सौभाग्य व ती! - 14 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 14

१४) सौभाग्य व ती!
"आल्या का वो माझ्या संजुबाय. तायसाब आणा वो आमच्या बाळीला. किती दिस झाले वो तुमास्नी फावून. अव्हो , ह्यो भला मोडा वाडा कसा खायला ऊठायचा बघा, तुमी नव्हत्या ना म्हणून. बसा बो मीनावैनी बसा. तायसाब, धनी गेलेत गावाला.." मालिनीच्या लग्नाहून परतलेल्या नयन, संजीवनीला पाहून विठाच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
"मीना, बाळू त्या दारात कोण होते?"
"अग, त्या दारात प्रभा..."
"म.....मग तुला काही फरक जाणवला का?" नयनने विचारले.
"फरक? छे! काही नाही..."बाळू म्हणाला.
"अरे, तिच्या कपाळावर कुंकू दिसत होतं."
"तुला वेडी म्हणावं की खुळी. अग, ती विधवा. ती कशाला कुंकु लावेल?" मीना म्हणाली.
परंतु नयनला ते पटलं नाही. राहून राहून तिला साजशृंगार केलेली प्रभा आठवत होती. जणू ती नयनला वाकुल्या दाखवत होती. काहीतरी निमित्त काढून वाड्यात जावं आणि खात्री करून घ्यावी असा विचार तिला सातत्याने येत होता. तशा द्विधा मनःस्थितीत तिने मीनाच्या मदतीने स्वयंपाक केला. जेवण करून मीना, बाळू निघून गेले. कामे आटोपून विठाही गेली आणि मग नयनच्या मनात आले,
'अरे, विठाला विचारले असते तर? परंतु माझे डोळे मला धोका देणार नाहीत. दारात होती प्रभाच. तिच्या कपाळावर कुंकू होते. म्हणजे? तिचे लग्न झाले? कुणाशी? सदाशी? न... नाही सदा माझा नवरा आहे आणि प्रभाचे सदासोबत लग्न झाले असते तर विठाबाईने मला सांगितले असते. विठा ती गोष्ट माझ्यापासून का लपवील?' अशा विचारात ती संजिवनीच्या शेजारी लवंडली आणि विचारांच्या वादळातच झोपेच्या कुशीत शिरली झोपेतही पोर्णिमेच्या भरतीप्रमाणे विचारांची भरती चालूच होती...
'अभिनंदन! आजपासून पती-पत्नी झाला.'
'काँग्रेच्युलेशन.. ' एकमेकांचे अभिनंदन करत प्रतिभा-सदाशिव कार्यालयाबाहेर पडले.
'सदा, हे बघ. आपण आपल्या नवीन अयुष्याची सुरूवात.... आपला हनिमून एखाद्या सुंदर ठिकाणी करू या...'
'ठीक आहे. आपण महाबळेश्वरला जावू या.'
'महाबळेश्वर? वाव! लग्नापूर्वी मी लग्न झाल्यावर महाबळेश्वरलाच हनिमुन साजरा करण्याची स्वप्ने रंगविली होती परंतु स्वप्ने पूर्ण होतातच असे नाही. एखादा तगडा, मजबूत...'
'जस्ट लाईक मी...'म्हणत सदाने कॉलरकडे हात नेले.
'येस! करेक्ट!' प्रभा आनंदातिशयाने चित्कारली.
'अग, मग आपण महाबळेश्वरी जावूया. माझ्यासारखा पती मिळावा हेही तुझे स्वप्न पूर्ण झाले ना?'
'हो रे. पण तुझ्यापूर्वी तो थेरडा माझ्या जीवनात जणू चंद्रासमोर काळाकुट्ट ढग आल्याप्रमाणे डोकावला आणि माझे जीवन अंधकारमय झाले.'
'बाईसाहेब, आता त्या आठवणी काढून माझा आणि स्वतःचा मूड घालवू नका. मी आलोय ना, आता...'
'तू माझ्या जीवनात आल्यापासून माझे हरवलेले चैतन्य, ऊत्साह परत मिळाला. ग्रहण सुटून स्वच्छ चांदणं पडाव त्याप्रमाणे माझे जीवन उजळले म्हणूच या नवीन नात्याची सुरुवात आणि सर्वोच्च आनंद लुटण्यासाठी...'
