शोध चंद्रशेखरचा! - 4 suresh kulkarni द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शोध चंद्रशेखरचा! - 4

शोध चंद्रशेखरचा!

४----

इन्स्पे.इरावती तिच्या पोलीस स्टेशनला पोहंचली, तेव्हा दुपार टाळून गेली होती. येतायेत तिने सोबत आणलेली ऑइल असलेली माती आणि तो रक्ताळलेले कपड्याचा तुकडा परीक्षणासाठी, फॉरेन्सिस लॅब मध्ये दिला होता.

फिंगर प्रिंट आणि ब्लडचा रिपोर्ट सकाळपर्यंत येणार होता. शिंदेकाकाच्या तपासाची माहिती पण, रात्री जेव्हा ते येतील, तेव्हा कळणार होती. आता फक्त त्या अपघातग्रस्त गाडीच्या रजिस्ट्रेशनची माहित मिळू शकणार होती.

तिने राकेशला फोन करून लक्षात ठेवलेला गाडी नंबर सांगितला. आणि माहिती काढण्यास सांगितले. तो RTOच्या ऑफिसिअल साईट वरून माहिती काढू शकणार होता. राकेश डिपार्टमेंटचा सायबर जीन होता. पद नसले तरी, तो हौसेने हे काम करायचा. त्याला या कामात गती होती.

" मॅडम, सकाळ पासून एक बाई सारखा फोन करतीयय!" कॉफीचा मग टेबलवर ठेवत, कॉन्स्टेबल आशा म्हणाली.

"काय म्हणत होती?"

"तुम्हाला भेटायचंय म्हणाली."

"का?"

"महत्वाचं बोलायचं म्हणाली."

"मग?"

"मग काही नाही! तिचा नंबर ठेवून घेतलाय. मॅडम आल्या कि कळवीन म्हणून सांगितल!"

"काय नाव होत त्या बाईचं?"

"इस्त्री का काय असच सांगितलं!" हि आशा म्हणजे पक्की विसरभोळी.

"ठीक आशा, मला तो फोन नंबर दे. करीन मीच त्या बाईला फोन!"

"हा, बगते कशावर लिहून ठेवलाय ते!" आशा घाईत निघून गेली. इरावतीच्या कपाळावर आठ्या पडल्या.

इराच्या मोबाईलने मेसेज आल्याचा इशारा दिला. राकेशच्या मेसेज होता.

MH ०२/ XXXX

woner -- चंद्रशेखर

Add --- २५ देवल हाईट्स , मुंबई

contact --७८९१०१११२(काल्पनिक)

--राकेश

कॉफीचा मग तोंडाला लावत इराने त्या मेसेजवर नजर टाकली. सध्या तिच्या कडे असलेल्या माहितीची उजळणी करण्यात, तिचा मेंदू आणि मन गुंतले होते. रात्री बाराच्या सुमारास घाटात एक अपघात होतो. महागड्या गाडीचा चालकाचा, कदाचित तो मालक हि असू शकतो, मागमूस सापडत नाही. गाडीत स्टियरिंग आणि ड्रायव्हिंग सीटवर रक्त आहे. तो जखमी किंवा मृत झाला हे पक्के. मग गेला कोठे? आणि कसा? म्हणजे कोणी तरी त्याला हलवलंय, हेही नक्की. अपघाताच्या स्पॉटच्या अपोझिट साईडला, एक कार थांबल्याचे संकेत आहेत. तो मातीतला डाग ऑईलचा असेल तर, गाडी बराच वेळ थांबली असण्याची शक्यता होती. त्यात असलेल्या व्यक्तीने त्या जखमीस हलवले असेल. म्हणजे, तो जखमीमाणूस त्यावेळी जिवंत असणार, कारण मुडदा कोण कशाला हलवणार? शकील किंवा शिंदेकाका याना तो सापडणार होता! शकीलला नाही तर शिंदेकाकांनाच. कारण त्या थांबलेल्या गाडीचे तोंड, शिंदेकाका गेले त्या गावाकडे होते!

केबिन बाहेर इरावतीला काही तरी गडबड ऐकू आली. आशा कोणाला तरी 'जा, पहिले आधार कार्ड घेऊन ये! मग तुझं काय म्हणणं बघीन!' म्हणून कटवायच्या पवित्र्यात बोलत होती. आणि तिच्याशी कोणी तरी 'मला आत्ताच्या आत्ता तुझ्या सिनियरला बोलायचंय!' म्हणत होते. बोलणारा आवाज एका बाईचा होता.

"आशा, कसला कल्ला चाललाय? कोण असेल, त्यांना आत पाठवून दे!"

मग मात्र आशाचा नाईलाज झाला.

"जा, मॅडम बोलावत्यात!" आशा त्या बाईला म्हणाली.

झंझावाता सारखी ती बाई इरावतीच्या केबिन मधे घुसली. इरावतीने खुणेनेच तिला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले. ती बाई खूप अस्वस्थ आणि भडकलेली दिसत होती. इरावतीने टेबलवरला पाण्याने भरलेला ग्लास तिच्याकडे सरकवला. तिने तो अध्याश्यासारखा तोंडाला लावला. ती पाणी पीत असताना, इरावती तिचे निरक्षण करत होती. उंची साडेपाच फुटाच्या आसपास, सडपातळ बांधा. साधारण पस्तिशीच्या आसपासच वय असावं. डोळ्याभोवतीची काळी वर्तुळ, मेकअप मधून सुद्धा डोकावत होती. डोळ्यात गुलाबी छटा दिसत होती. ओठाचा रंग, भडक लिप्स्टीकने झाकण्याचा प्रयत्न करून हि, स्मोकिंगची सवय उघड करत होता. एकंदर काही तरी मन विरुद्ध हिच्या बाबतीत घडतंय. अंगावरील फॅशनेबल उंची कपडे, हातातली इंपोर्टेड पर्स, आणि इतर क्सेसरीज श्रीमंतीच्या खुणा दाखवत होत्या.

"आधी शांत व्हा. मिसेस---?" तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर नजर रोखत इरावतीने विचारले.

"मी कस्तुरी! मी केव्हाची तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करतीयय. फोनवर तुम्ही भेटेनात, म्हणून स्वतः आले." ती आता जरा सावरली होती. हीच ती आशाची 'इस्त्री!' होती तर! बावळट आशाला कस्तुरी नाव लक्षात ठेवता आलं नव्हतं.

"कस्तुरी, चहा कि कॉफी?"

"कॉफी!"

इंटरकॉमवर इरावतीने कॉफीची व्यवस्था केली.

"हू, बोला. काय काम होत माझ्याकडे?"

"माझे मिस्टर रात्री घरी आलेले नाहीत! "

"मग, हरवल्याची तक्रार आणि मिस्टरांच्या फोटो ठेवून जायचा! माझीच भेट का हवी होती?"

"मॅडम! मामला गंभीर आहे. मला रात्री एक फोन आला होता. त्या संबंधी सांगायचं होत!"

"काय?" इरावती एकदम सावध झाली.

"हो!"

"एक मिनिट कस्तुरी! मी आपलं बोलणं रेकॉर्ड करून घेते. म्हणजे मला नंतर संदर्भासाठी तुम्हाला कमीत कमी त्रास द्यावा लागेल. तसेच तुमची तक्रार पण लिहून घेताना आम्हाला त्रास होणार नाही! ओक?"

"ठीक."

इरावतीने ऑडिओ रेकॉर्डिंग ऑन केले.

"हा बोला. आधी तुमची माहिती, न लपवता सांगा. मला काही शंका असेल तर मी विचारीन."

"नेहमी साडेदहा आकरा पर्यंत घरी परतणारे माझे मिस्टर, बारा पर्यंत आले नाहीत. मी सात आठ वेळेला त्यांच्या मोबाईलवर फोन केले. रिंग वाजत होती. पण उत्तर येत नव्हते."

"एक मिनिट! तुमच्या मिस्टरांचे नाव?"

"चंद्रशेखर!" इरावती खुर्चीतल्या खुर्चीत ताठ झाली.

"पुढे?"

"रात्री साधारण बाराच्या सुमारास चंद्रशेखरचा फोन आला. मी तो उचलला, पण पलीकडून बोलणारा चंद्रशेखर नव्हता!"

" मग कोण होता? पुढे."

"बोलणाऱ्याने मला पाचलाख तयार ठेवण्यास सांगितले. आणि पोलिसात जाऊ नको म्हणाला! त्याने चंद्रशेखरला किडन्याप केल्याचं पण तो बोलला. पैसे नाही दिले तर, तो पुन्हा फोन करून मुडदा कुठे फेकला हे, तो सांगणार आहे!"

"तुम्हाला रात्री बाराला फोन आला, आणि तुम्ही आत्ता पोलिसांना कळवताय?"

"सॉरी, एक तर मी खूप बावरले होते. दुसरे 'पोलिसात जाऊ नको!' हि धमकी होतीच. पोलिसांकडे येण्याचा निर्णय घेण्यास वेळ लागला. सकाळी नऊ पासून संपर्काचा प्रयत्न करत होते. तुमच्या त्या आशाबाई 'आधार' साठी आडून बसल्या! शिवाय तुम्ही नसल्याचे फोनवर सांगत होत्या. मग मीच बसले येऊन तुमची वाट बघत."

"ओके. चंद्रशेखर रोज आकराच्या आसपास घरी येतात? कधीच उशीर करत नाहीत?"

"तसे, होतो बरेचदा उशीर." या उत्तराला कस्तुरी आडखळल्याचे इरावतीच्या नजरेतून सुटले नाही.

"तुमचे आणि चंद्रशेखरचे संबंध कशे आहेत?"

"कशे? म्हणजे?"

"म्हणजे स्पष्टच विचारते. तुमच्यात तणाव आहे का?"

"म्हणजे. आहे. तसा पण तो आमचा घरगुती मामला आहे!" इरावतील साधारण कल्पना आली!

"तुमचे लव्ह मॅरेज?" इरावतीने अचानक प्रश्न केल्याने कस्तुरी गडबडली.

"हो! पण, मी चंद्रशेखर हरवल्याची तक्रार करायला आली आहे. आणि तुम्ही माझ्या घरगुती माहिती घुसलाय!"

हि बया नक्की काहीतरी लपवत आहे!

"त्या किडन्यापरचा पुन्हा काही मेसेज किंवा फोन आला होता का?"

"न -- नाही! अजून पर्यंत तर नाही!"

हे हि विचित्रच होते. किडन्याप करून खंडणी कोठे आणि कधी द्यायची,याची माहिती न देणारा, हा किडन्यापर जगाच्या पाठीवरील एकमेव किडन्यापर असावा!

"त्याचा फोन आला तर, लगेच माझ्या मोबाईलवर sms करा! आणि घाबरू नका. चंद्रशेखरचा तपासा लावण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. काही धोक्याची शंका आली तर लगेच कळवा." इरावतीने तिला धीर दिला.

कस्तुरीने जवळ ठेवलेली कॉफी संपली.

"ठीक आहे. तुमचा मोबाईल नंबर आणि चंदशेखरचा फोटो ठेवून जा. जाताना बाहेर आमचे साळुंके म्हणून क्लार्क आहेत, त्यांच्या कडे तुमची तक्रार लिहून तयार आहे. त्यावर सही करून जा!"

कस्तुरीने मान हलवली. तोंडातल्या तोंडात 'thanks' म्हणून इरावतीच्या केबिन मधून बाहेर पडली. इरावती तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून पहात होती. इतका कमनीय देह इरावती पहिल्यांदाच पहात होती! बर्फीचा तुकडा! चंद्रशेखर हिच्या जाळ्यात अडकणे काहि वावगे नव्हते. तो अडकला कि हिनेच अडकवला?

कस्तुरी निघून गेल्यावर इरावती गहन विचारात गढून गेली. या बाईने गुंता वाढवून ठेवला होता. राहून राहून, या कस्तुरीचा 'किडन्याप' स्टोरीची तिला शंका येत होती. हि स्टोरी खरी का खोटी? समजा चंद्रशेखरचा मृत देह सापडला तर? तर कस्तुरी प्राईम सस्पेक्ट असणार होती! आणि या गोष्टीची तिलाही कल्पना असावी! म्हणून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तर नसेल?

इरावतीने काही विचार केला आणि फोन उचलला.

"हॅलो, अर्जुना, इरा बोलतींयय."

"हा, मॅडम हुकूम!" अर्जुना एक रफ अँड टफ इंफॉर्मर होती. तिच्या गल्लीत तिचा वट होता. एका बारमध्ये रात्री बाऊन्सर म्हणून 'सेवा' करायची! बऱ्याचश्या नाजूक कामगिरी तिने इरासाठी केल्या होत्या.

"हे बघ, पत्ता, फोटो पाठवते. त्या बाईची माहिती काढायची आणि तिच्यावर नजर ठेवायची! तिचे प्रोटेक्शन पण करायचं! अर्थात वेळ पडली तरच!"

"ओके!"

इरावतीने तिला कस्तुरीचा फोटो आणि पत्ता sms केला.

तेव्हड्यात शकील केबिनचे दार उघडून आत आला.

"मॅडम रिपोर्टींग!"

"'काही सुगावा लागला नाही!' हेच रिपोर्टींग करणार ना?" आपली नजर मोबाईलच्या स्क्रीनवरून न हलवता इरावती म्हणाली!

"हा. खरं आहे! पण तुम्हाला कसे समजले?" शकील आश्चर्याने म्हणाला.

" शकील, न्यूज आणली तर, फक्त शिंदेकाका आणू शकतील!"

"सॉरी मॅडम, माझ्याकडे पण काही न्यूज नाही!" शकीलच्या पाठीमागून पुढे येत शिंदेकाका म्हणाले. तेव्हा इरावती वेड्यासारखी त्यांच्या तोंडाकडे पहातच राहिली.

हा चंद्रशेखर गेला कोठे? हवेत विरून गेल्या सारखा!

******