लक्ष्मी - 3 Na Sa Yeotikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लक्ष्मी - 3

कादंबरी लक्ष्मी भाग तिसरा

मोहनची नोकरी

दहावी पास झालो आता पुढे काय करावं ? हा प्रश्न मोहनला सतावत होता. सर्वत्र प्रवेश प्रक्रिया चालू झाली. मोहनचे सर्व सोबती कॉलेजला प्रवेश घेतले होते तर काहीजण आय टी आय ला गेले होते. दोन-तीन दिवसांनी मोहन अकरावी आर्टस मध्ये प्रवेश घेण्याचा निश्चित केला. सायन्सला प्रवेश घे म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला खूप समजावले पण त्याची आर्थिक परिस्थिती अशी होती की त्याला इच्छा असून देखील तो सायन्सला प्रवेश घेऊ शकला नसता. नाईलाजस्तव त्याने आर्टसमध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन प्रवेश केला. कॉलेजला सुरुवात झाली. पहिले दोन दिवस कॉलेजमध्ये गेला आणि कोणत्या विषयाला कोणते शिक्षक आहेत ? याची नोंद घेतली. वाचनालयातुन मिळतील तेवढी पुस्तके घेतली आणि घरी राहून अभ्यास करू लागला. सायन्स घेतलं असतं तर रोज कॉलेजला जावं लागतं आणि आर्टस घेतलं तर आठवड्यातून एक दोन वेळा गेले तरी चालते हे मनाशी ठरवून मोहनने ही शाखा निवडली होती. ज्या दिवशी तो घरी राहत असे त्यादिवशी तो आईसोबत किंवा दुसरीकडे कामाला जात असे. रात्रीच्या वेळी अभ्यास आणि दिवसभर काम असा त्याचा वेळापत्रक ठरलं होतं. लाईट देखील त्याला साथ देत नव्हती. महिन्यातून वीस एक दिवस तरी रात्रीला लाईट राहत नसे त्यामुळे दिव्याच्या उजेडात तो अभ्यास करायचा. कॉलेजमधील त्याची अनुपस्थिती ठळक दिसून येत असल्याने एके दिवशी प्राचार्याने मोहनला त्यांच्या कॅबिन मध्ये बोलावून घेतलं. पूर्वीप्रमाणे आता कॉलेज राहिलेलं नाही, तुझी उपस्थिती 75 टक्के भरली नाही तर तुला वार्षिक परीक्षेला बसता येणार नाही असा प्राचार्यानी दम भरला. मोहनने त्याची परिस्थिती आणि अनुपस्थितीचे कारण प्राचार्याना सांगितले. तेवढ्यात तिथे मोहनचे इंग्रजीचे शिक्षक आले. त्यांनी मोहनचा अक्षर आणि गुणवत्ता पाहिली होती. त्यांनी मोहनची बाजू घेऊन त्यास सवलत देण्याचे प्राचार्याना सुचविले. प्राचार्य खूप देवमाणूस होता तेंव्हा प्राचार्य देखील राजी झाले आणि म्हणाले, तुला कशाची गरज भासली तर मला सांग, तुला हवी ती मदत करतो. यावर मोहन उत्तरला, धन्यवाद सर, मला आपली एवढीच मदत खूप मोलाची आहे. असे म्हणून मोहन बाहेर पडला. अकरावीचे वर्ष संपले आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेध लागले. मोहनची आई त्याला शहरात खोली घेऊन राहण्याविषयी अनेकदा बोलली मात्र मोहन काही ऐकत नव्हता. आईला एकटीला सोडून जाणे त्याला जीवावर जात होते. बारावी निघेल किंवा निघणार नाही मी मात्र तुला सोडून जाणार नाही असे तो आईला ठणकावून सांगून ठेवले. सारे मित्र बारावीच्या परीक्षेसाठी जोरदार तयारी करून अभ्यास करत होते. मोहन मात्र आपल्या रुटीनप्रमाणे दिवसा काम आणि रात्री अभ्यास करत होता. गणित आवडता विषय होता, त्याला पूरक अर्थशास्त्र विषय मिळाल्याने तो आवडीने अभ्यास करू लागला. शेतीच्या कामातून मिळालेल्या पैश्यातून त्याने एक नवी सायकल विकत घेतली. आता आठवड्यातून दोन दिवस कॉलेज करू लागला. कॉलेजमधील सारेच शिक्षक मोहनला हवी ती मदत करत असत. त्याची परिस्थिती जवळपास सर्वाना माहीत होती. त्याचे मित्र ही त्याला मदत करण्यास तयार असायचे मात्र मोहन मदत टाळायचा. जोपर्यंत माझ्या मनगटात ताकद आहे तोपर्यंत मी कोणाकडे हात पसरणार नाही. ज्यादिवशी मी हात पसरलो त्यादिवशी मी संपल्यात जमा आहे, असे तो नेहमी बोलायचा. मन लावून खूप अभ्यास केला आणि बारावीची परीक्षा 65 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. मोहनला आणि त्याच्या आईला खूप आनंद झाला. मोहनला अजून पुढे शिकायचे होते. आर्टस केल्यामुळे त्यांच्यापुढे डिग्रीला प्रवेश घेल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्याच कॉलेजमध्ये त्याने डिग्रीला प्रवेश घेतला. त्याच्या सोबतचे काही मित्र मेडिकलला गेले, काही इंजिनिअरिंगला गेले तर काही इतर शाखेत प्रवेश घेतले. आठवड्यात एक-दोन दिवसांच्या ऐवजी मोहन आता महिन्यातून एकदा कॉलेजला जात होता. महत्वाचे नोट्स टिपण करून पुस्तकांची अदलाबदल करून घरी येत होता. महिनाभर तो आपल्या शेतात राबायचा आणि सोबतच मजुरी देखील करायचा. याचे त्याला बऱ्यापैकी पैसे मिळत होते. शेतातील उत्पन्न मात्र त्याला काही साथ देत नव्हती. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होऊ लागला. त्याला शेतातील गणित काही केल्या जुळत नव्हतं. त्याचं अर्थशास्त्र या शेतीच्या व्यवसायात काही कामाला येत नव्हतं. शेती सोडून काही तरी काम करावे हे त्याच्या डोक्यात नेहमी चालायचं. आपल्या शिक्षणाचा काही तरी फायदा व्हायलाच पाहिजे. सरकारी नोकरी मिळणे तर कठीण आहे पण खाजगी नोकरी करायला काय हरकत आहे असा विचार त्याच्या मनात येत होता. शहरात कॉलेजच्या निमित्ताने गेल्यावर कुठे काम मिळते का ? याचा तपास त्याने चालू केला. पण याच्या शिक्षणाच्या बळावर त्याला कोणतीही नोकरी मिळत नव्हती. काय करावे ? हे त्याला सुचत नव्हते. तो रोज चिंताग्रस्त व्हायचा. असे डिग्रीचे तीन वर्षे निघून गेली. डिग्री देखील चांगल्या गुणाने पास झाला. अजून पुढील शिक्षण घेण्याची त्याची ईच्छा होती मात्र त्यासाठी दूरच्या मोठ्या शहरात जावे लागायचे. आईने त्याला जाण्याची परवानगी दिली मात्र तो काही जाण्यास तयार होत नव्हता. असेच एके दिवशी मोहन शहरात गेला होता. त्याला बाजारात तो व्यापारी भेटला. मोहन त्या व्यापाऱ्याला ओळ्खले नाही मात्र व्यापाऱ्याने मोहनला चटकन ओळखून घेतलं आणि म्हणाला, " अरे मोहन, कसा आहेस ? " ठीक आहे " नाराजीच्या सुरात मोहन म्हणाला. ते दोघे एका हॉटेलात गेले आणि चहा घेऊ लागले. चहा घेता घेता व्यापाऱ्याने विचारले की, " तू सध्या काय करत आहेस ?" " काही नाही, सध्या नोकरी शोधत आहे. " मोहन उत्तरला. " कसली नोकरी आणि तुझं शिक्षण कुठपर्यंत झालंय ?" व्यापाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला मोहन म्हणाला, " कोणतीही नोकरी चालते, माझ्या डिग्रीच्या शिक्षणाला, कोण देईल नोकरी ? " यावर तो व्यापारी म्हणाला, " मी देईन ना नोकरी, चल मी तुला देतो माझ्याजवळ नोकरी " मोहनने ती रक्कम घेतली नाही हे त्या व्यापाऱ्याला नेहमी छळत होते, आज एक सुवर्णसंधी मिळाली, त्या कर्जातून मुक्त होण्याची, असा विचार तो व्यापारी करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर येण्याची कबुली देऊन मोहन आनंदाने घरी परतला. आईला ही बातमी कळल्यावर ती देखील आनंदी झाली. ज्या लक्ष्मीला मी धुडकारले होते, तीच लक्ष्मी आज वेगळ्या रुपात येऊन भेटली, भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं असे स्वतःशी म्हणत मोहन बा च्या फोटोकडे एकवार नजर फिरवली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तयार होऊन मोहन शहराकडे निघाला. त्याच्या चेहऱ्यावर आज जे तेज दिसत होते ते यापूर्वी कधीच दिसले नाही. त्या व्यापाऱ्याच्या दुकानासमोर आपली सायकल लावली आणि तो आतमध्ये गेला. सगळीकडे धान्यच धान्य पसरलेलं दिसत होता. मोहनला काय काम करायचं अजून ठाऊक झाले नव्हते. त्याच्या मनात एक शंका येत होती की, हे वजन तर उचलावे लागणार नाही. थोड्याच वेळात व्यापारी आला आणि त्याने मोहनला त्याच्या कामाची जबाबदारी दिली. त्याला साजेशी असेच काम मिळालं होतं. मनोजला व्यापाऱ्यांनी मुनीम म्हणून कामावर ठेवलं होतं. त्याला ही ते काम आवडले आणि मोहनच्या नोकरीला सुरुवात झाली. अगदी प्रामाणिक आणि सचोटीने तो काम करू लागला. तो त्या व्यापाऱ्यांचा खास माणूस बनला. महिन्याचा पहिला पगार हातात पडला, तेंव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. त्याने आपला पहिला पगार बा च्या चरणी अर्पण केला. मोहनला नोकरी मिळाली आता आईला मोहनच्या लग्नाची काळजी वाटू लागली. मोहनला लग्नासाठी कोण मुलगी देणार ? याला मुलगी मिळेल की नाही असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात धुमाकूळ घालत होते. दोनाचे चार हात करण्यासाठी मोहनची आई आतुर झाली होती.
क्रमश :

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769