शोध चंद्रशेखरचा! - 3 suresh kulkarni द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शोध चंद्रशेखरचा! - 3

शोध चंद्रशेखरचा!

३----

आपल्या लांब सडक बोटात धरलेली किंगसाईझ सिगारेट, कस्तुरीने जवळच्या ash ट्रे मध्ये चिरडून विझली. मनातली चरफड त्या निर्जीव सिगारेट वर काढली होती. पसरट बुडाच्या जड काचेच्या ग्लासातल्या, जीनच्या घोटकडे, जडपापण्यांनी एक नजर टाकली. तिच्या धुंद डोळ्यांना पापण्यांचे ओझे पेलवत नव्हते. त्या क्षणा क्षणाला मिटत होत्या.

अट्टाहासाने तिने पुन्हा डोळे उघडले. जीनच्या बाटलीत राहिलेली जीन ग्लासात ओतून घेतली, आणि तो ग्लास पुन्हा तोंडाला लावला. रोस्टेड काजूचे चार दाणे तोंडात टाकून ते सावकाश चघळू लागली. आज पुन्हा चंद्रू घरी आला नव्हता. म्हणजे आजून पर्यंत तरी. एखादी बिझनेस मिटिंग असेल तर, होतो त्याला घरी यायला उशीर. पण तो अकरापर्यंत परततो. आता आकरा वीस झालेत. अजून दहा मिनिटे वाट पाहून सरळ बेडरूम मध्ये जाऊन झोपावे झालं.

तिने नवीन सिगारेट ओठाच्या कोपऱ्यात धरली. हल्ली होतात पाच सहा सिगारेटी रोजच्या. ऑफिसमध्ये नाही, पण घरी मात्र असतात. दारू सुद्धा नैमितिकातली होती, आता ती दैनिकात आलीयय! पूर्वी ती या दोन्ही व्यसनान पासून दूर होती. पण या चंद्रूमूळ ती व्यसन जवळ आलीत. चंद्रुमुळे? हो त्याच्या मुळेच! त्याने अशात थोडे अंतर ठेवायला सुरवात केली होती. म्हणून तिने दारू जवळ केली. कित्ती प्रेम करायचा लग्नापूर्वी! दिवसाचे बारा तास नजरे समोरून हलू द्यायचा नाही. ऑफिस मध्ये त्याची सेक्रेटरी होते ना! मग ते बारा तास पूरेनात म्हणून, त्याने गायत्रीमॅडमला घटस्फोट दिला! सोलमेंट- सोलमेंट म्हणतात तो असाच असतो, असे तेव्हा वाटेतले होते!

आणि आता मात्र काहीतरी बिघडलंय! मला ते जाणवतंय. घरापासून, आपल्यापासून फारकाळ दूर, न राहू शकणारा, रात्र रात्र गायब असतो. बरे त्याला त्याबद्दल विचारलेले आवडतहि नाही. तरी तिने मागच्या आठवड्यात विषय काढलाच होता.

"चंद्रू! काय होतंय?"

"कशाचं काय होतय?"

"हेच, तू हल्ली मला टाळतोयस!"

"तू खूप गम्भीर आरोप करतेस, असं नाही वाटत तुला?"

"नाही म्हणजे, मला असं वाटलं."

"का?"

"तूझ अशात घराबाहेर रहाणं वाढलंय!"

"अजून?"

"पूर्वी सारखं, माझ्याशी मनातलं शेयर करत नाहीस!"

"अजून?"

"तुझ्या कुशीत, मला ती उब जाणवत नाही!"

"कस्तुरी, हे सगळं तुझ्या मनाचे खेळ आहेत! डार्लिंग, माझे कालच्या इतकेच आज आणि आजच्या इतकेच उद्याही, तुझ्यावर प्रेम असेल! यु आर माय सोलमेंट! आणि हो तुला माहीतच आहे, माझ्या कंपनीला दुबईचे एक मोठे काम मिळालाय. व्याप वाढलाय. तेव्हा पूर्वीसारखा वेळ काढणे जमत नाही. आणि हो, तू जेव्हा अशी बोलतेस तेव्हा मात्र, ते मनाला लागत. माझ्यावर विश्वास आहे ना? मग कुठे होतास, काय करतोस? नको ना विचारू! मला नाही आवडत! आग, तुझ्यासाठी मी माझा सुखीसंसार, आणि गायत्री सारखी सोज्वळ बायको सोडलीय!" कस्तुरीचा चेहरा ओंजळीत घेत चंदशेखर म्हणाला होता.

त्याच म्हणणं खरे होते. कारण ते खोटं आहे याचा पुरावा तिच्याकडे नव्हता.

त्या विशाल गॅलरीत तिला एकटीला बसवेना. काही तरी नक्कीच या चंद्रुची भानगड आहे. पुरुषाच्या जातीवर विश्वास ठेवणे घातक असते. तिने पाचव्यांदा चंद्रूला फोन लावला. नुस्ती रिंग वाजत होती! कुठे गेला असेल? कोण्या नवीन बाईच्या घोळात आला कि काय? खात्री नाही, पण त्याची हिस्ट्री हेच संगतीयय! आपल्या साठी त्याने गायत्रीला सोडलं! आता कोणासाठी तरी आपल्याला ----? या विचारा सरशी तिच्या अंगावर काटा आला.

ती ग्यालरीतून उठून बेड रूम मध्ये आली. अंगावरील झुळझुळा गाऊन काढून बेडवर फेकून दिला. आणि सरळ बाथरूममध्ये, शॉवर खाली उभी राहिली. कोमट पाण्याच्या तुषारने तिला थोडी हुशारी वाटली. मागे चंद्रशेखरच्या ऑफिसमधल्या, शहाचा फोन आला होता. बोलता बोलता सहा महिन्याखाली नवीन आलेल्या, चंदशेखरच्या पर्सनल सेक्रेटरीचा विषय, कस्तुरीने मुद्दाम काढला होता. उंचेली काळी- सावळी असलेल्या चैत्रालीत, 'पुरुषांनी मागे वळून पहावे' असे काही नाही, तो म्हणाला होता. पण ती प्रचंड टँलेन्टेड आणि एफिशियंट आहे. इतकी, कि ती एक हाती चंद्रशेखरची सगळी कंपनी सांभाळू शकते! हे हि त्यानेच सांगितले होते! हा पण एक धोका होताच!

कस्तुरीने शॉवर बंद केला. कोरडा सॅटिनचा गाऊन अंगावर चढवला. समोरच्या आरश्यात आपले रूप न्याहाळले. दुधाच्या फ्रेश क्रिम सारखी कांती. रेखीव नाकडोळे, किंचित उपरे नाक, हुकूमत गाजवणारे. आणि सेक्सी ओठ, थोडेसे जाड! यावर तर चंद्रू फिदा झाला होता! चंद्रशेखरच्या विचारसरशी तिने मोबाईल जवळ घेतला. पुन्हा 'नो रिप्ल्याय'!

कस्तुरी तशी कॅल्क्युलेटेड माईंडची होती. तिने आपले भविष्य सुरक्षित करण्याची व्यवस्था करण्यास सुरवात केली होती! चंद्रशेखरच्या मागे लागून तिने स्वतंत्र कंपनी सुरु केली होती. भांडवल चंद्रुचेच होते. आणि आजवरचा व्यवसायाचा अनुभवहि, त्याच्यामुळेच मिळाला होता! तरी तिचे समाधान होत नव्हते. चंद्रुला असे सहजा सहजी ती सोडणार नव्हती. तिने त्या दृष्टीने विचार करण्यास सुरवात केली होती!

बेडरमच्या कोपऱ्यात असलेल्या, मिनी बार टेबल जवळ जाऊन, तिने पुन्हा एक लार्ग पेग बनवून घेतला. चार घोटात तो संपवला. तेव्हड्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. चंद्रूचा कॉल होता! बेडच्या काठावर बसून तिने मोबाईल कानाला लावला.

"हॅलो, चंद्रू अरे आहेस कोठे? मी केव्हाची फोन करतीयय. तू उचलतच नाहीस! का?" तिने दारूमुळे जाड झालेल्या आवाजात विचारले.

""मी तुझा चंद्रू नाही! तुझा तो ढेरपोट्या चंदू माझ्या ताब्यात आहे! कानावरच्या झिपऱ्या बाजूला करून ऐक! एक पोलिसात जाऊ नकोस! दुसरं पाचलाख तयार ठेव! कसे? कुठून आणू? असले बहाणे मला नकोत! मी पुन्हा फोन करून पैसे कोठे अन कधी ठेवायचे ते सांगेन! आणि समाज नाही दिलेस तर? मी, अजून एक फोन करून, तुझ्या चंद्रूचा मुडदा कोठे फेकलाय ते सांगेन! तोवर तुला बॅड नाईट!" मग्रूर आवाजात कोणीतरी बोललं आणि फोन कट झाला!

एव्हाना तिचे डोके जड झाले होते. ती सरळ बेडवर कलंडली. कानावरल्या झिपऱ्या - पाचलाख - किडन्याप - ढेरपोट्या चंद्रू - पुन्हा फोन करतो - असं काहीतरी तिच्या कानात घुमत होत! काहीतरी महत्वाचं आहे. आपण काहीतरी करायला पाहिजे, असे तिला वाटत होते, पण जमत नव्हते. तिचे डोळे मिटले गेले!

******