MAZYA LOVEMARRIAGECHI GOSHT - 14 books and stories free download online pdf in Marathi

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 14

१४

मेंदीच्या पानावर!

एकूणच चित्र जुन्या जमान्यातल्या कुठल्याशा कृष्णधवल सिनेमासारखे धूसर होते. मी उदास झालो. आणि कंटाळून शेजारच्या घरात येऊन बसलो. तरी लग्नघरात कुणी साधे उदास पण बसू देत नाहीत.. डॉक्टरला तर नाहीच नाही.

माझ्या मागोमाग कालचे ते हाय नि लो बीपी आणि स्पांडिलायटीस नि डायबिटीस वाले वरती आले.

कालचे अर्धवट राहिलेले संभाषण ते पुढे चालवू इच्छुक होते. आणि आता या सकाळच्या वेळी झोपेची सबब सांगणे पण शक्य नव्हते. आता आज मोबाईलच्या युगात हे किती सोपे झालेय.. रस्त्यात कुणी येताना दिसतोय.. लावा मोबाईल आपल्या कानास आणि टाळा त्याला पद्धतशीर. ते तेव्हा मात्र शक्य नव्हते. मग नाईलाजाने मला बसावेच लागले कन्सल्टिंग करत! मनात विचार वैदेहीचे आणि चालू आहे पद्धतशीर सल्लासत्र. सकाळ अशीच गेली. सगळ्यांचे प्रश्न संपले असावेत किंवा कदाचित विचारून थकले असावेत. एक एक करून सारे निघून गेले. नि मी एकटाच उरलो तिथे.

मी पण वैतागून समोरील घराच्या व्हरांड्यात पाय पसरून बसलो. पुढे काय घडणार? खरेतर वै.. नाही वैदेही.. जोवर ती माझी नाही होत तोवर वैदेहीच.. भेटून पुरते अठ्ठेचाळीस तास नाही उलटले. तिच्याशी बोललो असेन ते फक्त अर्धा एक तास पण ती अशी हुरहूर लावू शकते? सिनेमा असता तर डायलॉग मारता आला असता.. ये प्यार नहीं तो और क्या है मेरे दोस्त.. पण इथे शंका होतीच कुणाला. फक्त हे वैदेहीपर्यंत पोहोचवायचे कसे इतकाच प्रश्न होता. आणि तिला ते मान्य होईल का हा त्याहून गहन प्रश्न.

आजवर न पडलेला प्रश्न मला पडला.. जगभर इतक्या जोड्या जुळतात.. म्हणजे कोण न कोण कुणाला न कुणाला या जगात कुठल्याही क्षणी कोठे न कोठे प्रपोज करतच असणार.. 'मी फक्त विचारले तिने लाजून हो म्हटले' वगैरे कवितेतच नाही प्रत्यक्षात येत असणारच. मग या गोष्टीबद्दल कुठे ऑफिशियल मार्गदर्शन नको? सगळे काही पुस्तकी ज्ञान..

तिथल्या आरामखुर्चीत बसून पाय लांब करत जग निरखून पाहण्याशिवाय आता मला काही काम नव्हते आणि दुसरे काही जमले पण नसते. म्हणून मी तेच करत बसलो. नशिबाने ती नातेवाईक गॅंग माझा पाठलाग करीत आली नाही.. कदाचित गरज सरली म्हणून या वैद्यास सोडून दिले असावे. किती वेळ गेला कुणास ठाऊक. रिकाम्या डोक्याने बसलेलो मी. मला अशी अधेमधे झोपायची सवय नाही, नाहीतर चांगली ताणून दिली असती.

काही वेळाने खालून आवाज आला.. “मोदका.. तू इथे आहेस?”

हा आवाज कृत्तिकाचा.

“अगं वर ये.. कालपासून दिसली नाहीस ती..?”

“येते..”

वर आल्या आल्या तिने माझी ताणायला सुरूवात केली.

“मी इथेच आहे रे पण तुला दिसत नसेन तर.. तुला

दिसते ती..”

“तू दिसत नाहीस? म्हणजे.. तू भूत बित आहेस की काय? पाहू तुझे पाय? उलटे.. नाहीत.. आणि ती पहा तुझी सावली.. भुतास सावली नसते.. ॲज लाँग ॲज माय नाॅलेज गोज, द भूत्स डोण्ट कास्ट अ शॅडो..”

मूड नसताना पण मी, पोरी ज्याला फनी म्हणतात तसे कितीही बोलू शकतो.. मग नेमके वै.. नाही वैदेहीसमोर का फाफलतो मी?

माझ्या बोलण्यावर कृत्तिका हसली. क्षणभर विचार आला.. अरे ही पण चांगली आहे.. वैदेही नसेल तर. आणि दुसऱ्या क्षणी माझी मलाच लाज वाटली. असे उठसूठ पक्ष बदलायला मी काही राजकीय नेता थोडीच होतो..

“मला कळतं बरं मराठी.. नाही तुझा गैरसमज होत असेल तर.. ती मी नव्हेच..”

विषय बदलत मी विचारले,

“आणि काय कधी आलीस?”

“मी? कुठून?”

“बाहेर गेलेत ना बुरकुले मंडळी? तू पण..”

“छे रे.. ते तिकडे त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकांना भेटावयास गेले आहेत. वैदू नाही नाही म्हणत होती पण मीच पिटाळले तिला. एवढ्या लांब आली आहे तर.. तिचे इथे नाहीतरी काय काम?”

म्हणजे आजच्या सकाळची खलनायिका ही कृत्तिका आहे.. दोन प्रेमी जिवांची ताटातूट घडवणारी.. प्रेमी जीव! छे! हे अगदीच नाटकी आहे..

“म्हणजे? नुसतेच गेलेत ते बाहेर?”

“ऑफकोर्स.. आणि नुसतेच म्हणजे काय?"

"नुकतेच म्हणालो मी.." मी बचावात्मक पवित्रा घेत म्हणालो. पण कृत्तिकाने डाव साधलाच.. हळूच म्हणाली,

"तुला काय वाटले? कुणी स्थळ वगैरे..”

ती शेवटचे वाक्य तोंडातल्या तोंडात बोलली पण मला ते ऐकू आले. म्हणजे ते मुलगे बघणे वगैरे झूट? आई आणि काकू माझी विकेट घेऊ पाहात होत्या की काय? माझी बॉडी लॅंग्वेज इतकी तर नाही ना बदलली? ही कृत्तिका पण माझ्याशी असे बोलतेय..

“तर, आज काय उपास की काय? तीन वाजलेत.. आई म्हणाली बोलावून आण जेवायला म्हणून आले..”

“मला इच्छा नाही गं जेवायची..”

“कां.. कुणाची वाट बिट बघतोयस.. नाही आई बोलावते म्हणून..”

“आई अशीच आहे गं.. उगाच मागे लागते..”

“तुला काय ठाऊक?”

“म्हणजे? आई माझी.. मला नसणार ठाऊक?”

“तुझी? तुझा काय संबंध.. वैदेहीची आई बोलावित होती. एकत्र जेवू म्हणे.. जाऊ देत.. मी सांगते तुला इच्छा नाही..”

कृत्तिका अशी बदमाश असेल असे वाटले नव्हते. आता मी पवित्रा बदलून म्हणालो.. “चल. उगाच माझ्यामुळे नको कुणास ताटावर ताटकळत ठेवायला.. कधी आलेत गं?”

“तू चल.. मी सांगते..”

खाली आलो तशी ती परत म्हणाली, “आली नाही काही.. मी फक्त गंमत केली.”

या कृत्तिकाला शिव्या घालाव्यासे वाटले मला. पण एकतर तिला मी इतके ओळखत ही नव्हतो आणि माझी शिवीसंपदा अगदीच मर्यादित. वर वैदेहीची जवळची मैत्रीण. उगाच असले नसले इंप्रेशन खराब व्हायचे. आता निघालोच म्हणून आलो घरी तर समोर वैदेही. निळ्या गर्द ड्रेस मध्ये. मस्तच.

सकाळपासूनचा सारा राग क्षणात नाहीसा झाला. नक्कीच ही काही मुलगा बिलगा बघायला गेली नसणार. त्यासाठी किमान साडी तरी नेसून गेली असती.

“मोडक.. हाय.. व्हेअरार्यु सिन्स मॉर्निंग?”

“मी? आयॅम हिअर ओन्ली.. तुम्ही लोकच नव्हतात इथे."

"ओह! गाॅन आऊट समव्हेअर. पन आता आलो ना परत? तू जेवला अजून नाही?"

"नाही. चला जेवूया.. भूक लागली..”

शेवटचे शब्द बोलता बोलता मी कृत्तिकाकडे पाहून जीभ चावली. कृत्तिकापण डांबिसपणे हसली.

मग आम्ही घरी आलो जेवायला. वै किती चाखत माखत जेवते ते पाहात होतो. रमाकाकू मला आग्रह करून वाढत होती. आणि दरवेळी त्या वैदेहीला ही विचार सांगत होती. त्यावर ती तिची लांबसडक बोटे आडवी करत 'नाही' म्हणत होती. जेवणापेक्षा माझे तिच्याकडेच जास्त लक्ष होते..

जेवता जेवता गप्पा झाल्या, पण दोघांनीच गप्पा मारण्याची मजा नव्हती त्यात. तरीही नाही पेक्षा चांगलेच. आता संध्याकाळी काही ना काही भेटणे बोलणे तरी होईलच. मी जेवता जेवताच संध्याकाळची वाट पाहू लागलो. जेवण उरकून उठलो .. वैदेही तिच्या खोलीकडे निघाली.. कृत्तिका ही तिच्या पाठोपाठ.. जाता जाता म्हणाली.. “आता विश्रांती घे.. आम्ही बिझी आहोत.. मेंदी लावण्यात.. इझंटीट डिअर वैदू.”

"या.. ॲम सो एक्सायटेड.. बाय मोडक..”

“मोडक..” कृत्तिका हसत सुटली.. “ड नाही द..”

असू देत.. मोडक.. किती गोड वाटते हिच्या तोंडी.. मी मनातल्या मनात म्हणून पुढे निघालो. आता सामूहिक मेंदी म्हणजे आता यापुढे आजतरी देवीदर्शन नाही.. तरीही तिच्या हातांवर रंगलेल्या मेंदीच्या पानावर आता माझे मन झुलणार होते.

काही असो. बुरकुले मंडळी काही 'स्थळ' दर्शनाला नाही गेलेली.. म्हणजे 'स्टोरी में जान अभी बाकी है दोस्त' एवढा निष्कर्ष काढून मी खोलीवर आलो.. आजच्या दिवसात एवढेच नशिबात आणि काय! म्हटले आता ताणून द्यावी. बाकी पुढचे पुढे!


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED