Samarpan - 8 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - ८

समर्पण-८

ना तुम मेरे बन सकते हो,
ना मुझे किसिका बनने देते हो।
किस कश्मकश्म में जी रही हूं मैं,
ना तो डुबने देते हो ना उभरणे देते हो।


खूप विचित्र परिस्थिती मध्ये अडकली होती मी. बुद्धीला हे पटत होत की अभय च वागणं त्याच्या जागेवर बरोबर आहे पण मनाला मात्र विक्रम ची ओढ होती. जेव्हा जेंव्हा बुद्धी आणि मनात द्वंद होतं तेंव्हा आपण मात्र मनाचच ऐकतो. माझं ही तसच होतं. मनाला खूप समजावून सांगितलं की विक्रम फक्त मित्र आहे आणि अभय माझं सर्वस्व आहे. पण जेवढं विक्रम ला स्वतःपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला विक्रम तेवढ्याच जवळ येत होता माझ्या.

दोन दिवस झाले होते अभय माझ्याशी एक शब्द ही बोलला नव्हता. एवढंच काय तर दोन दिवस तो घरी जेवला सुद्धा नाही. मी स्वतःहून खूप बोलण्याचा प्रयत्न केला पण तो मला टाळायचा. विक्रम ला माझ्या बोलण्यातून कळलं होतं की मी काहीतरी टेन्शन मध्ये आहे पण त्याने ही विचारलं नाही आणि मी पण सांगितलं नाही. पण मला विक्रम ची खूप आठवण येत होती त्यामुळे मी फोन केलाच त्याला,

"बोल सोनू काय प्रॉब्लेम आहे?"

"कुठे काय, काहीच तर नाही"

"हे बघ तुला पण माहीत आहे मी तुला किती ओळखतो, त्यामुळे गुपचूप सांग काय झालंय?"

तो अस बोलल्यावर मला रडू आवरलं नाही, मी एक आवंढा गिळला, अन स्वतःला आवरत त्याला बोलणार होती पण माझ मलाच काही कळत नव्हतं काय सांगू त्यामुळे मी काहीच बोलू शकली नाही, त्यामुळे विक्रम पुन्हा बोलला,

"ए रडुबाई, बोल पटकन काय झालं, रडकी...किती रडतेस ग?"

"तुला माहीत आहे ना माझ्या डोळ्यांत समुद्र आहे"

"समुद्राला असच उधाण नाही येत सोनू, बोल ना काय झालं?....भांडलीस का अभय सोबत?"

मला हेच खूप आश्चर्य वाटायचं की अशी काय तार जुळली आहे आमची की विक्रम ला मी काही न बोलता सगळं कळतं आणि अभय सोबत मी इतके दिवस राहते आहे तो अजून कसा नाही ओळखू शकला मला. आणि अस झाल्यावर मी कळत नकळत अभय आणि विक्रम ची तुलना करायला लागायची. कोणत्याही दोन लोकांची तुलना करणं हे नक्कीच चुकीचं आहे पण त्यावेळेला माझं मन माझ्या बुद्धी वर हावी झालं होतं. आणि हेच कारण होत ज्यामुळे मी अभय पासून दूर जात होती.

मी विक्रम ला सगळं सांगितलं माझ्या आणि अभय मध्ये काय घडलं ते. खरं तर माझं अन अभयचा तो वैयक्तिक प्रश्न होता, पण इतक्या दिवसांत मी आणि विक्रम एकमेकांना एवढं ओळखायला लागलो होतो की एकमेकांच्या आवाजावरून आम्हाला कळून जायचं की आम्ही कोणत्या परिस्थिती मध्ये आहोत. त्यामुळे आम्ही कधीच काही लपवून ठेवल नाही. विक्रम ला ही माझं वागणं चुकीचं वाटलं. तो बोलला,

"हे चुकीच केलस तू सोनू, एवढे दिवस तुझ्या तक्रारी होत्या की अभय ला तुझी काही पडली नाही, आणि आता तो प्रयत्न करतो आहे तर तू अस चुकीच वागून त्याला अजून दूर नको करू"

"तू पण मलाच बोल, मला कळतंय सगळं विक्रम...पण नाही जमलं मला, मग त्याने पण एवढं वाढवायला नको होती ना गोष्ट"

"त्याने नाही तू वाढवलीस गोष्ट सोनू, काय गरज होती तुला चिडायची, तुला जमत नव्हतं तर तू प्रेमाणेही समजवू शकली असती ना त्याला, छोट्या गोष्टीला मोठं केलस तू"

"छोटी गोष्ट?? तुझ्या नजरेत ती छोटी गोष्ट आहे विक्रम? तुला नाही कळणार जाऊदे....😔😔"

"नको ना चिडू जाडे....एकदा हसून दाखव"

"मी जाडी नाही, अन आता यानंतर मला जाडी बोलला ना तर मी कधीच बोलणार नाही तुला😠😡"

"अग नको इतकं रागवू, अजून फुगशील😂😂😂"

आणि आता मला ही हसायला येत होतं, पण मी काहीच बोलत नव्हती....

"बघ कोणाला तरी खूप हसायला येत आहे, पण नागपूर चे लोकं इतके कंजूस की मन भरून हसत पण नाही"

"😁😁तू कॅमेरे लावलेत का विक्रम?"

"असच समज....., तू कितीही लांब असलीस ना माझ्यापासून तरी मला तुझ्या मनातली चलबिचल, तुझ्या चेहऱ्यावरचे भाव सगळंच कळत मला....."

किती खोटा बोलायचा ना तो?? खरंच जर त्याला कळलं असत तर असा सोडून गेला नसता मला....आता त्याला कळत नसतील का माझे भाव, माझी चलबिचल....कितीही विचार केला तरी विक्रम परत मला भेटणार नव्हता. विक्रम माझ्यासाठी काय होता हे त्याला पण माहीत होतं त्यामुळे तो मला नेहमी अभय ची सकारात्मक बाजू दाखवून द्यायचा. मला बोलायचा,

"मी शरीराने जरी तुझ्या सोबत नसलो ना सोनू, तरी तू एक क्षण ही माझ्या पासून लांब नाही, पण सत्य हे आहे की अभय सर्वकाही आहे तुझ्यासाठी... मित्र म्हणून माझ्या काही मर्यादा आहेत, मनातून मला तुझ्यासाठी काही जरी करावं वाटलं तरी, तेवढा अधिकार नक्कीच एका मित्राला नाही, त्यामुळे अभय ला दुर्लक्षीत नको करू"

विक्रम मला जेंव्हा अस समजवायचा ना, त्याची प्रत्येक गोष्ट ऐकत राहावी वाटायची. त्याच सगळं बोलणं खरं वाटायचं. जेंव्हा तो मला गाणे ऐकवायचा माझं मन आतून आनंदी व्हायचं. ज्या दिवशी विक्रम शी बोलणं व्हायचं नाही मला करमायच नाही. त्याचा आवाज ऐकूनच बर वाटायचं. एक मित्र म्हणून विक्रम ने माझे अन अभय चे प्रॉब्लेम खूप संयमाने ऐकून घेतले. त्याने अभय बदल मला कधीच चुकीचं मार्गदर्शन केलं नाही. यावेळेस पण त्याच्या बोलण्यामुळेच मी अभय ची माफी मागायची ठरवली. त्या दिवशी अभय उशिरा आला घरी, मी जेवली पण नव्हती त्याची वाट बघून. त्याने आल्यावर माझ्याकडे बघितलं पण नाही आणि सरळ रूममध्ये निघून गेला,

"अभय मला बोलायचं आहे "

"मी थकलो आहे, प्लिज झोपू दे मला, तुझं काहीच ऐकून घ्यायची इच्छा नाही माझी"

"अभय प्लिज माफ कर ना रे मला, त्यादिवशी मी चिडली कारण मलाच कळत नव्हतं की कस रिऍक्ट करू, माफ कर न प्लिज, "

"तू नको माफी मागू नैना, मीच मागतो, खर तर मला खुप पश्चात्ताप होत होता की मी इतके दिवस चुकीचं वागलो तुझ्या सोबत, त्यामुळे मी प्रयत्न करत होतो, तुला आनंद द्यायचा पण त्यादिवशी मला खुप वाईट वाटलं की तुला माझा स्पर्श ही नको आहे, मी नाही येणार तुझ्या जवळ नैना"

"अभय प्लिज नको असं वागू ना, माझी चूक झाली रे...."

अन मला बोलता बोलता माझे अश्रू आवरणं कठीण झालं होतं. अभय ला पण कदाचित वाईट वाटलं, त्याने मला जवळ बसवलं, शांत केल अन बोलला,

"हे बघ नैना, जस तुझ्यासाठी कठिण आहे तस माझ्यासाठी पण काही सोप्प नाही हे सगळं, त्यात आपलं लग्न एवढ्या घाई घाईत झालं, माझे काही प्रोब्लेम्स होते नैना तेंव्हा, त्यामुळे मला अजिबात इच्छा नव्हती हे लग्न करण्याची. आणि खर तर तुझा काही दोषच नाही या सगळ्यामध्ये, पण आता मला खरच या गोष्टीची जाणीव होत आहे की मी चुकीचा वागलो, त्यामुळे मला माफ कर"

"मला तुझ्यावर चिडायला नको होतं रे, पण मला नाही कळलं काही तेंव्हा"

"हे बघ जाऊदे ते सगळं, मी काय म्हणतो आपण कुठे फिरायला जायचं का? कमीत कमी एकमेकांना समजून घेऊ, काय वाटत तुला"

"जशी तुझी ईच्छा, मला काही अडचन नाही"

अभय ने ठरवलं की दोन तीन दिवस महाबळेश्वर ला जाऊन यायचं. माझी ईच्छा नव्हती पण यावेळी मला अभय ला दुखवायच नव्हतं त्यामुळे मी काही बोलली नाही.
-------------------------------------------------------------------

मी विक्रम ला जेंव्हा ही गोष्ट सांगितली त्याने आनंद व्यक्त केला पण त्याच्या बोलण्यात नाराजी वाटत होती, मी त्याला विचारलं तर बोलतो,

"मला तुझ्या अन अभय साठी नक्कीच आनंद होतोय ग पण मन खूप अस्वस्थ होत आहे, कदाचित तुझ्या त्रासाची सवय झाली ना मला त्यामुळे....😂😂😂"

"मी खरंच तुला त्रास देते का रे,😢😢"

"मग नाही तर काय, विक्रम कुठे चालला, कधी येणार, कधी फ्री होणार, कधी जेवणार....किती प्रश्न असतात तुझे, बायको असल्यासारखी हक्क गाजवत असते, आता तू चार दिवस जाशील तर मला शांती मिळेल थोडी"

"ओहह शांती पाहिजे ना तुला, आता कायमचीच शांती देते, नाही त्रास देणार यापुढे...मला नव्हतं माहीत विक्रम तू मला एवढं कंटाळला आहेस ते, मला वाटलं तू पण मला तुझी चांगली मैत्रीण मानतो, बर झालं माझा गैरसमज दूर केलास तू....बाय...."

मला खूप दुःख झालं होत विक्रम च्या अश्या बोलण्याने, खूप रडायला येत होतं, मी फोन ठेवणारच तेवड्यात,

"अग सोनू सॉरी सॉरी, मी गम्मत करत होतो तुझी, का लगेच मनाला लावून घेते तू...."

"मी मनाला लावून घेते कारण मी मनापासून तुला माझं मानलं आहे विक्रम, पण तू मला तुझी कटकट मानतोस त्यामुळे ही मैत्री संपवते मी"

"प्लिज सोनू अस नको बोलू, तुला माहीत आहे ना मी असाच आहे, मी खरंच गम्मत करत होतो ग, अन हे मैत्री संपवते म्हणजे काय...मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय.......सॉरी ना सोनू....."

"कदाचित गम्मत म्हणून तू खरं बोलून गेलास, मी खूप त्रास दिला तूला आता नाही देणार, मी नाही विसरू शकणार तुला, पण तू विसरून जा मला"

"मला नव्हतं माहीत ग माझा एक मजाक तुला एवढा त्रास देऊन जाईल.......एक काम कर उद्या भेटू आपण मग काय शिक्षा द्यायची मला दे तू, पण तू माझ्यामुळे अशी दुःखी झाली हे नाही सहन करू शकत मी"

"मला नाही भेटायचं तुला, नको खोटी काळजी करू माझी"

"हे बघ सोनू उद्या आपण भेटणार आहोत अन हे फायनल आहे, उद्या सुट्टी घे, मी स्टेशन ला वाट पाहीन तुझी"

"मी नाही येणार..."

"पण मी सकाळी स्टेशन ला वाट पाहीन, मी तुला दुखावलं याची शिक्षा तर मिळायलाच पाहिजे मला"

"मी काही सुट्टी नाही घेणार विक्रम...अन मी भेटणारही नाही"

"मी स्टेशन ला वाट पाहीन अन तू पण नक्की येशील हे माहीत आहे मला......"

खर तर मला पण विक्रम ला भेटायचं होत,पण आज त्याने केलेली गम्मत ही का सहन झाली नाही मला. मी का एवढा अधिकार गाजवायला पाहिजे त्याच्यावर, आणि तो पण का माझे सगळे रुसवे फुगवे दूर करतो, मी आता खरच चिडणार होती त्याच्यावर , त्याला भेटणार होती की नाही हे सगळं दुसऱ्या दिवसाची पाहाटच संगणार होती...........

-----------------------------------------------------------------

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED