भाग दुसरा
बाबांचे अकाली जाणे मोहनला खूप जड गेले. त्याच्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखे झाले. त्याची आई तर वेडी झाल्यासारखे वागू लागली. या दोघांना सांभाळण्यासाठी मोहनचा मामा हा एकटाच आधार म्हणून उभा होता. दोन दिवसांनी मोहनचा इंग्रजीचा पेपर होता. वडिलांच्या मृत्यूनंतरची सर्व क्रिया सोपस्कार पूर्ण केल्यानंतर तो परीक्षेचा विचार करू लागला. अपघातात त्याच्या सायकलचा चक्काचूर झाला होता. त्याला दुरुस्त करणे शक्य नव्हते. आईला एकटीला गावात सोडून परत शहरातल्या खोलीवर जाऊन राहणे मोहनला अशक्य होते. परीक्षेचे पुढील पेपर कसे द्यावे ? द्यावे की देऊ नये ? या विचारात तो तसाच झोपी गेला. त्याला जेवण देखील गोड लागत नव्हते. सकाळ झाली. त्याचा मामा तेवढ्यात तेथे हजर झाला. वर्षभर केलेल्या अभ्यासावर पाणी कश्याला पेरतोस चल आपण दोघे जाऊ या मी सोडतो तुला परिक्षेला, असे म्हणून मामाने त्याच्या सायकलवर डबल सीट बसवून मोहनला घेऊन गेला. त्याचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला होता, पण मनःस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे तो उदास होऊन परीक्षा केंद्रावर गेला. त्याच्या वडिलांची बातमी शहरात पसरली होती, तशी परीक्षा केंद्रावर देखील पोहोचली होती. परीक्षा केंद्राचे संचालकांनी मोहनला परीक्षा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या खोलीत बोलावून घेतले. त्याला समजावून सांगितले, आणि परीक्षेचे सर्व पेपर देण्यास प्रोत्साहित केले. न्यूजपेपरवाल्यांना देखील ही बातमी कळाली तसे ते ही परीक्षा केंद्रावर धाव घेतली. मोहनचा एक फोटो घेतले आणि वडिलांच्या मृत्यूचा दुःख बाजूला ठेवून मोहनने दिली दहावीची परीक्षा अशी बातमी लावली. या सर्वांचा प्रेरणेने मोहनच्या मनाची तयारी झाली. तो चांगल्या प्रकारे सर्व विषयाचे पेपर्स दिला. घरात आई एकटीच राहत असल्याने तो शहरात खोलीवर राहण्याऐवजी घरूनच मामासोबत ये जा करत सर्व पेपर्स दिले. शेवटच्या दिवशी पेपर संपल्यावर त्याने ती खोली सोडली आणि सर्व सामान घेऊन गावाकडे परत गेला. त्यासोबत पेपर टाकण्याचे काम देखील सोडून दिला. आई अजून ही दुःखातून सावरली नव्हती म्हणून मामाने दोघांना आपल्या घरी घेऊन जाण्याचे ठरविले. जरासे हवापालट होईल आणि मन हलके होईल म्हणून मोहन आणि त्याची आई गावी जाण्यास तयार झाले. मामाच्या गावात देखील मोहन स्वस्थ बसला नाही. रोजच्या रोज कुठे ना कुठे काम करत चार पैसे मिळवित राहिला. बाबांच्या सायकलला धडक दिलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता. मामाने काही तरी सेटलमेटल करून त्याच्याकडून पैसे घेण्याचे कबुल केले होते. तो शहरातील एक व्यापारी होता आणि तो पैसे द्यायला कबूल देखील झाला. एके दिवशी पैसे देण्यासाठी तो मामाच्या घरी आला. मोहन, त्याची आई, मामा आणि मामी सारेजण अंगणात बसले होते. करारानुसार त्याने पैसे देऊ केले मात्र मोहनने ते पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला. या पैश्याने माझी मनःस्थिती अजून बिघडून जाईल. तुमच्या पैश्याने माझा बा काही परत येणार नाही आणि माझे बाबा नेहमी कष्टाचा पैसा स्वीकारावे असे मला सांगत आलेत म्हणून मी हे पैसे घेणार नाही. असे बोलतांना आई त्याला एकटक पाहतच होती. आईला मोहनचा अभिमान वाटला. ती मोहनला जवळ घेऊन दोन्ही हाताचे बोटे गालावर फिरवून कडकड मोडली. तो व्यापारी देखील खजील होऊन परत फिरला पण जाताना मोहनचा स्वाभिमान पाहून थक्क झाला. इकडे मामी मात्र घरात मोहनच्या नावाने बोटे मोडत होती. घरात आलेल्या लक्ष्मीला असे धुडकावणे काही चांगले नाही. घरात एक पैसा नाही आणि कष्टाचे कमाई केलेले पैसेच घेणार. अशी ती मनातल्या मनात बोलत होती. व्यापारी येऊन गेल्यापासून मामीच्या वर्तनात देखील बदल दिसू लागला. तो व्यापारी पैसे घेऊन येणार आणि आपणाला देखील काही तरी मिळेल या आशेवर ती आजपर्यंत सेवा करत होती. पण एक ही रूपाया मिळाला नाही हे पाहून ती देखील धुसफूस करू लागली.हे मोहनच्या आईच्या लक्षात आले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या घरी जाण्याची तयारी केली. मोहन आणि आई आपल्या घरी आले. मामाच्या घरात मोहनचे वागणे आणि बोलणे पाहून आईचा उर भरून आला होता. ती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. पूर्वीप्रमाणे ती शेताला जात होती आणि मोहन सुद्धा तिच्यासोबत शेताला जात असे. माय लेकरू मिळून शेतात काम करू लागले. निकालाचा दिवस उजाडला. मोहन निकाल बघण्यासाठी शहरात गेला. पास होतोच की नाही याची मोहनला खात्री नव्हती. कारण ऐन परीक्षेच्या दिवसांत त्याच्या बाबांचा अपघात झाला होता आणि बाबा त्याला सोडून गेले होते. शाळेत जाऊन निकाल पाहिला तर त्याचे त्याच्यावर विश्वास बसत नव्हते. त्याला ऐंशी टक्के मार्क पडले होते आणि तो शाळेतून तिसरा होता. सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. पेपरवाल्यां नी देखील त्याची तोंडभरून स्तुती केली. ही बातमी कधी एकदा आईला सांगतो असे त्याला झाले होते. घराकडे जाताना त्याने थोडेसे पेढे विकत घेतले आणि घराकडे गेला. घरी त्याची आई वाटच पाहत होती. पळतच तो आईला मिठी मारली आणि पास झालो असे सांगितले. बाबांच्या फोटोपुढे एक पेढा ठेवला आणि मनातल्या मनात म्हणाला, बाबा निकाल बघायला तुम्ही हवं होतात, बघा ऐंशी टक्के मार्क पडलेत आणि शाळेतून तिसरा आलोय. आई बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यातून देखील पाणी वाहू लागले. पदरने तिने आपले डोळे पुसले. मोहनने आईच्या हातात पेढा दिला आणि नमस्कार केला. आईने मोहनचे तोंड गोड केले. बाबांच्या मृत्यूनंतर आज एक सुखाचा क्षण त्यांच्या जीवनात आला होता. रात्री जेवताना आई मोहनला म्हणाली, बाळ, पुढे काय शिकायचं ठरवलं ? यावर मोहन चिंताग्रस्त झाला. तसे तर त्याचा गणित हा विषय खूपच आवडीचा होता. गणित विषय घ्यावं तर सायन्स निवडावे लागते आणि सायन्स करणे खूप अवघड आहे याची जाणीव त्याला होती. त्याच्या डोळ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले होते. शहरात खोली घेऊन राहावे का ? आईला गावात एकटीला ठेवावे का ? सायन्सला जावे की आर्ट्स घ्यावे की आय टी आय करावे ? याच विचारांच्या तंद्रीत तो झोपी गेला.
नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769