शोध चंद्रशेखरचा!
९--
इरावतीच्या डोक्यात प्रचंड गोंधळ मजला होता. चंद्रशेखरच्या अपघाताच्या घटने संदर्भात जे तुकडे हाती आले होते ते, पूर्णचित्र स्पष्ट करण्यास पुरेसे नव्हते. अजूनही चंद्रशेखरचा ठाव ठिकाणा लागलेला नव्हता. अर्जुना आणि शिंदेकाकाच्या गोंधळाने तो किडन्यापर हातून गेला होता. तो या गोंधळाच्या वेळेस कॅफे रुद्राक्ष मधेच असण्याची शक्यता होती.
मुळात हि 'किडन्यांपिंगची' कथाच इतकी ठिसूळ होती कि, त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते! एक तर किडन्यापर खंडणीसाठी फोन करतच नाही! हि गोष्ट कस्तुरीला सांगितल्यावर, मग तो तिला फोन करतो. हे कसे? कस्तुरी खंडणीची रक्कम बागेत भरून ती देण्यास इतकी का उच्छुक वाटली?
कस्तुरीची माहिती जी अर्जुनाने मिळवली होती, त्यावरून काही गोष्टी उजेडात आल्या होत्या. एक, ती एका स्थानिक ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये प्रथम आली होती आणि त्या बक्षीस समारंभास चंद्रशेखर प्रमुख पाहुणा होता. हल्लीच्या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये रूप, बुद्धी, हजारजवाबीपणा सगळंच तपासलं जात. चंद्रशेखरने पर्सनेल सेक्रेटरीची ऑफर, आपल्या पहिल्या डेटवरच कस्तुरीला दिली! कस्तुरीने अर्थात ती नुसतीच स्वीकारली नाही तर, अवघ्या दोन वर्षात ती 'एनकॅश ' केली. आपल्यापेक्षा दहा वर्ष मोठ्या चंद्रशेखरची ती दुसरी पत्नी झाली! तिच्या साठी चंद्रशेखरने आपल्या पहिल्या पत्नीला-गायत्रीला घटस्फोट दिला होता! लग्नानंतर कस्तुरीने आपली आर्थिक बाजू भक्कम करून घेतली होती!
चैत्राली - हे एक गूढ प्रकरण होत. या पोरीला बरीच माहिती असावी असे इरावतीला वाटत होते. हिची अधिक सखोल माहिती काढायला हवी. चंद्रशेखरशिवाय ती कंपनी चालवत होती. नॉट ए जोक!
मोबाईलच्या रिंगने इरावतीची विचाराची तंद्री भंग झाली. राकेशचा फोन होता.
"इरा, चंद्रशेखरच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस झालाय!"
"कुठे?"
"घाटाच्या दरीत!"
"आपल्याला तो रिकव्हरं करायचाय!"
"मी तो करून घेतलाय!"
"काय? मला तू काही बोलला नाहीस?"
"मॅडम, आम्ही मित्र आहोत तुमचे! फिल्डवर नसलो तरी माझेही काही नेटवर्क आहे! त्याचा वापर करून घेतला!"
"थँक्स. काही डाटा मिळाला का? महत्वाची माहिती त्यात असणार आहे!"
"सॉरी मॅडम! दगडावर आपटून फुटलाय! आणि पावसाच्या पाण्यात आणि चिखलात विसावला होता! नो होप्स!"
इराने हताशपणे राकेशच्या फोन कट केला.
एक अजून माहितीचे दार बंद झाले होते! अरेच्या, मग कस्तुरीला, कॅफे रुद्राक्षला येण्याचा निरोप कोठून आला होता?
घाईत इरावतीने कस्तुरीला फोन लावला.
"कस्तुरी, तुम्हाला खंडणी साठी जो फोन आला होता तो, चंद्रशेखरच्याच फोन वरूनच आला होता ना?"
"नाही! नवीन नंबर होता!"
"माय गॉड!, तुम्ही मला सांगितलं का नाही?"
"तुम्ही विचारलंच नाही!"
"तो नंबर ताबडतोब मला फॉरवर्ड करा!"
कस्तुरीने जडावलेल्या डोळ्यांनी तो नंबर हिस्टरी मधून हुडकून काढला, आणि इरावतील पाठवून दिला. हि इन्स्पेक्टर इरावती, एकदम बेकार बाई आहे. करत काहीच नाही.नुसत्या चौकश्या करते! काल, काय? तर चंद्रुच्या ऑफिसात गेली होती म्हणे. त्या टनगाळ्या चैत्रीन, काय काय हिचे कान भरलेत कोणास ठाऊक? हि काळुंद्री आल्या पासूनच, चंद्रू आपल्याशी तुटक वागतोय! काही हरकत नाही. त्या माकडापासून आपल्याला हाव होत ते, आपण मागेच वसूल केलय म्हणा! पण चंद्रशेखरला काही झालेतर, पहिला संशय आपल्यावर घेतला जाईल! प्राईम सस्पेक्ट! आणि चैत्री येथे आगीत तेल ओतले! या इरावतीने तो किडन्यापर पकडून, चंद्रूचा ठावठिकाणा हुडकण्या ऐवजी, आपल्या पैशाची बॅग परत उचलून आणली! हिनेच किडन्यापरला हुसकून लावले असावे! या पुढे हिला कोऑपरेट करण्यात काही हशील नाही!
कस्तुरीने नवा पेग भरला. आणि ओठाच्या कडेला सिगारेट अडकवली.
०००
"राकेश, तुझी मदत हवी आणि तीही ताबडतोब! मी एक नंबर पाठवते. लोकेशन हवाय!" इराने कस्तुरीकडून आलेला फोन राकेशला फॉरवर्ड केला.
