महती शक्तीपिठांची भाग १९ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

महती शक्तीपिठांची भाग १९

महती शक्तीपिठांची भाग १९

४) कोल्हापूर (श्रीमहालक्ष्मी) शक्तीपीठ

साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ म्हणून कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी प्रसिद्ध आहे.
हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात.
कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते.
आपणास देवीचा वरप्रसाद मिळाल्याचे त्यांनी अनेक लेखांत लिहून ठेवले आहे.
सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो.

मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.
मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.
पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते..

कधी काळी परकीय आक्रमणांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने आपल्या घरात अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हणतात.
पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले.
उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे असलेले वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबेचे रूप आहे.
देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे.
मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे.
अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे.
देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते.
करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे.
हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित” चतुर्वर्गचिंतामणी “या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.
नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच या देवीची महत्त्वाची ओळख आहे.

कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाव्दार पश्चिमेकडे आहे.
पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो.
मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत.
पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे.
देवीचा गाभारा येथेच आहे.
उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणार्‍या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.
चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणार्‍या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो .
देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणार्‍या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादीनी , आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत.
माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्‌साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये आहेत .
देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.

बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहील्याचा उल्लेख सापडतो.

शुक्रवार, मंगळवार हे देवीचे महत्वाचे दिवस मानले जातात.
दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या उत्सवमूर्तीची पालखी प्रदक्षिणा काढली जाते.
पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार असतात.
पूर्वी संस्थाने असताना पालखीसोबत हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे.
नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा असते .
अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना उत्सवाची तयारी होते .
पहील्या दिवशी बैठी पूजा
दुसर्या दिवशी खड़ी पूजा
त्र्यंबोली पंचमी दिवशी अंबारीतील पूजा,
रथावरची पूजा
मयूरावरची पूजा
आणि अष्टमीला महीषासुरमर्दिनी सिंहवासिनीच्या रूपातली पूजा बांधतात.
अशा पुजांमुळे देवीचा उत्सव प्रेक्षणीय असतो.
अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते.
प्रत्येकाच्या घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते.
नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे.
अश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे.

काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसपास मिळणार्‍या काळया दगडात केली आहे.
देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात.
मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ.स. १७२२ मध्ये दुसर्‍या संभाजीमहाराजांनी मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली.
हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे.
देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे.
पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत.
उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते.
या दरवाजाला “घाटी दरवाजा” असे म्हणतात.
देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत.
पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत.
देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात.

प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो.
या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत.
या मंडपातून मणिमंडपाकडे जाता येते.
या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत.
या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत.
मणिमंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभार्‍यात आहे त्या ठिकाणी जाता येते.
देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक लिंग आहे.
मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे.
थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत.
महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, विठोबा, काशीविश्‍वेश्‍वर, राम आणि राधाकॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत.
सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते.
या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत असत .

शिलालेख

देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात.
दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्‍वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे.
दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे.
हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो.

वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो.
त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.
या दिवशी महालक्ष्मीची उत्सवमूर्ती पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते.
दुसरा उत्सव आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी होतो .
या दिवशी कोल्हापूरपासून ५ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते.

करवीर निवासिनी महालक्ष्मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानाकडे महामातृक क्षेत्र म्हणून पाहिले जाते.
पद्मपुराण, स्कंदपुराण, मार्कंडेयपुराण, देवीभागवत यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये महालक्ष्मीचा उल्लेख आढळतो.
ताम्रपट आणि शीलालेखांवर नवव्या शतकापासून या मंदिराच्या नोंदी सापडतात.
ज्याप्रमाणे श्री यंत्राच्या १६ काटकोनाच्या मध्यभागी सर्वोच्च शक्तिस्थान असते, त्याप्रमाणे महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग आहे.
या मार्गाच्या मध्यभागी महालक्ष्मीची मूर्ती असून अशी रचना असणारे, उत्कृष्ट शिल्पवैभव मिरवणारे हेमाडपंथी असे एकमेव दुमजली मंदिर असावे, असे सांगितले जाते.

क्रमशः