लक्ष्मी - 5 Na Sa Yeotikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लक्ष्मी - 5

लक्ष्मी आली घरा

कु कूच कु कोंबड्याच्या आरवण्याने मोहनला जाग आली. तसा तो अंथरुणातून उठला, आपले सकाळचे सर्व कार्य आटोपून शहराकडे निघाला. आज स्वारी मजेत होती. मनातल्या मनात गाणे गुणगुणत तो जात होता. दुकानासमोर आपली सायकल लावली, आत गेला. मध्ये गेल्याबरोबर त्याच्या कानावर एक वाईट बातमी आली, त्याच्या मालकाला सकाळी दवाखान्यात घेऊन गेले. आपला डबा दुकानात ठेवला आणि दवाखान्याकडे सायकलवर निघाला. मनात खूप विचार येत होते, काय झालं असेल मालकाला ? कोणता त्रास आहे ? कसे असतील ते ? विचाराच्या तंद्रीत तो दवाखान्यात आला. अतिदक्षता विभागात मालकांना ठेवण्यात आले होते आणि बाहेर त्यांची पत्नी बसली होती. मोहनला पाहताच ती ओळखली आणि डोळ्यांतून पाणी आले. मोहनने मालकीणबाईला विचारले, " काय झालं आहे मालकांना ?" त्यावर मालकीणबाई म्हणाली, " त्यांना झटका बसलाय, एक बाजू पडून गेलंय " मोहनच्या लक्षात आलंय की, मालकांना लकवा मारलं आहे. मालकीणबाई ला जरा धीर देऊन तो काचेतून मालकांना पाहू लागला. थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी गोळ्या औषधाची चिठ्ठी दिली. मोहनचे मेडिकल मध्ये जाऊन ती सर्व गोळ्या औषधं घेऊन आला. डॉक्टर म्हणाले, " आठवडाभर देखरेखीखाली ठेवावे लागेल, पेशंटला पॅरेलिसीस अटॅक आलेलं आहे, ही गोळ्या औषधं नियमित द्या, काळजी घ्या." मालकीणबाई तेथे बसली आणि मोहन दवाखान्यातून बाहेर पडला. त्या दोघांना मदतीसाठी तेथे मोहन शिवाय कोणीच नव्हते. म्हणून मोहन सर्व काही पाहत होता. दुकान आणि दवाखान्यात लक्ष देतांना त्याची खूप धावपळ होऊ लागली. आठवड्यानंतर दवाखान्यातून सुट्टी मिळाली आणि ते घरी आले. मालकाला स्वतःला उभे ही राहता येत नव्हते, त्यांच्यासाठी एक व्हीलचेअर घेतले, त्यावर त्यांना बसवावे लागत होते. नीट बोलता ही येत नव्हते. शरीराची उजवी बाजू पूर्ण लकवा मारला होता. मोहनला त्यादिवशी कळाले की, मालक निपुत्रिक आहेत. त्यांना कोणी ही नाहीत. मोठ्या बंगल्यात फक्त ते दोघेच राहतात. आपली आनंदाची बातमी सांगावी असे मोहनला वाटले होते पण त्यांच्या दुःखात आपली आनंदाची बातमी सांगणे योग्य वाटले नाही. त्यामुळे तो काही सांगितला नाही. मोहनवर आता दोन जबाबदाऱ्या पडल्या, दुकान पाहायचे आणि मालकांच्या घराकडे देखील हवं नको ते पाहायचं. एके दिवशी मालक त्याला म्हणाले, " मोहन, तू येथेच माझ्या घरी येऊन का राहत नाहीस ? तुझी खूप धावपळ होत आहे." त्यावर मोहन फक्त हुं म्हणून विचार करू लागला. त्यादिवशी रात्री जेवण करताना तो आईला म्हणाला, " आई, मालक म्हणत होते की, त्यांच्या घरी येऊन राहा, काय करू मला काही सुचत नाही." यावर आई म्हणाली, " काही हरकत नाही बाळा, मालकावर लई कठीण प्रसंग आलंय, तुझी देखील खूप धावपळ होत आहे, जाऊन राहा, माझी काही हरकत नाही, सोबत राधाला ही घेऊन जा" आई बोलली पण मोहनला आईला सोडून जाणे जीवावर जात होते. काय करावं हेच त्याला कळेना. राधा देखील आईशिवाय जाणे नको म्हणत होती. शेवटी मनाचा निश्चय करून तो मालकाच्या घरी राहण्याचा निर्धार केला. राधा आणि आईला घेऊन तो दुसऱ्या दिवशी मालकाकडे गेला. येथे तिघेजण राहू शकतो का ? म्हणून विचारणा केली. मालकाने लगेच होकार दिला. त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या एका खोलीत मोहनाचा संसार सुरू झाला. मोहनला आता जास्त वेळ लक्ष देता येत होते. राधा आणि आई घरातील कामे करून मालकीणबाईला मदत करत होते. तेव्हा त्यांना ही बरे वाटले. मालकाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती मात्र ते अजूनही चालू शकत नव्हते.
रात्रीची वेळ होती, साधारण दहा वाजले असतील, राधाला पोटात कळ यायला सुरुवात झाली होती. मोहनने लगेच राधाला घेऊन दवाखान्यात गेला. काही वेळांत राधा प्रसूत झाली आणि एका मुलीला तिने जन्म दिला. मोहन खूप आनंदी झाला कारण आज तो एका मुलीचा बाप झाला होता. घरी आई एकटी काळजीत होती म्हणून तो घरी जाऊन आईला ही गोड बातमी दिली आणि परत दवाखान्यात आला. रात्रभर राधाजवळ राहिला. सकाळ झाली, ही बातमी मालकांना सांगावं म्हणून तो हातात पेढ्याचा डबा घेऊन गेला. मालकाच्या हातात पेढा दिला, त्यांच्या पाया पडला आणि मुलगी झाली अशी गोड बातमी दिला. मालकाच्या पदरात देवाने पुत्र दिले नव्हते त्यामुळे ही बातमी ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला. मालकीणबाईच्या डोळ्यातून अश्रू गळाले. आई होण्याचं सौभाग्य तिला मिळालं नाही याचे तिला राहून राहून दुःख वाटायचे मात्र मोहन व राधा च्या रुपात त्यांच्या अंगणात एक बाळ आलंय याचा तिला आनंद झाला होता. राधा दवाखान्यातून घरी आली. घरात आनंदाचे वातावरण पसरले होते. काही दिवसांनी बारसे करण्याचे नियोजन करण्यात आले. घरात तिच्या नावाविषयी चर्चा चालू होती. काय नाव ठेवावं ? यावर कोणाचेही एकमत होत नव्हते. शेवटी नामकरण करण्याचा दिवस उजाडला. अनेक पाहुणे, नातलग, मामा-मामी, सारेचजण कार्यक्रमाला हजर होते. आदल्या दिवशी रात्री एक अनोखी घटना घडली. मोहन आपल्या मालकाकडे नामकरण विषयी निमंत्रण देण्यासाठी गेला होता. मालकाने त्याला बसवून घेतले आणि म्हणाला, " हे बघ मोहन, तुला एक महत्वाची गोष्ट सांगावी वाटते" बाजूला मालकीणबाई देखील बसलेल्या होत्या. मोहन म्हणाला, " कोणती गोष्ट मालक ?" यावर मालक पुढे बोलू लागला, " मला आता दुकानात येऊन सर्व व्यवहार सांभाळणे शक्य होणार नाही, मला कोणी ही नाही, तुझ्याशिवाय. तेव्हा येथून पुढे तू पूर्ण दुकानाची जबाबदारी सांभाळायची. आजपासून तू दिवाणजी नसून, तू या दुकानाचा अर्धा मालक आहेस. " हे ऐकून मोहनला काय बोलावे हे सुचत नव्हते. मालकांनी सर्व काही व्यवहार कसे करायचे हे पूर्वीच शिकविले होते. आज त्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे आणि मेहनतीचे फळ मिळाले होते. त्याने मालकाचे पाय धरले आणि म्हणाला, " मालक, तुमचे खूप उपकार आहेत, अजून उपकार करून माझ्या डोक्यावर भार टाकू नका, मला पेलवणार नाही." यावर मालक म्हणाला, " नाही मोहन, माझे काही उपकार नाहीत, खरं तर तुझेच माझ्यावर खूप उपकार आहेत. तुझा निर्णय मला आवडतो, तू खूप गुणी, संस्कारी आणि मेहनती मुलगा आहेस. माझ्या एका चुकीमुळे तुझा बा तुझ्यापासून दूर झाला. हे पाप मी कधीच भरू शकत नाही. पापाची तपश्चर्या म्हणून मला एवढं पुण्याचे काम करू दे, नाही म्हणू नको" बोलताना मालकाचा कंठ दाटून आला होता. तो आपल्या घरी आला आणि आईला ती बातमी सांगितली. आईला देखील भरून आले. ती म्हणाली, " मोहन, तुझी मुलगी लक्ष्मी आहे रे, ज्या लक्ष्मीला तू ठोकर मारला होतास ती लक्ष्मी कोणत्या रूपात आली बघ, बाळा, लक्ष्मी आली घरा, हिचे नाव लक्ष्मीच ठेवू " सकाळी नाव ठेवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि आईने मोहनच्या मुलीचे नाव लक्ष्मी ठेवले. सर्वाना खूप आनंद वाटले. बारस्याचा सोहळा आनंदात पार पडला. चंद्रकलेप्रमाणे लक्ष्मी हळूहळू मोठी होत होती. पूर्ण बंगला जणू आपलाच आहे या तोऱ्यात ती साऱ्या बंगल्यात फिरत होती. लक्ष्मीच्या पावलाने मालक आणि मालकीणबाई ही आनंदून गेल्या. लक्ष्मी त्या दोघांना आजी-आजोबा या नावाने हाक मारत होती. मोहनच्या आईला माय म्हणू लागली. सर्वांची ती लाडकी झाली होती. मोहनला आकाश ढेंगणे झाल्यासारखे भासत होते. आई-वडिलांचे संस्कार आणि शाळेतील शिक्षण मोहनच्या नसानसात भिनले होते. मला जे शिक्षण मिळू शकले नाही ते माझ्या लक्ष्मीला मिळवून देणार असा त्याने मनाशी निश्चय केला.
क्रमशः

नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769