Deja vyuh books and stories free download online pdf in Marathi

देजा व्हू

नयन, एकवीस वर्षाचा मुलगा. दिसायला साधारण, पण लाजाळू वृत्तीचा, आपल्याच जगात हरवलेला, पण स्वतःपेक्षा जास्त विश्वास विज्ञानावर ठेवणारा असा साधा भोळा मुलगा. त्याला मित्र तेवढे न्हवतेच, पण त्याचा जुळा भाऊही त्याच्याच वयाचा, दोघांचेही चेहरे एकसमान, आणि दोघे भाऊ कमी पण मित्र जास्त होते.
नयनचा भाऊ अमन दुसऱ्या शहरात शिक्षण घेत होता. दोघांचे बोलणे व्हायचे फोन वर, पण तरीही आठवण वेगळीच सतावायची एकमेकांची. जेव्हापासून अमन दुसऱ्या शहरात गेला आहे, तेव्हापासून नयन आपल्या गावी एकटा पडला आहे. तो आपल्या दुसऱ्या मित्रांसोबतही राहणे पसंत करत नाही. तो आधीपेक्षाही जास्त एकटा राहू लागला आहे. त्याचे एकटे राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याचा अभ्यास. कारण त्याचा भाऊ अमन अभ्यास करून चांगल्या कॉलेज मध्ये लागलेला होता, आता नयनलाही आपल्या गावाकडच्या कॉलेजतून चांगल्या टक्क्यांची डिग्री काढून, शहराकडे जायचं होतं. नयन अभ्यासात जरा कच्चा असल्याने, त्याला जास्त वेळ वाचन करत राहावं लागत होतं. पण तरीही तो वाचायला तैयार होताच.
नयनचा स्वभाव, लोकांना जरा विचित्रच भासत होता. तो कुणालाही टोचून बोलत होता, पण नंतर पुढील व्यक्तीची क्षमाही मागत होता, त्याच्या म्हणण्यानुसार घडले नाही तर, कुठेही भांडण करायला लागत होता, पण काही वेळातच स्वतःचा राग आटोक्यात आणून, स्वतःला सावरत होता. लोकांची नजर त्याच्याविरुद्ध जरा वेगळीच बनली होती.
नयनचे असे चिडचिड करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे, त्याला कसला ना कसला भास नेहमीच होत होता. तो कुठल्याही नव्या जागेत आला तर, त्याला ती जागा कुठेतरी बघितली असल्यागत भासत होते. त्या नव्या जागेतील वेगवेगळ्या आठवणी मनात धावू लागत होते आणि तसाच तो विचारांच्या दुनियेत हरवून जात होता. पण जेव्हा तो विचारांत बुडून राहत होता, आणि मध्येच कुणी त्याला त्रास दिला तर, त्याचा पारा चढायचा. कारण आधीच त्याला समजायचे नाही की, ह्या नव्या जागी आपण केव्हा आलो आहे, ह्याचा शोध घ्यायला विचारात गुंत होत होता, पण विचार करत असताना मध्ये कुणीही आले तरी त्याला आवडत न्हवते, तो त्या सदर व्यक्तीवर भडकायचाच.
त्याने कितीही प्रयत्न केले तरी, त्याला आठवत न्हवते की, ह्या जागेत आपण केव्हा आलो आहे? आणि वेगवेगळ्या आठविणीचे गुपित काय आहे, हेही त्याला समजत न्हवते. पण जसा तो रात्री झोपी जात होता, त्याला पूर्ण आठवत होते की, ती आपल्यासाठी असलेली नवीन जागा कसले रहस्य लपवून ठेऊन आहेत. त्याला स्वप्नात दिसत होते, की त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्या नव्या जागेवर काय घडणार आहे. पूर्ण घटनाक्रम स्वप्नातच घडत होता. पण आश्चर्याची बाब म्हणजे, नेमकेच दुसऱ्या दिवशी नक्की तेच घडत होते, जे त्याने स्वप्नात अनुभवले होते. पण झोपून उठल्यावर त्याला समजत न्हवते की, स्वप्नाची सुरुवात कुठून झाली आणि अंत कुठे झाला, तो विचार करायला त्याला वेगळेच डोकं लावण्याची गरज वाटत होती, म्हणून तो दुसऱ्याच दिवशी त्या घटनास्थळी जाऊन बघून घेत होता की, स्वप्नात काय घडले आणि जसे त्याच्या स्वप्नात घडले, तेच खऱ्या आयुष्यातही घडत होते आणि पडलेल्या स्वप्नात काय घडले होते, हेही समजून जात होते.
एखाद्या नवीन जागेत जाणे, जिथे याआधी कधी गेलेलं नाही. तिथे वेगवेगळे भास होणे, वेगळ्याच आठवणींना उजाळा येणे, पण त्याच रात्री झोपेत पूर्ण स्वप्न त्याच आठवणींच्या बळावर निर्माण होणे, सकाळी ते पूर्ण स्वप्न विसरून जाणे, पण जे स्वप्नात घडले ते, दुसऱ्या दिवशी जसेच्या तसे घडणे, आणि हेच ते स्वप्न होते, हे निश्चित होणे, हे नयनचे आता नेहमीचेच झाले होते. त्याला एवढे तर ठाऊक होते की, नव्या जागेत आल्यावर, आपण याआधी इथे आलेलो आहे, अश्या होणाऱ्या भासा लाच 'देजा व्हू' म्हणतात. पण जर तेच 'देजा व्हू' स्वप्नात येत असेल आणि दुसऱ्या दिवशी हुबेहूब तसेच घडत असेल तर त्याला काय म्हणायचे हे त्याला समजत न्हवते. त्याने आपल्यासोबत घडत असलेला प्रकार मानसोपचारतज्ज्ञ जवळ सांगितला. पण त्यांनीही ही बाब 'देजा व्हू' सारखी नॉर्मल आहे, असे सांगून नयनचा पेंच आणखीनच वाढविला. नयनने आर्टिकल लिहून, आपल्या ह्या नवीनच 'देजा व्हू' बद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचविली. काही अभ्यासक नयनची भेट घेऊन, काही प्रश्नांची उत्तरे विचारली, आणि सोबतच, खरंच असं घडते आहे काय, हे बघायला त्याच्यावर पूर्ण नजर ठेऊन होते. पण ह्यावेळी मात्र असे काहीही घडत न्हवते.
काही दिवसानंतर, नयन आपल्या भावाला म्हणजेच अमनला भेटायला त्याच्या शहरातल्या घरी गेला. पण जाताना त्याने अमनला सांगितले न्हवते की, तो येणार आहे म्हणून, तो त्याला सरप्राईज देऊ इच्छित होता. पण अमनच्या घरी जाताच त्याच्या घरी कुलूप लावलेले दिसले. हे बघून नयनने अमनला फोन लावले. अमन म्हणाला की तो सध्या अमेरिकेला आहे, पण तिथून रात्रीच्या फ्लाईटने निघणार आहे, आणि उद्या नक्कीच पोहोचनार आहे.
आता उद्या अमन येणारच म्हणून, नयनने निश्चय केले की, आज इथेच कुठेतरी जवळपासच्या हॉटेलमध्ये मुक्काम करूयात. पण अमनच्या घराकडे बघताच त्याला पुन्हा 'देजा व्हू' सारखा भास वाटू लागला. तो अमनच्या घरी या आधी फक्त एकदाच आलेला आहे, तेही त्याला तेवढं आठवत नाही आहे, पण त्याला काहीतरी वेगळाच भास होत आहे. तो खिडकीतून घरात बघू लागला. त्याला भास होऊ लागला की, घराच्या आत कुणीतरी खुर्चीवर बसून कॉम्पुटरवर काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो भास स्पष्ट समजत न्हवता. त्याला तो भास काही क्षणासाठी व्हायचा आणि काही क्षणासाठी, घराच्या आत काहीही दिसायचे नाही. तो ह्या सर्वाला हलक्यात घेऊन, परतु लागला., पण त्याला पुन्हा भास होऊ लागला की, कुणीतरी आत बसलेल्या माणसावर, दुसराच इसम मागून हल्ला करण्याच्या तैयारीत आहे, पण त्या हल्लेखोराचा चेहरा स्पष्ट दिसत नाही आहे, पण त्या आत खुर्चीवर बसून कॉम्पुटर वर काहीतरी शोधत बसलेल्या इसमचा चेहरा काहीसा अमनसारखा भासू लागला. पण पुन्हा ते भास होणे बंद झाले. नयनला ह्या सर्वावरून समजले की, कुणीतरी उद्या अमनवर हल्ला करणार आहे, कारण ह्या आधी झालेले प्रत्येक भास दुसऱ्या दिवशीचेच विश्लेषण असायचे, आपल्याला त्याला वाचवायला हवे, काहीही करून. पण त्याला हे जाऊन घ्यायचे होते की, उद्याची वेळ काय असणार आहे?, तो पुन्हा खिडकीतून बघू लागला, पण ह्यावेळी आत असलेल्या घड्याळाकडे लक्ष देऊन बघू लागला. पण तो भास पुन्हा येतच न्हवता. नयनला मात्र जाणूनच घाययचे होते की, ती वेळ कोणती असणार आहे?, म्हणून तो खूप लक्षपूर्वक आतील घड्याळीकडे बघू लागला. काही वेळात तो भास पुन्हा येऊ लागला, पण ह्यावेळी त्याने बघितले की, उद्या ठीक दहा वाजता, हा प्रकार घडणार आहे, आणि हेही दिसले की, कुणीतरी येऊन खरंच हल्ला करणार आहे, कारण मागून येणारा इसमने आत बसून असलेल्या अमनला मारलेलेही आहे आणि ह्यासोबतच तो भास पुन्हा बंद झाला.
नयनला समजत न्हवते की, आज त्याला भास झाला आहे, आणि उद्या तो नक्कीच आपल्या भावाला वाचवायला जाणार आहे, पण होणाऱ्या भासामध्ये तर त्या इसमने अमनला ठारही केलेले दिसत आहे, मग उद्या ह्या वेळी आपण कुठे असणार, आपण त्याला वाचवू शकतो की नाही?, हाच विचार त्याला सतावत आहे.
नयनने जवळच एक हॉटेल बुक केले. तिथे त्याने मुक्काम करण्याचे ठरविले. त्याला पुन्हा विचार येऊ लागला की, झालेला भास खरंच उद्या घडणार आहे, की दुसऱ्याच वेगळ्याच दिवशी घडणार आहे?, पण या आधी होणारे प्रत्येक भास, दुसऱ्या दिवसाचेच छायाचित्र असायचे. त्याने आपल्या मोबाईलमध्ये तारीख बघितली, तर त्याला आजची तारीख आठ एप्रिल दिसली. मोबाईल ठेऊन तो झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी तो उठला आणि सर्वात आधी त्याने मोबाईलवर तारीख बघितली तर त्याला आजची तारीख नऊ एप्रिल दिसली. तो सरळ अमनच्या घराकडे निघाला. पण येतानाच मध्येच असलेल्या एका दुकानातून एक चाकू विकत घेतला, स्वतःची सुरक्षा करण्यासाठी. तो अमनच्या घरी आला. घड्याळात ठीक दहा वाजायला येत आहे. त्याने घरात एन्ट्री केली, दार खुलेच होते. पण घड्याळीत ठीक दहा वाजले, असे नयनला दिसले. पण पुढे त्या इसमची सावलीही दिसली आणि वेळेनुसार पुढेच बसून असलेल्या अमनला मारणारच होता, पण नयन मागून एक मोठा श्वास घेऊन आपल्या हातात असलेल्या चाकूने त्या इसमवर प्रहार केला. पण प्रहार करताच पुढील असलेला इसम अचानक गायब झाला आणि चुकून, हातात असलेला चाकू नकळतपणे अमनच्या पाठीत शिरला...
नयन झोपेतून ताडकन उठला. त्याने पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये बघितले, रात्रीचे दोन वाजत आहे आणि त्याने आता जे बघितले आहे ते स्वप्न आहे. पुन्हा मोबाईल सुरू करून सध्याची तारीख बघितली, तर त्यात नऊ एप्रिल दाखवीत होते, म्हणजे नऊ एप्रिल ही तारीख आत्ताच बारा वाजतापासून सुरू झाली आहे. बाजूलाच ठेवलेली पाण्याची बॉटल घेऊन, पाणी पिऊन, लांब श्वास घेऊन, पुन्हा झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी तो उठला, त्याने स्वतःलाच चिमटा घेतला की, खरंच आपण उठलेले आहोत की नाही हे बघायला. पण तो स्वप्नात न्हवताच. त्याने आपला मोबाईल हातात घेतला, तारीख बघायला. पण त्याच्या मोबाईलची बॅटरी संपलेली होती आणि आता चार्जिंग करत बसण्याऐवढे वेळही न्हवतेच. घड्याळीत वेळ बघितला, तर त्यात नऊ वाजले होते. तो लगेच फ्रेश होऊन, अमनच्या घराकडे निघाला. अमनच्या घराला कुलूप लावून न्हवते, म्हणजे अमन परतलेला असावा, असे नयनला वाटले. तो आत गेला. आत घड्याळीकडे बघितले असता, त्याला दिसले की, साडे नऊ वाजली आहेत. तो घरात अमनला शोधू लागला. पण अमनचा कुठेच पत्ता लागत न्हवता. पण त्याचा कॉम्पुटर सुरूच होता. नयनला वाटलं अमन बाथरूम मध्ये गेला असावा. पंधरा मिनिटं झालीत, पण अमन आलाच नाही, बाथरूममधून. त्याने अमनला आवाज दिला, पण अमनचे काहीच उत्तर आले नाही. त्याने बाथरूमचे दार जरा ढकलले. तर ते दार उघडे होते आणि अमन आत न्हवताच.
