शोध चंद्रशेखरचा!
८----
" साला हमारा ऑर्डरवला पाकीट क्या किया? हमको बोगस माल दिया!" तो चौताळलेला पठाण गरजला.
दुबईच्या ज्वलरी मॉलच्या, मागल्या गल्लीत मेहबूबचे ते छोटेखानी लेदर गुड्सचे 'अफगाण लेंदर्स' हे दुकान होते. त्याच्या दुकानातील कातडी वस्तू, या हाताने तयार केलेल्या असत. प्रत्येक नग एक 'क्राफ्ट' पीस होता. जाणकार आवर्जून त्याच्या दुकानाकडे वाकडी वाट करत. काही शेख लोक त्याच्याकडून आपल्या आवडी प्रमाणे आणि डिझाईन प्रमाणे वस्तू बनवून घेत.असेच एक स्पेशल बेल्ट आणि पुरुष वापरतात ते मनीपर्सची ऑर्डर मिळाली होती. साधारण किमतीच्या दसपट पैसे त्याला मिळणार होते! फक्त त्याला त्यांनी दिलेला कागद त्या पाकिटाच्या लेदरच्या दोन लेयरच्या आत लपवून ते पाकीट शिवायचे होते! इतकेच!
मेहबूबने त्या स्पेशल पाकिटासोबत तसेच, अजून एक पाकीट तयार केले होते. दोन्ही पाकिटावर हिरव्या शाईचे 'अफगाण लेंदर्स'चा लोगो एम्बॉस पण करून टाकला होता. दोन्ही पाकिटे विकली गेली होती. त्याला आज आठ दिवस झाले होते. आणि आज अचानक तो पाकिटाची ऑर्डर देणारा, तो धटिंगण पठाण तंगड्या फाकवुन समोर उभा होता! काही तरी गोची झाली होती.
"बरखुरदार, आप तो ले चुके है डिलिव्हरी!"
"बेकूफ समझता है? साले, ओ कागज उसमे नाही है! बोल क्या किया?"
"साब, वो कागज का तुकडा आपके सामनेही मैने पाकीट के चमडमे सी दिया था! और पाकीट पालीश मार के दिया था आपको!"
"तू पाकीट चमका रहा था, हम चाई पिने गया, इस टाइम कुछ तो हुवा!"
"अरे हा, याद आय! आपके जैसही एक पाकीट, मैने एक इंडियन को बेचा था!"
"साले, तुने पाकीट डुप्लिकेट बनवा दिया? फिर बराबर! हमारा पाकीट उसको दिया! और हमको डुप्लिकेट मिला!"
मेहबूबच्या पायाखालची वाळू सरकली! हे खरे होते!
तांबडे लाल डोळे करत, त्या पठाणाने मेहबूबला गचांडीला धरून डोक्या इतके उचलले, आणि सोडून दिले!
"कोन इंडियन है?" दात ओठ खात त्याने विचारले.
कसेबसे दुकानातला cctvच्या फुटेज वरून मेहबूबने तो इंडियन दाखवला.
राग अनावर झालेल्या पठाणाने, चार गोळ्या मेहबूबच्या टाळक्यात घातल्या! CCTV चे सगळे पार्टस पिशवीत कोंबून, पठाणाने 'अफगाण लेदरला' आग लावून दिली!
"भाई, मेहबूबने गद्दारी कि! पाकीट किसी इंडियनको थमादिया! मैने दुकानके साथ उसको जला दिया! CCTV साथ मे ला रहा हू! ओ इंडियन देख लो, उधर जाके सालेको डबोचेंगे!" पठाणने मोबाईलवर 'भाई'ला रिपोर्टींग केले आणि काहीच झाले नाही अश्या थाटात, तो आला होता, त्या उघड्या जीप मधून धूळ उडवत निघून गेला.
समोरून फायरब्रिगेडची गाडी, ठणा-ठणा घंटा बडवत येत होती!
०००
तो चांगला सहाफुटी उंचेला खप्पड गालाचा, हावरट नजरेचा माणूस होता. त्याचे डोळे सापा सारखे चापट होते. डोक्यावर दोन सेन्टीमीटर उंचीच्या केसांचा थर होता, संडास साफ करायच्या ब्रश सारख्या राठ केसांचा. त्याला पाहिल्याबरोबर हा माणूस, छाटकभर सुद्धा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, हि धारणा पाहणाऱ्याची होत होती. तो स्वतःची ओळख 'मी माणिक!' अशी करून देत असे. आसा हा 'माणिक' एका स्पेशल कामावर नियुक्त झाला होता.
माणिकने त्याच्या पद्धतीने आधी, त्या फोटोवाल्याची व्यवस्थित माहिती काढली. त्या फोटोतल्या माणसाचे नाव चंद्रशेखर होते. तो एका मोठ्या कंपनीचा मालक होता. त्याने आपल्या पेक्ष्या लहान असलेल्या पोरी बरोबर लग्न केले होते. हे महत्वाचे मुद्दे त्याने लक्षात ठेवले होते. त्याला चंद्रशेखर आणि त्याच्या बायकोचे मोबाईल नंबरही माहित होते. हि माहित जमवणे हा त्याचा आगाऊपणा होता. त्याचे काम फक्त चंद्रशेखर वर नजर ठेवणे आणि दिवसाकाठी त्याचा अहवाल एका मोबाईलवर देणे, इतकेच होते. त्यासाठी त्याला, त्याच्या खटारा स्विफ्ट साठी लागणारे पेट्रोल आणि रोज तीन हजार मिळणार होते. गेले चार दिवस चंद्रशेखर दुबईला गेल्याने त्याला भरपूर आराम मिळाला होता.
