सौभाग्य व ती! - 13 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 13

१३) सौभाग्य व ती!
रस्त्याच्या दुतर्फा प्रकाशणाऱ्या लाईटच्या गोळ्यांमुळे ती नगरी झगमगून निघाली होती. मध्यरात्रीची वेळ. सर्व दुकाने बंद झालेली. क्वचित एखादा माणूस किंवा एखादं वाहन रस्त्यावरून जाताना वातावरणातील शांतता भग करीत होते. तशा वातावरणाशी, त्या रात्रीशी आणि त्या नगराशीही काही घेणेदेणे नसलेली, जीवाची मुंबई करण्यासाठी त्या हॉटेलमध्ये चाललेली पार्टी उन्मादाच्या अत्युच्च शिखरावर होती. महाविद्यालयीन युवक-युवती त्या पार्टीच्या मदहोशीला बळी पडलेले स्पष्ट दिसत होते. त्या उन्मत्त वातावरणाशी बळी पडणाऱ्या युवक युवतींना पार्टीसाठी विशेष असं कारणही लागत नाही. जन्मदिवस, निकाल, एखाद यश अशा अनेक कारणांवरून तसा धिंगाणा घालणे म्हणजे एक फॅशनच-जणू शिष्टाचार! त्या हॉटेलात चालू असलेली पार्टी पूर्ण जोशात होती. महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी सदाशिवची झालेली निवड आणि त्यामुळे त्याने त्या पार्टीचे आयोजन केले होते. मादक पदार्थांच्या नशेपेक्षाही त्याठिकाणी असलेल्या युवतींच्या सौंदर्याची आणि त्यांच्या सान्निध्याची झिंग त्या युवकांना चढू लागली. हळूहळू त्या झिंगेवर स्वार होत एक-एक जोडपं गुल होत होते. परंतु त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. त्यापेक्षा स्वतःच्या साथीदाराकडून अधिकाधिक सुख कसे घेता येईल याकडेच प्रत्येकाचे लक्ष होते. हॉटेलच्या व्यवस्थापकाकडे नोटांचे बंडल फेकून सदाशिव एका युवतीसोबत पसार झाला...
रात्रभर बाहेर राहून सकाळी-सकाळी घरी परतलेल्या सदाला त्याच्या आईने विचारले,
"सदा, तू... तू रात्रभर कुठे होतास रे?"
"आई, आमची निवडणूक होती. मी निवडून आलो."
"तू निवडून आलास? हा घे सव्वा रुपया. जा देवासाठी खडीसाखर आण."
"आई, मला पाच हजार रुपये पाहिजेत."
"पाच हजार? एवढे कशासाठी?"
"आई, असे काय करतीस ग. निवडून आल्याची पार्टी द्यायची आहे. तू देणार आहेस, की... मी..." "नको. नको. घे, माझ्या राजा घे..." असे म्हणत सदाशिवच्या म्हाताऱ्या आईने त्याचा हट्ट पुरवला...
सदाशिव तीन वर्षांचा असताना त्याचे वडील मरण पावले. घरी गडगंज संपत्ती होती. सदाशिव प्रमाणे त्याचे वडील एकटेच होते. त्यांना ना भाऊ ना बहीण! गड्यांनी केलेल्या बदमाशीतूनही भरपूर माल आणि पैसा घरी येत होता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर पोराला सदाशिवच्या आईने त्याचा प्रत्येक हट्ट पुरवला. सदाची प्रत्येक मागणी तात्काळ पूर्ण होत असे. एखाद्या वेळी त्याने मागितलेली गोष्ट मिळण्यासाठी उशीर होताच सदाशिव सारी गल्ली दणाणून सोडत असे. त्याचा हट्ट मागचा पुढचा विचार करता पुरवत गेल्यामुळे तो म्हाताऱ्या आईच्या डोक्यावर बसला, तिच्या डोक्यावर जणू मीरे वाटत सुटला. आठवी-नववी वर्गात शिकत असल्यापासून सदाचा खिसा फुगलेला असल्यामुळे त्याच्याभोवती मित्रांचे कोंडाळे असायचे, गुळाच्या ढेपीभोवतलाच्या मुंगळयाप्रमाणे! त्या संगतीतूनच सदाला नानाविध व्यसने लागली. अगदी दारू आणि क्वचित प्रसंगी आईच्या नकळत घरातले पैसे काढण्यापर्यंत!
