मला काही सांगाचंय... - २१ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय... - २१

२१. आनंदाश्रू

सुजितच्या मनात आलेला प्रश्न तसाच राहीला आणि तिच्या मनातला सुध्दा ... मोबाईल वरचा संवाद संपला ... तिने मोबाईल बाजूला ठेवला , कुमारने डायरीत अजून काय लिहिलं याचं कुतूहल प्रत्येक क्षणाला वाढतच होत ..... मनात येणारे विचार दूर सारून तिने पुन्हा डायरी उघडून वाचायला सुरुवात केली.. ... ... ...


कुमारने लिहिलं होतं ...

बारावीचं वर्ष ... माझं कॉलेज सुरु झालं होतं आणि तिचं सुध्दा , मग काय सोबतच कॉलेजला जाणं , येतेवेळी सोबतच घरी येणं असा रोजचा दिनक्रम .... आमची मैत्री आणखी घट्ट झाली , तिचा सहवास मला जास्तच आवडायला लागला होता पण मनात प्रेम वगैरे अस काहीएक नव्हतं .. . खरं तर मला तोवर प्रेम म्हणजे काय ? हे सुध्दा ठाऊक नव्हतं ... पण ती सोबत असली की बाकी कशाचं भान उरत नव्हतं , मी कित्येकदा तिला पाहत सर्वकाही विसरून जात होतो .. तिचं बोलणं झालं की तिला उत्तर द्यायचं राहून जायचं ... तिच्याशी बोलतांना , पंख पसरून पाखरांनी आकाशात उंच भरारी घेतली असा देखावा जणू नजरेसमोर आहे आणि एका क्षणाला पापणी न लवता त्यांना पाहत राहावं अस भासत होतं ...

एक दिवस ... मला घरून निघायला जरा उशीर झाला .. ती समोर गेली असेल या विचाराने मी घाईघाईत सायकल चालवत जात होतो ... पण ती दिसत नव्हती , थोड्या वेळेसाठी वाटलं की ' बहुतेक ती आज कॉलेजला येणार नाही ... कदाचित काही कामं असेल म्हणून लवकर गेली असेल ... आज जाता जाता भेट होणार नाही ... ' असं मनात काहीसं चाललेलं ... सायकल हळू चालवत वळण घेतलं आणि समोर बघतो तर काय ? ती समोरच होती ... सायकल थांबवून स्टँडवर उभी केलेली होती , ती खाली उतरून काहीतरी करत असल्याचं दुरून दिसत होतं ... काहीतरी गडबड नक्की झाली मला समजलं ... मी तिच्याजवळ पोहोचेपर्यंत ती दोन तीन वेळा त्रासून एक पाय जोरात रस्त्यावर आपटत इकडे तिकडे बघत असल्याचं दिसून आलं ...


तिच्या जवळ जाताच मी सायकल थांबवून नेहमीप्रमाणे एक पाय खाली टेकवून थांबलो ... ती खाली वाकून काहीतरी करत होती पण ती काय करत होती तिकडे माझं लक्ष नव्हतं तर तिच्या कपाळावर आलेले थेंब सूर्यकिरणाच्या प्रकाश्याने किती चमकत होते आणि एकटक खाली पाहत असल्याने तिच्या पापण्या कितीतरी पटीने जास्त मोहक वाटत होत्या ... तिथं माझं सारं लक्ष लागलं होतं ...

इतक्यात ती बहुतेक स्वतःशीच पुटपुटली

" छे ! आता काय करु ? " म्हणत तिने वर पाहिलं ...


" गुड मॉर्निंग , किर्तीप्रिया "


" जाता जाता नसती उठाठेव , कसली गुड मॉर्निंग ? "


जसं मला काहीच माहित नाही असं दाखवत ..." का बरं ? काय झालं ? "


" तुला काय दिसत नाही ? सायकलची चैन पडली ... "


" अस्स होय ... मला वाटलं काहीतरी हरवलं ... ते तु शोधत आहे ..."


त्यावर काहीएक न बोलता , ती चैन बसविण्याचा प्रयत्न करत होती ... हात खराब होऊ नये म्हणून अगदी बोटांच्या टोकाने चैन पकडून पैडलच्या चाकावर त्या लहान लहान खाच्यावर चैन चढविण्याचा तिचा अपयशी प्रयत्न सुरूच होता ..


तिला कदाचित वाटलं असेल की मीच समोर होऊन तिला मदत करेल पण मी मनात विचार केला की जरावेळ तिलाच प्रयत्न करू द्यावा ... बघू तिला जमते कि नाही ..? गंमत म्हणून नाही तर मागे पुढे परत कधी अशी वेळ आली तर तिला चैन बसविता यायला पाहिजे ...


