इस्कोट - कोंबडी आणि कोरोना Nilesh Desai द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना


हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौकर सुट्ट्या मंजूर करवून घेत माधव यावेळी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात गावी आला होता. उगाच कुठलं संक्रमण नको, या कारणानं घेतलेली योग्य अशी ती खबरदारी होती. जगभर कोरोनोच्या विषाणूने आपला इंगा दाखवला होता. दगावणाऱ्या माणसांचे आकडे वाढत होते. याव्यतिरिक्त सगळीकडे अफवांचे पेव फुटले होते. शिवाय आता उगाच पसरवलेल्या अफवा माधवच्या गावापर्येंत येऊन धडकू लागल्या होत्या.

'कोंबडी खाल्ल्याने हा आजार होतो' त्यातल्या या एका अफवेनं मात्र गावातल्या खूप जणांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. तसं गावात कोंबडीचं दुकान नव्हतंच. खाणारी लोकं पुढच्या गावाकडे जाऊन आणत असत. पण तरीही खबरदारी म्हणून गावातल्या मागल्या-म्होरल्या, तोंडासमोरच्या, आडबाजूच्या अश्या सगळ्या वाड्या आणि गावातली मंडळी यांनी एकमताने आजार जाईपर्येंत मांसाहार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दादा पाटील आणि किसन दर्जी यांनीही तोंड वाकडी करत तो निर्णय मान्य केला. खरेतर गावातल्या खूप जणांची तोंडं त्या निर्णयामुळं हिरमुसली होती.

पण बाजाराच्या वाराला जर कोंबडी न्हाय खाल्ली तर कसला गावकरी तो असं म्हणणारी हावरट अन वशाट दिसताच लाळ गाळणारी माणसं पण गावात होतीच.

एका दुपारी गावाजवळच्या शेतातल्या खोबऱ्या आंब्याखाली रंग्या आणि दिन्या निवांत पडले होते. दोघेही साधारण तिशीच्या घरात होते. रंग्या जरा भरल्या अंगाचा असून सारखा आपल्या बारीक मिश्यांना पीळ द्यायचं कामं करत होता. दिन्या दिसायला बारीक दिसत असला तरी त्याचं पोट एव्हाना सुटू लागलं होतं म्हणूनच अंगात नुसता आळशीपणा भिनला होता. पैश्याची गरज पडेल तेव्हाच कामाला हात लावणारे गावातले गडी. गावांत एकाबाजूला असलेल्या कष्टकऱ्यांच्या वस्तीमध्ये राहणारे रंग्या आणि दिन्या दोघे जिवाभावाचे मैतर होते.

"दिन्यारं.. लगा.. वशाट खाण्याचं लय मन हुतंय आज.. " जिभेवरची लाळ तोंडात आतल्या आत गिळत रंग्या म्हणाला.

"व्हयं गड्या... बाजाराच्या दिवशीपण कोंबडीच तोंड दिसंना झालयं.. च्या मारी.. येकुद्या हिरोईनीवाणी कुंबडीला डिमांड आलाय.." दिन्या हताशपणे म्हणाला.

दोनेक मिनिटं शांततेत गेली आणि रंग्या गडबडीत उठला.

"राहवत न्हाय बघ आता.. हप्ता झाला वशाटाची चव न्हाय चाखाय.. जहरी.. पाक जहरी लगा ही कुंबडीची तलफ.. तंबाखू झक मारल हिच्यापुढं..." रंग्या वैतागलेला.

"आरर्र.. लेकाच्या पण त्यो रोग का काय आलाय.. आपल्यावर बी येईल की.. !" दिन्या शंका उपस्थित करू लागला.

"आरं हाड.. असं कुठं असतं.. सगळं उगाच पसरवत्यात हे.. मला सांग सगळं रोग उठसूट कोंबडीवर येऊन कसं पडत्याल..? आणि तसं असतं तर सरकारनं अजून कुठं सांगितलंय तवा की कुंबडी खायची न्हाय ते.. !" रंग्याने बराच विचार केलेला असं दिसत होतं.