तो परत मेन हॉल मध्ये आला. दहा वाजणारच होते. पण त्याला आजची तारीख नऊच एप्रिल आहे की, नाही हे ठाऊक न्हवते, कारण त्याचा मोबाईल बंद होता. पण अमनच कॉम्पुटर सुरूच होता, आणि कॉम्पुटरच्या सर्वात खाली उजव्या बाजूला तारीख लिहिलेली असते, तेच बघायला कॉम्पुटर जवळ गेला. पण हा कॉम्पुटर जरा जास्तच एडव्हान्स होता, नवीन जनरेशनचा असावा कदाचित. म्हणून तो त्या कॉम्पुटर वर तारीख शोधण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला तारीख कुठेच दिसत न्हवती. नयन कॉम्पुटर पुढे बसला, आणि डाव्या बाजूला असलेली विंडोज ओपन केले, तिथे त्याला तारीख दिसली, नऊ एप्रिल, पण बाजूलाच वेळही दिसत होते, तर तिथे वेळ ठीक दहा वाजलेले दिसले.., दहा?..,
तो काही विचार करायच्या आधीच मागून त्याच्यावर चाकूने हल्ला झाला. मागे बघितले असता, मागे कुणीच न्हवते. पण काही वेळातच, जास्त रक्त वाहल्यामुळे नयनचा मृत्यू झाला.
दुपारचे दोन वाजता, अमन आपल्या घरी परतला. पण घरचे दार उघडेच दिसले. पण आत गेल्यावर कळले की, आत नयन मृत अवस्थेत पडून आहे. अमनने लगेच रुग्णवाहिकेला फोन लावले, पोलिसांनाही बोलाविले.
मरणोत्तर तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना हे समजले की, नयनच्या पाठीवर खुपसलेच्या चाकूवर, नयनचेच म्हणजे त्याच्याच हाताच्या खुणा आहेत. पण मागून एवढे सटीकपणे कोणताही माणूस स्वतःलाच मारू शकत नाही, मग नयनने असे स्वतःला मारलेच कसे?... चाकूचा प्रहार ठीक मानेच्या खाली, एकदम सरळ रेषेत झालेला होता. पण कुणाचाही हात एवढ्या सरळ रेषेत तेही मागे जाऊच शकत नाही. मग हे कसं शक्य आहे?
चाकूला बघून, जवळच असलेल्या दुकानात अश्या चाकूबद्दल विचारणा करण्यात आली, आणि सोबतच नयनचा फोटो दाखविण्यात आले, आणि हा इथे चाकू घ्यायला आला होता काय?, अशी विचारणा केली, आणि त्या दुकानदाराने होकार दिला. नयन त्या दुकानात काल म्हणजे आठ एप्रिलला चाकू घायला आला होता, अशी कबुली त्या दुकानदाराने दिली.
पण स्वतःच अश्याप्रकारे कसा खून करू शकतो?, हे मात्र रहस्य बनून राहिले, पण पूर्ण पुराव्यातून हे समजले की, त्याने आत्महत्या केली आहे. पुन्हा विचारपूस केली असता, पोलिसांना समजले की, नयन काही दिवसापासून वेड्यासारखे वागत होता.
समाप्त.


(नयनसोबत काय झाले? ह्याचा तुम्हीच विचार करा)




उत्कर्ष दुर्योधन लिखित...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED