Divyanchi avas books and stories free download online pdf in Marathi

दिव्यांची अवस

दिव्यांची अवस

आषाढ महिन्याच्या अमावास्येला ‘हरिता’ किंवा ‘हरियाली अमा’ असे संबोधतात. व्रतकर्त्याने एकांत असलेल्या पाणथळ जागी जाऊन स्नान करावे. ब्राह्मणाला भोजन घालावे असे दोन प्रमुख विधी ह्या व्रतात सांगितले आहेत. ह्या व्रतकार्यामुळे ‘पितर’ प्रसन्न होतात- हेच त्याचे फल आहे. ह्या दिवशी काही देवळांमध्ये पूजा बाधली जाते. तसेच स्त्रिया झोपाळ्यावर बसून आनंदाने गाणी म्हणतात.

हिंदू धर्मात पितरांसाठी भाद्रपदाचा दुसरा पंधरवडा खास राखून ठेवलेला आहे. तरीदेखील प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला त्यातही दर्श अमावास्येला असे श्राद्ध करण्याची प्रथा आहे. ज्यांना ब्राह्मणभोजन घालणे शक्य नसेल त्यांनी शिधा स्वरूपात एखाद्या गरजूला दर महिन्यात ह्या तिथीला अन्नदान म्हणून धान्य दान करावे. असा संकेत आहे .

दिव्याची अवस
विशेषकरून आपल्या महाराष्ट्रात आषाढ अमावास्येला ‘दिव्याची अवस’ म्हणतात. ह्या दिवशी घरातील स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासूनपुसून लख्ख करतात. नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्याच्याभोवती रांगोळी काढतात. रात्रौ ते सर्व दिवे तेल-वाती घालून प्रज्वलित करतात. त्यांची मनोभावे पूजा केली जाते. गोडाचा नैवेद्य दाखविला जातो. ‘सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या, तू स्वत: तेज आहेस, प्रकाश आहेस. तू आमच्या पूजेचा स्वीकार कर, आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर’ – अशी त्याची प्रार्थना करतात. त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याच्या अवसेचा कहाणी सांगितली जाते तिचे सर्व भक्तिपूर्वक श्रवण करतात .

दिव्याच्या अवसेची कथा

तामीळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनीत आणि गौरी नावाची दोन मुले होती.
त्या दोघा भावंडानी आपापल्या मुलांचे विवाह परस्परांशी करून द्यायचे असे ठरविले.
पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या. त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव ‘सगुणा’ होते.
विनीतला तीन मुलगे झाले.
काळाच्या ओघात गौरी श्रीमंती उपभोगत होती.
परंतु विनीतला दुर्देवामुळे अचानक दारिद्र्य आले.
त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलाशी करून दिले. धाकट्या सगुणाला आईचे हे वागणे आवडले नाही. तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले. गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली.
आईवडिलांनी रागाने तिच्याशी सबंध तोडून टाकले. पुढे एकदा त्या राज्याचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला. स्नानाच्यावेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती. ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळविली. मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली.
ती सगुणेला मिळाली. सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले.
तिने प्रामाणिकपणे ती राजाला नेऊन दिली. राजाने खूष होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले.
शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले. तेव्हा तिने ‘येत्या शुक्रवारी अमावास्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील. बाकी पूर्ण राज्यात कोणीही दिवे लावू नयेत’
अशी इच्छा प्रदर्शित केली.
राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे आषाढ अमावास्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले.
इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले.
नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले. तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या केलेल्या दिराला सांगून ठेवले की, जी जी सवाष्णबाई घरात प्रवेश करू बघेल तिच्याकडून ‘मी ह्या घरातून पुन्हा बाहेर जाणार नाही- असे वचन घ्या.
नंतरच तिला घरात येऊ द्या. तर मागच्या दारात उभ्या केलेल्या दिराला सांगितले की, जी बाई मागच्या दाराने बाहेर जाऊ बघेल तिच्याकडून ‘मी पुन्हा कधीही ह्या घरी येणार नाही’ असे वचन घ्या. मगच तिला बाहेर जाऊ द्या.
तिन्ही सांजेच्यावेळी माता लक्ष्मीदेवी त्या राज्यात आली. तिला सर्वत्र अंधाराचे साम्राज्य दिसले. मात्र सगुणेचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले होते. तिथे जाऊन लक्ष्मीमाता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरात येऊ दिले.
लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारिद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली.
परंतु तिथे उभ्या असलेल्या सगुणाच्या दुसऱ्या दिराने आधी तिला पुन्हा कधीही परत न येण्याची शपथ घ्यायला लावून मगच बाहेर सोडले. अशारीतीने त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुखसमृद्धीने भरून गेले. राज्यातील सर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले.
अशी ही दीप अमावास्या किंवा दिव्याच्या अवसेची कहाणी

समाप्त

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED