मला काही सांगाचंय..... ३६ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय..... ३६

३६. का ?

सुजित , आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज सोबतच कुमारच्या वॉर्डजवळ पोहोचले . इतक्यातच डॉक्टर त्याच्या रूममधून बाहेर पडतांना त्यांना दिसुन आले , त्याचे आई वडील , आकाशचे वडील , सुजितचे वडील डॉक्टरशी बोलत होते , झपाझप चार पाच पावलं टाकत ते तिथं जाऊन ठेपले ... डॉक्टर देवांश सांगत होते की , " कुमारची तब्येत आता बऱ्यापैकी चांगली आहे , तुम्ही त्याला भेटू शकता फक्त जास्त लोक एकसाथ जाऊ नका आणि त्याला त्रास होईल म्हणून जास्त बोलू पण नका .. समजलं ना , येतो मी .."

सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली , आई वडिलांसह प्रशांतने रूमचे दार लोटून आत प्रवेश केला .. कुमार नजर रोखून त्यांना पाहत होता , माऊलीने जवळ जाताच त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला ... " कुमार , बाळा कसा आहे ? फार त्रास होतो का ? खूप लागलं ना .. भूक लागली का रे ? " इतकं बोलून झालं अन तिचा कंठ दाटून आला आणि ती त्याला जवळ घेऊन रडू लागली , प्रशांतने कसतरी तिला सावरलं ..

त्याचे वडील , " दादा , आता बरं वाटतंय ना , काही हवं आहे का ? सांग तुझे आवडते अंगुर आणायचे का ? " आपला थोरला मुलगा आज बरोबरीचा असतांना असा हतबल झालेला पाहून यावेळी त्यांनाही गहिवरून आलं ...

प्रशांतने पुढे येऊन कुमारला पायापासून डोक्यापर्यंत एक दोनदा पाहिलं , " दादा , हे सगळं कसं काय झालं ? तू तर नेहमी दुचाकी काळजीपूर्वक चालवतो ... सगळं ठीक होईल , दादा " मागे वळून त्याने डोळ्यात जमा झालेले आसवं हातानेच पुसले ...

कुमारचे डोळे किंचित आसवांनी भरून आले , पापण्या ओलावल्या , आसवं खाली ओघळणार इतक्यात त्या माऊलीने पदराने टिपून घेतले . तो काहीतरी बोलेल , आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून दोन चार शब्द तरी बोलेल या आशेपोटी 10 -15 मिनिट ते तसेच शांततेने त्याला पाहत राहिले . पण कुमारने शब्दानेही प्रतिसाद दिला नाही , शेवटी मनातच , कुमार अजूनही का बोलला नाही ? हा प्रश्न आणि डोळ्यात अश्रू घेऊन ते तिघे रूम बाहेर पडले ...

ते बाहेर पडताच सर्वजण त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करायला लागले आणि त्यांनी सांगितले की , " कुमार बरा तर वाटतोय पण काहीच बोलला नाही .."

आतापर्यंत त्यांना पडलेला प्रश्न इतर सर्वांच्या मनात अंकुरला , काहीवेळ कुणीच आत गेलं नाही , थोडा वेळ थांबून मग सुजितचे वडील , आकाशचे वडील , आकाश हे तिघे कुमारला पहायला आत गेले ... त्यांनी कुमारला कसा आहेस ? काही त्रास होत आहे का ? लवकर बरा हो , काळजी करू नको आम्ही आहोत ना असा दिलासा दिला , नंतर तो काहीतरी बोलेल याची ते वाट पाहत काहीवेळ तिथेच थांबले पण त्याने काहीच प्रतिक्रिया न दिल्याने परत एकदा ' कुमार काहीच का बोलत नाही ? ' हाच प्रश्न मनात घेऊन तेसुध्दा परतले ...

बाहेर सर्व कुमार यावेळी तरी काही ना काही बोलला असेल या विचारात होते पण ते तिघे बाहेर आल्यावर त्यांचं उत्तर काही वेगळं नव्हतंच ... मग काय करावे ? आत जावं कि नाही असं सुजित , आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराजला वाटून गेलं . जरावेळ विचार करून अर्ध्या एक तास अजून थांबून नंतर भेटायचं असं त्यांनी ठरवलं .. मग ते कँटीनमध्ये जाऊन बसले , चहा पित असतांना ... एक एक चहाचा घोट घेतांनी कुमार का बोलत नाही ? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत होता ...

सुजित ," खरंच कुमार मला मित्र मानत होता का ? जर याच उत्तर हो आहेच तर तो निदान आतातरी बोलेल का ? "

आर्यन ," सर्वांना आधार देणाऱ्या कुमार वर हि वेळ आली तरी का ? पहिल्यासारखा कुमार परतून येईल का ? "

अनिरुध्द ," बालपणीचे मित्र असून डायरी लिहिल्याचे लपवून का ठेवावं लागलं असेल ? ते एक खाजगी म्हणून बाजूला ठेवलं तर सोनेरी क्षण हे परत एक गुपित का ? मैत्रीचं नातं रक्ताच्या नात्याला मात देईल का ? "

ऋतुराज ," कुमार नेमका कोण हे समजून घेणं कुणालाच कसं जमलं नाही ? सगळ्यांत असून तो कुणातच नव्हता असंच काहीसं या सर्व गोष्टीवरून दिसत नाही का ? त्याने एकदा मैत्रीच्या नात्याने मदत मागायला नको होती का ? "

याशिवाय एक समान प्रश्न सर्वांच्या मनात होता , " निदान आपल्याशी मैत्रीच्या नात्याने बोलेल का ? आणि त्याचा अबोला संपेल का ? "

मनातच असे विचार करत असता हातात घेतलेले चहाचे ग्लास कधी रिकामे झाले त्यांना कळलं नाही ... एकमेकांकडे नजर फिरवत त्यांनी हातातील ग्लास टेबलवर ठेवले , मनात नकळत घर केलेले " का ? " अजूनही मनाला बाजूला सारता येत नव्हते , इतक्यात एक 15 - 16 वर्षे वयाचा मुलगा हातात स्ट्रे घेऊन आला , टेबलवरचे रिकामे ग्लास त्याने उचलून घेतले आणि टेबलवर ग्लासमुळे पडलेले गोलाकार चहाचे डाग खांद्यावर ठेवलेल्या कापडाने पुसून काढले ... त्याचा निरागस , घामाने तवंग उमटलेला चेहरा पाहून त्यांच्या मनातील सारे प्रश्न जणू काही पळून गेले ... या वयात हा मुलगा कामात गुंतलेला आहे , परिस्थितीने त्याच्याजवळ याशिवाय दुसरा कोणताच पर्याय ठेवला नसेल ... पण तरी तो यावेळी हिमतीने आलेल्या परिस्थितीचा सामना करत आहे ... तो मुलगा केव्हाच ग्लास घेऊन निघून गेला आणि जाता जाता या सर्वांना वास्तविकतेचा सामना करण्याचा एक धडा व जरासा दिलासा देऊन गेला , कॅंटीनच बिल चुकतं करून ते तेथून बाहेर पडले ...