arnyrushis patra books and stories free download online pdf in Marathi

अरण्यऋषीस पत्र - मारुती चितमपल्ली


माननीय श्री. मारुती चितमपल्ली सर यांस,

माझा नमस्कार.


आपल्याला पत्र लिहावे ही खूप दिवसांपासूनची इच्छा होती, आज पूर्ण करावयास घेत आहे. पत्र लिहिण्यास कारण की, मागील काही वर्षांपासून आपली पुस्तके माझ्या वाचनात आली आणि त्या पुस्तकांनी मुळात असलेली माझी निसर्गाविषयीची गोडी आणखी तीव्रतेने वाढवली. निसर्गाविषयी भरभरून लिहिल्या गेलेल्या आपल्या अनमोल साहित्याशी माझी गाठ पडावी, हे मी माझे भाग्य समजतो. आपल्या पुस्तकांच्या रूपाने मला जीवनातल्या असंख्य पैलूंशी संवाद साधता आला. खरेतर एक लेखक म्हणून मला आपल्या साहित्यातून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. म्हणूनच हे पत्र म्हणजे आभार प्रकट करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

मुळ तेलगू असलेल्या आपण मराठी भाषेवर दाखवलेलं प्रेम कधीही न विसरण्यासारखे आहे. आपल्या वडिलांचा वाचनाकडे असलेला कल, आईची अरण्यवाटांची आवड मनाला खूप भावले. हनुमंत मामा, लिंबामामा तर आपलेच मामा असल्यासारखा नेहमी वाटत राहिले. 65 वर्षे जंगलातला आपला प्रदीर्घ अनुभव, 36 वर्षे वनाधिकारी म्हणून जंगलांची केलेली सेवा यांचा विचार करताच आपले व्यक्तिमत्व किती अफाट आणि स्फुर्तीदायक आहे याचा अंदाज येतो. आपल्या ज्ञानाला तुमच्यातील लेखकाने निरनिराळ्या कलाकृतीत शब्दबद्ध करून मानवजातीवर एकप्रकारचे उपकारच केले आहेत.

जंगलातल्या अनुभवाची समृद्धी आणि साहित्य संपदेच्या जोरावर आपण वयाच्या 85 व्या वर्षीही कणखरपणे उभे आहात. आपण परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केल्यानंतरसुद्धा जर्मन आणि रशियन भाषांचे अध्ययन केलेत, यावरून आपले साहित्यप्रेम दिसून येते. इतकेच नाही तर वन्यजीव व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन हे सर्वच प्रेरणादायी आहे. आपल्या शब्दशिल्पी, वनविद्येतील जाणकार व्यक्तिमत्वाने मनात एकप्रकारची आपुलकीची भावना निर्माण केली आहे.

आपल्या कथा, लेख यापैकी 'नेमेची येतो पावसाळा' यातले वर्णनं वाचताना आपण निसर्गापासून किती अनभिज्ञ आहोत याची कल्पना येते. निसर्गातील अज्ञात घडामोडींचे इतके सुंदर वर्णन मी याअगोदर कधी वाचले नव्हते. त्यापुढे मग झपाट्याने एकामागोमाग एक अद्भुत सृष्टी अद्भुत नाती, पग घुंगरू बांध, केशराचा पाऊस, जंगलाचं देणं, रानवाटा, रातवा, निळावंती वाचत गेलो. आपल्या लिखाणातले असाधारण कौशल्य मनाला भुरळ पाडत गेले. वाचकाला बांधून ठेवणारे शब्दसामर्थ्य म्हणजे काय, याची प्रचिती आपले लिखाण वाचताना आली. आपल्या लिखाणामुळे माझ्या शब्दसाठ्यात मोलाची भर पडत गेली. आपली पुस्तके वाचताना सर्वसामान्य आयुष्याला विसरून आताच जंगल प्रवासाला निघावं असे मनोमन वाटत राहते.

जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणाऱ्या लिखाणाची ओघवती शैली प्रत्येक वाक्य मनात कोरत जाते. आपले प्रचंड वाचन आणि पुस्तकांची आवड मन थक्क करून जाते. वयाच्या 84 व्या वर्षी रामटेकच्या कालिदास संस्कृती विद्यापीठाच्यावतीने चालवण्यात येणारा 'प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण' हा अभ्यासक्रम पूर्ण करून आपण उतारवयातील कित्येक 'तरुणांना' प्रेरणा दिलीत, याची कल्पना करता येणार नाही.