"इरा, हे काय चालयय? सगळ्याच फोनचे लोकेशन का हवेत?"
"मला हवेत! नको ना मला टेन्शन देवूस! मला हवाय म्हणजे हवाय! त्याचा पर्चेसरच नाव आणि पत्ता सुद्धा!" ती त्याच्यावर भडकली! फोन कट करून, इरावती क्षणभर विसावली नसेल तोच आशा तिच्या केबिन मध्ये आली.
"मॅडम एक पांढऱ्या कपड्यातला, ड्रॉयव्हर सारखा दिसणारा माणूस तुम्हाला भेटायला आलाय! पाठवू का?"
"सुलतान?"
"हो! तुम्हाला कस कळलं त्याच नाव?"
"पाठव त्याला!" आशाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत इरावती म्हणाली.
सुलतान चांगला उंचापुरा चाळिशीतला माणूस होता. स्लिम. अदबीने नमस्कार करून, तो स्वतःच्या पोटापाशी हात बांधून उभा राहिला. त्याचा बावचळलेल्या चेहऱ्यावरून, तो पहिल्यांदाच पोलीस स्टेशन मध्ये आला होता, हे इरावतीने ताडले.
"बस!" समोरच्या खुर्चीकडे बोट करत इरावती म्हणाली.
"शुक्रिया!" म्हणत तो, तिच्या समोरच्या खुर्चीत अंग चोरून बसला.
"सुलतान! चंद्रशेखर मालक म्हणून कशे आहेत?"
"राजा माणूस! दिलदार!"
"आणि एक माणूस म्हणून?"
"चांगलेच आहेत!"
"रात्री बेरात्री बाहेर फिरतात?" त्याच्या डोळ्यात पहात इरावतीने विचारले.
"पैसा, है, जातात बरेचदा!"
"दारू?"
"फार कमी!'
"बाई?"
"मोठ्यांच्या गोष्टी असतात मॅडम, मी काय बोलू?"
"घाबरू नकोस, मला त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचे वीक पॉईंट्स काय आहेत. हे जाणून घ्यायचंय!"
"बायकांच्या बाबतीत -कॅरेक्टर थोडा ढिला है!- पण एका मर्यादेपर्यंतच!"
"कस्तुरी मॅडम विषयी तुला काय माहित आहे?"
"त्या पूर्वी ऑफिसला साहेबांच्या पर्सनल सेक्रेटरी होत्या. लग्नानन्तर त्यांचं ऑफिसला येणं बंद झालं! त्या खूप हुकूमशाही पद्धतीने वागायच्या! खूप इगो होता त्यांना! पैश्याचा घमंड होता!"
"तू ऑफिसच्या कोणकोणत्या गाड्या हाताळतोस?"
"तश्या सगळ्याच चालवतो, पण महिंद्रा आणि BMW माझ्याकडे ज्यास्त असते."
"ओके. गाड्यांची देखभाल?"
"माझ्या कडेच असते!"
"ज्या दिवशी चंद्रशेखर औरंगाबादला जाणार होता, त्या दिवशी तू कुठे होतास?"
"मी कामावरच होता! मला चैत्राली मॅडमनी सकाळीच, मल्होत्रा साहेबांच्या ऑफिस बाहेर, महिंद्रा गाडी घेऊन थांबायला सांगितले होते!"
"मग?"
"मग, साधारण अडीचच्या दरम्यान, परत ऑफिसला बोलावून घेतले!"
"सुलतान तू चंद्रशेखरला घेऊन शेवटची ट्रिप कोठे केली होतीस?"
"मी त्यांना दुबईच्या फ्लाईटसाठी एअर पोर्टवर सोडले होते."
"कधी?"
"या महिन्याच्या सोळा तारखेला."
"चंद्रशेखर दुबईहून परत कधी आला?"
"एकवीस तारखेस आले. मी त्यांना त्या दिवशी ऑफिसमध्ये पहिले होते."
"गाड्यांची देखभाल तुझ्या कडे आहेस म्हणालास. चंद्रशेखर औरंगाबादला जाणार म्हणून तू BMW चेक करून ठेवली असशील?"
"नाही मॅडम, आदल्या दिवशी ती गाडी चैत्राली मॅडम घेऊन गेल्या होत्या!"
चैत्राली! जाणून बुजून BMW चंद्रशेखरला घेऊन जाण्यास भाग पडले असावे. हि शंका इरावतीच्या मनाला चाटून गेली!
"सुलतान आता तू जा. तुझा मोबाईल नंबर बाहेर शकील किंवा शिंदेकाका असतील तर, त्यांच्याकडे देऊन जा! आणि काही सांगावे वाटले तर मला फोन कर. शुल्लक गोष्ट असली तरी!"
०००
याकूब पठाणाने मेहबूबच्या दुकानातून आणलेला CCTV चा पसारा समोरच्या टेबलवर पसरून ठेवला. त्या पोरगेल्या स्वाफ्टवेयर तज्ज्ञाने, त्या इंडियाचा फोटो वेगळा काढून 'भाईला' पाठवला, तेव्हा याकूबला थोडेसे हाय वाटले. त्याच्या जगात पैश्यापेक्षा अपयशाची किंमत ज्यास्त होती. शुल्लक कारणासाठी येथे खोपडीत, कट्ट्याची गोळी घातली जाते!
आणि काही तासात त्या इंडियाचे नाव 'भाईच्या' मोबाईलवर झळकले. 'चंद्रशेखर!'
भाईंचे नेटवर्क कामाला लागले होते! 'साला, पुलिस्को दूर रखो!' हा खास संदेश त्याच्या नेटवर्क मिळाला होता!
******