Iskot - nave ghar books and stories free download online pdf in Marathi

इस्कोट - नवं घर


सकाळी नऊच्या सुमाराला एस्टी गावात येऊन धडकली. खांद्यावरची खचाखच भरलेली बॅग कशीबशी दरवाज्यातून बाहेर काढताना एकदोनदा हेंदकाळत माधव खाली उतरला. एसटी आली तशी निघून गेली. माधवने पॅन्टच्या खिश्यातुन सफेद रुमाल बाहेर काढला आणि चेहऱ्यावरची धूळ साफ करत पुढं चालू लागला. माधवचे खांदे नेहमी झुकलेले असत, त्यामुळे चालताना तो पोक काढलेलाच दिसे. जणू घरसंसाराचा भार त्याला सदानकदा दाबत असे. म्हणूनच येन चाळिशीतच माधव बराच थकलेला वाटे.

वेळ सकाळची असली तरी उन्हाची तिरपी किरणे अंगाला बोचत होती. स्टँडजवळच एक भलंमोठं पिंपळाचं झाड होतं, त्याखाली बांधलेल्या पारावर दोन-चार म्हातारी टाळकी दिसत होती. 'म्हमईकडनं' कुणी घरातलं आलं की घ्यायला म्हणून अथवा इतर काही कारणांसाठी तिथं सकाळी सकाळी जमा होण्याचं शौक आजकाल म्हाताऱ्यांनी पाळलं होतं.

गावाच्या स्टॅन्डवरच रस्त्याच्या अल्याड बाबू नाभिकानं दोन खुर्च्यांचं दुकान मांडलं होतं. अंगात मळकी बंडी, खाली गुढघ्यापर्येंत जेमतेम पोहचणारं आखूड धोतर आणि डोईवर तिरपी गांधी टोपी घातलेल्या बाबू नाभिकाची नजर कावळ्यासारखी तीक्ष्ण होती. गिऱ्हाईकाची दाढी करता करता त्याचं लक्ष समोरून येणाऱ्या माधवाकडे गेलं. वस्तरा जसा गालावरनं फिरताना त्याची धार दाखवू लागला तसं ते गिऱ्हाईक बाबूवर डाफरलं.

कसंसं तोंड करत बाबू एका ढेंगत बाहेर आला आणि उजव्या हाताच्या दोन बोटांनी व्हीक्ट्रीचा "V" तोंडाजवळ ठेऊन रस्त्यावर "प...चं. च्याचं..क.. " करून पिचकारी मारली. यावेळी त्याची तिखट नजर माधवावर खिळली होती. माधवने पाहून न पाहिल्यासारखे केले आणि आपल्याच तालात जवळच असलेल्या आपल्या घराकडे निघाला.

खरंतर माधवचं आजोळ आणि जुनं घर गावाच्या आत मैलभर अंतरावर असणाऱ्या वाडीत होतं. पण भविष्यात सोयीचं व्हावं म्हणून त्याच्या आईने बळेच त्याला स्टॅण्डवर जवळच नवं घर बांधायला लावलं. अर्थात म्हातारीची दूरदृष्टी त्यामागं होती. पुढंमागं नातवंडांना याचा फायदा होईल याची खात्री त्या अडाणी आजीला होती.

गावात नव्या घरात माधवची साठी ओलांडलेली म्हातारी आई एकटीच राहायची. वाडीतलं जुनं घर रिकामचं असायचं. माधव एकुलता एक होता. तो पत्नी आणि एका मुलासह मुंबईला राहायचा. त्रेसष्टावं लागलं असलं तरी माधवची आई खमकी होती. वाईच केस पांढरी झालीत वा अंगाला सुरकुत्या पडल्या म्हणून कुणी मसनात जाऊन बसत नाही. माधवची आई एकटी बाजूच्या गावांपर्येंत चालत जायची.

माधवने नोकरीत जमवलेला पैसा ओतून गावात स्टॅन्डजवळ महागातली जागा विकत घेतली आणि हे बंगल्यासारखं घर बांधलं त्याला जेमतेम सहा मासच झाले होते. त्याच्याजवळचा पैसा आता संपत आला होता. तसं मुंबईतसुद्धा त्यानं स्वतःचं घर उभं केलं होतं, म्हणून जास्त फिकिरीचं काम नव्हतं.

घर बांधण्याच्या कालावधीत नोकरीच्या सुट्ट्या खूप झाल्या होत्या. त्यावेळी गावच्या गवंड्यापासून ते सुतारापर्येंत सर्वांनीच माधवला चांगलाच तंगवला होता. कसेबसे घराचे पक्के बांधकाम पूर्ण करून अदल्यामधल्या शनिवारी माधव गावी यायचा आणि बारीकसारीक काम करून रविवारी पुन्हा मुंबईला निघून जायचा.

कधीकधी त्याला वाटलं होतं, कश्याला नसती गावात घर बांधून घेण्याची आफत गळ्यात पडून घेतली? पण तेव्हा म्हातारी इरेला पेटली होती. तिच्यापुढं माधवचं काही चाललं नाही.

