माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 15 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 15

१५

हाऊ टू स्पीक!

सारे काही अकल्पित घडले.

मी येऊन बसलो आपल्या खोलीत. कसला तरी विचार करत बसलेलो. तर हळूच वैदेही आत आली. माझ्यापुढे हात दोन्ही पसरून म्हणाली, "मोडक, बघ ना, आय हॅव कम.."

मी पाहिले तर तिच्या दोन्ही हातांवर मेंदी रंगलेली मस्त.

"छान आहे हां. मस्तच!"

"अजून काही?"

"काही नाही. बाकीच्या सर्वांची झाली?"

"हुं.." ती फणकाऱ्यात म्हणाली नि गप्प झाली एकाएकी. ती जायला निघणार इतक्यात कृत्तिका आली पाठोपाठ.

"मोदका.. तुला इतकेही नाही कळत? नीट बघ ती मेंदी.."

कृत्तिकाने वैदेहीचे हात समोर माझ्या समोर धरले. मी निरखून पाहिली मेंदी तर त्यात माझे नाव लिहिलेले. त्यानंतर जे झाले.. मी लाजलो चक्क. पाठोपाठ वै ही.

नंतर आमची सगळ्यांची बैठक झाली. सगळे बसलेले समोर. वै चे आई बाबा, माझे आई बाबा नि काका काकू देखील.

बोलणी सुरू होती. वै खाली मान घालून बसलेली. मध्येच हळूच माझ्याकडे कटाक्ष टाकत होती. त्या बैठकीतल्या सगळ्या बोलण्याकडे माझे लक्ष नव्हते. तिच्या चोरट्या कटाक्षांकडे मी पाहात होतो. मला आमच्या पहिल्या वर्षात शिकलेली ॲनाटाॅमी आठवली. डोळ्यांच्या स्नायूंना एकदम बाजूला बघायला मदत करणारे स्नायू असतात, त्यांना लव्हर्स मसल्स म्हणतात! बाकी ॲनाटाॅमी विसरलो पण इतकी गोष्ट मात्र अजून लक्षात माझ्या. तर त्या लव्हर्स मसल्सना कामाला लावत बसलेलो. सगळे लग्नाच्याबद्दल बोलत बसलेत..

लग्न तिथे अमेरिकेत होणार का? की इकडेच?

"आमच्या वैदूला आपली भारतीय पद्धतच आवडते. त्यामुळे इथेच करू सारा समारंभ." वै ची आई.. म्हणजे मिसेस बुरकुले अर्थात सासूबाई माझ्या.

"छानच!" आई.

"अहो, आपण ते इथेच करूयात. याच घरी." रमाकाकू.

"पण दादा तुला चालेल ना? म्हणजे माझे कसे सारे साग्रंसगीत. देवादिकांना साक्ष ठेऊन. उगाच इकडतिकडचे हाॅल कशाला. आणि स्वामींचा पण आशीर्वाद मिळेल."

"त्यांना काय विचारायचेय.. मी सांगते ना. इथेच करूयात सारे." अर्थातच आई.

"ठीक आहे, ही म्हणेल तसे. ही म्हणेल तसे ही सुखी संसाराची गुरूकिल्ली आहे. आजवर ही गाइडलाईन पाळल्यानेच तर सुखी झालोय.."

"काहीतरीच तुमचे. जणू कोणी विश्वासच ठेवेल यावर."

"का? मी सुखी नाही?"

"ते नाही, माझे ऐकून सगळे करता यावर."

हे सारे होताना मि. आणि मिसेस बुरकुले हसत होते गालातल्या गालात. जणू काही घरोघरी मातीच्याच चुली असाव्यात. वै अशी बसलेली की मला मुद्दाम पहायला लागत होते तिच्याकडे. पण सासूबाई समोरच होत्या आणि त्यांचात नि वै च्या हसण्यात खूपच साम्य होते.. म्हणून त्यांच्याकडे पाहून दुधाची तहान ताकावर भागवत होतो. बोलणी सुरूच होती. मी आपल्या भाग्याचा हेवा करत बसलो होतो. काय घडले ठाऊक नाही, एकाएकी वै उठली, नि आम्हा सगळ्यांच्या हातात कांदेपोह्यांच्या बशा देऊ लागली. सगळे त्या पोह्यांवर लिंबू पिळत होते. तिच्या हातचे ते स्वादिष्ट पोहे खात गप्पा सुरू होत्या नि मी मात्र गप्पच होतो! इतक्यात काहीतरी घडले. म्हणजे वै परत उठून उभी राहिली. आणि धावत धावत बाहेर पडली. पाठोपाठ मि. आणि मिसेस बुरकुले पण बाहेर पडले. त्यांच्या मागे मी.

वैदेही तिच्या आईबाबांसोबत धावत निघाली. समोर एक हाॅल होता. अगदी सनई वादन सुरू होते. आत धावत गेली ती. तिथे आंतरपाट घेऊन भटजी, त्यामागे एक मुलगा हार घेऊन उभा होता. वैदेहीने धावत उडी मारत त्याच्या गळ्यात हार घातला. मि. आणि मिसेस बुरकुले टाळ्या वाजवत उभे बाजूला. ते कमी की काय म्हणून माझे आई नि बाबा त्या दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकताहेत.. कृत्तिका माझ्या पाठीवर हात फिरवत सांत्वन करतेय. आणि मी? पुस्तक घेऊन बसलोय, हाऊ टू स्पीक अँड इन्फ्ल्यूयन्स पीपल..

मी जागा झालो अचानक. आई बाजूलाच होती. तिला म्हणालो, "ते माझे पुस्तक कुठे गेले गं मी वाचत होतो ते?"

"कुठले ते पुस्तक? स्वप्नात पाहतो आहेस?"

मी गडबडून जागा झालो. नशीब काहीतरी दुसरे बोललो नव्हतो मोठ्याने स्वप्नात! संध्याकाळचे स्वप्न ते! अर्धे खरे व्हायला हवे! म्हणजे पहिले अर्धे! काही असो ते पुस्तक मिळवायला हवे! हे महत्त्वाचे.. हाऊ टू स्पीक! पण हे ही मी कोणाला आणि कसा सांगणार होतो?