सस्पेन्सची कॉमेडी Pralhad K Dudhal द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सस्पेन्सची कॉमेडी

एका सस्पेन्सची कॉमेडी...
एका एकांकिका स्पर्धेसाठी आमच्या गृपने एक रहस्यकथेवर बेतलेली एकांकिका बसवायची ठरवली.राज्य पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत भाग घ्यायची खूप दिवसाची आमच्या हौशी नाट्य संस्थेची इच्छा या निमित्ताने प्रत्यक्षात येणार होती.
साधारणपणे एखादी नामवंत लेखकाने लिहिलेली एकांकिका निवडून ती स्पर्धेसाठी बसवावी असे सगळयांचे मत होते;पण आमच्या ग्रुपमधल्या एका स्वतःला अष्टपैलू कलाकार समजणाऱ्या एका मित्राचे मत वेगळे होते.हा आमच्या ग्रुपचा लीडर होता. या हौशी मित्रामुळेच आमची ही नाट्य संस्था टिकून होती त्यामुळे अर्थातच तो म्हणेल ती पूर्व दिशा असायची.
तर या मित्राने नुकतीच एक एकांकिका लिहिली होती आणि त्याचे म्हणणे होते की आपण दुसऱ्या कुणाची संहिता घेण्याऐवजी त्याची नवी कोरी एकांकिका बसवावी.अर्थात या गोष्टीला कुणाची हरकत असायचे काही कारण नेव्हते. फक्त त्याच्या अजूनही अटी होत्या. या एकांकिच्या माध्यमातून एकाच वेळी तो त्याची अष्टपैलू कलाकार म्हणून प्रतिमा लोकांसमोर त्याला आणायची होती शिवाय या मागे अजून एक कारण होते ते मात्र आम्हाला थोडं उशीरा लक्षात आलं होतं!
तर या एकांकिकेचे लेखन तर त्याने केले होतेच याशिवाय तोच एकांकिकेचे दिग्दर्शन करणार होता!एवढेच नाही तर या एकांकिकेचे नेपथ्य, प्रकाशयोजना शिवाय महत्वाची असलेली प्रमुख भूमिकाही त्यालाच करायची होती! सबकूछ 'मी'च या त्याच्या हट्टापुढे उघडपणे जरी कुणी काही बोलत नसले तरी तशी आमच्या सहकाऱ्यांच्यात याबद्दल बरीच नाराजी होती.जे काही करायचे ते करू दे त्याला, निदान आपल्याला आपली हौस तर भागवता येते ना, बस्स ! असा विचार करून शेवटी आम्ही त्याच्या सगळ्या अटी मान्य करून टाकल्या!
खरं तर आमच्या या एकांकिकेत नायिकेची भूमिका करणाऱ्या मुलीवर इंप्रेशन मारण्यासाठी आमचा हा मित्र हा सगळा खटाटोप करत होता!
एक मात्र निश्चित होते की त्याच्या लिखाणात दम होता.एकांकिकेची संहिता एकदम दमदार होती.जेव्हा प्रथम वाचन झाले तेव्हाच सर्वानी त्याच्या लिखाणाचे भरभरून कौतुक केले होते.
योग्य दिग्दर्शक मिळाला तर आमची ही एकांकिका पहिले बक्षीस सहज मिळवणार यात शंकाच नव्हती!
पात्रांची निवड झाली आणि आमच्या मित्राच्या दिग्दर्शनाखाली तालमी सुरू झाल्या. एका रहस्यमय खुनाचा तपास अशा स्वरूपाचे हे कथानक होते.पंधरा दिवस अथक तालमी झाल्या.एकांकिका छानच बसली.
आमचा तो मित्र या कथेतील पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारत होता.
एकांकिका स्पर्धेचा दिवस उजाडला आणि आम्ही संपूर्ण तयारीने आमची एकांकिका सादर करण्यासाठी रंगमंचावर गेलो....
तीसरी घंटा वाजली आणि पडदा सरकला.
स्टेजवर संपूर्ण अंधार होता.रातकिडे ओरडल्याचा आवाज आणि अचानक एका बाईची प्रचंड किंकाळी..
एकांकिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.प्रवेशामागून प्रवेश सादर होत होते.थिएटरमधे पिनड्रॉप सायलेंस होता.पुढे काय होणार याची उत्सुकता ताणली गेली होती....
खरा खुनी कोण या रहस्याभोवती कथानक फिरत होते.सगळ्यांनी आपापल्या भूमिका जीव ओतून केल्या होत्या.नाटकाच्या उत्कर्षबिंदूपर्यंत कथा पोहोचली होती....
पोलीस इंस्पेक्टर आणि नायिकेमधील संवाद चालू होता.
"मँडम,मला माहीत आहे हा खून कोणी केलाय!'
"कशावरून तुम्ही हे तुम्ही ठरवलं साहेब ?"
"माझ्याकडे तसा पुरावा आहे!"
"पण तुमचा हा पुरावा खुनी नराधमाला शिक्षा देऊ शकेल एवढा ठोस आहे ना?"
" हो नक्कीच,तुम्हाला आता मी हा पुरावा दाखवतोच!"
संवाद बोलता बोलता इन्स्पेक्टरसाहेब आपला हात खिशात घालून तो पुरावा शोधू लागतात, त्याची नजर मात्र नायिकेची भूमिका करणाऱ्या पात्रावर होती! उभी असलेली नायिका अचानक खाली वाकली आणि इन्स्पेक्टरच्या भूमिकेतल्या आमच्या या मित्राचे लक्ष विचलीत झाले!त्याला काही केल्या खिशात ठेवलेला तो पुराव्याचा कापडाचा तुकडा काही सापडेना!
तो पुरावा हातात आल्याशिवाय पुढचा संवाद बोलता येणार नव्हता!
रंगमंचावर असलेली दोन्ही पात्रे ब्लँक झालेली आणि इन्स्पेक्टर खिशात पुरावा शोधतो आहे!त्याला आता घाम फुटायला लागलेला!
एकदाचा इन्स्पेक्टरला खिशातला कापडाचा तो तुकडा मिळाला आणि तो पुढचा संवाद बोलण्यापूर्वीच प्रेक्षक ओरडले...
"सापडला.😜😜😜😜"
प्रेक्षकांनी हसून हसून थिएटर डोक्यावर घेतले!
आमच्या रहस्यमय नाटकाची पार कॉमेडी झाली होती !!!
..... © प्रल्हाद दुधाळ.