लक्ष्मी - 7 Na Sa Yeotikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लक्ष्मी - 7

लक्ष्मीची दहावी

मालक वारल्याची बातमी तशी राधाला ही कळाली होती. तिने लक्ष्मी व राजुला घेऊन लगेच आपल्या घरी आली. तिलाही खूप मोठा धक्का बसला होता. त्याच शहरात एक किरायाची खोली घेऊन ते पाचजण राहू लागले. घरात जागा कमी आणि माणसं जास्त झाली होती. मोहनला आता यापुढे कोणते काम करावे हेच सुचत नव्हते. दुकानात काम करतांना त्याचा दिवस कसा जात होता ? हेच कळत नव्हतं तर आज दिवस कसा घालवावा ? हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. लक्ष्मी यावर्षी सहाव्या वर्गात जाणार होती, तिची पूर्वीची शाळा पाचव्या वर्गापर्यंतच होती. तिचे नाव कोणत्या शाळेत टाकावं ? खाजगी शाळेत टाकावं तर भरपूर फीस भरावे लागणार, तेवढा पैसा त्याच्याजवळ उपलब्ध नव्हता. मालकाच्या मृत्यूपूर्वी त्याने शेताजवळची जमीन विक्रीस निघाली असता सर्व जमापुंजी एकत्र करून शेत खरेदी केला होता. त्यामुळे आता त्याच्याजवळ एकही रूपाया शिल्लक उरला नव्हता. येता-जाता त्याच्या कानावर मालकाच्या मृत्यूबाबतचे बोलणे ऐकू येत होते त्यामुळे तो अस्वस्थ होत होता आणि कधी एकदा शहर सोडतो असे त्याला झाले होते. पण शहर सोडून करावं काय ? कुठं जावं ? हे प्रश्न त्याच्या मनाला खात होते. शिवाय लक्ष्मीच्या शिक्षणाचा देखील प्रश्न होताच.
एके दिवशी सकाळी सकाळी भोसले सर मोहनच्या घरी आले व म्हणाले, " मोहन, अरे अभिनंदन तुझं" मोहन म्हणाला, " अरे, माझं अभिनंदन कसं काय ?" यावर भोसले सर आनंदात म्हणाले, " अरे, तुझी लक्ष्मी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आली आणि विद्यालयात तिची निवड झाली." हे ऐकून मोहनला देखील खूपच आनंद झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळाले. मोहनने भोसले सरांना बसायला सांगून राधाला चहा करण्यास सांगितला. ती बातमी ऐकून लक्ष्मीला खूप आनंद झाला. माईने तर तिच्या गालावरून हात फिरवत कडकड बोटं मोडली " माझी गुणाची लेकरू " अशी ती बोलली. भोसले सर आणि मोहन काही वेळ गप्पा मारत बसले होते. नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी काय काय लागते याची संपूर्ण माहिती भोसले सरांनी मोहनला दिली. काही दिवसांत आपण लक्ष्मीला घेऊन नवोदय विद्यालयात जाऊ असे सांगून भोसले सर निघून गेले. मोहनच्या चेहऱ्यावर आज आनंद झळकत होता. नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्याचे महत्व त्याला चांगलेच ठाऊक होते. त्याने देखील पाचव्या वर्गात शिकत असताना ही परीक्षा दिली होती, मात्र त्यात त्याला यश मिळाले नव्हते. लक्ष्मीच्या शिक्षणाची सोय झाली म्हणून तो चिंतामुक्त झाला होता. त्याचवेळी त्याच्या डोक्यात एक कल्पना सुचली आणि तो आईला म्हणाला, " आई, हे शहर आपण सोडून देऊ आणि परत गावाकडे राहायला जाऊ " यावर आईला थोडं आश्चर्य वाटलं, ती म्हणाली, " बाळा, गावाकडे जाऊन काय करणार आहेस ? तिथं कोणतं काम मिळणार तुला ? " यावर मोहन मोठ्या निर्धाराने म्हणाला, " गावाकडे आपण शेती करू या, लक्ष्मीसाठी शहरात राहण्याचा विचार करत होतो, पण आता लक्ष्मी जाणार नवोदय विद्यालयात, तेव्हा आपण इथं राहण्यापेक्षा गावी राहू या. म्हणजे घरखर्च ही वाचेल आणि शेतात काम करून जगता येईल." मोहनचे हे बोलणे ऐकून आईने होकार दिला. मोहनने एकवार राधाकडे पाहिलं, या निर्णयामुळे ती जरा उदास दिसत होती. मात्र लगेच तिने ही होकार दिला.
दहा-पंधरा दिवसांनी लक्ष्मीला घेऊन मोहन आणि भोसले सर नवोदय विद्यालयात पोहोचले. तेथील प्राचार्यांनी लक्ष्मीचे, तिच्या वडिलांचे आणि भोसले सरांचे मनःपूर्वक स्वागत केले. कारण लक्ष्मी ही जिल्ह्यातून पहिली आलेली विद्यार्थिनी होती. अर्थातच लक्ष्मीला घडविण्यात भोसले सरांचा सिंहाचा वाटा होता. लक्ष्मीला विद्यालयात सोडून जाताना मोहनच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते पण त्याने लक्ष्मीला काही एक न कळू देता, तेथून निघाला. लक्ष्मीला विद्यालयात सोडून आल्यानंतर मोहनने सामानाची बांधाबांध केली, एकवेळ मालकीणबाईला भेटून आला व परत गावी जात आहे, असे सांगून मोहन, त्याची आई, बायको राधा आणि मुलगा राजू हे चौघे शिरपूर गावात परत आले.
मोहन प्रामाणिक, कष्टाळू आणि इमानदार व्यक्ती आहे, हे गावकऱ्यांना माहीत होते त्यामुळे शहरातले ते बोलणे त्याला गावात ऐकू आले नाही. शेजारच्या लोकांनी त्याला घराची डागडुजी करण्यासाठी मदत केली. ऐन पेरणीच्या दिवसांत मोहन आपल्या गावी आला होता. त्याच्याजवळ आता पाच एकर शेती होती. पण बियाणे खरेदी करण्यासाठी फुटीकवडी नव्हती. काय करावं ? हा प्रश्न त्याच्यासमोर पडला होता. अशा कठीण प्रसंगी त्याचा जिवलग मित्र ज्याने गावात दुकान टाकून आपला संसार सांभाळत होता, त्या संजूने त्याला मदत केली. बियाणे व औषधीसाठी लागणारी रक्कम त्याने उधार म्हणून दिले. संजूचे मनोमन आभार मानून मोहनने शेतात पेरणी करून घेतली.
मोहन आणि राधा रोज शेतात जाऊ लागले आणि शेतातली कामे मोठ्या आनंदाने करत होती. आई राजुला सांभाळत घरीच राहत होती. सायंकाळी ते दोघे घरी येईपर्यंत आई जमेल ते काम करून स्वयंपाक करून ठेवत असे आणि रात्रीला सारेजण एकत्र बसून जेवण करत. महिन्यातून एकदा लक्ष्मीचं पत्र येत असे. मोहन देखील तिला पत्र लिहून ख्याली खुशाली कळवत असे. शेतीच्या उत्पन्नामधून मोहनला चांगले पैसे मिळाले. त्याची आर्थिक स्थिती चांगली झाली. संजूकडून उधार घेतलेले पैसे त्याला परत दिल्यावर देखील बरीच रक्कम त्याच्याकडे शिल्लक होती. त्यातून त्याने आईला एक नऊवारी साडी, बायकोला सहावारी साडी, राजूला छानसा ड्रेस आणि लक्ष्मीसाठी सुंदर ड्रेस खरेदी करून आणला. सर्वजण आनंदात व मजेत राहू लागले.
भिंतीवरील कॅलेंडर बदलत गेले तसे मोहनचे दिवस देखील बदलत गेले. सर्व काही सुरळीत चालू होते. राजूला गावातल्या सरकारी शाळेत प्रवेश दिला. त्याच वर्षी लक्ष्मीचं दहावीचं वर्ष होतं. नवोदय विद्यालयात लक्ष्मीने चांगला अभ्यास करून नाव कमावलं होतं. प्राथमिक शिक्षण मराठीतून झाल्यामुळे तिच्या सर्व संकल्पना स्पष्ट झाल्या होत्या. पहिला वर्ष तिला जरा कठीण गेलं. कारण तिथलं शिक्षण इंग्रजीतून होते. तरी ती मुळात हुशार आणि मेहनती मुलगी होती. त्यामुळे तिथला अभ्यास देखील मन लावून करत राहिली. दहावीची परीक्षा जवळ येऊ लागली तसा मोहनच्या चेहऱ्यावर चिंता जाणवत होती. तो दहावीला असतांना परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या दिवशी वाईट घटना घडली. त्याचा बा त्याच दिवशी त्याला सोडून गेला होता, त्याची त्याला वारंवार आठवण येत होती, लक्ष्मीच्या जीवनात असे काही विपरित घडू नये, याची तो मनातल्या मनात देवाजवळ प्रार्थना करत होता. माझ्या माघारी लक्ष्मीचे शिक्षण पूर्ण होणार नाही आणि तिला अधिकारी बनविण्याचे स्वप्न अपूर्ण राहील, अशी काळजी त्याला वाटत होते. अखेर परीक्षेचा दिवस उजाडला. लक्ष्मीचा पहिला पेपर संपला आणि घरात अप्रिय असे काही घडले नाही, हे पाहून तो मनोमन आनंदी झाला. लक्ष्मीची दहावीची परीक्षा संपली आणि ती आपल्या गावी परत आली. तिने सर्वच पेपर्स उत्तम प्रकारे सोडविले होते. त्यामुळे ती खूप आनंदात होती. काही दिवसांनी दहावीचा निकाल लागला आणि लक्ष्मीने 95 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. परत एकदा लक्ष्मीच्या पुढील शिक्षणाची चिंता मोहनला लागली होती. शहरातल्या चांगल्या कॉलेजात लक्ष्मीला प्रवेश द्यायचे, तिला खूप शिकवायचे असा मनाशी ठरवून मोहन पुढील कामाला लागला.
क्रमश :

नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769