आपले जंगलातले असंख्य अनुभव, किस्से शब्दसंग्रहित करून आपण खरोखर मराठी भाषेमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. इतर लेखकांच्या साहित्यात निसर्ग प्रामुख्याने प्रेमी युगुलांच्या, नायक नायिकेच्या पार्श्वभूमीवरच दिसून येतो. अजूनही तश्याच प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. म्हणूनच निसर्ग हा साहित्यात कायम दुय्यम स्थानी राहीला आहे. परंतु तुमच्या साहित्यातला नायक नेहमी निसर्गचं दिसून येतो. प्राणी, पक्षी, झाडे हे आपल्या लिखाणातले नायक. मराठी साहित्यात असे लिखाण कधीच झाले नाही. प्रसिद्ध लेखकांनी कधीही मराठीत कोष लिहिला नाही, तो आपण लिहिला. आपल्यामुळेच मराठी भाषेला एक लाख नवीन शब्द मिळाले.

प्राणी-पक्ष्यांच्या दैनंदिन व्यवहारातून आपण मांडलेले सिद्धांत, भविष्यात घडू पाहणाऱ्या घटना, भाकितं, भविष्यातले अंदाज याविषयी काय बोलावे..! इतके सहज, सुंदर निसर्गाशी एकरूप होऊन जगलेलं आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या गुंतवून ठेवणाऱ्या कादंबरीप्रमाणेच मला वाटते. जंगलातल्या निरनिराळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, झाडांच्या मूळच्या स्वभावासकट असलेल्या टिपण्या ह्या भविष्यातील कितीतरी अभ्यासक्रमांत कायम महत्त्वपूर्ण योगदान देतील. त्यातूनच आपले निरीक्षण कौशल्य अद्भुत असल्याचे दिसून येते. अर्थातच हे फक्त दोन दिवस जंगलात फिरून शक्य झाले नाही. त्यासाठी चाळीस वर्षे फिरावे लागले, अभ्यास करावा लागला. त्या साधनेचं मूल्यमापन कोणत्याहीप्रकारे करता येणे शक्य नाही.

माझे दुर्दैव म्हणजे आपले लिखाण माझ्या हाती उशिराच लागले. त्याचा प्रभाव माझ्या मनावर इतका पडला की मी वनखात्यात रुजू होण्यासंबंधी का प्रयत्न केले नाहीत, असा प्रश्न मनात शेवटपर्येंत राहील. असो, आपले जवळपास सर्वच साहित्य अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या आगामी येणाऱ्या मत्स्यकोश, वृक्षकोश, वृक्षायुर्वेद यांचीही उत्सुकता लागून आहे.

"चालीस वर्षे जंगलामध्ये राहिलो आणि अनुभवाने लिखाण केले. दोन दिवस जंगलात राहून पुस्तकं लिहिणारे, माझ्या कामाचा वारसा थोडेच पुढे जाणार? त्यासाठी रानवाटा झिजवाव्या लागतात, " यां शब्दांत आपण एकदा मनातील सल बोलून दाखवली होती. आपल्याइतके उच्च व्यक्तिमत्व नसल्याने कदाचित मला खूप अवघड जाईल, पण मी माझा खारीचा वाटा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करेन. कधी मन भरकटले तरी आपला त्याग, सतत नवीन काहीतरी शिकण्याची उर्मी, आपले बालपण, जंगलातले दिवस या गोष्टी लक्ष्य गाठण्यासाठी मला कायम प्रेरित करत राहतील.

पत्र खरेतर लांबत चालले आहे, पण तरीही मनाचे समाधान होतं नाही. अथांग सागरातील पाण्याचा अंत नेमका कुठे हे जसे सांगता यायचे नाही, तशीच अवस्था माझी आहे. आपले जंगलातले शोध, निसर्ग साहित्यातील असंख्य टिपण्या, मुद्दे, गोष्टी जितक्या आठवाव्या तितक्या कमीच आहेत. निसर्गाची हिरवी वाट मराठी साहित्यात निर्माण करून निसर्गप्रेमींना आपण नवी दिशा दाखवून दिली आहे. कित्येक वर्षांच्या तपाने सिद्ध केलेली लेखणी वाचकावर अमूल्य अश्या ज्ञानाची भरभरून उधळण करत असते. त्यामुळे आपल्याला आणि आपल्या लेखणीला मनापासून सलाम.

इतकी वर्षे जंगलात राहून निसर्गाचा सूक्ष्मपातळीवर अभ्यास करणे, हे एखाद्या तपस्येहून कमी नाही. म्हणूनच अरण्यऋषी हे नाव आपल्यासाठी अतिशय समर्पक वाटते. अजून भरभरून लेखन करा. निसर्गाची विविध अंगे समजून घेण्यास वाचकांना दिशा दाखवा. तुमच्या लेखनाचा मी नेहमीच वाचक असणार आहे. निसर्ग आपल्याला भरपूर तंदुरुस्त आयुष्य देवो. खूप शुभेच्छा.

आपला वाचक,

निलेश देसाई


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED