५
धागे आणि दोरे
लुंगीत मी लुंगासुंगा वाटलो असेन का तिला? असेल.. जे व्हायचे ते होऊन गेलेले. त्यात करण्यासारखे आता काही नव्हते. आता फक्त स्मार्ट होणे आवश्यक. मी पटकन वर जाऊन कपडे बदलले. होता होईल तो स्मार्ट झालो नि बाहेर आलो. पण मी बाहेर येईतोवर नक्षत्रा निघून गेलेली. म्हणजे दरवाजा बाहेरच्या चपला नाहीशा झालेल्या. परत त्या येतील की नाही कुणास ठाऊक. आता करावे तर काय करावे?
मी वाचलेली सारी डिटेक्टिव्ह पुस्तके मनात जागी झाली. माहिती काढण्याच्या पद्धती असतात. माहिती देणाऱ्यास आपण माहिती देत आहोत हेच माहिती नसावे अशा काही! एखादा डिटेक्टिव्ह धनंजय जणू संचारला माझ्यात. आता आईकडूनच मिळतील डिटेल्स. मी कामाला लागलो.
समोर आई होतीच, तिला साळसूदपणे विचारले,“आई गं, कोण कोण आले गं दुपारी? किती तो आवाज?”
माझ्या मुख्य प्रश्नास बगल देत ती म्हणाली, “लग्नघरी धांदल असायचीच. इतकाही माणूसघाणेपणा बरा नव्हे बरं!”
माझे हे असेच. आवाजाबद्दलचा दुसरा प्रश्न नसता विचारला तर कदाचित पहिल्याचे उत्तर मिळाले असते की नाही? पण नाही.. उगाच काहीतरी लांबण लावायची सवय आहे मला. पण आता या पुढे अगदी टू द पॉईंट.. मी निर्णय घेऊन टाकला. माझे निर्णय असेच तडकाफडकी होतात!
“नाही पण कोण कोण आले गं..” मी दुसरा खडा टाकला.
“अरे येणार.. सगळीकडून येतात लोक. त्यात हे दिन्याकाकाच्या घरी पहिलेच लग्न.”
गंमत म्हणजे आई पण दिन्याला काकाच म्हणते! हा खडापण वायाच जायचा.
"नाही पण माझ्या ओळखीचे कुणी आले का?" तिसरा खडा माझा. त्याने मात्र थोडाफार निशाणा साधला मी. कारण आई म्हणाली,“अरे तिकडून अमेरिकेतून आलेत काही..”
“कोण गं..?”
“तुला काय.. आहेत रमाकाकूच्या माहेरच्या. तिकडे अमेरिकेत असतात. माझ्या मंगू मामाची ओळख निघाली!”
जग किती छोटे आहे नाही? म्हणजे आई त्या नक्षत्राशी बोलत होती ते काही याबद्दल असावे तर! आईच्या माहेरची ओळख म्हणजे इतक्या गप्पा तर हव्यातच! मला धागा व्यवस्थित सापडला. आता कल्पनाविस्तार करावा म्हणून मी काही म्हणणार तोच आई म्हणाली.. “तू बस टिवल्याबावल्या करत.. मी जाते काकूला मदत करायला.”
असे म्हणून आई निघून गेली.
काही असो.. हे सगळे लोक रहाणार.. अमेरिकेतून जाऊन येऊन तर नाही अटेंड करणार लग्न.. एवढी कन्फर्म माहिती मिळाली मला. त्यातल्यात्यात तेवढाच दिलासा. तेव्हा आता त्यांची वाट पाहाणे आले. पण मला कामाचा पुळका आला नि आई पाठोपाठ मीही निघालो..
“काही काम असेल तर सांग.. बसल्याबसल्या कंटाळलो..”
या माझ्या प्रस्तावात थोडा धोका होता. पण धोका पत्करल्यावाचून थोडीच होतात मोठी कामे? आईने दळण वगैरे आणायला पाठवले तर.. कल्पना करा.. मी चक्कीत उभा.. केस पांढरे झालेत पिठाने. मग त्या पिशव्या उचलून मी येतोय.. माझी नवी जीन्स.. तिलाही पीठ लागलेय नि तिकडून नक्षत्रा येतेय.. आधी ती लुंगी आणि आता हे असे.. बाप रे! असे काही होऊ नये म्हणून म्हणालो, “काकू साधेच असेल असे काही काम द्या..”
“वा! स्वयंपाकखोलीत आलीय स्वारी.. चांगलेय.. पण माझा अनुभव सांगते तुला प्रमिला.. असे होते ना तर समजावे जरूर काहीतरी भानगड आहे!”
प्रमिला म्हणजे माझी आई.. आणि रमाकाकू तर चांगलीच स्मार्ट निघाली!
“जा ना.. मदत करायला आलो तर..”
मी मानभावीपणे म्हणालो खरा पण माझ्या अशा कामाची हौस आईला चांगलीच ठाऊक होती! तरी ती गप्प राहिली. कदाचित बेनीफीट ऑफ डाऊट देत असावी! मग मी टेबलाशी बसून त्यांच्या गप्पांतून काही क्लु मिळण्याची वाट पाहात राहिलो. आईने सारे विषय काढले पण त्या अमेरिकन टुरिस्टांबद्दल काहीच नाही. पण रमाकाकूच म्हणाली, “बरं काय रे मोदका..”
मोदक हे माझे टोपणनाव! माझे खरे नाव आमोद.. “अरे ते अमेरिकन पाहुणे आलेत ना.. त्यांना एकदा घेऊन जा बाहेर फिरायला..”
माझ्या मनात लाडू फुटायचे बाकी होते. काकाच्या गाडीत बसवून सर्वांना मी शहर दर्शन घडवतोय.. नक्षत्रा माझ्या बाजूला बसलीय.. वा! इथे मी मागतोय एक डोळा.. खरेतर मी काहीच मागत नव्हतो अजून.. आणि डायरेक्ट दोन डोळे तेही अगदी रेबॅन गॉगल सकट मिळतायत मला. हा क्षण मला सोडायचा नव्हता. मी तो धागा पकडून म्हणालो, “कोण कोण आहेत गं काकू?”
“कोण कोण काय.. चौघे आहेत.. त्यातले मिस्टर बुरकुले कसले येताहेत.. राहिल्या मिसेस बुरकुले.. वैदेही आणि कृत्तिका. मिसेस बुरकुले आल्या तर ठीक, नाहीतर दोघींना जा घेऊन”
वा! काय काम आहे! आणि दोघी म्हणजे कृत्तिका आणि वैदेही.. म्हणजे दोघींपैकी एक नक्षत्रा! माझी! माझी? कशाला कशाचा नाही पत्ता आणि लागले गुडघ्यास बाशिंग बांधायला. असो.. प्रगती चांगली आहे. आणि उद्या खरेच गेलो आम्ही तर काय..?आईशी बोलत होती ती कोण.. हा प्रश्न अगदी जीभेच्या टोकावर आलेला.. पण तो मी कष्टाने आत ढकलला. म्हणजे गिळून टाकला. ती नक्षत्रा म्हणजे वैदेही किंवा कृत्तिका असावी.. इतपत माहिती मिळाली. माझ्यातल्या डिटेक्टिव्हने इथवर हुशारीने काढली माहिती. पण त्यावर समाधान न होता मी म्हणालो,
“म्हणजे काकू, बुरकुलेंना दोन मुली? शाळेत जातात का?”
हा शेवटचा माझा खास गुगली! म्हणजे दोघांची वये नि माहिती काढण्यासाठी. माझ्या या प्रश्नावर मी खूश झालो. पण तितक्यात काका आला आणि संभाषणाच्या गाडीने रूळ बदलले. काका पुढे जे काही म्हणाला त्यातून एवढेच झाले की दुसऱ्या दिवशी गाडीतून शहर दर्शनाचा बेत रद्द करावा लागला. तरीही मी मनात म्हणालो, हे ही नसे थोडके. गाडी परत त्या बुरकुले कन्यांच्या विषयावर आणणे आता कठीण होते. मी अर्थात विसरलो नव्हतो पण मुद्दाम विषय काढणार कसा? पण चार एक तासांत मी बऱ्यापैकी माहिती काढली होती. वै किंवा कृ.. माझे भविष्य. चांगलेय!
रात्र झाली तरी ते बुरकुले कुटुंबीय परत आले नव्हते. त्यांची चौकशी करणार कशी?
रमाकाकू एकटीच आहे हे पाहून मी तिला म्हटले, “काकू अजून कोण कोण येणार आहेत गं..” रमाकाकूने यादी वाचल्यासारखी नावे सांगितली. मोठा इंटरेस्ट असल्यासारखे मी ते ऐकून घेतले.. आणि पुढचा प्रश्न टाकला, “काकू ते बुरकुले आलेले दिसत नाहीत अजून?”
“अरे येतील. काय आहे गेलेत एका नातेवाईकांकडे. ते काय जेवल्याशिवाय सोडतात?”
“त्यांच्या मुली तिथल्याच शाळेत असतील ना?”
माझा हा या ओव्हरमधला गुगली. रमाकाकू यावर हसू लागली. म्हणाली, “शाळेत..? मोठी आहे वैदेही.. कॉलेज पण पूर्ण झालेय.. चांगली डॉक्टर आहे तुझ्यासारखीच. आणि दुसरी तिची मैत्रीण कृत्तिका.. दोघी फास्ट फ्रेंड्स..”
आता आली पंचाईत! दोघींपैकी एकच बुरकुले.. दुसरी नॉन बुरकुले.. पण मी पाहिलेली कोण? कोण जाणे. ते शोधून काढायला काय प्रश्न विचारावा न कळून मी गप्प राहिलो. बघू. अजून लागतीलच हाती धागे नि दोरे! 'पोलिसतपास सुरू आहे' एवढे बातमीच्या शेवटी वाक्य घालून मी गच्चीवरच्या झोपाळ्यात जाऊन बसलो. एकटाच. आई आणि काकू काहीतरी करत बसलेल्या. बाबा नि काका लग्नाच्या पुढच्या प्लॅनिंगबद्दल बोलत बसलेले. बुरकुल्यांचा पत्ता नाही अजून. मी झोपाळ्यावर जाऊन आकाशातले तारे मोजत दिवसाचा हिशेब लावत पहुडलो. किती वेळ गेला पत्ता नाही. डोळा लागला असावा माझा.