माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 16 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 16

१६

डिलिव्हरी बाॅय!

नंतर मला झोप लागली असावी.

स्वप्न पडलेले ते विसरून मी मनसोक्त झोपून उठलो. अंधार झालेला. पाहुणे अजून काही पोहोचले असावेत. आवाज येत होता खालून. मी आळस दिला. किती वाजलेत त्याचा अंदाज घेतला. बहुधा रात्र झाली असावी.

आई खोलीत आली नि म्हणाली,"आज बागेत नाही गेलास.. पाणी टाकायला?”

“अगं झोप लागली..”

“हुं.. परत स्वप्न बिप्न काही..?”

मी उगाच तिच्या ट्रॅपमध्ये अडकू नये म्हणून विचारले.. “वाजले किती?”

“तेच.. तुला उठवायला पाठवलेय. उठ. काकू बोलावतेय..”

“मला? कशाला?”

“मदतीसाठी. आणि काय.”

“आलो. मी? आणि कसली मदत करणार?"

"तूच बघ जाऊन."

मी उठून किचन मध्ये गेलो तर काकू ताटं तयार करत होती. म्हणाली, “आलास.. छान. एक काम कर. तेवढी ही ताटं नेऊन दे..”

“कोणाला?”

“अरे तिकडे मेंदी लावतायत त्यांच्या खोलीत..”

माझ्या चेहऱ्यावर अचानक लाॅटरी लागल्यावर फुटावे तसे हसू फुटण्याच्या बेतात होते. ते आवरून उगाच बेफिकिरी दाखवत म्हणालो.. “मी?”

“बरं राहिले.. मीच जाते..”

“नको नको.. जातो मी.”

घाईघाईत मी म्हणालो. हे म्हणजे चोराला खजिना उघडून देण्यासारखे होते. असली आयती संधी मी कसली सोडणार होतो? काकू त्यात अजून काही बदल करण्याच्या आत मी ताटं उचलली आणि निघालो. बुरकुल्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. आतून पोरींचा कलकलाट ऐकू येत होता. मी दार ठोठावले..

"डिनर रेडी.. मे आय कम इन फाॅर डिलिव्हरी..?"

"ओह! डिलिव्हरी बाॅय इज हिअर..?" कोणीतरी खिदळत म्हटलेले मला ऐकू आलेच.

“यस, कमिन..”

हा वै चाच आवाज. मी तृप्त कानाने दार उघडले. हे वाक्य चूक असेलही व्याकरण दृष्टीने किंवा अन्य कुठल्याही दृष्टीने चूक असेल पण तुम्हाला सांगतो प्यार व्याकरणबिकरण नहीं जानता. अधीरतेने मी दार उघडून आत गेलो.

आत चार पाच मुली बसलेल्या कृत्तिका आणि वै सोडून. बाजूला वै दोन्ही हातापायांवर मेंदी लावून बसलेली. बाकी काही रागिणीच्या मैत्रिणी आलेल्या. खोटे नाही सांगणार.. मी साऱ्यांकडे एकदा पाहून घेतले. होत्या चांगल्या पण एकीला वै ची सर नव्हती.

वै दोन्ही हात पकडून बसलेली. ही खाणार कशी? मला पडलेला प्रश्न मागे सारत म्हणालो,

“सो.. अंडर हाऊस अरेस्ट.. कान्ट मूव्ह?”

मी मला सुचलेला डायलॉग बोलून स्वतःवरच खूश झालो.

तेवढ्यात रागिणीची मैत्रीण म्हणाली, “हो ना जेलर साहेब..”

“कैद में है बुलबुल..” कुणी दुसरी म्हणाली.

सगळ्या हसू लागल्या. मला उगाच माझी बुलबुल म्हणजे वै लाजल्यासारखी वाटू लागली. खरेच लाजली का ती? की मला झालेला भास नुसता?

“अजून ताटं आणतो..”

मी सटकलो. मी पण लाजल्यासारखा दिसलो असेन का? असेल की नसेल.. कोणाला विचारणार होतो मी. आता या सगळ्या त्यांच्या रूममध्ये अडकून पडल्यात. मला काय काम नंतर.. ताटांची डिलिव्हरी मुद्दाम टप्प्याटप्प्यात देत मी वै ला तीन चारदा पाहून घेतले. त्या सगळ्या हात वर पकडून कशा जेवल्या असतील कुणास ठाऊक.

हातापायावर मेंदी लावून बसलेल्या वै ची रूपे डोळ्यांत साठवत बाहेर आलो. काकू आणि आई टपून बसल्यासारख्या मागे आल्या.

"अरे, तू पण जेऊन घे.."

"अगं, त्याचं पोट भरलं असेल आपोआप.."

"म्हणजे गं? संध्याकाळी तर काही खाल्लं नाही त्याने."

"तेच गं. आज नुसता झोपून होता. भूक कसली लागतेय. पण एक आहे, घरी कामाला हात लावत नाही.."

"तुझं काहीतरीच प्रमिला, मी बोलावले ताटं द्यायला आला की लगेच. उगाच नाव ठेवतेयस.."

"तसं नाही. हवं ते काम करेल तो. नको ते सांगून बघ, म्हणजे कळेल."

मी निमूटपणे ऐकून घेत होतो. दोघीही चिडवत होत्या आडून आडून. मी शक्य तितका चेहरा सरळ ठेवून ऐकत होतो. वै बद्दल काहीतरी अजून बोलतील तर ते ऐकायला मिळावे म्हणून.

"छान रंगेल मेंदी बरं. रागिणी खूश दिसते."

"तिच्या मैत्रिणी आल्या म्हणून. आणि या कृत्तिका नि वैदेही दोघींचे चांगलेच जमलंय त्यांच्याशी."

"अगं, वैदेही आहेच तशी. तिचे कोणाशीही सहज जमेल.. हो की नाही मोदक?"

आता मी यावर काय बोलावे अशी अपेक्षा होती त्यांची? हो म्हणावे तर तू तिला इतका कसा ओळखतोस विचारतील.. नाही म्हणावे तर कां म्हणून विचारतील! उगीच नाही प्रत्यक्ष धर्मराजाने नरो वा कुंजरोवा अशी उत्तर देण्याची पद्धत डेव्हलप केली. तरी मला तसे काही उत्तर सुचले नाही आणि नुसताच "हुं" म्हणून गप्प झालो.

अजून इथे बसणे धोक्याचेच. दोघीही कशी विकेट काढतील सांगता येत नव्हते. अशा या विकेटवर यांच्या बाउन्सिंग डिलिव्हरीज वर या डिलिव्हरी बाॅयला तग धरणे कठीण. तेव्हा सारे तसेच सोडून उठलो नि गच्चीवर निघून आलो.