perjagadh - 2 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ...एक रहस्य...भाग 2

२) पवनचे सोनापुरात आगमन आणि शुरुवात...

तितक्यात समोर गणेशाची मुर्ती दिसली, तिला ही नमन करून मी सुखरूप घरी पोचवण्याची विनंती करु लागलो. माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याचं असचं होत. आता माझंच बघा ना!!! किती देवांच्या पायी पडत आलो. कित्येकांना स्मरलं मी माझं जीव वाचवण्यासाठी. इतरांसारखी माझी अवस्था होवु नये म्हणुन .... आता नेमकं एखाद किलोमीटर अंतर उरलं असेल. मला जगण्यासाठी पुरेसे काही क्षण.पुरेशी काही वाट.

अख्खं जीव एकवटुन मी धावत होतो. नाकातून,तोंडातून श्वास जोरा जोरात घेतला जात होता. त्याचा आवाज दुर दूर पर्यंत घुमत होता.... आणि आता माझं एकवटलेल शरीर साथ सोडायला लागलं.पण मी आता जवळच पोहचलोय या नादात प्रयत्न करत होतो.मी आता बाहेर पडू शकणार नाही हा विचार थकवा घालू लागला होता.

दुरूनच गेट दिसला आणि सिमेंटच्या पायऱ्या लागल्या. पण समोरचं दृश्य पाहून मी अजुनच गर्भगळीत झालो. गेट पाशी कुणीतरी उभा असल्याची प्रचिती मला आली आणि दुरूनच त्याच्या खांद्यावर तो काही धरून असल्याच मला जाणवलं.माझी एकवटलेली शक्ति तिकडे बघूनच क्षीण होऊ लागली होती.

आता जे होईल ते होईल अशी आस्था मनात ठेवून मी माझे पळते असणारे शरीर सैल सोडले.आणि तेवढ्यातच माझा पाय घसरून मी घरंगळत एखाद्या दगडा प्रमाणे खाली आलो होतो.कारण आता माझ्या अंगात काहीही सामर्थ्य उरले नव्हते.घरंगळत आल्यामुळे माझ्या अंगाला बऱ्याच जागी खरचटले होते.पण ते बघायचे सुद्धा आता माझ्यात त्राण उरले नव्हते. आणि हळूहळू मी माझे डोळे मिटले. कारण ते उघडण्याचे सामर्थ्य माझ्यातून केव्हाच निघून गेले होते. कदाचित मी ते शेवटचे समजून मिटले होते, का कोण जाणे? पण आता माझी जीव वाचवण्यासाठी असलेली धडपड बंद झाली होती .... आणि आता माझा प्रवास कुठे संपला होता ते माझे मलाच माहित नव्हते.

आता सांगायचे म्हणजे मी कोण?मी तिथे कशाला गेलो असेल? ती जागा काय असेल? काय झालं माझ्यासोबत तिथे? मी एकटाच होतो काय तिथे? अश्या पद्धतीचे पुष्कळ प्रश्न तुम्हाला पडले असतील आणि साहजिकच तुम्हाला ते जाणुन घेणे तुमचा अधिकार आहे.

मी भटकंती करणारा एक साधारण तुमच्यापैकीच एक होतो आणि ज्या जागेबाबत मी तुम्हाला सांगत आहे त्याचे नाव आहे "पेरजागड". ज्याला विदर्भात "सात बहिणींचे डोंगर" असे म्हणुन मान्यता आहे. ज्या बद्दल बऱ्याच काही आख्यायिका गावातील बुजुर्ग मंडळी मोठ्या चवीने आज पण सांगतात.आणि कसं आहे जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरु होते ही म्हण कुणीतरी महान व्यक्तीने बोलली होती. त्यातलेच हे एक उदाहरण म्हटले तरी चालेल. आपण एखाद्या विशिष्ट स्थळाचा जेव्हा आस्वाद घेण्यासाठी जातो.तिथे फक्त जितकं दाखवलं जातं किंवा जितकं दिसतें तितकच आपण मानतो. पण सत्याच्या पलीकडलेही अजून काही सत्य आहेत, जे आपल्या लक्षात येत नाही. किंवा ते आपल्या बुदधिमत्तेच्या पलिकडले असते. पण त्याची पूर्तता केली तर खरोखर अगदी तंतोतंत आहेत. आणि आज मी त्याच सत्याच्या पलीकडले शोधण्यासाठी इथे आलो आहे.

जग किती बदललंय याची प्रचिती आज तुम्हाला कुणीही देवु शकेल. या जगाला कलियुग असे म्हंटले आहे. आज हे उदाहरण खास त्यांच्यासाठी आहे ज्यांनी हा युग अनुभवला आहे पण त्यामागचे सत्य नाही. कारण ते सगळ अनुभवायला लागणारी आत्मसात नावाची जी शक्ती आहे, माणूस तेच विसरत चालला आहे.

आपण इतके सुपरहिरो बघतो कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्या शरीरात ह्यूमन बॉडीचा विकास होऊन एका अज्ञात शक्तीचे स्वामित्व त्यांना लाभते. पण या पलीकडेही काही शक्ती आहेत जे साधारण मानव सुध्दा विकास करू शकतो. त्याला म्हणतात मौनधारणा.जर आपल्या शरीरातील पंचेंद्रिये जागृत झाली तर मनुष्य असाधारण शक्तीचा राजा बनू शकतो हे कितीतरी सिद्धांतात मांडले गेले आहे. पण पूर्वजांपेक्षा आज माणसाची श्रद्धा,शक्ती,सामर्थ्य ही कमी होत चालली आहे... आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातील काही कालावधी कमी होते.
आणि दिवसेंदिवस कमीच होत चाललं आहे.

पुर्वी माणूस घागरीत भात शिजवून घेत होता, आज स्टीलच्या भांड्यात शिजवुन खातो. निसर्गाचं देणं खात असताना, हव्यासापायी नको त्या औषधीचा वापर करू लागला. आणि त्यामुळे अल्कोहोलचे प्रमाण वाढले व नव नवीन रोग उद्भवू लागले. पूर्वीचं जीवन सहज नव्हत पण आजच्या सोप्या जीवनापेक्षा तेच जीवन सुखी होत. कारण आजचा माणूस स्वार्थी आणि ऐश आराम करणारा झाला आहे. की त्याला पाप काय? पुण्य काय? हे सुद्धा कळेनासे झाले आहे.

माणसाची सगळ्यात मोठी शक्ती वैचारिक शक्ती, सगळ्यात मोठी स्थिती मानसिक स्थिती, सगळ्यात मोठं दुःख ताण तणाव. पूर्वीच्या काळात वरील कोणत्याही गोष्टीचा प्रादुर्भाव माणसावर नव्हता. पण हल्ली प्रत्येक व्यक्ती एका तरी व्याधीने त्रस्त आहे व त्यासाठी मोठ मोठे तज्ञांमार्फत ते आपले नको ते हाल करून घेत आहेत.

जग इतकं बदलत जात आहे की लोक एखाद्याच्या श्रद्धेची टिंगल उडवायला पण मागे पुढे पाहत नाही. आणि त्यामुळे सत्व नाहीसे होत आहे. जर सत्व नाहीसे झाले तर मनुष्य जगणार कश्या प्रकारे.क्षितीज कधी कुणी पार केलंय का? क्षितिज म्हणजे सीमा हे मात्र आपण ठरवतो. आणि जसजसं समोर जातो ती सीमा पण वाढत जाते.तसेच सत्व म्हणजे एक श्रद्धा असते ती अंतर्मनातुन केली जाते आणि त्याची सुरुवात ही अध्यात्मा पासुन होते.

मानवी शरीर द्वारे जे जिवन आपणास प्राप्त झाले आहे. ते निसर्गाच्या नियमानुसार चालावे असा क्रम आहे, पण सगळ काही उलट होतंय. माणूस अज्ञान, अहंकार , अंधश्रद्धा आणि अभिमान यांच्या आहारी जाऊन जीवनाचे दिवाळे काढत आहे.आयुष्याचं उहापोह करत आहे.

निसर्गा सारखे आई वडील कोणीच नाही. पोट भरण्यासाठी माणसाने काम करावे हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा हा नियम लाथाडून जी माणसे काम करण्यात टाळाटाळ करतात तेव्हा माझ्या मते निसर्गाच्या विरुद्ध वर्तन करीत असतात. म्हणुन त्यांना असं भोगायला येते की निसर्गाकडून त्यांना अतिशय कठीनाईचे प्रसंग येतात.. थोडक्यात माणसाच्या ठायी असलेली भुक ही प्रेरणा म्हणजे वैश्विक जिवन व्यवस्थापन करण्यासाठी निसर्गानं केलेली सुरेख योजना आहे. आहार ,निद्रा ,भय या क्रिया सर्व प्राण्यांमध्ये सारख्याच आहेत. परंतु मनुष्य प्राण्यांपेक्षा विकट परिस्थितीत पोहोचला आहे. थोर संतांनी अशी किततरी उदाहरणे दिली आहेत परंतु या निरोगी शरीराशी निगडीत आहेत. त्यांनी केलेलं मार्गदर्शन व दिलेलं ज्ञान हे धूळ खात असलेले फक्त ग्रंथ राहिलं आहे. ज्यामुळे या कलियुगाचा शेवट लवकर होईल ही खात्री आहे.

मी पवन भांडारकर. नवीन स्थळांची भेट घेवून माहिती काढणे, आणि त्या विषयी लोकप्रिय दंतकथानुरुप त्याचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा माझा आवडता छंद.त्यातले तथ्य,आणि निसर्गाची आगळी वेगळी रूपे बघण्यात मला फार मजा यायची.त्यासाठी दरवर्षी मी सतत कुठे ना कुठे नवीन स्थळांवर फिरायला जायचो.

सातपुडा पर्वतरांग उतरताना मला पडलेला एक प्रश्न?मी भटकंती करणारा एक ट्रॅकर. नुकतंच एक नवीन चॅनल सुरु केले होते. आणि जगातील काही आश्चर्यकारक व रहस्यमय गोष्टी जगासमोर आणणे हा माझा उ्देश होता. आणि त्यासाठी मी रात्रंदिवस महराष्ट्रातील कित्येक डोंगरदऱ्या पायी तुडवल्या होत्या.कित्येक स्थळांची मी नोंद केली होती,जी कुणी बघितली पण नव्हती.

अशी कितीतरी स्थळे मी बघितली होती. तेव्हा मला असं कळलं की प्रत्येक देव देवतेची निर्मिती ही कुण्या ना कुण्या कारणाने झाली आहे. बुजुर्ग मंडळीच्या मते तिथे काहीतरी अदृश्य शक्तींच वास्तव्य असते... कारण शेवटी ती श्रद्धाच असते जी दगडाला पण देवपण आणते. आणि आपण कितीदा पाहिलं किवा ऐकलं पण आहे की शास्त्रज्ञ सुद्धा या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागले आहेत.

मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतात चौरागढ अद्वितीय प्रेक्षणीय स्थळ आहे. ज्यावर शिव शंकर म्हणजे भोलेनाथ देवतेने तपश्चर्या केली. पण काही कारणास्तव त्यांनी तिथुन पलायन केले... अशी माहिती मला तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी कडून कळली.

तेव्हाच ठरवलं आपल्या महाराष्ट्रात असे अनेक प्रेक्षणीय स्थळ आहे आपण त्याचाच शोध करूया... कितीतरी दिवस कुठे जावे कुठे नाही मला काही कळत नव्हते. पावसाळा असल्यामुळे जास्त करुन स्थळ बंद करण्यात आले होते. पण प्रकृती ची अस्सल छटा तर पावसाळ्यातच दिसुन येते.

तेवढ्यात मला माझ्या मित्राचा फोन आला. त्याने मला आपल्या गावी येण्याचे आमंत्रण दिले.मी पण बॅग भरली. कारण याच निमित्ताने माझे फिरणे पण होणार होते.चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहर तेथील तो रहिवासी होता. मला माहिती नव्हते की माझ्या इतक्या जवळ पण प्राकृतिक सुंदरता आणि अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. आणि सोबतच ईथल्या भागात अनेक रहस्य दडले आहेत म्हणुन.

त्यामुळे वेळ न घालवता दुसऱ्या दिवशी मी सकाळी तयारी केली व आपला कॅमेरा आणि इतर गरजेच्या वस्तु सोबत घेतल्या, आणि निघालो एका नव्या संशोधनात. पण मला काय माहिती होते की नियती ने माझ्यासाठी आणखीच काही ठरवले होते.

मी नागभीडला अवघ्या काही तासातच पोहोचलो. माझा मित्र स्टॉप वर माझी वाट बघत बसलाच होता. उतरता बरोबरच त्याने माझे स्वागत केले.कारण खरंतर त्याने माझ्या येण्याची आशा केली नव्हती. तिथून आम्ही त्याच्या घरी गेलो. फ्रेश होऊन आम्ही जेवण केले. माझ्यासाठी हा एक सुखद अनुभव होता.कारण याआधी मी कधी विदर्भात कुणाकडे राहिलो नव्हतो.आणि तिथली ती आपुलकी माझ्यासाठी नवीन होती. सायंकाळी जेव्हा मी गावात फेरफटका मारला. तेथील वातावरण खूपच मनमोहक वाटले.इतके दिवस शहरांतल्या गर्दीत मी हा एकांत कसा गमावला याचे मला नवल वाटत होते. मला तीथे आल्यापासून एक वेगळंच भास होत होतं. काहीतरी नवीन आपल्या जीवनात घडणार असे ठामपणे वाटत होते.

सुरुवात आम्ही शिव टेम्पल पासुन करण्याचे ठरवले. ते सर्वात जवळचे ठिकाण होते. एका उंच पर्वतावर शिव शंकरचे अस्तित्व या छोट्या शहरात असेल असे वाटले नव्हते. पण तिथे काही रहस्य दडले आहे? हे मला माहीत नव्हते. मंदिरापर्यंत ज्या शिड्या तयार केल्या आहेत सर्वसामान्य माणसाला तिथपर्यंतच जाता येते. पण तिथुनच वर जायला एक अरुंद पाऊलवाट होती. जी त्याचं जंगलातून आहे... आणि तिथून डोंगर चढत असताना आपण अजुन उंचावर जातोय अशी खात्री होते.

जवळपास ५०० ते ६०० मिटर चढाई केल्यावर आपणास तीच पाऊलवाट डोंगराच्या माथ्यावर पोहोचवते... परत तिथून काही अंतर गेल्यावर समोर डोंगराचा रुंद माथा आपल्याला दिसुन येतो... आणि त्या मध्य भागी उजव्या बाजूला कोपऱ्यात काही शेंदुर माखलेल्या मुर्त्या आहेत. आश्चर्य म्हणजे तिथे त्यांची पूजा केलेली मला दिसले. पण माझ्या मित्राला विचारलें तर तो म्हणाला: इथे कोणीच येत नाही. आणि आजपर्यंत त्याने कुणाला इथे पूजा करताना बघितले सुद्धा नाही. कारण तो कितीतरीदा या भागात फिरलेला होता. आणि त्याच्या साठी काही नवीन नव्हते.

वर डोंगराच्या कडेला असलेली त्यांची स्थापना ही कुणालाही अचंभित करणारी होती. कारण त्या मुर्त्या आजपर्यंत कुणालाही दिसल्या नव्हत्या. शिवाय आणखी बरेच काही असल्याचं मला कळलं.तीच डोंगररांग शेवटी घोडाझरीला येवुन मिळते ... घोडाझरी एक ब्रिटिशकालीन तलाव आहे. घोडाझरीचा अगम्य परिसर आणि तिथला तलाव इथल्या लोकांसाठी एक समुद्राची उपमा देतो.तिथे असलेल्या बोटींगसाठी बरेच लोक तिथं येत असतात.आणि सोबत संपूर्ण निसर्गाचा देखावा अगदी अप्रतिम दिसतो तिथून.पावसाळी दिवसांत जेव्हा तलाव भरतीला येतो तेव्हा गावकरी तिथे आंघोळीचा आस्वाद घ्यायला येतात.
जेव्हा पावसाचा जोर वाढतो तेव्हा तेथील मासेमारी करणारे तिथे जात असतात. एक एक करुन मला इथल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करत होत्या. त्यामुळे माझी ईच्छा आणखी माहिती गोळा करण्यासाठी तीव्र होत होती.शिवाय मला एका नवीन स्थानाबद्दल माहिती मिळाली होती. ती म्हणजे पेरजागड, मुक्ताई, आंबाई निंबाई अश्या बऱ्याच स्थळांची यादी मला माझ्या मित्राकडून कळली.आणि त्या सोबत काही दंतकथा प्रचलित आहे हे पण मला कळले. त्याचा उलगडा करण्यासाठी माझे कुतुहल वाढू लागले होते.

मला वाटते बहुतेक ती शिवरात्र असेल जेव्हा मी गडावर पहिले पाऊल ठेवले होते. आणि एक योगायोगही. विदर्भात दरवर्षी पडत असलेला दुष्काळ बघुन शासनाने तेहतीस कोटी झाडे लावण्याचा उपक्रम राबवला होता. त्यामुळे जितका जंगली भाग होता तो बंद करण्यात आला होता.आणि पावसाळ्यात ही स्थळे बऱ्याच प्रमाणात बंद असत.आणि पेरजागढ बऱ्याच प्रमाणात फॉरेस्ट मध्ये गेलं होतं.त्यामुळे शेवटचं म्हणून आम्ही त्या गडावर जायचं ठरवलं.

जंगलातून प्रवास करीत आम्ही निघालो. खरंच त्या वेळेस दुरूनच मला ते पेरजागड फार अवर्णनीय वाटत होते. दैव सुध्दा कशा कशात वास करते, याची प्रचिती मला त्या स्थानावर येत होती.असो दृष्टी आड सृष्टी आहे हे खरंच आहे. हा प्रवास माझ्या आयुष्यातील फार मोठा होता असं म्हंटले तरी चालेल. कारण त्याआधी मी कित्येक स्थळाची माहिती काढली होती त्यांची सखोल चौकशी पण केली होती. पण या गडाची तर गोष्ट वेगळीच होती.

गावा खेड्यात शिवरात्रीचा उत्सव म्हणजे जरा जोराचा असतो. आणि यानिमित्त गावात जत्रे सारखे कार्यक्रम होत असतात. रात्री नाटके सादर करण्यात येतात. गडावर तशीच जत्रा भरते. खाली जत्रा आणि वर पुजा वगैरे होते.

मी कधी माझ्या आजूबाजूचे गड किंवा प्रेक्षणीय स्थळ बघितले नव्हते. फक्त एक खात्री होती, की ज्या प्रकारे जग एक रहस्य आहे, आणि त्याची गणना आजपर्यंत झाली नाही. अख्ख्या जगाचा फक्त पाच टक्के अभ्यास झाला आहे आणि तोही अर्धवट. मग आपल्या भागात काही असायलाच हवं, हे मला वाटत होतं.

सत्वाबद्दल सांगायचं राहिलं तर त्या जुन्या काळात असले कितीतरी सत्व होते. जे आपण आज ओठावर उच्चारले तरी लोक हसल्या शिवाय राहणार नाही. त्यात तथ्य नाही, पण हे खरं आहे जर आपण एखाद्या व्यक्तीला म्हटलं की, एके काळी कुणी तिथे शोध घेत चक्क १८ महिने आणि सतरा दिवस न खाता पिता राहिला आहे तर ही एक थट्टा वाटेल. पण हे एक सत्य होते. तिथले जे अनुभव मला स्थानिक लोकांकडून कळाले. इतरांसारखे माझ्यासाठी पण हे एक नवलच होते.

सुरवातीला जेव्हा मी त्या गडावर जाण्यासाठी निघालो त्यावेळेस माझ्यासोबत दोन अद्भुत गोष्टी घडल्या.
जत्रेच्या दिवशी मला त्या गडावरची शांतता अनुभवता आली नाही.मात्र मला जे अनुभवता आले ते मात्र कॅमेऱ्यात कैद करून आणले. वाढत्या सुधारणेनुसार आता गडाच्या सभोवताल जी अरुंद पायवाट होती. तिथे रेलिंग लावल्या गेली होती. त्यामुळे तोल जाण्याची भीती कमी झाली होती. सौंदर्यानी नटलेले आणि लोककथेनी थाटलेलं ते स्थान माझ्या काळजात असं उतरलं होतं की जस माझं आणि त्या गडाचं संबंध फार जवळचा आहे. काहीतरी नातं माझं त्या गडाशी जुळलेलं आहे असं सारखं मला वाटत होतं.

सौंदर्याची प्रत्येक गोष्ट अनुभवताना मी सूर्यास्ताचे विलीन दृश्य बघू लागलो. माथ्यावरून खडकाळ पण विरान पडलेलं ते गड भोवतालचा संपूर्ण परिसर आपल्याला दाखवतो. ज्यामुळे मन प्रसन्न झाल्याची जाणीव होते. ढगांचा प्रवास असं नकळत डोळ्यांनी आपण बघु शकतो. आणि खाली त्याचं प्रतिबिंब जणु एक खेळ खेळत असतो. आवडलं... मला ते ठिकाण फार आवडलं. पण निराशा ही तितकीच झाली की हे स्थान आता बंद होणार. सौंदर्यानं नटलेलं हे गड आता जंगलात विलुप्त होणार.असं नको व्हायला? हा विचार करत मी परतीचा प्रवास सुरु केला.

गडाच्या वरच्या पायऱ्या उतरून दुसऱ्या वळणावर लागलोच होतो की मला कुणाची तरी हाक आली. आणि मी वळुन पाहिले. क्षणभर तो चेहरा बघितला,न्याहाळला आणि मी पळू लागलो त्या व्यक्ती पासुन.गर्दीत विलीन झालो. पण हा एक योगायोग होता. आज इतक्या वर्षांनी आम्ही त्या गडावर एकमेकांसमोर आलो होतो. शेवटी ती घाईघाईने मागोमाग आली. भर गर्दित तिने माझा हात पकडला आणि खेचत मला बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत टोकाशी नेले.

पळतच आहे ना शेवट पर्यंत...

(मी फक्त गप्प उभा होतो)

अरे वेड्या बोल ना ... आज तरी बोल.. असं किती दिवस पळतच राहणार.

ऐक रितु... प्लीज मला जाऊ दे... नकोत मला त्या गोष्टी परत...

मग का इतके दिवस माझ्यावर प्रेम केलं. मला सोडुन जाताना तुला एकदाही माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं.इतकी नकोशी झालेय तुला.पण त्याचं कारण काय? हे तरी सांगणार का मला?

परिस्थती नुसार सगळं बदलते रितु... मग मीच काय वेगळा.

अजूनही लपवतो आहेस पवन... पण काय आजतरी नाही सांगणार का मला ?इतकी परकी कधीच नव्हते रे तुझ्यासाठी?

वेळ आल्यावर कळेल तुला!!!

ती वेळ केव्हा येईल..? केव्हापासून वाट बघत आहे मी .. फोन करते तर उचलत नाही. कुठे भेटाव म्हटलं तर ठावठिकाणा नाही ... काय चाललंय काय तुझं? मला काहीच कळत नाही? का असा वागत आहेस?

मी तुझ्यावर प्रेम नाही करत ! जाऊ दे मला ...
( तिला बाजूला सारत मी उतरू लागलो)

मित्र हे सगळं बघत होते. पण मी एकदाही परत मागे वळुन बघण्याचा प्रयत्न नाही केला. मित्रांनी पण विचारणे योग्य नाही समजले आणि त्यांना काही सांगण्याच्या स्थितीत मी होतो पण नाही. फक्त इतकं समाधान वाटले की ती आहे.आणि अजूनही माझ्यात आहे.

क्रमशः....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED