शोध चंद्रशेखरचा!
१.----
विकीने आपली कार 'सावधान! घाट आरंभ!' या सूचनेच्या पाटीजवळ थांबवली. त्याच्या कानाजवळचे केस पांढरे झाले होते. बाकी वय सांगणाऱ्या खुणा शरीरावर कोठे दिसत नव्हत्या. पैसा आणि दारू, हीच काय ती त्याची दोन व्यसने होती. पैसा 'कमावण्यात' त्याला कधीच रस नव्हता. पण 'मिळवण्या' साठी तो अगणित फंडे करायचा. अनाथाश्रमातल्या बालपणाचे ओरखडे घेऊन तो जगला आणि वाढला होता. त्याला या जगाची भाषा चांगलीच आवगत झाली होती! कळायला लागल्यावर, रहीम चाच्यांच्या ग्यारेज मध्ये काम मिळाले. देशी विदेशी गाड्यांची अनॉटॉमी डोक्यात फिट होत गेली. गाड्यांच्या ट्रायलने, ड्रायव्हिंग परफेक्ट करून घेतले होते.
त्याने हिप पॉकेट मधून काढून, चापटी बाटली तोंडाला लावली. एक दोन मोठे घोट घश्याखाली चरचरत गेल्यावर, त्याला जरा बरे वाटले. सूर्य पश्चिमेला सरकला होता. त्याने हातातल्या घड्याळावर नजर टाकली. साडेचार वाजून गेले होते.
आज साली, कालिंदीची याद सतावत होती. तिचा आज बर्थडे! आपण तिला घेऊन, लॉन्ग ड्राइव्हवर जाऊन सेलिब्रेट करायचो. तिला काय गिफ्ट हवं असायचं? तर, संध्याकाळी सूर्य क्षितिजावर आला कि, त्याचा एक दीर्घ किस, गालावरच! बस! पागल होती! शेवटच येथेच, याच घाटात आलो होतो! आजच्या सारखंच भन्नाट वार सुटलं होत.--- तिच्या आठवणीने विकीच्या पापण्या ओल्या झाल्या. त्याने पुन्हा चपटी तोंडाला लावली. शेजारच्या सीटवर ठेवलेल्या, टपोऱ्या गुलाबाच्या चार काड्यावर त्याने एक नजर टाकली. दर वर्षी तो या दिवशी, कालिदींच्या घाटातील अपघाताच्या जागी, हि फुले वाहायला तो येत असे.
त्या ठराविक ठिकाणी, सडकेपासून दहा फुट दूर असलेल्या दगडावर, त्याने सोबत आणलेली फुल ठेवली. "काली, बारावर्ष होऊन गेलीत. पण तुला विसरता आले नाही. मिस यु!" तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. त्याला घाट ओलांडून परत यावे लागणार होते. कारण अश्या अरुंद घाटात गाडी, वळण घेणे धोकादायक होत. त्याने गाडी सावकाश रोडकडे घेतली, मिरर मध्ये पाहून अदमास घेतला आणि गाडीला वेग दिला.
डोक्यात 'चपटी' हळूहळू, दरवळू लागली. मनात काली हसत होती. तरी त्याची स्टियरिंग वरली पकड भक्कम होती. सगळं झकास चालू होत. मोसम सुहाना होता. उघड्या विंडोतून येणारा वारा, शेजारच्या ओल्या, घनदाट वनराईचा जंगली सुगंध, त्याच्या चेहऱ्यावर शिंपत होता. त्याला आता पावसाची साथ लाभली होती. समोरचे वळण नजरेच्या टप्पात होते. स्पीडोमीटरचा काटा नव्वदी कडून ऐंशीकडे झुकत होता.
आणि झटक्यात विकीच्या मेंदूने काही तरी बिघडल्याची नोंद घेतली. काय होतंय हे कळायच्या आत, त्याने त्याची गाडी रस्त्याच्या कडेला घेत, करकचून ब्रेक मारून थांबवली! त्याच्या गाडी मागून, एकशेवीसच्या स्पीडने येणारी सिटीहोंडा कर्कश हॉर्न वाजवत, डोळ्याची पापणी लवायच्या आत पास होऊन गेली. तो थोडक्यात बचावला होता! त्याचे हृदय रेसच्या घोड्या सारखे धावत होते!
आपण असे अचानक का थांबलो? याचा त्याला उलगढाही चटकन झाला. समोरून येणारी काळी बी.एम. डब्लू. कार, तुफान वेगाने येऊन, वळणावरल्या झाडाला धडकली होती! बॉनेटचा चकणाचुर झाला होता. पेट्रोलची टाकी फुटली असावी, पेट्रोलचा वास आसपास पसरत होता. ती धडक इतकी भयानक होती कि, कारचे चारही दारे निखळून रस्त्यावर फेकली गेली होती! समोरची दोन्ही चाक निखळली होती. बहुदा उतावरून दरीत घरंगळत गेली असावीत.
विकीची हृदयाची धडधडी थोडी स्थिरावली. तो बऱ्यापैकी भानावर आला. पावसाने आता चांगलाच जोर पकडला होता. डोक्यावर हात धरून, विकी झटक्यात त्या अपघातग्रस्त गाडी जवळ गेला. स्टियरिंगवर डोके रक्तबंबाळ झालेला एक प्रौढ माणूस, अर्धवट शुद्धीत विव्हळत होता. त्याने अंगावर घातलेला कोट, तो गाडीचा मालक असल्याचे स्पष्ट करत होता. विकी पॅसेंजर सीट कडून गाडीच्या आत गेला. त्याने आपला मोबाइलटॉर्च सुरुकरून आतली पहाणी केली. डॅशबोर्डा जवळच्या कप्प्यात काही कागद पत्रे, मनीपर्स होती, ती त्याने खिश्यात खुपसली. त्या माणसाच्या पायाजवळ त्याचा मोबाईल पडलेला दिसला. तो उचलताना त्याने सवयीने ऑन करून पहिला, स्क्रीन लॉक नव्हते. तोही त्याने खिशात घातला. या जखमी माणसाचं काय करावं? का? असच सोडून जावं? याला वाचवण्यासाठी जवळचा दवाखाना पहावा लागणार होता. म्हणजे पोलिसांचं लफडं! वर ड्रिंक अँड ड्राइव्हची वेगळीच भानगड! आत्ता आपल्या रक्तात, किमान दोन क्वार्टर दारू उसळत आहे! हे सगळं निस्तरायच कशा साठी? यात आपला काय फायदा?
त्याच्या रक्तात, लाल रक्तपेशी पेक्षा स्वार्थ ज्यास्त होता. त्या तशा विचित्र परिस्थितीचा, कसा फायदा करून घेता येईल, याचा इन्स्टंट प्लॅन त्याच्या मेंदूत तयार झाला होता! मोकेका फायदा उठाओ! त्या साठी फक्त, या जखमी माणसाला गाडी पासून शक्य तितक्या दूर नेणे गरजेचे होते. हा बाबा, किमान एक दिवसतरी कोणाला सापडला नाही पाहिजे! आणि सापडला तरी, या अपघातग्रस्त गाडी आणि याचा संबंध जोडता नाही आला पाहिजे! मग मात्र, त्याचा प्लॅन शंभरटक्के सक्स्सेसफूल होणार होता!
' इसे ऐसा हि छोड दिया तो, ये मर जायेगा!' 'शोले'तला अभिताभ बच्चन त्याच्या कानात म्हणाला. पण त्याला तो जखमी, वाचला काय अन मेला काय? काही सोयर सुतक नव्हते! तो झटपट कामाला लागला. विकीने जखमीला कसेबसे सीटबेल्ट सोडवून बाहेर काढले. जाणार येणार वाहने आजूबाजूला डुंकूनही पहाणार नव्हते. याची खात्री विकीला होती. आणि कोणी मदत ऑफर केलीच तर, त्याला कसे कटवायचे, हे त्याला पक्के माहित होते. त्याने कपाळावरला घाम पुसला. तो या जखमीला, जमले तर, सुरक्षित ठिकाणी पोहचवणार होता, पण ते ठिकाण हॉस्पिटल नसावे इतकी तो काळजी घेणार होता! त्याने जखमीला आपल्या खांद्यावर घेतले, रस्ता क्रॉस करून त्याला आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर ठेवले. त्याच्या डोक्याचा जखमेतून अजून रक्त ठिबकत होतेच. त्याने गाडी स्टार्ट केली.
आता पाऊस थांबला होता. तुरळक वस्ती लागली होती. एक, दोनमजली घर पाहून विकीचे डोळे चमकले, त्याने गाडी थांबवली. रात्रीचे साडेदहा होऊन गेले होते. घर मंद प्रकाशात झोपल्यासारखे सुस्त दिसत होते. त्या जखमीला विकीने मागच्या सीटवरून ओढून बाहेर काढले. त्याची नाडी तपासली. ती मंद चालत होती, नियमित नव्हती. डोक्याच्या जखमेतून होणार रक्त प्रवाह थांबला होता. पण तो अजून शॉकमध्येच होता.जीवाला धोका होताच! विकीने त्याला गेटच्या पोलला टेकून ठेवले. दोनदा, त्या बंगल्याच्या गेट वरील कॉल बेलचे बटन दाबले. आणि चटकन गाडीत घुसून गाडी स्टार्ट केली. थोडे पुढे जाऊन तो थांबला. बंगलीच्या वरच्या मजल्याच्या एका खोलीत दिवा पेटल्याचे त्याने, मिरर मध्ये पहिले. म्हणजे त्या जखमीला वैद्यकीय मदत मिळणार होती! चला एक सत्कार्य घडले म्हणायचे!
०००
विकी त्या जखमींची सोय लावून वेगात गावाबाहेर परत फिरला. हवेत गारवा जाणवत होता. रस्त्या लगतच्या, एका चहाच्या टपरी जवळ त्याने आपली कार थांबवली.
"भाऊ एक कडक मिठ्ठी! स्पेशल चहा करा! अन सोबत काय खायला असेल तर द्या." त्याने चहावाल्या म्हाताऱ्याला सांगितले.
"साहेब, सांच्या काढलेले वडे हैती. जरा सवड आसन तर, गरम तेलातनं काडतो. फकस्त, धा मिनिट!"
"ठीक. पण लवकर करा. रात्र झालीयय घाट पार करायचा आहे."
त्या चहावाल्याचे, वडे आणि चहा तयार होई पर्यंत, विकीने ब्लबच्या पिवळ्या प्रकाशात, खिशातले, त्या जखमीचे पाकीट काढले. दोनदोन हजाराच्या बचकभर नोटा त्यात होत्या! त्या अर्थात विकीने, आपल्या खिश्यात कोंबल्या. नॉट बॅड! पाकिटात त्याचे ड्राइव्हिंग लायसन्स पण होते. पाकिटाच्या प्लास्टिक विंडो मध्ये, एका सुंदरबाई बरोबरचा एक फोटो होता. पोजवरून, ती त्याची बायको असावी असे वाटत होते. तोवर म्हाताऱ्याने वाफाळलेला चहा आणि गरमागरम, चार वडे समोर आणून ठेवले. त्या जखमीचे नाव चंद्रशेखर होते, हे त्याच्या लायसेन्स वरून कळत होते.
वड्यांचा फडशा पडून, विकीने चहा संपवला आणि तो पैसे देण्यासाठी म्हाताऱ्याकडे वळला.
"साहेब, तुमच्या गाडीत मागच्या शिटावर कुणी घायाळ प्याशिंजर हाय का?" म्हाताऱ्याने त्याच्या गाडीकडे टक लावून पहात विचारले.
"नाही!"
"मग, पायऱ्याला रगत कसलं दिसतया?"
विक्याच्या हृदयाचे दोन ठोके चुकले! खरेच तेथे सकाळलेल्या रक्ताचा, पंज्या एव्हडा डाग पडला होता! जखमीचे डोके याच बाजूला होते!
"येताना वाटेत एखादी खार नाहीतर ससा, चाकाखाली आला असेल! तुम्हाला काय वाटलं?" विकीने घाईत पैसे देताना विचारले. त्या म्हाताऱ्याचा विकीच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नव्हता, हे त्याच्या डोळ्यात दिसत होते.
"मला वाटली कि, आक्शीडन्ट करून पाळताव कि काय?"
विकी तेथून सटकला.
थोडं अंतर गेल्यावर रस्ता निर्मनुष्य झाला. विकीने गाडी साईडला घेतली आणि तो गाडीबाहेर येऊन दाराला टेकून उभा राहीला. त्याने अपघात्याचा मोबाईल काढला. ऑन केला. पाच सहा मिस्ड कॉल्स होते, त्यावर पाकिटातल्या बाईचा फोटो होता. विकीने बिनधास्त कॉलब्याक केले. आणि मोबाईल कानाला लावला. त्याच्या रँडम प्लॅन मधला हा अत्यंत महत्वाचा भाग होता. दोनच रिंग मध्ये फोन उचलला गेला.
"हॅलो, चंद्रू! अरे कोठे आहेस? मी केव्हाची फोन करती आहे. तू उचलताच नाहीस! का?" अपेक्षे प्रमाणे बाई फोनवर होती. त्या बाईचा आवाज सेक्सी होता. दारू पिल्या सारखा.
"मी तुझा चंद्रू नाही! तुझा तो, ढेरपोट्या चंद्रू माझ्या ताब्यात आहे! कानावरच्या झिपऱ्या बाजूला करून ऐक! एक पोलिसात जाऊ नकोस! दुसरं पाचलाख तयार ठेव! कसे आणू? कुठून आणू? असले बहाणे मला नकोत! मी पुन्हा फोन करून पैसे कधी आणायचे अन कोठे ठेवायचे ते सांगेन! आणि समाज नाही दिलेस तर? मी, अजून एक फोन करून, तुझ्या चंद्रूचा मुडदा कोठे फेकलाय ते सांगेन! तोवर, बाय अँड बॅड नाईट!" फोन कट करून, विकीने तो झटक्यात दूर भरकावुन दिला! हे मोबाईल साले, आपले माग मागे सोडतात! त्यापेक्षा फेकून दिलेला बरा! या विचारसरशी विकी चटका बसल्या सारखा जागीच खिळला! माग? मोबाईलचा माग दूर भिकावून तोडता आला होता. आपल्या मागचे काय? त्याला घाम सुटला. या क्षणापर्यंत त्याने याचा, विचारच केला नव्हता! त्या गाडीच्या आत, जखमी चंदूच्या हातावर आणि कपड्यावर त्याच्या बोटाचे ठसे, तो सोडून आला होता. अजून काय, काय मागे राहिलंय कोणास ठाऊक?
विकीने खिशातून सिगारेट काढली. ओठाच्या कोपऱ्यात धरून, ती शिलगावली. त्याचे डोके विचारमग्न झाले. त्याची रँडम योजना तीन पॉईंटवर त्याच्या मेंदूने तयार केली होती. एक अपघातातली महागडी गाडी-- पैसेवाला, दोन मोबाईलचा अनलॉकड स्क्रीन -- कॉन्टॅक्ट नंबर्स, तीन किडन्यांपिंगची धमकी आणि पैसे कलेक्ट करायला वेळ हवा, म्हणून चंद्रशेखरला अपघातग्रस्त गाडीपासून दूर करणे. चंद्रशेखरच्या, अंगावरच्या आणि कपड्यावरच्या ठश्यांची त्याला काळजी नव्हती. हॉस्पिटलवलेच ते साफ करणार होते. फक्त गाडीत फ्रंट सीट आणि स्टियरिंगवर काही ठेसे असण्याची शक्यता होती. हि एक लिंक सोडली तर, त्याचा माग काढणे कोणाचं शक्य नव्हते! सिगारेटच्या बोटाला बसलेल्या चटक्याने तो विचाराच्या तंद्रीतून बाहेर आला. साला, पैसा हवा तर रिस्क घ्यावीच लागणार! त्याने घड्याळात नजर टाकली. रात्रीचे बारा वाजले होते. अजून त्याचा कडे काही तास होते. त्याने अक्सेलेटरवर दाब वाढवला. नाकात वारभरल्या जनावरासारखी, त्याची गाडी दौडू लागली. पुढच्या वळणावर ते अपघाताचं ठिकाण होत. त्याने वेग कमी करून ते वळण पार केले. कचकन ब्रेक दाबला! त्या धडकल्या गाडी जवळ एक ऍम्ब्युलन्स आणि पोलीस जीप उभी होती! रात्री अकरा नंतर या घाटात पोलीस पेट्रोलिंग सुरु होते, हे तो विसरला होता!
******