मला काही सांगाचंय...- २५-१ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय...- २५-१

२५. सोनेरी क्षण

रूमचा दरवाजा उघडून ते शिरले ... समोर बेडवर कुमार , त्यांना आत येतांनी बघून त्याने जरा मान वळून पाहिलं ... त्याला त्रास होऊ लागला तशी त्याने मान परत सरळ केली ... नजर रोखून तो त्यांना पाहू लागला , त्याची आई जवळ आली, त्याला त्या अवस्थेत पाहून तिला काय वाटतं होतं याची कल्पना कुणालाच करता येणं जवळ जवळ अशक्य ..!


तिने खूप धीराने पापणीवरचे आसवं खाली गळण्याआधी पटकन पदराने टिपले ... त्याच्या बेडजवळच दोन लहान लहान स्टूल ठेवलेले होते , ती मात्र त्याच्याजवळ बेडवर बसली ... त्याच्या हाताला स्पर्श करून त्याच्या पूर्णतः उतरलेला चेहरा पाहून -


" कुमार ... कुमार ... "


त्याचं नाव ओठावर आलं आणि तिचा धीर खचला , डोळ्यांत आसवांनी गर्दी केली , पापण्यांच्या बांध मोडून अश्रुधारा वाहू लागली ... तिच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या वडिलांनी डॉक्टर काय म्हणाले होते आठवून देत -


" अगं , बघ कुमार बघतो आहे ... तो आता बरा आहे ..... लवकरच होईल "

त्यांनासुद्धा भरून आलं ...


मग सुजीतच्या वडिलांनी त्यांना स्टुलावर बसायला सांगितले ... " तुम्ही जरा स्वतःला सांभाळा , आपण त्याला पाहायला आलो आणि तुम्ही ... .... ... ... " त्यांनी आपलं बोलणं आवरत घेतलं ..


त्या मायमाऊलीने आसवं पुसले , काही क्षण त्याला एकटक पाहिलं ... मायेनं त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत -


" कसं वाटतं रे बाळ आता ? खूप त्रास होत आहे का ? " तो काहीतरी बोलेल या अपेक्षेने ती त्याच्याकडे पाहत राहिली ...


पण तो एक शब्दही बोलू शकत नव्हता ... नुसतंच नजरेनं आळीपाळीने तो त्यांना पाहत होता , तिचे पाण्याने डबडबलेले डोळे पाहून त्याच्या पापण्या ओल्या झाल्या ... कदाचित तिचं आपुलकीनं बोलणं ऐकून , तिचा स्पर्श अनुभवून ... जखमेच्या वेदनेने ...


त्याच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून , ती उठून उभी झाली ... खाली वाकून तिने लगेच पदराने त्याचे आसवं पुसले ... मस्तकावर हलकेच ओठ टेकवून तिने दोन्ही हातात चेहरा धरला ... " बाळा तू लवकर बरा होशील , काळजी करू नको आम्ही सगळे आहोत ना ... "


ती परत त्याच्या बाजूला बसली ... त्याच्या डोळ्यात पाणी पाहून तिचं मन पेटून उठलं , ती धीट झाली अन त्याच्या हातावर हात ठेवून नजरेनं त्याला हिंमत ठेव म्हणून जसं सांगू लागली ...


" कुमार , बोल रे काहीतरी ... " इतकंच काय ते त्याचे वडील बोलले


" बेटा , लवकर बरा हो ... " सुजितचे वडील


पण तो काहीएक बोलला नाही ,काही वेळ तेही शांत बसून त्याला पाहत राहिले ... नर्सने दरवाजा उघडला , त्यांना बाहेर या असा इशारा केला ... तरी थोडावेळ थांबून ते बाहेर पडले ...


रूमच्या बाहेर आल्यावर बाकी सर्व त्यांच्याजवळ आले ...


" आई बाबा , दादा काय म्हणाला ? तो बरा आहे ना ? " प्रशांत


" हो बाळा ... "


" बाबा , कुमार कसा आहे ? " सुजित


" जागा झाला आहे पण काहीच बोलला नाही .. "


" काहीच नाही ... ? " आर्यन , अनिरुध्द , ऋतुराज


" नाही ... " त्याची आई


" आता आपण जाऊ पाहायला ... " आकाश


" जरावेळ थांबा , नंतर जा ... आता त्याला आराम करू द्यायला हवा .. " बाजूलाच उभ्या असलेल्या नर्स ने संवादात सहभागी होऊन सांगितले ..


" ठीक आहे , यावेळी मी , प्रशांत आणि आकाश आत जाणार ... मग काहीवेळाने आर्यन , अनिरुध्द, ऋतुराज .." सुजित म्हणाला


" हो ठीक आहे आता मात्र तुम्ही हॉलमध्ये बसा ... तिथे टी व्ही लावलेला असतो ..." नर्स


तिचं बोलणं झालं तोच त्याचे आई वडील आणि कुमारचे वडील समोरच बसायला खुर्च्या होत्या तिथं जाऊन बसले ... बाकी सर्व काही अंतर समोर चालत गेले , पहिल्या मजल्यावर असल्याने ते सर्व गॅलरीत येऊन थांबले म्हणजे रुमपासून अगदी हाकेच्या अंतरावर ...


आकाश आणि प्रशांत पाणी आणायला निघून गेले ... दोन बॉटल त्यांनी येतेवेळी सोबत आणल्या त्यापैकी एक सुजीतकडे देऊन एक सोबत घेऊन आई बाबा जवळ आला ... उन्हाळ्याचे दिवस , दिवसभर बाहेर चांगलंच तापलं होत , दवाखाना वातानुकूलित असल्याने त्यांना बाहेरची तितकीशी जाणीव नव्हती ... जे काय नियतीनं त्यांच्या समोर आज मांडलं होत त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला होता ...


सवयीला आहारी जाऊन एकापाठोपाठ सर्वांनी मोबाईल बाहेर काढले , जवळपास 5:30 वाजलेले ...


तसा सुजितने प्रशांतला कॉल करून जवळ बोलवलं आणि आता आपण आत जाऊ असं इशाऱ्याने सांगितलं ...


मग ते तिघे नर्सजवळ जाताच , एव्हाना तिला सुध्दा ह्यांना आत जायचं आहे हे कळलं होतं ... " जा पण लवकर परत या आणि त्याला त्रास होईल असं काहीही बोलू नका , करू नका ... "


ते आत आले , कुमार डोळे मिटून होता ...


" दादा बहुतेक झोपला वाटते ... " प्रशांत


" हो रे ... मला तसंच वाटतं " आकाश


रूममध्ये शांतता पसरली होती म्हणून त्यांचा हळू आवाज त्याला ऐकू आला ... त्याने डोळे उघडले , सुजित त्यालाच पाहत होता म्हणून त्याला लगेच लक्षात आलं ... " जरा शांत व्हा , तो बघा कुमार जागाच आहे ... " तो म्हणाला .


तिघेही त्याच्याजवळ जाऊन बसले ... प्रशांत बेडवर तर सुजित आणि आकाश स्टुलावर ..! तो त्यांना एक एक वेळा नजर फिरवून पाहू लागला , जरा मान वर करून त्याने उठायचा प्रयत्न केला ...


" कुमार , तसाच पडून रहा ... तुला त्रास होईल ... " सुजित


" दादा , कसा आहेस तू ? बरं वाटतं का ?" प्रशांत


त्याने नजर रोखून त्याला पाहिलं , पण बोलता येत नसल्याने त्याने फक्त हात जरा हलवून त्याला प्रतिसाद दिला ...


" दादा, तू लवकर बरा होशील ... " आकाश


एव्हाना तिघ्यांनाही कळून चुकलं कि कुमार काहीही बोलणार नाही पण तरी त्याला काहीवेळ सहवास मिळावा म्हणून ते थांबले ... नीरव शांतता .... आणि फक्त शांतता ....


इतक्यात नर्सने त्यांना हळूच दार उघडून बाहेर या ! म्हणून खुणावले ... ते तिघेही बाहेर निघाले , प्रशांत आईजवळ जाऊन बसला , आकाश त्याच्याजवळ थांबला ... सुजित गॅलरीत आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज होते तिथे आला ...


" सुजित , कसा आहे कुमार ? " सर्वांनी सोबतच विचारले ...


" शुध्दीवर आला खरा पण काहीही बोलला नाही .. " सुजित


" कुमार शुध्दीवर आला हे खूप छान झालं ... " अनिरुध्द


" हो ... पण तो काहीच का बोलतं नाही ... ? " सुजित


" हाच प्रश्न मलाही पडला .. त्याने काही तरी बोलायला पाहिजे .... " आर्यन


" मला वाटतं तो बोलायचा प्रयत्न करत असेल पण त्याला त्रास होत असेल म्हणून ... " ऋतुराज


सर्वांनी नजरेनं त्याला सहमत असल्याचं सांगितलं ... बोलता बोलता काही वेळ निघून गेला . बराच वेळ एकाच ठिकाणी उभं होते , मग खालच्या मजल्यावर जाऊन ते सर्व चहा प्यायले आणि बाकी पाच जणांकरिता चहाची ऑर्डर दिली आणि वर आले ... त्यांच्या पाठोपाठ चहा घेऊन कँटीन वाला तिथं पोहोचला , सर्वांचा चहा पिऊन झाला ...


आता कुमारला पाहायला आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज आत गेले , त्यापूर्वी नर्सने कुमारला सलाईन लावले होते ... ते तिघे आले , कितीतरी दिवसांनी ते कुमारला पाहत होते चेहरा काहीसा निस्तेज झालेला ... पाहून त्यांना नेहमी हसणारा आणि इतरांना हसविणारा कुमारचा शेवटी कधीतरी पाहिलेला चेहरा आठवला ... त्यांनी सुध्दा कुमारला बोलतं करायचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग न झाल्याने त्यांनाही इतरांसारखं फक्त त्याला डोळे भरून पाहता आलं ... " लवकर बरा हो, हिम्मत ठेव , आम्ही आहोत ! तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे " असं बोलून त्यावर कुमार काहीतरी बोलेन या अपेक्षेने बोलले पण त्यांनाही अपयश आले ... ते सुध्दा पडलेला चेहरा घेऊन बाहेर आले .... आता वास्तविक परिस्थिती सर्वांना माहीत झाली होती म्हणून तेच तेच प्रश्न विचारायचे त्यांनी टाळलं ....