त्याच्या वागण्यामध्ये आपोआप बेदरकार वृत्ती आली. रोज नवा ड्रेस बदलावा त्याप्रमाणे तो स्वतःची मैत्रीण बदलत असे. सदाच्या कोणत्याच त्रासाबद्दल, खोडीबद्दल कुणाचीही त्याच्या घरी तक्रार करायची हिंमत नसायची. एखाद्याने तक्रार केलीच तर म्हातारी सदाची बाजू घेवून त्यालाच दुत्कारायची. अनेक वेळा सदाने डोके फोडल्याची तक्रार घेऊन येणारास म्हातारी म्हणायची, 'अहो,माझा सदा मुद्दाम नाही करायचा. त्याने कुत्र्याला किंवा माकडाला दगड मारला असेल. तुमच्या पोराने डोकेमध्ये घातलं असेल त्याला सदा काय करेल?'
ती गल्ली जरी पूर्ण त्यांच्या भावकीची असली तरी चांगल्या-वाईट प्रसंगाशिवाय एकमेकांकडे जाणे-येणे होत नसे. त्यांच्या शेजारी सदाशिवचा दूरच्या नात्यातला विधूर मामा एकटाच राहत असे. त्या दिवशी सदाची आई म्हणाली,
"सद्या, तुला समजले का? अरे, तुझा थेरडा मामा लग्न करतो आहे."
"काय? या वयामध्ये?"
"हो ना. अरे, एवढी मोठ्या जायदादीस वारस तर लागेल. पोरीचे काय बाबा. कुणीही देईल. मुलीचा जन्म गरीबाच्या घरी त्यासाठी होतो. अशा गडगंज जायदादीकडे पाहून कुणीही त्याच्या गळ्यात पोरगी बांधेल रे..."
"पण आई..."
"जाऊ दे ना. आपल्याला काय?" असे म्हणत म्हातारी पूजापाठात दंग झाली. स्वैर, स्वच्छंदी सदाही ती गोष्ट विसरला. संपर्कात येणाऱ्या अनेक मुलींसोबत त्याचे संबंध होते परंतु कुणा एकीशी अडकून राहणे त्याला जमायचे नाही. कामापुरता तो तिच्याशी मैत्री करायचा. दोन-चार वेळा संबंध येताच प्रत्येकीला खड्यासारखे दूर करून पक्षाप्रमाणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात असे.
निर्ढावलेला सदा पिऊनही घरी येई. सुरुवातीला एक-दोन वेळेस आईन त्याला हटकले परंतु सदाने असे काही आकंडतांडव केले, की तिने नंतर त्याला त्याबाबत चकार शब्द बोलायचे सोडून दिले.
अखेर त्या मामाचे लग्न झाले. गावातच लग्न असल्यामुळे सदा लग्नाला गेला. सहजच त्याचे लक्ष वधुकडे गेले आणि नकळत त्याचा हात स्वतःच्या कपाळाकडे गेला. निसर्गही कधी कधी क्रूर होतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ते पती-पत्नी! एका उमलत्या कळीचे भवितव्य अंधारमय होत होते. स्वतःच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत तो म्हातारा संसार थाटत होता. त्या अल्पवयीन नवरीला त्याच्या वंशाचा दिवा तेवविण्यासाठी स्वतःच्या तारूण्याचा बळी द्यावा लागत होता. त्यापायी आजीवन स्वतःची भूक, इच्छा यांचे दहन करावे लागणार होते. लग्न लावून सदाशिव परतला. नंतर स्वतःच्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाला. परंतु काही दिवसानंतर त्याच्या लक्षात आले, की त्याच्या बाहेर जाण्याच्या वेळी ती दारात उभी असायची. नजरानजर होताच हलकेच स्मित करायची. नकळत सदाशिवही तसेच प्रत्यत्तर देवू लागला. त्यादिवशी दुपारी तो काही कामासाठी शेजारच्या वाड्यात गेला. प्रभा एकटीच वाड्यात होती. नेहमीप्रमाणे प्रभाने हसून त्याचे स्वागत केले, तिच्या डोळ्यामध्ये वेगळीच चमक होती. त्या नजरेला नजर सदा देऊ शकला नाही. तरुणींच्या डोळ्यातले आव्हान नेहमीच अलगद टिपणारा सदाशिव त्या आव्हानामुळे अस्वस्थ झाला.
"मामी, मामा नाहीत का?" सदाने विचारले.
"मामी? अरे, हां तू भाचा आहेस. खरे तर या शब्दांनी मी दचकले..." असे प्रभा बरेच काही बोलत होती तिने सदासाठी चहा केला. तिच्या थरथरत्या हातातली कपबशी घेतानाचा स्पर्श बरेच काही सांगून गेला. त्यातला अर्थ जाणणाऱ्या सदाच्या शरीरालाही वेगळी संवेदना जाणवली. तोपर्यंत तशी संवेदना कुणाच्याच स्पर्शाने जाणवली नव्हती. प्रभाच्या डोळ्यातील आव्हान त्याला त्या वाड्यात वारंवार जाण्यासाठी भाग पाडत होते. त्यालाही सोने-चांदीच्या ताटामध्ये जेवायचे डोहाळे लागत होते.
त्या सायंकाळी सदा प्रभाच्या वाड्यामध्ये शिरत असताना त्याला एक मुंगूस आडवे गेले. अलभ्य लाभ होणार या शुभ संकेताने आनंद घेत तो वाड्यात शिरला. चिरपरिचित स्मिताने आणि आव्हानात्मक नजरेने प्रभाने नेहमीप्रमाणे त्याचे स्वागत केले. त्याची धडपड वाढली. तो सोफ्यावर तिच्या शेजारी अंतर राखून बसला. दोघाच्याही शरीरातील कंपन, स्पंदन वाढली. मोठ्या वादळातील होडीमध्ये सापडलेल्या प्रकाशाप्रमाणे धडधडत्या मनाने दोघांची नजर जरी दूरदर्शनवर असली तरी दोघांचे चित्त था-यावर नव्हते. सिनेमामध्ये काही प्रणयदृश्ये येताच दोघांचे श्वास एकमेकांना साद घालत असल्याचे आणि श्वासाची गती एकमेकांना स्पष्ट जाणवत असताना नकळत दोघांचे हात एकमेकाच्या हातात आले आणि..आणि.. पुढील काही क्षणात जे घडू नये ते पडले. एका समाजमान्य नात्यातून समाजाला अमान्य असे दुसरे नाते निर्माण झाले, कदाचित नियतीला हेच अपेक्षित असावे. शरीरसुखासाठी तळमळणारी प्रभा शांत झाली. त्या दिवसापासून सुरू झाले एक दुष्ट चक्र. भरतीचे पाणी जसे जमिनीकडे धाव घेते, वेल झाडास लपेटून घेताना स्वतःचे अस्तित्व विसरते त्याप्रमाणे ते दोघे एकमेकांचे अस्तित्व लपविण्याचा प्रयत्न करू लागले...
एकटे असताना दोघांनाही ते संबंध मान्य नसत, पश्चातापाने होरपळत असत परंतु नवीन नाते आणि त्यामधून मिळणारा आनंद त्यांना स्वस्थ बसू देत नसे. शरीरधर्म कुणालाच चुकला नाही. लग्नापूर्वी शरीरसुखाची चव चाखणाऱ्या प्रभाचे हक्काच्या पुरुषाकडून समाधान होत नसे तेंव्हा तिच्या डोळ्यांपुढे अनेक चेहरे येत विनय, अजय याची प्रकर्षाने आठवण येत असे. त्या दोघांपासून मिळालेले सुख, आनंद प्रभाला लग्न झाल्यावर कधीच मिळाला नव्हता. जे समाधान तिला चोरट्या संबंधातून प्राप्त होत असे तशी तृप्ती तिला हक्काच्या नात्यातून मिळत नव्हती. ज्यावेळी माणूस पहिला अपराध करतो त्यावेळी तो काहीसा भयभीत असतो. परंतु नंतर जसजसे त्याचे कुकर्म वाढत जातात तसतसा तो निर्भय होत जातो. सरावाने निर्ढावत जातो. नंतर ते प्रकार त्याची गरज बनतात. विनय, अजय नंतर प्रभासमोर सदाचा चेहरा येताच ती छाया स्थिर होत असे कारण सदाचे वाड्यातले जाणे-येणे नात्याच्या पड्याआड झाकून जावू शकते. पुढे पुढे सदा तिची गरज बनत गेला. परिस्थिती तशी विचित्र झाली. तिथे नातेगोते, चांगले-वाईट विचार गौण ठरत होते. किंबहुना तसा विचार करायची इच्छा नव्हती.
सदाशिव! तो तर एक भ्रमर होता. नव-नवीन फूल शोधणे आणि त्यातला मधुरस शोषून दुसऱ्या फुलाकडे धाव घेणे हा त्याचा स्वभावधर्म होता. त्याच्यावर कोणाचाही अकुंश नव्हता. परिस्थिती कशीही असो तिला स्वतःकडे वळविण्याच्या कलेत तो प्रवीण होता. त्याच्या त्या प्रवृत्तीला लहानपणीच आळा बसला असता तर? परंतु क्रिकेटप्रमाणे मानवी जीवनात जर-तरला स्थान नसते. परिस्थितीला स्वतःकडे वळवताना सदा कधीच त्या स्थितीचा गुलाम बनत नसे परंतु प्रभाच्या संबधात मात्र तो परिस्थितीच्या आहारी गेला होता. तो जे करतो आहे ते वाईट आहे, चूक आहे हे सदाला निश्चितच समजत होते परंतु परिस्थितीचा गुलाम बनत तो प्रभाच्या सौंदर्याच्या चक्रव्युहात अडकला होता. त्यातून बाहेर पडणे त्याच्या हातात नव्हते, त्याला ते जमतही नव्हते. प्रभा आणि सदाशिव दोघेही प्रवाश्याप्रमाणे एका झाडाखाली बसले होते. झाडावर लटकलेली फळे कच्ची होती. पिकलेली फळे शोधण्याची तसदी त्यांनी घेतली नाही कारण त्याना भीती होती, की काळ त्यांची वाट पाहणार नाही आणि म्हणून त्यांनी कच्ची फळे तोडून खायला सुरुवात केली. काळाच्या चक्रव्युहात दोघेही सापडले होते. तिथून बाहेर पडायचा मार्ग सापडत नव्हता आणि त्यांना तो शोधायची इच्छा झाली नाही. त्यांचे वागणे, दोघांमधील संबंध अनेकांच्या लक्षात आले कारण प्रभाच्या विजोड संसारासोबत तिच्या सौंदर्यावर अनेकांचे डोळे होते. त्याच टपलेल्या डोळ्यांनी सदाशिवला त्या विजोड संसाराचा भेद करताना पाहिले. समाजाने पाहिले तसेच सदाच्या आईच्या नजरेतूनही ते विकृत संबंध सुटले नाहीत परंतु ती बिचारी म्हातारी कडू औषधाचा घोट गिळावा त्याप्रमाणे शांत राहिली. सदाशिवला त्या चक्रव्युहातून सोडविण्यासाठी ती उपाय शोधत राहिली. तिला सापडला एकमेव उपाय तो म्हणजे सदाचे लग्न!
दुसरीकडे प्रभाच्या म्हाताऱ्या पतीनेही त्या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. त्याचा राग अनावर झाला. त्या दोघांनाही किंवा त्या दोघापैकी एकाला संपविण्याचा निर्णय दृढ होत असतानाच स्वतःचे दौर्बल्य लक्षात येताच तो गर्भगळीत झाला. मनात ठाम होत असल्याच्या विचाराचाच गर्भपात झाला. कालातराने प्रभाच्या पतीने असाही विचार केला, की सदाशिवमुळे त्याच्या वंशाला वारस तर मिळेल. तो त्याच्या नातेवाईकाच्या रक्ताचा तर असेल! दूरवरचा का असेना पण सदाशिव त्याचा भाचा होता..भाचा!
स्वतःच्या आईकडून निर्बंधीत झालेल्या सदाने आणि पतीकडून जणू मूक संमती मिळालेल्या प्रभाने प्रणयाचे नवनवीन रंग मुक्तपणे उधळायला सुरुवात केली. तिकडे म्हातारीने सदाच्या लग्नाची चर्चा सुरु केल्याचे समजताच भडकलेला सदा प्रभाला म्हणाला,
"नाही. मी लग्न करणार नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणूनच..."
"तसे नाही माझ्या राजा.अरे, आपले एकमेकांवर प्रेम आहे. तसे संबंधही आहेतच. त्यात कुणीच दुरावा निर्माण करु शकणार नाही."
"मग ती लग्न करुन आल्यावर.."
"अरे,मला जसे हक्काचे कुंकू आहे. त्याचप्रमाणे तुलाही.."
"पण... पण..."
"अरे, माझ्या म्हाताऱ्या नवऱ्याला, तुझ्या आईला आणि समाजालाही आपले संबंध माहिती आहेतच ना. कुणी आपले काही वाकडे करू शकते का? नाही ना? मग त्यात अजून एकीची भर पडली तर बिघडले कुठे?"
"बघ. तू म्हणतेस म्हणून नाही तर या म्हाताऱ्याला संपवून आपण दोघांनी लग्न करावे असा विचार..."
" शु...! शु...! भिंतीलाही कान असतात. अरे, मला तरी तुझ्याशिवाय करमणार आहे का? पण
समाजाच्या रीतीरिवाज काही प्रमाणात पाळावे लागतात. आईच्या समाधानासाठी एखादी बाहुली ठेवल्याप्रमाणे तिला वाड्यात ठेव. नंतर पुन्हा तू आणि मीच..."
" तू म्हणतेस तर ठीक आहे." सदाशिव म्हणाला.
शेवटी सदाचे लग्न झाले. नयन वाड्यात आली. एक चालती बोलती बाहुली... कठपुतळी बनून! सदाच्या तालावर चालताना त्याचे अत्याचार, जुलुम, यातना सहन करणारी नयन! पदोपदी मरणात लिप्त होत जाणारी.. एक शापित सौभाग्यवती...!
००००