"व्हयं की र्र.. तू म्हणतुयास ते खरंच हाय.. पण गड्या पैसं..! आता कुंबडी गावात आणायची कशी..? गावानं तर सगळ्यास्नी बंद सांगितलंय.. अन स्टॅण्डवर माणसं कायम असत्यात... मग कसं करायचं.. " दिन्या जरा रुळावर येऊन विचार करू लागला होता.

"हू.. ही समदं पार करता येईल.. " रंग्या जांभई देत हातपाय ताठवून म्हणू लागला, "खरी गंम्मत वेगळीच हाय.. "

"काय रं.. सांग की लग्या.. लौकर.. " दिन्याची उत्सुकता वाढली होती.

"पैश्याचं कायतरी तू विचारात हुतास.." रंग्यानं डोळ्यांची बुब्बळं इकडून तिकडे फिरवत विचारले.

"आईच्यान.. रंग्या.. भना.. उडवायची व्ह रं..?" दिन्यानं अगदी योग्य ओळखलं होतं.

दोघांनी मिळून मस्तपैकी प्लॅन केला. बबन वाण्याकडं कोंबड्या जास्त हुत्या. त्यालाच लुटायचा ठरवलं. संध्याकाळी अंधार पडण्याच्या थोडं अगोदरची वेळ निश्चित करण्यात आली. त्या वेळेला बबन्याच्या दुकानात गर्दी वाढली की त्याची बायको पण दुकानात येते. हीच संधी सांगून मागं परसात हिंडत असलेल्या एका कोंबड्याला धरायचं.

"पण काय रं रंग्या.. ही कामं होईल व्हय रं फत्तं.. " दिन्या साशंक होऊन विचारू लागला.

"दिन्या.. हिची भना.. मी ठरवल्यालं काम पार पड्ल्याबिगीर दम घेत न्हाय.. " रंग्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास होता.

"आन.. पकडून घराकडं न्यायचा का काय..? " दिन्याचे प्रश्न अजूनही संपत न्हवते.

"आरं का खुळा हाईस व्हयं.. उगा घरातल्यांचा त्यात कालवा नगं.. मी कोंबडं पकडून नदीकडं जाईन, तू तोपर्येंत घरणं सामान घेऊन ये. मग लांब शेतात नेऊ आन दोघच फडशा पाडू.." रंग्याने आपल्या तल्लख बुद्धीचा परिचय दिला.

दिन्याने हो ला हो केलं आणि सायंकाळ होऊ लागली तसं दोघेही बबन वाण्याच्या घराच्या दिशेने निघाले.

जसंजसं शेतं मागं पडून दुकानांची रांग लागली तसतसं कानावर गोंधळ ऐकू येऊ लागला. रंग्या आणि दिन्या थोडं पुढं जाऊन पाहू लागले तर बबन वाणी आणि त्याची बायको जोरजोरात वरडत, बोट मोडत कुणाला तरी शिव्या घालताना दिसली.

हा काय प्रकार म्हणून एकाला विचारले तेव्हा कळाले की, बबन्याची बायको कोंबड्या खुराड्यात ठेवण्यासाठी म्हणून परसात गेली तेव्हा सारी कोंबड्या- पिले मान टाकून निपचित पडली होती. कोंबड्यांवर कसलातरी रोग आल्याचा संशय होता.

दिन्यानं रंग्याकडे पाहिले, रंग्या जीभ चावून मान डुलवु लागला. थोडक्यात वाचलो, असे भाव दोघांच्याही चेहऱ्यावर आले होते. आता कितीही तलफ लागली तरी जोपर्येंत गावात बाकी कुणी वशाट खात नाही तोपर्येंत बुवा बनून राहायचं रंग्यानं मनोमन ठरवलं.

आता हा कोरोनोच्या विषाणूचा प्रताप की आणखी कुठला रोग कोंबड्यांवर पडला कुणास ठाऊक..? पण या अवचित घडलेल्या घटनेनं रंग्या आणि दिन्याच्या कार्यक्रमाचा मात्र पार इस्कोट झाला होता.


समाप्त

निलेश देसाई