तो चंद्रशेखरच्या ऑफिस बाहेर आपली स्विफ्ट पार्क करून, मोबाईलवर 'तसली' व्हिडीओ क्लीप पहात होता. तेव्हड्यात 'तो निघालाय' म्हणून मोबाईलवर फोन आला.
त्याने गालफडात साठलेला घाणेरडा तंबाखूचा गोळा, तर्जनी थोबाडात घालून काढला आणि रस्त्यात फेकून दिला. भसकन गाडीचे उघडे दार ओढून घेतले, आणि गाडी चालू केली. त्याच्या समोर चंद्रशेखरची काळी गाडी रोडवर धावत होती, तो सुरक्षित आंतर ठेवून, तिच्या पाठलागावर निघाला. कदाचित आज दूरवर पाठलाग करावा लागेल, याची 'टीप' त्याला मिळाली होती. त्या मुळे पेट्रोलची टाकी त्याने फुल करून घेतली होती!
रहिवाशी वस्ती मागे पडली, तशी चंद्रशेखरच्या गाडीची स्पीड वाढली. तो औरंगाबाद रोडला लागला. माणिकला त्या गाडीच्या वेगाशी जमवून घेणे कठीण जात होते. त्याच्या खटाऱ्याचा पिकअप प्रॉब्लेम होता. पण माणिक पट्टीचा ड्राइव्हर होता. त्याला खात्री होती कि वाटेत घाट लागल्यावर, चंद्रशेखरला वेग कमी करावा लागणार होता. तेथे तो गाडीला गाठू शकणार होता. आणि झालेही तसेच! घाटाच्या चढामुळे चंद्रशेखरची गाडी काहीशी स्लो झाली होती. ती आता त्याच्या नजरेच्या टप्प्यात होती. चंद्रशेखरला फॉलो करताना, एक गोष्ट त्याला खटकत होती, हा खूप रॅश ड्रायव्हिंग करत होता! स्पीड कमी न करता, तो समोरून येणाऱ्या वाहनांना कट मारत होता! ब्रेकचा वापर तो करतच नसावा. साल, असल्या घाटात हे गाडीचे थेर करणं महाग पडू शकत!
आता घाटाची चढण संपत आली होती. मघाशी झाकाळून आलेले आभाळ गळू लागले होते. माणिकने गाडीचे व्हायपर चालू केले. समोरची BMW थोडी अस्पष्ट दिसत होती. समोरच्या वळणावर चंद्रशेखरची गाडी वळल्याने माणिकला दिसत नव्हती. आणि माणिकने स्पीड कमी करून ते धोकादायक वळण पार केले, आणि कचकावून ब्रेक मारत, गाडी साईडला घेऊन थांबवली. मोठा आवाज झाला! आणि ते भयानक दृश्य माणिकच्या नजरेला पडले. तो डोळे फाडून समोर पहात होता. चंद्रशेखरची मस्ती नडली होती! माणिकच्या मनात जी भीती मघाशी डोकावत होती, ती खरी ठरली होती! ती काळी गाडी वळणा समोरच्या झाडावर आदळली होती! तशाच भर वेगात! बोनेटचा चुराडा झाला होता. दार निखळून पडली होती. आणि समोरची दोन्ही चाक, शेजारच्या दरीत फेकली गेली होती! तो या धक्यातून सावरला आणि त्याने मोबाईल काढला, अपघाताचे 'रिपोर्टींग' करावे लागणार होते. पण घाटात मोबाईलला रेंज नव्हती! त्याने मोबाईल खिशात सारला. चंद्रशेखरचे काय झालंय, हे पहाणे गरजेचे होते. तो चंद्रशेखरच्या गाडीकडे पाऊल उचलणार, तेव्हड्यात दुसरा धक्का त्याची वाट पहात होता! समोरून येणाऱ्या एका भरधाव गाडीने, अपघात पाहून कर्कश्य ब्रेक मारला होता. क्षणात त्या गाडीतील तो तरुण खाली उतरला, पाऊस वाढला होता. तो तरुण डोक्यावर हातधरत चंद्रशेखरच्या गाडीकडे घावला. त्या तरुणाच्या, गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात माणिकला, त्याचा हालचाली स्पष्ट दिसत होत्या. चंद्रशेखरच्या गाडीला वळसा घालून तो तरुण, पॅसेंजर साईड कडून गाडीत घुसला. दोनचार मिनिटात तो बाहेर आला. बाहेर येऊन त्याने चंद्रशेखरला सीटबेल्ट मधून सोडवून खांद्यावर घेतले. आणि त्याला आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर ठेवून तो निघाला. माणिक पहात होता. चंद्रशेखर घायाळ होता. त्याच्या डोक्यातून रक्त ठिबकत होते, आणि पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात होते! माणिक बारीक लक्ष देऊन पहात होता. चंद्रशेखर जखमी असला तरी, तो जिवंत होता आणि हा तरुण त्याला जवळच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार, यात माणिकला तिळमात्र शंका नव्हती. माणिकने रस्त्या लगतच्या जेमतेम तीनचार फूट जागेत आपली कार वाळवून घेतली, आणि तो तरुणाच्या गाडीचा पाठलाग करू लागला. चंद्रशेखर कोणत्या दवाखान्यात ऍडमिट होतोय, हे त्याला पाहायचे होते. रिपोर्टींग करताना उपयोगी पडणार होते. या स्पेशल रिपोर्टींग साठी तो हजार रुपये ज्यास्त मागणार होता! हर जान और जानकारी कि इक किंमत होती है, बॉस!
*******