शोध चंद्रशेखरचा!
७--
इरावती त्या सिक्रेट मिटिंग साठी, जोग साहेबांच्या घरी पोहंचली तेव्हा, जोग साहेबांसोबत, एक साधासा दिसणारा माणूस, हलक्या आवाजात बोलत होता. तिला पहाताच तो एकदम गप्प झाला.
"या इन्स्पे.इरावती. आणि इरा हे आहेत मिस्टर राजे!"
"म्हणजे, गुप्तहेर विभागातले!"
"हो तेच हे!"
"सर, तुमचे नाव खूप ऐकले होते. आज प्रत्यक्ष भेट होत आहे." इरावती भारावून गेली होती.
"कमनिग तो द पॉईंट. दुबईतून -----------" नंतर ते तासभर बोलत होते. इरावती आणि जोगसाहेब फक्त ऐकत होते! आपल्या हद्दीत काय उत्पात घडू शकतो, याच्या कल्पनेनेच इरावती हादरली होती.
०००
ती गुप्त मिटिंग संपवून इरावती आपल्या स्टेशनकडे निघाली. तिने मिटिंग साठी मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला होता, तो ऑन केला. चार कॉल होते आशाचे. त्यात नवल नव्हते, ती अगदी ब्लब शॉट झाला तरी फोन करते! रात्रीचे साडेदहा वाजले होते, तरी पोलीस स्टेशनला जावे लागणार होते. किडन्याप नाट्याचे काय झाले? याची तिला काळजी होती. कारण शिंदेकाकाकांचा मिसकॅल दिसत नव्हता!
ती पोलीस स्टेशनमध्ये पोहंचली तर, एक विचित्र दृश्य दिसले. शिंदेकाका एका हेल्मेटने चेहरा झाकलेल्या पोरीला, गन पॉइंटवर ठेवून उभे होते! आणि ती पोरगी एक बॅकसक पोटाशी गच्च धरून बसली होती!
"मॅडम, ऑपरेशन सक्सेसफुल! आम्ही किडन्यापरला पकडलाय!" शकीलने उल्हासात सांगितले.
इरावतीने कपाळावर हात मारून घेतला.
"शिंदेकाका, गन खाली करा! शकील समोरच्या हॉटेलातून काही खायला अन कॉफी घेऊन ये, सगळ्या साठी!"
शिंदे काकांनी आपली गन होल्डरमध्ये ठेवून दिली.
"अर्जुना, काढ तो हेल्मेट! आणि हा काय प्रकार झाला ते मला सांग!"
"म्हणजे? तुम्ही ओळखता या पोरीला?" शिंदेकाका आश्चर्य चकित झाले होते.
"काका, हि माझी मैत्रीण आहे!" अर्जुनाला भरून आले. एक पोलीस इन्स्पेक्टर आपल्या इंफॉर्मरला कायम धाकात आणि दहशतीत ठेवत असतात. एखादीच इरा सारखी, 'मैत्रीण' म्हणणारी!
"बापरे! तसे असेल तर सॉरी!"
"अर्जुना, काय झालं?"
"मॅडम, मी कस्तुरीवर नजर ठेवून होते. ती सॅक घेऊन रुद्राक्ष मध्ये गेली. कॉफी घेऊन ते वेंधळी, हि सॅक त्याच टेबलवर विसरून निघून गेली! मी तिच्या समोरच्याच टेबलवर बसले होते. ओळख लागू नये म्हणून, मी हेल्मेट तसाच डोक्यावर ठेवला होता. मी सॅकला हात घेतला तसा, माझ्या मानेला पिस्तूलच्या नळीचा स्पर्श झाला! आणि या तुमच्या काकांनी मला पोलीस स्टेशनात घेऊन आले! मी त्यांना आणि ते मला गुंड समजत होते!"
मग बराच वेळ हसण्याचा खेकाना उडाला!
इरावती लवकरच या हास्यकल्होळातून सावरली. या गैरसमजातून या केसचा गुंता अधिकच वाढला होता. तो किडन्यापर असलाच तर, बिथरणार होता. एक तर तो पुन्हा वाढीव पैशाची मागणी करणार होता, किंवा जखमी चंद्रशेखरचे ओझे झुगारून टाकणार होता! म्हणजे ---मुडदा पडणार होता!
०००
'गॅलॅक्सि सोल्युशन्स' नावाची फ्लुरोसन्ट रंगातला डिस्प्ल्ये बोर्ड असलेल्या, गॅलॅक्सि कॉम्प्लेक्स जवळ इन्स्पे.इरावतीने आपली बाईक पार्क केली. पोलीस आल्याची आसपास बातमी लागू नये म्हणून, ती आज सध्या वेशात आली होती. त्या इमारतीचा सहावा मजला, सगळाच्या सगळा, आठ हजार चौरस फुटाचा फ्लोअर गॅलॅक्सि सोल्युशन्स कडे होता. ऑफिस मध्ये पाऊल ठेवताच, इरावतीला चंद्रशेखर कसल्या श्रीमंतीचा मालक असावा याची कल्पना आली.
"मी इन्स्पे. इरावती. मला कंपंनीच्या मालकाला भेटायचंय!" रुबाबात इरा रिसेप्शनिस्टला म्हणाली.
"ऐनी अपॉइंटमेंट?"
"पोलिसांना,अपॉइंटमेंट गरजेची असते?"
"मॅडम, आपण सरकारी अधिकारी आहेत. वेळेचे महत्व आपल्याला मी सांगण्याची गरज नाही! अपॉइंटमेंट नसेल तर, थोडावेळ बसा. मी त्यांना, तुम्हाला आत पाठवण्याची परवानगी मागते." रिसेप्शनिस्ट कोपऱ्यातल्या सोफ्याकडे बोट दाखवत म्हणाली.
त्या उंची सोफ्यावर इरावती बसली. लगेच एका ऑफिस बॉयने कॉफीचा पॉट, साखर, कॉफी, दुधाचे छोटे भरलेले कप्स, असलेला चांदीचा कॉफीसेट, ट्रे मध्ये घालून समोर आणून ठेवला. इरावतीने कॉफी करून घेतली. सावकाश घुटके घेत आजूबाजूचा परिसर, आणि वर्क कल्चर पहात होती. इंटिरियर अप्रतिम होते. भिंतीवरील पेंटिंग्ज ओरिजनल होत्या! फोटो कॉपीज नव्हत्या. चंद्रशेखरची टेस्ट एका रसिकाची होती.
"मॅडम, बॉस इस वेटिंग फॉर यु!" पायाचा आवाज न होवू देता, ती रिसेप्शनिस्ट इरावतीच्या जवळ येऊन कुजबुजली.
CEO पाटी असलेल्या केबिनचे दार उघडून इरावती आत गेली. वर्डक्लास इंटिरियर असलेली, ती प्रशस्थ केबिन होती. एका कोपऱ्यात छोटा डायनींग टेबल आणि दोन उंच खुर्च्या होत्या. शेजारी लॅझुरियस लेदरच्या सोफा, आणि एक नाजूक टीपॉय. केबिन मध्ये दोन ऑफिस टेबल होते. एक लहान आणि एक मोठा. मोठ्या टेबलवर 'चंद्रशेखर' नावाची नेमप्लेट होती. त्यामागची खुर्ची रिकामी होती. छोट्या टेबलमागे, एक हातमागाच्या जाड्या भरड्या साडीतली चष्मेवाली उंच बाई बसलेली होती. तिच्या टेबलवर 'चैत्राली' नावाची नेमप्लेट होती.
"मी इन्स्पे. इरावती! एका अपघाताच्या चौकशी साठी आले आहे." आपला हात शेकहॅण्डसाठी पुढे करत इरावती म्हणाली.
"स्वागतम, इरावतीजी. मी चैत्राली,माझ्या गॅलॅक्सि कंपनी तर्फे आपले स्वागत करते." दोन्ही हात जोडत चैत्राली म्हणाली.
"थँक्स!"
"बसा, आणि विचारा काय हवाय ते?"
"चैत्राली, तुम्ही या मालकाच्या केबिन मध्ये कश्या?"
"मी चंद्रशेखरची सेक्रेटरी आहे. आणि त्याच बरोबर मी कंपनीची एक ऑफिसर सुद्धा. ते नसतील तेव्हा मीच या कंपनीचा व्यवहार पहाते. त्याप्रमाणे मला लिमिटेड पॉवर ऑफ ऑटरनी आहे! मी इथेच बसते!"
"तुम्हाला चंद्रशेखरच्या कारच्या अपघाताची माहिती आहे का?"
"हो! लोकल न्यूज चॅनलवर बातमी पहिली!"
"तुम्ही शेवटचं चंद्रशेखरला कधी पाहिलं?"
"ते मिटिंगसाठी औरंगाबादला गाडी घेऊन गेले तेव्हा."
"म्हणजे अपघात झाला ती गाडी घेऊन गेले होते?"
"हो."
"सोबत कोणकोण होत?"
"कोणीच नाही!"
"का? ड्राइव्हर नव्हता?"
"ते नको म्हणाले! त्यांना लॉन्ग ड्राईव्हचा छंद आहे !"
"त्यांचे ड्राइव्हिंग कसे आहे?"
"म्हणजे?"
"सेफ चालवायचे कि रॅश?"
"मला माहित नाही! कधी त्यांच्या सोबत मी गेले नाही! पण सेफ चालवत असावेत, कारण कधी किरकोळ सुद्धा अपघात झालेला नाही!"
"तुम्ही या कंपनीत येऊन किती दिवस झाले?"
"खरे तर हा प्रश्न 'अपघाताच्या' कक्षेबाहेरचा आहे, तरी उत्तर देते! पाच वर्ष झाली." हे पाणी वेगळंच आहे हि नोंद इरावतीच्या मनाने घेतली.
"इतर वेळी चंद्रशेखरची गाडी कोण चालवतो?"
"सुलतान म्हणून ड्रायव्हर आहे तो."
"शेवटचा प्रश्न. त्या दिवशी चंद्रशेखर गाडीघेवून गेल्यानंतर, त्यांनी काही संपर्क केला का?"
"नाही."
"तुमच्या कंपनीच्या मालकाची गाडी अपघातग्रस्थ होते, मालकाचा पत्ता लगत नाही. तुम्ही पोलिसांशी संपर्क का साधला नाही?"
क्षणभर चैत्राली पुतळ्या सारखी बसली. तिने डोळ्यावरचा चष्मा काढून हातात घेतला.
"मी मघाशी तुमच्या जोग साहेबांशी बोलले आहे! आमची लीगल टीम ते काम पहात असते!" इरावतीच्या नजरेला नजर भिडवत ती म्हणाली. या चैत्रालीच्या नजरेत एक वेगळीच जरब इराला जाणवली. तिचे डोळे भेदक होते. आणि तिने काजळाचे पट्टे ओढले होते, खालच्या पापण्या जवळ.
"थँक्स चैत्राली, गरज पडली तर फोन करीन. आणि मला सुल्तानशी बोलायचे आहे! आत्ता ऑफिसमध्ये आहे का ?"
"नाही. आला कि पाठवीन त्याला तुमच्या कडे."
इरावती केबिन बाहेर आली. या चैत्रालीत काहीतरी ऑड आहे, पण काय? होय, तिचा आवाज पुरुषी वाटत होता! नको तितका!
******