पेरजागढ- एक रहस्य.... - ४ कार्तिक हजारे द्वारा कादंबरी भाग मराठी में पीडीएफ

पेरजागढ- एक रहस्य.... - ४

४) पवनला हॉस्पिटलला नेणे...


गडाच्या पायथ्याशी एक मंदिर बसलं आहे.कालांतराने गड जेव्हा फॉरेस्टच्या हद्दीमध्ये गेलं, तेव्हा खाली असलेली दोन ते तीन एकर तेवढीच जागा फक्त देवस्थानच्या नावे राहिली.आणि तिथे रखवालदार फक्त एक माणूस राहतो.सकाळी रोजच्यासारखा तो जेव्हा झोपून उठला, तेव्हा रोजच्याप्रमाणे त्याने फेरफटका मारण्यास सुरुवात केली.

       अचानक गडाच्या प्रवेशद्वारापाशी, त्याला मी निपचित पडलेला आढळून आलो.तो घाबरत घाबरत माझ्यापाशी आला. डोक्यातून आणि गुडघ्यातून घरंगळत आल्यामुळे थोडेफार रक्तसंचार होऊ लागले होते. आधी त्याने मला पालथ्या पडलेल्या स्थितीतून सरळ केले. आणि मी जिवंत आहे की मेलो आहे याची जाणीव केली.अत्यंत कमी प्रमाणात माझा श्वासोच्छवास चालू होता. त्यामुळे त्याला जरा हायसे वाटले. आणि त्याने उचलून मला त्याच्या खोलीत नेले. थंड पाण्याचे शिंतोळे चेहऱ्यावर मारले.
पण माझ्यात इतकी शुद्ध पण नव्हती की त्याच्या पाण्याच्या शिंतोड्याने मला जाग यावी. कारण माझं शरीर फक्त तिथे पडलं होतं .आत्मा अजुनही तिथेच संचारत होती.जिथून मी निघालो होतो.मी अजुनही त्याच दरीतून मी चालत होतो. ज्या रस्त्यासाठी मी तिथे गेलो होतो. ते रस्तेही आज माझं निराकार रूप बघत होतं.

  मंदिरात असणार्‍या त्या माणसाने, गावात फोन करून माझं एक अज्ञात शव म्हणून माझी नोंद केली.आणि त्याच प्रमाणे एका डॉक्टरची सुद्धा सोय करावी असं त्याचं म्हणणं फोनवर झालं. ठरल्याप्रमाणे कित्येकांच्या गाड्या आणि सायकल मला बघण्यासाठी आले. त्यापैकी एक गाडी होती काकांची. गेली कितीतरी दिवसे मी लापता आहे हे सगळ्यांना कळलं होतं. एव्हाना माझ्या नावाची रिपोर्ट पण पोलिसात तेव्हाच केली होती रितुने.

     प्रत्येकाच्या घोळक्यात काकाने मला ओळखलं. आणि दुरूनच पवन म्हणून मला हाक मारली. पण मला शुद्ध होतीच कुठे? मला बघितल्यावर काकाच्या जीवात जीव आला. कित्येकांनी माझ्या मृत्युचे फर्मान आधीच काढले होते. त्यामुळे मी जिवंत आहे ही आशा कित्येकांनी सोडून दिली होती.

      गाडीवर बसवून काकाने मला घरी आणलं. घरी सगळ्यांना फोन करून माहिती दिली. रितूला वगैरे माहिती मिळाली. माहिती मिळताच रितुने हातातील काम टाकून तसेच ती माझ्याकडे धावत आली. बाहेरच्या खोलीत काकाने अंथरूण अंथरले आणि काकुने पंखा लावला. बहिणी आसवा गाळत उराशी बसल्या होत्या.

  काही वेळात दारात डॉक्टरची गाडी आली. बघ्यांची गर्दी अगदी अतोनात होती. कारण प्रत्येकाला आज माझ्या बाबतीत एक कुतूहल जाणवत होतं... डॉक्टर आले त्यांनी हाताची नाडी बघितली. स्तेथोस्कोप लावून हृदयाची हालचाल बघितली, आणि टॉर्चने डोळे वगैरे बघितले. मी जिवंत आहे की मेलोय हे त्यांच्याही लक्षात येत नव्हते.कारण हृदय फार कमी प्रमाणात धडधड करीत होते. आणि श्वास पण नाहीच्या बरोबर चालू होते. काय उपचार करावा?हे त्यांना सुद्धा उमजत नव्हते. कारण त्यांच्याही आयुष्यात ही अशी केस पहिल्यांदाच आली होती.

     काकाने जेव्हा त्यांना विचारलं की नेमकं त्याला काय झालं आहे? तर डॉक्टर काहीच सांगण्याच्या तयारीत नव्हते.तोपर्यंत रीतुपण येऊन पोहोचली होती. तुळशी वृंदावनापासून तिची आलेली आर्त हाक, खरंच हृदय पिळवटणारी होती.आतापर्यंत फूसफुसत असलेल्या बहिणी पुन्हा एकदा नव्यानं बांध फोडू लागल्या होत्या.ज्यात नुकतीच रितूने भर पाडली होती.

  नुकतीच पोचलेली आई अजून धाय मोकलून रडू लागली. शेवटी काकाने जरा रागाने डॉक्टरला विचारले. अहो सांगाल काय? काय झालं आहे ते?. किती वेळ झालाय तुम्ही त्याला तपासलं असता....?

     अहो हे माझ्या हातचं नाही.त्याचं हृदय इतकं कमी प्रमाणात धडधडत आहे की स्पंदनाचा आवाजही तितका येत नाही मला.आणि राहिला श्वास तो पण पूर्णपणे थांबून आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगू शकतो की तो स्मृतीमध्ये हरवलाय.... कोमात गेलाय तो..

    कुजबुज वाढली... रितू पण माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत ओरडायला लागली.. तू येतो म्हणालास आणि आलास.... पण का तू आज इतक्या लांब गेलास रे... परत सगळे कुजबूज करू लागले. इतके दिवस आज तीन_चार महिन्यांचा कालावधी होत आहे. इतके दिवस हा होता तरी कुठे?प्रत्येकाच्या मनात हा एक कुतूहलाचा प्रश्न होता.

     मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णवाहिकेत घालून हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं.सकाळीच वार्ताहरात बातमी आली, की शेवटी पवनचा शोध लागलाय...काही कालावधीनंतर त्याची बेशुद्धावस्थेत बॉडी सापडली.डॉक्टरच्या म्हणण्यानुसार तो कोमामध्ये गेलाय.एक छान पर्यटक, निसर्गाचे अध्ययन करणारे, दऱ्याखोऱ्याची माहिती जनलोकांपर्यंत पोहोचवणारे, काही दिवसांपूर्वी त्यांची लापता होण्याची वार्ता खरंच मनात हळहळ करून गेली होती. आणि आज अचानक त्यांचा पत्ता लागला पण तेही कोमामध्ये गेलेत ही वार्ता ऐकून प्रेक्षकांमध्ये घर करून गेली होती.कित्येकांना माझ्याबाबत एक दुःख वाटत होतं.

    खरंतर माझ्या जीवनशैलीमध्ये बरेच काही बदल झाले होते.शरीराने तर झालेच झाले पण ज्या विचारांनी मी एकेक पाऊल सत्वाच्या वाटेवर टाकला होता. त्याची ती अनुभूती पण तितक्याच दैवयोगाने आली होती.सायंकाळ होईपर्यंत कित्येकांच जाणं-येणं असल्यामुळे अख्खं वार्ड आणि हॉस्पिटल फेमस झालं होतं.

   सायंकाळच्या त्या एकांतात रितू माझ्या बाजूला बसली होती.कितीतरी दिवसानंतर आज तिच्या चेहऱ्यावर थोडीफार काळजी का असेना पण सुखाची एक लहर आली होती.कारण तसाही मी बेडवर असलो तरी तिच्या मनाला एक समाधान होतं. मी कुठेतरी तिच्यासोबत असण्याचा,तिचा होऊन जगण्याचा.

   काही वेळात नर्स आली .ऑक्सीजन मास्क माझ्या चेहर्‍यावर लावून मशीनकडे बघत काहीतरी तिच्या नोंदवहीत नोंदवलं आणि निघून गेली. रात्रीला थांबायला आई आली होती. आल्या-आल्या डोळ्याला पदर लावून तिने घेतला होता. माझ्या पायापाशी येऊन तिने स्वतःला नतमस्तक केले. आणि परत एकदा दूर कोपऱ्यात जाऊन पदर ओलं करायला बसली.

       रितुने एकवार माझ्याकडे बघितलं आणि आईकडे निघाली... तिला येताना बघून आईने रडायचे थांबवले, आणि म्हणाली.... बाळ जा आता घरी... मी थांबते पवन जवळ.

आई....
 इतक्या वर्षानंतर तो मला भेटला आहे, आणि आता इतक्या महिन्यानंतर आज माझ्याजवळ आला आहे.आणि ते वचनसुद्धा मी त्याला आधीच मागितलं होतं. इतक्यात मी काय सोसलं हे मलाच ठाऊक आहे आई.तुम्ही तर त्याची आई आहात ..तुमच्याशिवाय कोण आहे त्याच्याजवळ.. पण हे शेवटचे क्षण... द्याना मला आई... कदाचित तुमचं मातृत्व नाही देऊ शकणार त्याला... पण माझं प्रेम कधीच कमी पडू देणार नाही.

तुझ्याबद्दल खात्री आहे गं मला... पण ही वेडी ममता कधीच स्वस्थ बसू देणार नाही.. अगदी छोटासा होता तो. जेव्हा त्याची तब्येत बरी नसायची. कधीच मला एकटे सोडून जाऊ नको म्हणायचा. साधा ताप जरी येईल तरी मला त्याच्याजवळ बसून राहावं लागायचं. म्हणायचा आई तू नसशील ना माझ्याजवळ.... तर देवाला एकच प्रार्थना करीन, की मला कधीच कोणता आजार होऊ देऊ नको. आणि जर मला आजार देत असशील. तर माझ्या आईला कधीच माझ्यापासून हीरावू नको... किती कौतुक वाटायचं तेव्हा मला. आणि आज हा इतका मोठा झाला की त्याचे निर्णयसुद्धा तोच स्वतः घेतो.
                
आई तुम्ही जा ना हो घरी... मी आहे इथे त्याच्याजवळ, अगदी त्याची म्हणून. तुम्ही काळजी नका करू. काही लागलं तर आहे मी सांगायला. आणि कसलेही टेन्शन घेऊ नका! कुठेही जाणार नाही तो आपल्याला सोडून? जेव्हा तो बरा होईल ना त्या दिवशी हक्काने तुम्ही त्याला जाब विचारा.

ठीक आहे मुली निघते मी .. डबा आणला आहे जरा जेवून घे. काळजी घे स्वतःची आणि त्याची पण (आणि परत एकदा पदर डोळ्यांना लावून घेतला.) कासावीस झालेलं मन दरवाजाही पार करू शकत नव्हते.वारंवार नजर बेडवर लेटलेल्या माझ्या शवावर जात होती.

    मित्रमंडळी ,आई ,शेजारी वगैरे सगळे भेटून निघून गेले होते. मी निपचित अंथरुणावर पडलो होतो.आणि रितू माझ्यापाशी राहून माझा हात तिच्या हातात घेण्याचा प्रयत्न करत होती. एक नजर माझ्याकडे आणि एक नजर मिठीत धरलेल्या तिच्या हाताकडे.क्षणभर माझ्या हातात असलेल्या अंगठी कडे तिची लक्ष गेली. आणि केव्हा ती त्या भूतकाळात शिरली तिला कळलेच नाही.

    नुकताच पाऊस पडून बळीराजा सुखावला होता. उघडेबोडके असलेले डोंगर तृणपानांनी डोलावत होते. चोहोबाजुला गार गार वारे वाहू लागले होते. आणि त्यातच माझी सातपुडावर जायची ट्रीप ठरली होती. तसं तिच्यापासून दूर जाणे मला जमत नव्हते. पण निसर्गाचा नाद मला अलगद वेडा करून जातो.आणि त्यामुळे नवीन स्थळे बघणे आणि त्यांना ट्रेक करणे मला एक आव्हान असल्यासारखा वाटून जायचं.

    माझ्या प्रत्येक गोष्टीची रितूला फार काळजी वाटायची.डबा वगैरे तिने बनवून दिलाच होता, पण सतत माझं तिच्यापासून दूर असणे हे तिला कधीच आवडत नव्हते.आणि हे सगळं खरंच होतं. जेव्हापासून मी तिला भेटलो होतो, सतत मी कोणत्या ना कोणत्या कामातच असायचो. प्रवासात एखाद्या स्टेशनची भेट व्हावी, अशीच भेट व्हायची आमची.तिचं नको म्हणत असताना सुद्धा माझं जाणं तिला फारच अवघडत होतं.त्यामुळे मी आल्यावरही ती कितीतरी दिवस माझ्याशी बोलली नव्हती. पण तिला खूष करण्याच्या सगळ्या ट्रिक्स मला माहीत होत्या.

   लवकरच नव्या वर्षाची एक नवीन सुरुवात होणार होती. आणि मी तिला विचारावं तर ती फक्त एकच शब्द बोलायची. तुला तर माझी काहीच चिंता नाही, जा तू फक्त आपलं जंगल फिरत बस.

   तिला सरप्राईज देण्यासाठी मी मग एक प्लॅन केला. पण ती माझ्या पेक्षाही समोरची ठरली होती.मी मित्रांच्या खोट्या बहाण्याने तिला घराच्या बाहेर काढलं. अगदी किडनॅप केल्यासारखं.  सुरुवातीला ती मला खूप शिव्याशाप देत राहिली पण नंतर मला बघताच चूप झाली. 

    गाडी बीचवर थांबताच दूर किनार्‍यावर जाऊन बसली.  माझ्याकडे न बघता दुसरीकडे तोंड फिरवून अगदी शून्यात असल्यासारखे बसली.च्यायला मुलीचा पण राग ना खरंच भारी असतं. मनात असं म्हणून मी तिचा हात धरला, तर तिने तो हात झिडकारून लावला.मी परत एकदा हात पकडला आणि प्लीज म्हटलं, तिने रागाने थोडी नजर माझ्यावर टाकली आणि हात तसाच हातात ठेवत परत दुसरीकडे नजर वळवून बसली. मी खिशातून एक डबी काढली.ज्यात मी तिच्यासाठी एक आवडीने रिंग घेतली होती. हलकेच तिच्या हाताच्या बोटात टाकली आणि म्हटलं, आता झालीस बघ माझी हक्काची बायको,गाजवा आता तुमचे हक्क,आज वर्षाचा पहिला दिवस आपल्या लग्नाला या अथांग सागराला साक्षी मानून मी तुला माझी पत्नी मानतो... अगं आता तरी बोल.

काय बोलू... खूप ऐकतो न माझं जणू, थांबलेलाच असतो माझ्यासाठी..

हे काय आहे ना तुझ्यासाठी थांबून...

आता आहेस, पण मग गाजवतोस तू तुझे पुरुषार्थ...

ओके... आय एम सॉरी...आता ऐकणार बाबा तुझं... पण एकदा जरा गोड हस ना...

 तू कधीच सुधारणार नाही. असं म्हणून तिने तिच्या कडली एक अंगठी माझ्या हाताच्या बोटात अडकवली आणि म्हणाली... शो माय डियर हसबंड... सागराच्या साक्षीने येथे लग्न लावलाय, पण घरी काय सांगणार आहेस?

अग घरच्यांना काय करतेस? ऑल रेडी तुझ्या वडिलांना सासरेबुवा मानलंच आहे. नाही म्हणाला तर पळवून नेईन ह तुला...

इतक्यात असले निर्णय नको देऊ, घरी सगळ्यांना माहीतच आहे. तू सातपुड्याला गेला असताना आई-वडिलांशी बोलले तुझे बाबा.

अच्छा.... हे तर सोन्याहून पिवळे झालं...

पण एक वचन हवंय तुझ्याकडून... देशील ना...

अगं एक काय? दहा माग... आज जीव जरी मागितला तरी देईन....

प्लीज असं नको बोलू ...पण जेव्हा कधी तू मला सोडून जाशील ना,तेव्हा या अंगठी कडे बघून माझी आठवण करत जा. त्यामुळे मी अंगठी तुला देणं केली आहे.

ओके माय वाईफ... जर तुझ्या अटी पूर्ण झाल्या असतील. तर मला प्लीज तुझ्या ओठांचा स्पर्श देशील काय?

ओके माय हसबंड... शुअर..

चेहऱ्यावर एक हसू उमललं. प्रेमाचे प्रसंग किती मजेशीर असतात.माणसाच वय निघून जातं पण प्रेम जसेच्या तसेच असते. ती विचारात बुडलेली असताना एक विचित्र असा आवाज तिला ऐकू आला. आणि ती घाबरून इकडे तिकडे बघु लागली.दरवाजा आत मधून लावलेला होता. फक्त बाजूला नर्सचं येणं-जाणं चालू होतं. नाहीतर एव्हाना पूर्ण स्टॉप शांततेत विलीन झाला होता. फक्त पंख्याचा तेवढा आवाज गुरगुर करीत होतं.

 पण तो विचित्र आवाज दोन-तीनदा तिच्या कानात घुमत होता.एकवार नजर तिने पवन कडे नेली, आणि तिला धक्काच बसला. त्याच्या अंगावरचे कपडे रक्ताने माखले होते. चाबकाच्या फटक्याने त्याचे कपडे फाटत चालले होते.माझा श्वास जोराजोराने चालत होता रीतू हादरली होती कारण ही परिस्थिती तिच्यासाठी काही नवीन नव्हती. याआधी  मीच तिला कथन केली होती.

 पवन..... पवन..... ती आकांततांडव करू लागली होती. धावत जाऊन तिने नर्सला बोलावून आणले.जवळपास झोपून असलेले वार्ड बाय वगैरे सगळे तिथे जमा झाले. माझा शर्ट रक्ताने लाल लाल झाला होता.वॉर्डबॉयने जेव्हा माझा शर्ट काढला तेव्हा माझ्या पाठीवर चाबकाचे फटके अगदी ताजेतवाने वाटत होते.आणि माझा श्वासोच्छवास परत एकदा फुलू लागला होता. रितू स्वतःवरच कोसळत होती, कारण तिला कळायला आलं होतं की मृत्यु आता मला न्यायला आला होता. आणि चाबकाचे फटके देऊन त्याने त्याची सुरुवात पण केली होती.


क्रमशः

रेट करा आणि टिप्पणी द्या

Umesh Satpute

Umesh Satpute 1 वर्ष पूर्वी

juhi

juhi 1 वर्ष पूर्वी

महेश

महेश 1 वर्ष पूर्वी

Pankaj Shankrrao Makode

Pankaj Shankrrao Makode 1 वर्ष पूर्वी