आता घर तर झकासपैकी बांधून झालं होतं, पण नवीनच अडचण निर्माण झाली होती. माधवची भावकी वर वाडीत होती, आणि त्याची आई गावात राहत होती. गावातली माणसं त्यांना तिथं खपवून घेईनात. त्यात माधवनं घर पण चांगलं डोळ्यांत भरल असं बांधलं होत, म्हणून आजूबाजूंच्या लोकांचा चांगलाच जळफळाट होत असे.

नामा परीट, दादा पाटील, दर्जी किसन, बाबू न्हावी आणि बबन्या वाणी ही मंडळी बापजाद्यांपासनं परंपरागत 'आगे दुकान पीछे मकान' अशी राहत आलेली होती. या मंडळींच्या मते गावची सेवा करण्यासारखी कामं हीच लोकं इतकी वर्षें अविरतपणे करत आलेली होती. मुंबईला जाऊन काम करणे म्हणजे स्वार्थीपणा होय. त्यामुळे मुंबईला जाऊन राहणारी माणसे ही परकीच.

माधव मुंबईतच राहायचा शिवाय तो गावापासून आतल्या वाडीतला होता. साहजिकच गावातील या कामसू आणि प्रतिष्ठित मंडळींना माधवचं असं स्टॅन्डजवळ त्यांच्या बरोबरीने घर बांधून राहणे पटत नव्हतं. माधवचं नवीन घर जरी पाहिलं तरी त्यांचा अक्षरशः जळफळाट होत असे.

गावी माधवची आई एकटीच नव्या घरात राहायची. म्हणूनच त्या लोकांनी वेगळ्या प्रकारे माधवच्या आईला त्रास देण्यास सुरुवात केली होती. अव्वाच्यासव्वा वर्गणी गोळा करणे, काहीनाकाही निमित्त करून आसपासचे काम काढणे, सार्वजनिक बाबतीत प्रवेश नाकारणे इत्यादी प्रकार तर माधवच्या आईने सहन केले, पण आता गोष्ट खूप पुढे पोहचू पाहत होती.

गरज नसताना दारातून नवे मोठे गटार बांधण्याच्या निमित्ताने दहा हजार त्वरित जमा करण्यास सांगून गावकरी माधवच्या आईवर दबाव आणू पाहत होते. तिला सारखं पैशावरून डिवचत होते. अगदी तसंच आई माधवला फोन करून डिवचत होती. विनाकारण होत असलेल्या त्रासाचा एकदाचा बंदोबस्तच करावा, यासाठीच माधव आज गावी आला होता.

घरी जाऊन माधव थोडा ताजातवाना झाला आणि आईला घेऊन संबंधित मंडळींना भेटायला निघणार इतक्यात दारावर थाप पडली.

"पावण्ह.. आलं म्हण्तायसा म्हमईसनं... ! म्हातारे सांग आपलं तूच बिगीबिगी पैश्याचं.. कसलं पाणी तुंबतंय राव गटराची सोय नाय का काय न्हाय... " नाम्या परीटानं दरवाज्यातूनच जे तोंड उघडलं ते अजून चालूच होतं.

"किती पैसं लागणार हायती..?" माधव मुंबईत राहायला असला तरी गावच्या भाषेतला गोडवा त्याला आवडायचा.

"दहा हजार.. " नाम्या कपाळावर आठ्या पाडत म्हणाला.

"इतकं... काय घरबीर बांधायचाय का कुणाचं..?" माधव उद्धटपणे विचारू लागला. 'गटार बांधायला प्रत्येकी दहा हजार रुपये काढायचे म्हणजे काय वेडबिड लागलेय का.."

"तर तर आमास्नी काय हौस आलीया पैसं उधळाया..! दुसरी वाट न्हाय.. आमच्याच दारात घाण साचून राहतीया.." बबन्या वाणी नाम्याच्या मागेच उभा होता. त्याच्या कानावरचे केस बहुधा रागाने टरारुन ताठले होते.

"आर्रर्र.. मी न्हाई कुठं म्हटलंय.. ! पण इतका पैसा एक घरटी, जास्तचं हुतुय की.." माधव काकुळतीने म्हणाला.

"अय म्हाद्या.. लगा.. जे ठरलंय ते सगळ्यांना एकत्र बोलवून, विचरून.. तू मारे झाकपैकी शहरात कमावतोय, तू कधीच पारावर येत न्हाईस, कुणाशी बोलत न्हाईस. तुला गावातलं काय पडलयं..! म्हणून आज तुला कुणी ईचारलं नाही.. गपगुमान पैसं दे, कामात आडतं आणू नगस" किसन दर्जी तुसड्यापणे बोलला. तो जरा वयस्कर असल्याने कुणी त्याला उलट बोलायचे नाही.

पैसे तर द्यावे लागणार हे माधवला चांगलेच ठाऊक होते. तरीही त्यात काय कमीजास्त करण्याची सुरू असलेली धडपड आताश्या कमी झाली होती. ही गावाकडची लोकं डूख धरून ठेवणार, म्हणून त्यांच्याशी वाकडं घेणे माधवला कधीच परवडणारं नव्हतं. पण दहा हजार रुपये असं एकदम देणं ही त्याच्या जीवावर येत होतं.

का-कु करत माधवने पैसे दिले तर खरे, पण काम झाल्यावर एकदा सगळा हिसाब पाहण्याची उत्सुकता दाखवली. बस्स.. एवढेच निमित्त झाले, जे प्रतिष्ठितांच्या जिव्हारी लागले.

माधवच्या घरून पैसे घेऊन निघाल्यावर आपापसांत चर्चा करत ती चांडाळ चौकडी पाराकडं जात होती.

"हिसाब बघतुय बेलदार.. तुला चांगलाच हिसाब दावतु.. !" बाबू न्हावी दातओठ खात म्हणाला. त्या सर्वांमध्ये तोच जरा जास्त जळफळाट करणाऱ्या वृत्तीचा होता.

"कवा जातंय मग..? " किसन दर्जी आपले बारीक डोळे अजूनच बारीक करून विचारू लागला. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला किसन दर्जी पाच फुटांच्या वर काही जाऊ शकला नाही. पण तरीही दिमाखानं तल्लख, कमी बोलणारा आणि भेदक नजरेनं पाहणारा असा किसन दर्जी त्यांचा म्होरक्या शोभत असे.

"अजून कळल्यालं न्हाय... !" नाम्या म्हणाला.

"आज सांच्याला भेटू पारावर.." दर्जी किसन सगळ्यांना सांगून निघून गेला.

सायंकाळी पारावर एका बाजूला जाऊन खलबतं आखली जाऊ लागली. माधव दुसऱ्या रात्री मुंबईला जाणार होता. खबर पक्की होती.

आमचा हिसाब तपासणार..? सगळीच माथी भडकली होती. दर्जी किसनने डाव आखला. नाम्या, बाबू, दादा, बबन्या सर्वांनी दुजोरा दिला. आपापली कामं आणि जबाबदारी वाटून घेतली.

दुसऱ्या रात्री साडेनऊपर्येंत माधवला गाडीत बसवून त्याची आई जुन्या घराकडे सहज एक चक्कर टाकायला म्हणून गेली. तिला पुन्हा यायला तासभर तरी लागला असता. म्हातारपणातही तिची पावलं खंबीरपणे पडत होती. पोरानं चांगले दिवस दाखवले होते. तिच्या इच्छेप्रमाणे गावात नवं घर बांधलं होतं. शिवाय आजही पैसे भरून गावातल्या लोकांची तोंड बंद केली होती. चालता चालता म्हातारीचं मन भरून आलं होतं.

तिकडे बसमध्ये बसलेल्या माधवच्या डोक्यात एक संकट टाळल्याचं समाधान होतं. साठवलेले पैसे संपले असले तरी मुंबईला बायको पोरासाठी घर बांधलं होतं. गावात आता दोन घरं होती. एकदा गटाराचं काम झालं की गावातली माणसं पुन्हा त्रास देण्याचा संबंध नव्हता. बस धावत होती आज आपल्या विचारांत माधव प्रसन्नपणे खिडकीबाहेर पाहत होता.

नुकतेच रात्रीचे दहा वाजून गेले होते. सर्वत्र काळाकुट्ट अंधार दाटला होता. रातकिड्यांची किर्रकिर्र सुरू होती. बाकी कुठेही माणसांची वर्दळ वगैरे नव्हती. सगळीकडे शांत शुकशुकाट पसरलेला पाहून पाच टाळकी एकएक करून माधवच्या घरामागे जमा झाली. प्रत्येकाकडे कुदळ, फावडे, खुरपे, पहार असं काही नं काही हत्यार होतं. अंगावर घोंगडी टाकेलेल्या त्या पाचही चेहऱ्यांवर क्रूर हास्य जन्म घेऊ पाहत होते.

शक्य तितका कमी आवाज करत ते मानवी मुखवटे घातलेले राक्षस त्या घराच्या आसपासची जमीन उकरू लागले, कुठे कुठे भिंतीला तडे जाण्याइतपत आघात करू लागले. खिडकीचे गज वाकवू लागले, दरवाज्यातली फट वाढू लागली. आवाज न करता जमेल तितके होणारे नुकसान करून त्या पाचही आकृत्या आपापल्या घरी जाऊ लागल्या. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे भाव अवतरले होते.

क्षुल्लक कारणांमुळे समाज असाच एकमेकांच्या विरुद्ध टोकाच्या भूमिका स्वीकारतो. पाहायला गेलं तर माधव, त्याची आई आणि गावकरी यांच्या चेहऱ्यावरचं समाधान दिसताना सारखचं दिसलं असतं. पण त्यामागची प्रेरणा आणि कारणं परस्परविरोधी होती.

सामाजिक बांधिलकीला फाट्यावर मारणाऱ्या त्या मनोवृत्तीने दुसऱ्याचं विनाकारण नुकसान करत स्वतःमधील मानवी भावनांचा, त्या आईने रंगवलेल्या स्वप्नांचा, माधवच्या भविष्यातील विचारांचा अक्षरशः इस्कोट केला होता.


समाप्त

निलेश देसाई

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED