उद्धव भयवाळ
औरंगाबाद
शेजारचे सावंत
आमच्या शेजारचे सावंत कुठल्याशा सरकारी कार्यालयामध्ये नोकरीला आहेत. या सावंतानी फार पूर्वी एक कथा लिहून एका मासिकाला पाठवली होती. पण ती साभार परत आली. तेव्हापासून त्यांनी ठरवलेले आहे की चांगल्या दर्जेदार कथा लिहून खूप मोठा लेखक व्हायचे.
सावंत दर शनिवारी जरा लवकरच घरी येतात. ऑफिसमध्ये असतांनाच ते ठरवतात की, आज घरी गेल्याबरोबर एक कथा लिहून पूर्ण करायचीच. घरी आल्याबरोबर ते बायकोशी –पार्वतीबाईशी खूप खुशीमध्ये बोलतात. मुलांच्या अभ्यासाची चौकशी करतात. गप्पांच्या ओघात गावातील चित्रपटगृहामध्ये आलेल्या नवीन सिनेमाची माहिती ते पार्वतीबाईना सांगतात. पार्वतीबाई मग लाडेलाडे सिनेमाला जाण्याचा हट्ट त्यांच्यापाशी धरतात. खूप दिवसात त्यांनी सिनेमा पाहिलेला नसतो. सावंतांना कथा लिहायची असते. खूप मोठा लेखक व्हायचे असते. त्यांच्या मनात खूप कथाबीजे असतात. पण मुळातच भिडस्त असणारे सावन्त; मित्रमंडळी,शेजारीपाजारी यांचेही मन न मोडणारे सावंत, बायकोच्या हट्टापुढे नकार कसा देतील?
सावंत मनात एक बेत ठरवतात—उद्या रविवार. दिवसभर काय काम? उद्या सकाळीच कथा लिहिण्यासाठी जी बैठक मारायची की संध्याकाळपर्यंत उठायचेच नाही. एकामागोमाग दोन तीन कथा लिहून टाकायच्या. त्या खुशीतच ते बायकोला आणि मुलांना घेऊन सिनेमाला जातात. परत येतांना मुलांना चॉकलेट्स, बिस्किटे आणि मिठाई घेऊन देतात. त्यांना आता एक कथा सुचलेली असते. उद्या खूप कथा लिहून पुऱ्या होणार या आनंदात ते रात्री जेवतांना दोन घास जास्त खातात. जेवतांना पार्वतीबाईना आपले पुढचे बेत सांगतात. त्यांच्या कथा एकामागोमाग विविध मासिकांमधून प्रसिद्ध होऊ लागल्यावर संपादक मंडळी त्यांच्या दारी कथा मागण्यासाठी कशी रांग लावतील याचे चित्र ते कल्पनेने पार्वतीबाईपुढे उभे करतात. पार्वतीबाई निरागस चेहऱ्याने आणि कौतुकाच्या भावनेने नवऱ्याच्या गोष्टी तन्मयतेने ऐकत असतात.
दहा बारा कथा विविध ठिकाणी प्रसिद्ध झाल्यावर त्या कथांचा एक संग्रह काढण्याचा सावंतांचा मानस असतो. त्या कथासंग्रहाला जर सरकारचे पारितोषिक मिळाले तर त्या पुस्तकाची मागणी वाढून सावंतांची खूप चंगळ होणार असते. मग नोकरी कोण करतो? नोकरी सोडून फक्त कथालेखनच करायचे. नुसत्या कथा लिहून त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यातून गबर झालेल्या लेखकांच्या गोष्टी ते पार्वतीबाईना सांगत असतात.
त्यांनी सांगितलेला शब्द न शब्द भाबड्या पार्वतीबाई कानात साठवून ठेवीत असतात. उद्याचा मोठा साहित्यिक या दृष्टीतून त्या सावंतांकडे पाहू लागतात. त्या खुशीत त्या पानाचा विडा करून सावंतांना देतात. उद्या रविवार. उद्या सावंतांना खूप कथा लिहायच्या असतात. त्या आनंदात सावंत पतीपत्नी दिवा मालवतात आणि दोन्ही मुले गाढ झोपलीत याची खात्री करून घेऊन एकमेकांच्या मिठीत विसावतात.
सावंत झोपेतही खुशीत असतात. त्यांना स्वप्नात त्यांचा भावी कथासंग्रह दृग्गोचर होतो. त्यांच्या कथासंग्रहाला शासनाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला असतो. गावातील लोक त्यांची जंगी मिरवणूक काढतात. हारतुरे यांचे ओझे त्यांना पेलवेनासे होते. अभिनंदनपर तारांचा व पत्रांचा ढीग त्यांच्या घरात पडतो. पार्वतीबाईही नवऱ्याच्या या यशाने दिपून जातात.
सावंत रविवारी सकाळी उठतात. एक वेगळाच उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. त्यांच्या डोक्यात अनेक कथाबीजानी गर्दी केलेली असते.
आळशी नवऱ्याचा जाच सहन करीत मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या गावाकडच्या गंगीवर त्यांना कथा लिहायची असते. पुतण्यांच्या आणि भावजयीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्त्या करणाऱ्या म्हाताऱ्या तात्यांवर त्यांना कथा लिहायची असते. नवऱ्याशी प्रतारणा करुन शाळेतील शिक्षकांच्या मागे लागणाऱ्या कानडे नावाच्या शिक्षिकेवर त्यांना कथा सुचलेली असते.
अशी अनेक कथाबीजे त्यांच्या मनात फुलून येत असतात.
मुखमार्जन आटोपून सावंत गरमागरम चहाचा एकेक घोट मोठ्या चवीने घेत घेत मनातल्या मनात कुठल्यातरी कथेची जुळवणी करतात. इतक्यात सात वर्षे वयाचा त्यांचा मोठा मुलगा मधल्या घरात येऊन त्यांना सांगतो, " बाबा, बघितलं का आपल्याकडे कोण आलंय ते. दोन जण आहेत. समोरच्या बैठकीत बसलेत."
इतक्या सकाळी येणारे आगंतुक कोण असावेत याविषयी मनाशी अंदाज बांधीत सावंत उठतात आणि समोरच्या खोलीत येतात. त्यांचा दूरचा नातेवाईक भोसले आणि त्याचा एक मित्र असे दोघे आलेले असतात. नमस्कार चमत्कार झाल्यावर भोसले आपल्या मित्राची सावन्तांशी ओळख करून देतो; आणि येण्याचे प्रयोजन सांगतो. तो सांगत असतो, " हा माझा मित्र गणगणे. विज्ञानाचा पदवीधर असून मागच्या वर्षीच बी.एड. झालाय. पण अद्याप बेकार आहे. मागच्या आठवड्यात इथल्या पुरोगामी शिक्षण मंडळाची "शिक्षक पाहिजेत " ही जाहिरात वाचली; आणि अर्ज केला. पण आजकाल कुठेही नोकरी हवी म्हटलं तर ओळखीपाळखी, वशिला असल्याशिवाय काही खरं नाही. त्या दृष्टीने त्या संस्थेच्या सचिवाची प्रत्यक्ष भेट घ्यावी म्हणून आम्ही आलेलो आहोत. तुमच्यामार्फत किंवा तुमचे कुणी मित्र असतील तर त्यांच्यामार्फत त्या सचिवांची भेट घ्यावी असा आमचा इरादा आहे.
हे सर्व ऐकल्यावर सावंतांच्या मनातील नवीन कथेविषयी चालू असलेले चिंतन कुठल्याकुठे पळून जाते आणि नवीन चिंता मनात उभी राहते. पुरोगामी शिक्षणसंस्थेचा उद्धट सेक्रेटरी त्यांच्या नजरेसमोर उभा राहतो. कसेबसे धक्के खात खात म्याट्रिकच्या वर्गापर्यंत येणारा आणि तिथेच गचका खाऊन कायमचा नॉनम्याट्रिक राहणारा हा माणूस सर्जेराव पाटलांशी असलेल्या नात्याच्या जोरावर या संस्थेचा सचिव होतो. संस्थेच्या कर्मचाऱ्यांना अत्यल्प पगारात एखाद्या गुलामासारखे वागवीत असतो. कुरकुर करणारे किंवा अन्यायाविरुद्ध लढा देण्याची भाषा करणारे यांना घरचा रस्ता दाखविला जातो. अशा संस्थेच्या शाळेत भोसलेच्या मित्राला नोकरी हवी असते. सावंत विचारमग्न होतात. दरम्यान सावंतांच्या मुलाने आणलेला चहा सर्वजण घेतात.
नामदेवरावाकडे म्हणजेच त्या सेक्रेटरीकडे जाऊन काही फायदा होणार नाही हे सावंत त्या दोघांच्या नजरेस आणून देतात. त्याचप्रमाणे त्या शाळेत नोकरी म्हणजे निव्वळ गुलामगिरी आहे, हेही ते सांगतात. पण "इथपर्यंत आलोच आहोत तर एकदा त्यांची भेट घेण्यास काय हरकत आहे?" असे मत जेव्हा भोसले व त्याचा मित्र व्यक्त करतो तेव्हा नाईलाजाने सावंत त्या गोष्टीस तयार होतात.
सर्वांचा नाश्ता वगैरे आटोपल्यानंतर सर्वजण सावंतांच्या एका मित्राकडे – हरीभाऊकडे जातात. कारण हरीभाऊचे वडील आणि नामदेवरावाचे वडील यांची बालपणापासून मैत्री असते व त्यामुळे हरीभाऊ व नामदेवराव यांचेही मित्रत्वाचे संबंध असतात.
हरीभाऊकडे जाणे, तिथे काहीवेळ गप्पा, चहापाणी, मग सर्वांनी मिळून नामदेवरावाकडे जाणे, तिथे बराच वेळ ताटकळत वाट पाहिल्यावर त्यांची भेट होणे आणि त्यानंतर अपेक्षाभंग झाल्यावर निराश मनस्थितीत परतणे, या सर्व गोष्टींमध्ये दुपारचे दोन वाजून गेलेले असतात. घरी आल्यावर या पाहुण्यांना पाहुणचार, मग गप्पासप्पा आणि संध्याकाळी पाहुण्यांना बसस्थानकावर सोडून घरी येईपर्यंत रात्रीचे आठ वाजलेले असतात. घरी आल्यावर सावंत पार्वतीबाईंशी गप्पा मारीत मारीत जेवण करतात. कथा लिहिण्याविषयीचा इतका वेळ कुठेतरी दडून बसलेला विचार पुन्हा उचल खातो. सावंत त्या दिशेने विचार करू लागतात. सकाळी आलेले पाहुणे, त्यांच्या सोबत नामदेवरावाकडे जाणे वगैरे सर्व गोष्टी ते विसरण्याचा प्रयत्न करतात आणि कथेवर मन एकाग्र करतात. आता ते फक्त त्यांचे असतात. पण दिवसभर पाहुण्यांची ऊठबस आणि इतर कामे यामुळे त्यांचा जीव इतका आंबून गेलेला असतो की, कागद आणि पेन घेऊन कथा लिहावी अशी इच्छा असूनही सावंत तसे करू शकत नाहीत. अंथरुणावर पाठ टेकतात आणि लगेच घोरायला लागतात.
सोमवार उजाडतो. आज ऑफिस. रोजची धांदल, घाईगर्दी सुरु होते. कालचा रविवार वाया गेला. एकही कथा लिहिणे झाले नाही याची सावंतांना खंत वाटत असते. ती नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. दाढी, आंघोळ उरकून सटरफटर कामे करणे, छोट्या मुलास शाळेत सोडून येणे, पटपट जेवण करून ऑफिसला जाणे, अशी त्यांची दैनंदिनी सुरु होते.
शनिवारपर्यंत सावंतांची दैनंदिनी थोड्याफार फरकाने अशीच असते. मग पुन्हा शनिवारी सावन्तांमधला लेखक जागा होतो. सावंत मनाशी कथेची जुळवणी करतात. शनिवार येतो आणि जातो. रविवार येतो आणि जातो.
एखाद्या रविवारी पाहुणे आलेले असतात तर एखाद्या रविवारी मित्र येऊन वेळ खातात. कधी मुले आजारी असतात म्हणून त्यांना दवाखान्यात न्यायचे असते तर कधी शेजाऱ्याकडे असलेल्या एखाद्या कार्यक्रमात मदत करणे भाग असते. कधी अचानक परगावी जाणे निघते तर कधी ऑफिसमध्ये नुकत्याच नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यासाठी घर शोधण्याची मोहीम निघते. अशी अनेक कारणे निघत राहतात आणि सावंतांचे कथालेखन पुढच्या रविवारपर्यंत पुढे ढकलले जाते. गेली पाच वर्षे हे असेच चालू आहे.
शनिवारी कथालेखनाच्या नव्या उभारीने सावंत घरी येतात. बायकोशी खुषीत बोलतात. कथालेखनाची पुढची योजना सांगतात. त्यांना मोठा लेखक व्हायचे असते. भाबड्या पार्वतीबाई त्यांच्या गप्पा ऐकत असतात. कुठल्याशा कारणाने सावंतांचा तो रविवारदेखील गडबडीत जातो.
पुढच्या रविवारी मात्र एक अत्यंत वेगळ्या धाटणीची कथा लिहून पूर्ण करायचीच असा निश्चय मनाशी पक्का करून सोमवारी सावंत निराश मनाने ऑफिसची वाट धरतात.
-----------------------------
उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड ,
शहानूरवाडी , औरंगाबाद ४३१००९
मो: ८८८८९२५४८८ / ९८३४११९४४१