Mala Kahi Sangachany - 27 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय... - २७

२७. आभास

इकडे दुसऱ्या शहरात -


त्यांनी सोबतच चहा घेतला ... काही वेळ आज ऑफिसात दिवस कसा गेला ... ते तो तिला सांगत होता पण नेहमी सारखं तिचं आज त्या गोष्टींत मन रमत नव्हतं ... खरं तर तिचं मन हरवलं होतं ... कुठे ? तर कुमारच्या डायरीत .... ती त्याच्या समोर जरी बसून होती पण तिचं मन दूर कुठेतरी डायरीत जे काय आतापर्यंत तिने वाचलं होतं त्यातच अडकून होतं आणि आणखी पुढे काय ? यासाठी ती आतुर झालेली ... कदाचित म्हणूनच ती तिथं असूनही तिथं नव्हती तर जे काय वाचलं ते पुन्हा पुन्हा आठवून जणू ती स्मरण करू लागली ... तो ऑफिसात कशी एकाची आज फजिती झाली म्हणून सांगू लागला आणि त्याला हसू आलं , तिचा काहीही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा -


तिला नजर रोखून पाहत " कुठे हरवलीस ? "


ती जणू उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत होती आणि तिला त्याचा आवाज ऐकू आला नाही ...


तिच्या हाताला स्पर्श करून " ओ माय डिअर वाईफ ... कुठे आहेस ? "


किंचित हळुवार - इतक्या लवकर झोपली कि काय ?


त्याचा स्पर्श तिला जाणवला अन ती वास्तवात परतली ... जरा वेळ दोघांची नजरानजर झाली . तिला एव्हाना कळलं की तो जे काय बोलला त्याकडे आपलं काहीही लक्ष नव्हतं ...


" तुझं आज लक्ष आहे कुठे ..? "


" इथेच तर आहे ... "


" मी तुला आज ऑफिसला काय गंमत झाली म्हणून सांगितली तर तू त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही ... "


" जरा विचार करत होते .... सॉरी हं .. "


" विचार ??? पण कशाचा ? काही प्रॉब्लेम आहे का ? बरं वाटतं नाही का ? " जवळ जाऊन तिच्या कपाळाला तळहात लावून त्याने विचारलं ...


" मला काही झालं नाही ... "


" मग कसला विचार ... यापूर्वी असं कधी झालं नाही ... म्हणून ... " अन तो मध्येच बोलणं थांबवून तिला पाहत राहिला ..


" मी विचार करत होते की आज काय बरं बनवायचं जेवायला ..? " कसातरी तिने विषय बद्दलविण्याचा प्रयत्न केला .


" अच्छा , असं होय तर ... बनव ना काहीपण ... त्याच्या इतका विचार करायचा नाही ... "


" बरं ठीक आहे . " म्हणत तिने चहाचे कप , स्ट्रे टेबलवरून उचलले , ती किचनकडे निघाली ... त्याने टी व्ही सुरू केला , तिने चहाचे भांडे धुवून घेतले आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली ... आज ती जरा घाईघाईत स्वयंपाक बनवू लागली , लवकर जेवण करून तिला डायरी वाचायची होती ... ती जरी किचनमध्ये स्वयंपाक करत होती पण मनात सारखे कुमार आणि त्याने डायरीत जे काय लिहिलं ते घोळत होतं ...


तिने गरम गरम जेवण पटापट डायनिंग टेबलवर ठेवलं , त्याला जेवायला वाढलं असं सांगतच ती ताट वाढायला लागली .


" आलात का ? हात धुवून घ्या आणि या जेवायला ... " किचनमध्ये जाऊन फ्रीजमध्ये ठेवलेली पाण्याची बॉटल बाहेर काढत ती म्हणाली ...


स्वतःशीच ' आज स्वयंपाक जरा लवकर झाला वाटतं ... छान , तशी आज भूक लागली आहे ...'


असं काही पुटपुटत तो धरलेले हात टॉवेलने पुसून जेवायला बसला ... तिने ताट वाढून , पाण्याचे ग्लास भरून ठेवले होते ... जेवण सुरु झालं आणि रोजच्यापेक्षा जरा लवकर आटोपलं ... त्याच जेवण होईपर्यंत ती तिथंच थांबली , त्याच जवन आटोपताच तिने पटकन आवराआवर केली . ..


न राहवून त्याने विचारलं " तू जेवण लवकरच आटोपलं ..? "


" झोप येत आहे ना म्हणून ... " नाईलाजाने तिला खोटं बोलावं लागलं .


" ठीक आहे , जा तू झोप... मी बाजूच्या रूममध्ये काही ऑफिसचे काम बाकी आहे ते कॉम्पुटर वर पूर्ण करून घेतो.. "


" बरं .. " त्याला इतकंच बोलून ती बेडरूम मध्ये आली , आत येतांनी तिने दार किंचित उघड राहील असे हळूच मागे ढकललं ... तिने लगबगीने डायरी हाती घेतली , ती बिछान्यावर पाय लांब करून उशी पाठीला लावून पान वाचू लागली ...


कुमारने डायरीत पुढे लिहिलं होतं -


कॉलेजला असतांना बऱ्याच नवीन गोष्टी माहीत झाल्या . ज्यांची शाळेत असतांना मुळीच कल्पना नव्हती . त्यापैकीच एक म्हणजे वेलेन्टाइन डे ... मला बारावीला असतांना कळलं की हा दिवस का साजरा केला जातो आणि नेमकं कोण कोण साजरं करतं पण माझ्या मनात विचार आला की आपल्या जीवनात तर असं कुणीच नाही हा दिवस साजरा करायला ... 14 फेब्रुवारी ला अजून दोन दिवस बाकी होते , मी असाच कबीर जवळ बसून होतो ... मनात वेलेन्टाइन डे आणि सोबतच प्रेम म्हणजे नेमकं काय ? कस कळतं असेल एखाद्याला प्रेम झाल्यावर ? प्रेम करावे लागत कि आपोआप होऊन जातं ? मला प्रेम झालं तर मला कसं कळेल आणि कधी होईल की होऊन गेलं ? मग झालंच आहे तर ती आहे कोण ?


अन दुसऱ्या क्षणी तीच नावं ओठांवर आलं " किर्तीप्रिया ...? "


नाही , असं कसं शक्य आहे ... आम्ही तर चांगले मित्र मैत्रीण आहोत . तरी मनात राहून राहून येत होतं नेमकं काय होतं असेल प्रेम झालं की ? प्रेम होतंच का प्रत्येकाला ?


कित्येक प्रश्न मी मलाच विचारत होतो आणि कबीरला मध्येच काय दोस्ता काही मदत मिळेल का ? गंमत म्हणून विचारत होतो ...


वेलेन्टाइन आला तसा गेला पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही ... खरं तर मी तेव्हा शोधायचा प्रयत्न केला नाही , जर केला असता तर आज परिस्थिती काही वेगळी राहिली असती ...


तेथून पुढे काही दिवसांनी बारावीची शेवटची परीक्षा सुरु झाली होती आणि मध्येच होळीचा सण होता ... दुसऱ्या दिवशी रंगपंचमी .... मी लहानपणापासून रंग कुणालाच लावला नव्हता आणि कुणी मलाही लावला नव्हता . मला रंग खेळायला बिलकुल आवडत नव्हतं , कुणी रंग लावू नये म्हणून दिवसभर लपून राहायचो , मित्र जरी आले तर त्यांना तसाच कटवायचो ...


रंगपंचमीचा दिवस उजाळला होता , सर्वजण सकाळपासून आहे ते सारे रंग लावून विदूषक बनले होते आणि गाव एक सर्कस ... मी दरवर्षी प्रमाणे घरात दार लावून लपून होतो आणि खिडकीतून बाहेर रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचे काय ताल झाले आहे पाहून आनंदी होतो ... दुपारी बारा नंतर बाहेरच वातावरण जरा शांत झालं होतं तसा मी कसातरी बाहेर पडलो आणि सरळ धावत जाऊन कबीर जवळ पोहोचलो ... भरभर झाडावर चढून जमेल तितक्या वर जाऊन बसलो ... तिथून जरा दूरच्या शेतात मुलं एकमेकांना रंग लावण्यासाठी पळधाव करत होते . मी त्यांना पाहूनच खुश होतो . चार पाच तास सहज निघून गेले आणि मी घरी परतलो , सायंकाळ पर्यंत जवळपास सगळे दिवसभर लावलेला रंग निघेल तितका धुवून टाकत होते . क्वचितच कुणी कुणाला संध्याकाळी रंग लावत असे म्हणून मी बाहेर निघालो होतो ...


ती समोर होतीच , बाहेरच्या अंगणात पाणी शिंपत होती ... मी आज लक्ष नाही असं काहीसं दाखवत खाली नजर करून जात होतो . माझ्या पायापर्यंत पाण्याचे काही थेंब आले होते . मला वाटलं होतं की तिने चुकून शिंपले असावे अन मी बेसावध पुढे चालत होतो , अन काही क्षणात पावसाच्या काही सरी झरकन अंगावरून गेल्या असा आभास झाला होता ... मनात आलं भर उन्हाळ्यात असा अचानक पाऊस आला तरी कसा ?


समोर नजर वर करून पाहिलं तर ती हातात रिकामा मग घेऊन , हसतच


" हॅप्पी होली ... कुमार "


मी आधी भिजलेले कपडे पाहिले , पाण्यात रंग तर नाही ना म्हणून ... मी वाचलो फक्त पाणी होतं ... मला थोडा राग आला होता पण तिच्याकडे पाहून पूर्ण केव्हाच ओसरला होता .


मी तिच्या जवळ गेलो ... एक हात हळूच खिश्यात टाकला आणि हलकेच तिच्या गालाला स्पर्श करून -


" सेम टू यु ... किर्तीप्रिया "


" हे काय तू खरंच मला रंग लावला ? "


" हो . तु माझ्या अंगावर पाणी शिंपले मी तुला थोडा रंग लावला ... "


" मी फक्त पाणी शिंपले . मला रंग बिलकुल आवडत नाही आणि मी कधीच रंग लावला नाही अन कुणालाच लावू दिला नाही ... छे ! "


" बरं तुला एक सांगतो की हा रंग पाण्याने लवकर धुतला नाही ना तर आठवडाभर जात नाही "


" अरे देवा , मग मी कॉलेजला कशी जाणार ... कुमार तू , तू ना .."


ती पुढे काही बोलणार तोच तीच बोलणं मध्येच तोडून " आधी लवकर चेहरा धुवून घे , मग भांडू हवं तर ... "


काहीही न बोलता तिने मग भरून पाणी घेतलं , एक हातावर ओतून चेहऱ्यावर शिंपडले ... " कुमार रंग निघाला का ? "


" नाही , अजून तरी नाही ."


तिने परत एकदा पाणी शिंपडले " आता ? "


" तू हाताने साफ का करत नाही ? "


" शाब्बास , म्हणजे पूर्ण चेहरा भरवायचा तुझा विचार आहे तर ... "


" नाही तसं नाही काही "


तिने पटापट तीन चार वेळा चेहऱ्यावर पाणी शिंपडले ...


" आता वर बघ जरा .. "


तिने चेहरा वर केला , कळलं नाही का पण तिला तसंच पाहत राहावंसं वाटलं होतं ... मी पाहत राहिलो ...


" कुमार , निघाला का ? कि आहे अजून ? "


" हो निघाला आता ... "


तिने पाण्याचा मग माझ्या हातात दिला . तिने ओढणीने चेहरा पुसला ... राग अजून होताच .


" येतो मी ... "


ती काहीच बोलली नव्हती ... मी दोन एक पावलं चाललो आणि थांबलो . तिला आवाज दिला " किर्तीप्रिया "


" आता काय आणखी ? "


तिचा चेहरा खरंच बघण्यासारखा झाला होता आणि तिने मला पाण्याचा मग दिला तेव्हा जरासं पाणी मी ओंजळीत घेतलं होतं तिथूनच तिच्या दिशेने हाताला झटका देऊन काही थेंब फेकले ... बस ती माझ्यामागे मारायला धावणार अन मी तेथून पळ काढला होता .


हा किस्सा कबीरला दुसऱ्यादिवशी सांगितला होता . मी कितीतरी वेळ एकटाच हसत होतो , कारण ही तसंच होतं ...


" कबीर , खरं तर काल जेव्हा तिने मला पाण्याने भिजवलं तेव्हा अस वाटलं होतं की जणू सारे रंग तिने त्या पाण्यात मिसळून माझ्यावर शिंपले , मला राग आला होता खरा पण तिला पाहून पूर्ण राग ओसरला .. का ? मला ठाऊक नाही आणि जेव्हा ती चेहरा धुवत होती तेव्हा तिला सारखं पाहत राहावं अस वाटतं होतं , ते जाऊ दे तेव्हाच एक विचार मनात असाही आला होता की ती बकेट उचलून तिला चिंब भिजवून टाकावं पण मला तसं करणं पटलं नाही .... "


" आणि हो , कबीर , एक गोष्ट तर तुला सांगायची राहूनच गेली . मी तिची काल चांगलीच फजिती केली , मी तिला रंग लावलाच नव्हता , तिची गंमत करावी म्हणून तिच्या गालाला रंग लावला अस भासवून तिला चार पाच वेळा चेहरा धुवायला लावला ... "


मला माझंच हसू आवरत नव्हतं कितीतरी वेळ मी नुसता हसत होतो .. अगदी पोट धरून लोटपोट हसलो आणि शेवटी कसतरी हसणं थांबवलं , आवरलं तर गाल दुखत होते ...


कबीरला मनातलं बोललं कि खूप हलकं हलकं आणि प्रसन्न वाटत होतं ... कधी वाटायचं की माझं आणि कबीरच नातं या जन्माची नाहीच मुळी तर आम्ही जन्मोजन्मीचे सवंगडी असणार ..


तिने जरावेळ डायरी तशीच हातात घेऊन बाजूला केली , तिचं आतापर्यंत हसण्यावर ठेवलेलं नियंत्रण सुटलं अन तो प्रसंग पुन्हा पुन्हा आठवून ती पोटी धरून हसायला लागली ... काही क्षणांत हसू अनावर होऊन डोळ्यातून ओसंडत पापण्यांवर जमा झालं अन गालावर ओघळत खाली उतरलं , मग राहून राहून एक दोन ओझरते हश्याचे ध्वनी तिच्या ओठांतून बाहेर आले आणि त्या रूममध्ये विरले . तिला काही वेळाने एकांताची जाणीव झाली , त्याचबरोबर रात्र असल्याची आणि तहान लागल्याची सुध्दा ...


ती बेडवरून उठली , बाहेर आली आणि किचनमध्ये जाऊन तिने फ्रिजमधून थंडगार पाण्याची एक बॉटल सोबत घेऊन परतली ... परत येतांनी तिने सहज एक नजर तो ज्या रूममध्ये काम करत होता तिकडे फिरवली , तो कामात व्यस्त असल्याचं तिला दिसून आलं ... तिने रूमचा दरवाजा उघडला , ती आत गेली ...


" अहो , किती काम करताय ? झालं की नाही अजून ? "


" थोडं बाकी आहे ... तू कश्याला उठली ? "


" तहान लागली होती म्हणून पाणी आणायला ... "


" बरं , जा तू झोप , मला आणखी जरा वेळ लागेल .."


पाण्याची बॉटल त्याच्या समोर धरून " तुम्हाला हवंय का पाणी ..? "


त्याने होकार देऊन पाण्याची बॉटल हाती घेतली ... तो दोन चार घोट पाणी प्यायला ...


ती बॉटल सोबत घेऊन बेडरूम मध्ये आली , दार जरा लोटलं ... तिने भिंतीवर लावलेल्या घड्याळावर एक नजर टाकली तर रात्रीचे जवळपास 9:30 वाजलेले , तिने ट्युबलाईट बंद केला आणि नाईट लँम्प सुरु केला , तिने बिछान्यावर अंग टाकलं ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED