Lakshmi - 6 books and stories free download online pdf in Marathi

लक्ष्मी - 6

भाग - सहावा
लक्ष्मीचे शिक्षण

पहिली बेटी तूप रोटी असे पूर्वीचे लोकं म्हणत असत. लक्ष्मीचे चालणे, बोलणे आणि तिची प्रत्येक हालचाल सर्वांना आनंद देऊन जात होती. लक्ष्मी मोठी होऊ लागली तसे तिचे बुद्धीचातुर्य लक्षात येऊ लागले होते. आपल्या बापाप्रमाणे ती खूपच बुद्धिमान होती. कोणतीही गोष्ट एकदा सांगितली की ती लक्षात ठेवायची. योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरू लागली. मोहनवर जसे त्याच्या वडिलांचे संस्कार होते तसे लक्ष्मीवर तिच्या बाबाचे म्हणजे मोहनचे संस्कार होते. दिवसभर ती मायजवळ राहायची. माईने तिला अनेक गाणी , गोष्टी सांगायची. लक्ष्मीची आई कामात राहायची त्यामुळे ती जास्त तिच्याकडे जात नव्हती. सायंकाळी मोहन घरी आला की, लक्ष्मी त्याच्याकडे जायची. दिवसभराच्या गोष्टी ती मोहनला सांगायची. माईने सांगितलेल्या गोष्टी आणि गाणी म्हणून दाखवायची. रात्रीला मग आईच्या कुशीत झोपी जायची. लक्ष्मी अशी हळूहळू संस्काराच्या वातावरणात वाढू लागली होती. लक्ष्मीचे वय सहा वर्षे झाली होती. आता तिला शाळेत पाठविणे आवश्यक होते. मोहन समोर अनेक पर्याय होते कारण ग्रामीण भागात एकच जिल्हा परिषदेची सरकारी शाळा असते त्यामुळे तेथे विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र इथे शहरात अनेक शाळा असतात, सरकारी शाळेसोबत काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर काही सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उपलब्ध असतात. लक्ष्मीला कोणत्या शाळेत प्रवेश करावा ? हा प्रश्न त्याला गेल्या दोन दिवसापासून सतावीत होता. राधा म्हणत होती लक्ष्मीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकू तर मोहनला मराठी शाळा खुणावत होती. त्याच्या कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एक प्रसिद्ध वक्त्याने भाषण दिलं होतं आणि ते भाषण मोहनच्या मनात भिनले होते. ते वक्ते म्हणाले होते, ' आपल्या मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण द्या. त्यामागे खूप मोठं शास्त्रीय कारण आहे. मातृभाषा म्हणजे आईची भाषा. आईची भाषा मुलांना खूप लवकर समजते. शाळेत जाण्यापूर्वी त्याच्याजवळ मातृभाषेतील अनेक शब्दांचा संग्रह असतो, त्यामुळे शिक्षक काय बोलत आहे ? हे त्याला चटकन समजते. मातृभाषेतून शिक्षण घेताना घोकंपट्टी करण्याची गरज नसते. मुख्य म्हणजे मुलांना अभ्यासक्रम कळू शकते. पुस्तकाची भाषा आणि घरातली भाषा एकच असल्याने त्याला विषय समजून घेण्यात काही अडचण येत नाही. एकदा विषय समजला म्हणजे त्याचा पाया पक्का होतो. मग त्यावर चांगली इमारत उभी राहू शकते. म्हणून मित्रांनो, आपल्या मुलांचा खरा विकास साधायचा असेल तर त्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्या. ' त्या वक्त्याचे बोलणे मोहनला पटले होते. त्यामुळे लक्ष्मीला मराठी शाळेत टाकण्याचे त्याने जवळपास निश्चित केले होते. इतर मराठी शाळेपेक्षा जिल्हा परिषदची मराठी शाळा त्याला आवडली कारण घरापासून जवळ होती आणि तेथे शिकविणारे एक शिक्षक त्याचे मित्रच होते. मुलांना शाळेच्या बसने किंवा ऑटोमध्ये कोंबून पाठविणे त्याला आवडत नव्हते. म्हणून मोहनने लक्ष्मीचे नाव घराजवळच्या जिल्हा परिषद शाळेत टाकले. ती रोज सकाळी नटूनथटून शाळेला जाऊ लागली. शाळा पाचवीपर्यंत होती पण खूपच सुंदर होती. शाळेत अनेक झाडे होती. खूप मोठं मैदान होतं. जे शिक्षक होते ते खूपच प्रेमळ आणि मुलांचे लाड करणारे होते. लक्ष्मीने सर्वांचे मन जिंकले होते. शाळेची सुरुवात परिपाठाने व्हायची व शेवट पसायदान म्हणून. लक्ष्मीला शाळा खूपच आवडली. एकाच महिन्यात तिने शाळेतील राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान, प्रार्थना, पसायदान तोंडपाठ करून टाकले. घरी आल्यावर ती आपल्या माईला सर्व म्हणून दाखवत असे. मोहनच्या मित्राने खरोखरच ती शाळा गेल्या चार वर्षांपासून नावारूपाला आणली होती. पूर्वी नुसता ती शाळा एक कोंडवाडा वाटत होती. पण भोसले सरांनी त्या शाळेचा कायापालट केला म्हणून तर 25-30 पटसंख्या असलेल्या त्या शाळेने आज शंभरी पार केली होती. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळावा म्हणून भोसले सरांनी वर्षभर अनेक उपक्रम राबविले त्यामुळे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न तयार होऊ लागले.
राधाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. लक्ष्मीला एक भाऊ मिळाला. त्याचे नाव ठेवले राजू. त्यावेळी लक्ष्मी पाचव्या वर्गात शिकत होती. दरवर्षी तिने चांगला अभ्यास करून वर्गात प्रथम येत होती. लक्ष्मी ही त्या शाळेची सर्वस्व होती. ती सर्वांना कामात मदत करायची, भोसले सरांची तर ती आवडती विद्यार्थिनी होती. शाळेतील संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर या सर्व बाबी तिला चालविता येत असत. शाळेतल्या छोट्या वर्गातील मुलांना ती अधूनमधून सांभाळायची. तिला जर कोणी विचारलं की तू पुढे चालून काय होणार ? तर ती अभिमानाने सांगायची " मी भोसले सरांप्रमाणे शिक्षिका होईन आणि सर्व लेकरांना शिकवेन". तिचे बोलणे ऐकून भोसले सर आणि तिथल्या सर्वांना तिचा अभिमान वाटे. भोसले सरांनी लक्ष्मीला शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेला बसविले. तिच्याकडून कसून सराव करून घेतला. मोहनचे देखील अधूनमधून तिच्या अभ्यासाकडे लक्ष असल्याचे. तिला काय हवं-नको ते भोसले सरांना विचारत असे. यावर्षी लक्ष्मीच्या रुपात शाळेला एक चांगली संधी मिळाली काही तरी करून दाखविण्याची म्हणून भोसले सर आणि त्यांचे सहकारी बरीच मेहनत घेत होते. परीक्षेचा दिवस उजाडला. पहिल्यांदा नवोदयची परीक्षा झाली आणि दहा दिवसांनी शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाली. लक्ष्मीने दोन्ही पेपर उत्तमरीत्या सोडविले होते. तिला आता निकालाची प्रतीक्षा होती. मध्यंतरच्या सुट्टीच्या काळात ती तिचा लहान भाऊ राजू आणि आईसोबत मामाच्या गावी गेली. इथे मोहन आणि त्याची आई दोघेच होते.
त्यादिवशी सायंकाळी मोहन दुकान बंद करून घरी आला होता. रात्रीचे जेवण करून मोहन निवांत बसला होता. त्याचवेळी मालकांच्या घरातून रडण्याचा मोठा आवाज ऐकू आला म्हणून मोहन लगेच बंगल्याकडे पळाला. जाऊन पाहतो तर काय मालकाला एक झटका आला होता. मोहनने लगेच गाडी बोलावली. गाडीत टाकून मालकाला दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी मालकाला तपासलं आणि सॉरी एवढंच म्हटलं. मालकीणबाई धाय मोकलून रडू लागली. मोहनला थोडा वेळ पायाखालून जमीन सरकल्यासारखं वाटलं. पण वेळीच तो सावरला. आलेल्या गाडीतच मालकांना घेऊन तो बंगल्याकडे निघाला. हा हा म्हणता ही बातमी संपूर्ण शहरात पसरली. त्यांच्या नातेवाईकांना ही निरोप देण्यात आले. मालकाच्या जवळचे तर कोणी नव्हते. शेवटी मोहनलाच त्यांचा मुलगा बनून सारे क्रियाक्रम पार करावे लागले. मालकाने कधीही मोहनला दूर केले नव्हते, आपल्या मुलांप्रमाणे त्याच्याशी वर्तन ठेवले. आज संपूर्ण शहर मोहन आणि त्याच्या मालकविषयी बोलत होते. प्रत्येकजण मोहनची स्तुती करतांना कंटाळत नव्हते. मालकाच्या मृत्यूने मोहनला खूप मोठा धक्का बसला होता. पूर्वीप्रमाणे दुकान देखील चालत नव्हते. कारण मोहनला कधी खोटे बोलणे जमतच नव्हते. तो प्रामाणिक आणि इमानदार होता. त्याला कोणाला फसवून धंदा करणे जमत नव्हते. त्यामुळे दिवसेंदिवस धंदा मंद होत चालला होता. त्यातच कुठल्या तरी एका बँकेने दुकानावर जप्तीची नोटीस लावली. मालकाने या बँकेतून पन्नास लाख कर्ज घेतले असून त्याची भरपाई तीन दिवसात केली नाही तर दुकान घर सारे लिलाव करण्यात येईल असे त्या नोटीसमध्ये लिहिले होते. मोहन या नोटीसमुळे चक्रावून गेला. मालकाने याविषयी कधी काहीच बोलले नाही, मालकीणबाईला देखील हे विषय माहीत नव्हते. पण मोहनला कळले की, मालकाला एका व्यापारात नुकसान झाले, हे पैसे कसे भरू आता याच तणावात त्यांना झटका आला होता. दुकान आणि बंगला विकून मोहनने त्या बँकेचे पन्नास लाख रुपये भरून टाकले. ज्या घरात मोहन राहत होता त्या घरात आता मालकीणबाई येऊन राहू लागले. मोहन तेथून दुसरीकडे किरायाने घर घेऊन राहू लागला. मालक जाण्याने एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. सारेच रस्त्यावर आले. ज्या लोकांनी पूर्वी मोहनची स्तुती केली होती तेच आता मोहनला नावं ठेवू लागली. मोहननेच काही तरी घोळ केला असणार ? अशी चर्चा मोहनच्या कानावर आली की तो अस्वस्थ व्हायचा. हे असे ऐकण्यापेक्षा मी मेलो असतो तर फार बरं झालं असतं ! असं तो मनाशी म्हणत होता.
क्रमश:

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED