राहिला ...


तेव्हा जवळ जवळ 4 वाजून गेले होते , ती कुमारच्या आईला मी आलेच असं म्हणत सुजितकडे आली ...


" सुजित , काय म्हणाले डॉक्टर ? "


" रिपोर्ट नॉर्मल आहे आणि उद्या सकाळी ऑपरेशन करणार असं म्हणाले ... "


" खूप लागलं कुमारला ....... "


" हो ना कसं झालं काही कळत नाही "


जरावेळ दोघंही शांत राहिले ... मग मोबाईल मध्ये वेळ पाहत ती म्हणाली ..

" मला निघायला पाहिजे . मी घाईघाईत माझ्या ह्यांना न सांगताच इकडे आले तर उशीर व्हायच्या आधी मी घरी जायला हवं ...."

त्यावर तो म्हणाला...

" ठीक आहे , चल मी तुला बस स्थानक येथे सोडून परत येतो ..."


" जाईल मी तू राहू दे .."


" चल मी येतो सोबत ... "


मग तिने त्याच्या आईचा निरोप घेत , काळजी करू नका , सर्व ठीक होईल , तो लवकर बरा होईल असं म्हणत तिने बाजूच्या खुर्चीवर ठेवलेली हँडबॅग उचलली ... प्रशांत जवळ जाऊन त्याला काळजी घे , तुझी आणि काका काकूंची सुध्दा ... त्याच्या आई वडिलांना ' येते मी ' असं म्हणत परत जायला निघाली ....


सुजित तिला घेऊन बस स्थानकाकडे दुचाकीने जात होता ... तिला कुमारच्या डायरीबद्दल सांगावं असं राहून राहून त्याच्या मनात येत होत पण नेमकं तिला कसं सांगावं ? काय काय सांगावं ? त्याला कळत नव्हतं ... विचार करत असताना तो बस स्थानक जवळ पोहोचला त्याच्या लक्षात आलं नाही तेव्हा त्याला आवाज देत तिने त्याला दुचाकी बाजूला थांबवायला सांगितलं ...

तशी दुचाकी बाजूला लावून तो तिला बस पर्यंत सोडून द्यायला तिच्यासोबतच गेला ... तिला सर्व सांगून टाकावं असं वाटून त्याने बसमध्ये चढतेवेळी तिला म्हटलं ...

" जरा थांबशील पाच मिनिट ... "


" काय झालं ? सुजित "


नेमकं काय म्हणावं आता ? हाच प्रश्न त्याला रोखून होता ... तरी तो समोर आला ...

" काही नाही , व्यवस्थित जा आणि पोहचल्यावर मला फोन कर ... कुमारच्या नंबर वर फोन केला तरी चालेल त्याच सिमकार्ड माझ्याच मोबाईल मध्ये आहे .... "


" हो बरं येते मी ... काळजी घे , मी येईल परत ... त्याला भेटायला " म्हणत ती बसमध्ये चढली आणि सीटवर बसली


खिडकीतून त्याला हात हलवून बाय करत तिने जाते असा इशारा केला ... काही वेळातच बस सुरु झाली आणि प्रवाश्यांना घेऊन जायला लागली .....