पण तिला कदाचित वाटलं असेल की मी जाणून बुजून तिची फजिती पाहत तिथं थांबलो ... तिला चैन चढवायला जमतच नव्हतं मध्येच एखादा तीक्ष्ण नजरेचा कटाक्ष माझ्याकडे बघून पुन्हा प्रयत्न करत होती पण ' मदत कर ' असं काही म्हणत नव्हती मी आणखी काही वेळ वाट पाहिली पण तिला काही ते जमलं नाही ... एवढ्यात मला समजलं की ती काही मदत मागणार नाही आणि एक नजर घड्याळ पाहून , कॉलेजला उशीर होईल असे लक्षात आलं ... तरी मी तिला म्हटलं ...


" जमेल , जमेल पुन्हा एकदा प्रयत्न कर "


जरा रागात " तू जा , तुला उशीर होईल ... "


मग मीच माझी सायकल बाजूला उभी केली ...


" तू जरा ऊठ , मी बघतो .... जमते कि नाही "


ती एकही शब्द न बोलता झटकन बाजूला झाली ... चेहरा ओढणीने पुसून उभी राहून पाहत होती ... जसा आधी मी उभा होतो तशीच ...


मी पुन्हा एकदा किती वाजले म्हणून घड्याळ पाहिलं ... 5 - 10 मिनिटं आणखी थांबलो तरी विशेष असा जास्त उशीर होणार नव्हता म्हणून मी जरा धडपड करावी लागत आहे असं दाखवून रुमालाने घाम पुसला आणि जोर लावून कशी तरी चैन चढवली ... तिला समाधान वाटलं ... पण चेहऱ्यावर राग तर होताच मग तिने " थॅंक यू कुमार " एवढं म्हटलं ... मी मानेनेच प्रतिसाद दिला ...


माझे हात ऑइल लागल्याने खराब झाले होते , समोरच काही अंतरावर हातपंप असल्याने मी तिकडे गेलो तर ती लगोलग माझे पाठीमागेच आली आणि हात धुवायला मदत म्हणून तिनेच पाणी हपसलं ... आम्ही कॉलेजला जायला निघालो होतो ... काही वेळातच कॉलेजला पोहोचलो ... दोघेही आपआपल्या वर्गात गेलो आणि परत येतांनी सोबतच घरी आलो ...


मला घाई झाली होती कधी एकदा कबीरला जाऊन भेटतो आणि आज झालेली गंमत त्याला सांगतो .... घरी आल्यावर मी सरळ कबीर जवळ गेलो ...


" कबीर ..... कबीर ... " धावतच त्याच्याजवळ पोहोचलो ...


" तुला सांगू , कबीर ... आज काय झालं ?? "


माझा दोस्त हलकेच पान हलवून जणू मला विचारत होता ... " आज नवीन ... कामगिरी बजावली ..? "


मी त्याला टेकून बसलो आणि जातांनी जे काय झालं ते सर्व त्याला सांगितलं ... मला हसायला आलं ...


कबीर .....


खरं तर मी जोरात एक उलटं पैडल मारलं असतं आणि एक दोन सेकंदात चैन ठीक झाली असती ... मी असाच इतक्या वर्ष्यापासून सायकल चालवत नाही .... माझ्या सायकल ची कधी चैन पडली तर मी चालू सायकल मध्येच भराभर उलटे पैडल फिरवून चैन चढवून घेत होतो ... पण तिची त्यावेळी थोडं मस्करी करावं असं वाटलं आणि मी हळूहळू चैन चढवित असतांना पाहून कदाचित तिला सुध्दा आता अश्यावेळी काय करायचं ते समजलं असेल ...


जरावेळ तसाच कबीर सोबत बसून राहिलो ... कधी नव्हे ते अचानक डोळे मिटले , तो क्षण पुन्हा एकदा नजरेसमोर आला आणि मी देखाव्यात हरवलो ... काही वेळाने जाग आली , सूर्य केव्हाच मावळला होता ... माझ्या जिवलग दोस्ताचा निरोप घेऊन घरी परतलो ...

एकदा असच सुटीच्या दिवशी ... माझा वाढदिवस नेमका त्याच दिवशी होता ... सर्व मित्रांनी शुभेच्छा दिल्या ... मी आनंदी होतो पण मला आणखी आनंद झाला असता जर ती मला शुभेच्छा देण्याकरिता आली असती ... कबीर च्या सहवासात असतांना ... मनात विचार आला , तिच्याशी मैत्री झाली , जवळपास एक वर्ष पूर्ण झालं असेल ... पण अजून तिला माझा वाढदिवस माहित नाही ... अन दुसऱ्याच क्षणाला माझ्या लक्षात आलं की मला सुध्दा तिचा वाढदिवस माहित नाही ... मला आज माझं हसू आलं .... नंतर मात्र मी ठरवलं की तिचा वाढदिवस माहीत करून घ्यायचा , तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ... पण तिला न विचारता तिच्या नकळत हे मला माहित करून घ्यायचं होतं ... मग आता काय करावं आणि कसं ?


बराचवेळ विचार करून मला त्यावर उपाय सुचला ... लगेच कबीरला सांगत मी स्वतःला शाबासकी दिली आणि मोहीम सुरू झाली .... शोध जन्मतारखेचा ... ! तिचं कॉलेजचं ओळखपत्र मिळालं तर अगदी सहज तिचा वाढदिवस कधी आहे ते कळेल ... अस वाटून गेलं आणि मी माझा प्रयत्न सुरु केला पण त्यात मला यश मिळालं नाही ...


एक आठवडा निघून गेला पण मोहीम काही पूर्ण झाली नाही ... रोजच्या प्रमाणे त्यादिवशी सोबतच दोघे कॉलेजला जायला निघालो होतो ...


" कुमार .... जातेवेळी एक काम आहे , तू सोबत येणार ? तुला कॉलेजला जायला उशीर होत नसेल तर ... "


" हो येतो की सोबत , कुठे जायच आहे ? "


" आपल्या शाळेत ... पाच मिनिटांचे काम आहे ... "


सायकल जोरात चालवत आम्ही शाळेत पोहोचलो ... सोबतच शाळेच्या कार्यालयात जाणार इतक्यात माझे दहावीचे वर्गशिक्षक समोरून येत होते म्हणून मी बाहेरच त्यांच्याशी गप्पा मारत थांबलो होतो ... वर्गशिक्षक निघून गेले आणि काहीवेळात ती हातात काहीतरी घेऊन बाहेर आली .... जवळ येताच तिने माझ्या हातात प्रमाणपत्र देत ....

" कुमार ... हे दोन एक मिनिट तुझ्या हातात ठेव , मी बॅग उघडते "


मी ते प्रमाणपत्र हातात घेऊन -


" हे तर बोर्ड सर्टिफिकेट आहे ... "


" हो .. माझं घ्यायचं राहून गेलं होतं "


त्यावरून नजर फिरवत असता मला नकळत त्यावर तिची जन्मतारीख लिहिलेली दिसून आली ... मोठ्या आणि स्पष्ट अक्षरात ... त्यावेळी आश्चर्य आणि आनंदाचा गोड अनुभव आला होता ....


मग आम्ही तेथून कॉलेजला जायला निघालो आणि काही वेळातच पोहोचलो .... मी सवयीप्रमाणे ओळखपत्र बाहेर काढून गळ्यात टाकलं ... मागे वळून एक नजर तिच्याकडे बघितलं आणि समोर चालत चालत वर्गात गेलो ... वर्गात तास सुरु असताना मध्येच तिचा वाढदिवस मनात यायचा ... अन बरंच काही .... ..... सर्व तास संपले होते , कॉलेजला सुटी झाली आणि दोघे सोबतच घरी परतलो ... हात पाय धुवून सरळ कबीर जवळ , कधी एकदा आनंदाची बातमी त्याला सांगतो अस होऊन गेल होतं . ...


" कबीर ... कबीर ... तिचा वाढदिवस मला माहिती झाला ... 18 एप्रिल ..."


आनंदाने त्याला सर्व घडला प्रकार सांगितला ... जरावेळ त्याच्याजवळ विसावलो ..


त्या दिवसानंतर चार पाच दिवस लोटले होते ... तेव्हाची गोष्ट ... वर्गात दोन तास झाल्यावर 15 मिनिटांची सुटी ची बेल वाजली ... नोटीस बोर्ड वरची सूचना वाचतेवेळी , बाजूच्या खिडकीत ठेवलेला एक लहान बॉक्स माझा धक्का लागल्याने खाली पडला ... मी तो तसाच टाकून तेथून जाऊ शकलो असतो पण मी तसे केलं नाही . ऑफिसात आतमध्ये जाऊन तो बॉक्स उचलून टेबलवर ठेवला आणि त्या बॉक्स मधील खाली पडलेली ओळखपत्र परत त्यात टाकत होतो ... आणि योगायोग कि काय कळलं नाही तिचं ओळखपत्र माझ्या हाती लागलं . काही क्षण मी तसाच एकटक पाहत होतो ... बेल वाजली अन मी भानावर आलो . पुन्हा एकदा तिचा वाढदिवस कधी ? या प्रश्नाचं उत्तर नकळत मला मिळालं होतं .... आता फक्त वाट होती ती एप्रिल महिन्याची , अजून बरेच दिवस मला वाट पाहावी लागणार होती ... पण दररोज कॉलेजला येता जातांनी तिच्याशी बोलणं व्हायचं ...


किती प्रयत्न केला होता तिचा वाढदिवस माहीत करून घेण्यासाठी अन नकळत इतक्या सहज मनात काही नसतांना मला कळलं ... आणि तिच ओळखपत्र अचानक हाती आल्याने पुन्हा एकदा तिचा वाढदिवस कधी आहे ते माहित झालं , मी पोट धरून हसत होतो आणि हळूच माझ्या डोळ्यात आसवं चमकली .... आनंदाश्रू ... !


असं कुमारने लिहिलेलं वाचत असता ती जरावेळ डायरी तशीच ठेवून स्वतःशीच बोलत - मनात विचार करायला लागली ...