'आपण महाबळेश्वरला जात आहोत. कुठ-कुठ जायाच हनिमूनला...' सदाच्या आवाजावरून सदा भलताच आनंदित झाला असल्याचे जाणवत होते...
'ना...ही! मी ते होऊ देणार नाही...' असे जोराने ओरडत नयन अचानक उठून बसली. ती घामाने डबडबली होती. घाबरून तिने बाजूला पाहिले. संजीवनी रडत होती..
'अशी कशी झोप लागली बाई? लेकरू कधीपासून रडतेय की...' असे पुटपुटत तिने संजूला जवळ घेतले. दूर कुठेतरी घड्याळात टोल पडत होते. वाड्याबाहेर कुत्रे मोठ्याने रडत होते...
बाहेरचा दरवाजाकुणीतरी जोरजोराने बडवत होतं. 'कोण असेल?' सदाशिवने रात्री येणे सोडले होते. प्रभाच्या 'त्या' चार रात्री तो येतो परंतु एवढ्या उशिरा कधीच येत नाही. मग कोण आले असेल...' मनाशी पुटपुटत धडधडत्या अंतःकरणाने नयन दाराशी आली. दाराच्या फटीतून तिने पाहिले. सदा दिसत असूनही तिने विचारले,
"कोण आहे?"
"दार उघड. मी आहे." सदा म्हणाला. दार उघडत नयन बाजूला झाली. सदाचे नवीन रूप पाहून ती आश्चर्यात पडली.
"असे काय पाहतीस? दृष्ट लावशील. प्रभाला आवडत नाही. तिला त्रास होतो म्हणून मी कायमची दारू सोडली."
"का नाही सोडणार? ती तुमची लाडकी ना? तिने सोडा म्हटलं, तिला आवडत नाही म्हणून तुम्ही दारु सोडली. ती लग्नाची बायको तिचे ऐकावेच लागेल ना. अहो, नुसते तोंडदेखलं जरी म्हणाले असते, तुला त्रास होतेय म्हणून सोडली तर जीवनभर तुमचे पाय धुतले असते हो. नंतरच्या साऱ्या मरणयातनाही हसतमुखाने सहन केल्या असत्या पण नाही तसं क्षणभराचं शाब्दिक सुखही तुम्ही मला देणार नाहीत..." सदाच्या मागे दार लावून विचारांच्या वारूवर स्वार होत खोलीत परतलेल्या नयनला त्याने काही बोलण्याची, विचारण्याची संधी दिलीच नाही. खूप दिवसाच्या उपवासानंतर पंचपक्वान्नाच्या ताटावर तुटून पडावं तसा तो नयनवर तुटून पडला...
सदाचे काम पूर्ण होते न होते तोच संजीवनीने रडायला सुरुवात केली. तशाच नग्न, घायाळ अवस्थेत नयनने तिला छातीशी लावले. संजीवनी पिता-पिता कपडे करणाऱ्या सदाकडे... पित्याकडे पाहत असल्याचे पाहून तो म्हणाला,
"किती टपोरे आणि पाणीदार डोळे आहेत ग हिचे! अगदी तुझ्या त्या बाळूसारखे! का ग आज बाळू लवकर गेला."
"का?"
"दररोज उशिरापर्यंत नसतो ना..." असे म्हणत सदाशिव पुन्हा निघून गेला...
आज... आजच अनेक रात्रीनंतर सदा का आला? का? का? संजूच्या डोळ्याबाबत त्याने आजही टोचले. त्या बोलण्यात हेटाळणी का होती? बाळूबद्दल त्याला काय म्हणायचं होतं? बापरे! तो माझ्या आणि बाळूच्या संबंधावर संशय तर घेत नाही ना? निश्चितच तसे आहे. त्याचे बोलणे कसे गुढ होते, त्यामध्ये अविश्वास होता. तो उगीचच तसे म्हणाला नाही. सदाशिवला माझ्या आणि बाळूच्या संबंधांवर... पण..त्याला काय? ज्याचे संबंध लग्नांनतरही नात्यातल्या स्त्रीसोबत आहेत त्याला आमचे आतेभाऊ-बहिणीचे संबंधही तसेच दिसणार. प्रत्येकाची दृष्टी आणि मनोवृत्ती यामधला तो भेद आहे. कृती तसे विचार याप्रमाणे त्याला नक्कीच संशय येतो. तसेच त्या दोघांमध्ये असलेल्या घाणेरड्या संबंधावर मी ओरडू नये म्हणून तो नसते आरोप करून माझे तोंड बंद करण्याचा मार्ग शोधत असावा. पण का? मी त्याचे काय वाईट केले? कधी तरी त्याला चकार शब्दाने दुखावले का? त्याला..प्रत्यक्ष माझ्या नवऱ्याला दूरच्या नात्याने असलेल्या सासूच्या... पर स्त्रीच्या मिठीत पाहूनही मी शांत राहिले. ते दृश्य म्हणजे माझ्यासाठी स्वतःचे पायताण चावून खाल्ल्याप्रमाणे होते. केवढा मोठा अपमान होता तो माझा? तरीही मी ब्र काढला नाही. तरीही हे माझ्यावर संशय घेतात?...'
दुसऱ्या दिवशी सकाळी सामान घेवून आलेला गडी नेहमीच्या नजरेने पाहत असताना विठाबाई आली. गडी निघून गेला. नयनचे सुजलेले डोळे बघून तिने विचारले,
"का वो तायसाब राती..."
"आले होते ना. त्यांची जन्मभराची वैरीण आहे ना मी. रोजच्या रोज दंश करण्यापेक्षा एकदाच का विष देत नाहीत?" म्हणताना अचानक नयनच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.
"तायसाब, न्हाई.असं करायचं न्हाई."
"मग मी तरी काय करू विठा? सारे सोसयतेय मी..."
"व्हईल. तायसाब व्हईल. तुमचा बी तर्रास कमी व्हईल."
"नाही ग विठा, नाही. या जन्मात तरी ते शक्य नाही. त्या हडळीने त्याला पुरते कवेत घेतलय ग."
"कवरोक घील. अव्हो, डुकरीनच ती. समद्या गावाची घाण खायाची आदत हाय. आता आपल्या धन्याच्या नजरेत ही गोष्ट यील तव्हा बगा..."
"विठाबाई, तोपर्यंत मी या जगातून..."
"न्हाई. मालकीण न्हाई. आस्सा ईच्चारसुदीक करू नगसा. अव्हो, बगा कसं सोन्यावाणी लेकरू हाय तर."
"विठा ही वाकळ आहे म्हणूनच मी या वाड्यात आहे. नाही तर आजवर मी याच विहिरीला कायमचे जवळ केले असते ग."
"न्हाई. तायसाब, न्हाई. मही शप्पथ...या लेकराची आन हाय बगा. चुकून बी आस्सा ईच्चार करायचा न्हाय?"
"विठाबाई, मला का समजत नाही? खूप छळ..."
"मला म्हाईती हाय. तुमच्या जागी तिसरी बाय आसती ना तर ती घाणच संपविली असती..."
"म्हणजे?.."
"तायसाब, फशीरवर गुळ पडला आन् त्येला मुंग्या लागल्या तर आपून काय कर्तो?
"आपण तो गुळ बाहेर फेकून देतो..."
"आस्सा बगा. तसं एखादी बाय आस्ती तर त्या सटवीला..."
"विठाबाई, काय बोलतेस तू?"
"मला ठाव हाय. तुमी तस्स काय बी करणार न्हाईत पर त्या दोगांनी काकाला संपवून डाव साधला ना?" बोलता बोलता काम संपले तशी विठाबाई निघून गेली.
संजीवनीचा रडण्याचा आवाज आला तशी नयन खोलीत आली. संजूला घेवून ती पलंगावर कलंडली आणि सुरू झाले विचारावे एक नवे आवर्तन...
'विठा तसे का म्हणाली? प्रभाला संपवून या प्रकरणावर कायमचा पडदा टाकावा असे तर तिला सुचवायचे नव्हते ? प्रभा -सदाने मिळून प्रभाच्या नवऱ्याचा काटा काढलाच ना? आता त्या दोघांच्या डोळ्यात आपण तर सलत असणार? म्हणजे...म्हणजे... त्यांच्या पुढच्या पावलाचा तर विठाला सुगावा लागला नसेल? प...पण त्यांना तसे अघोरी पाऊल उचलण्याची गरजच काय? त्या दोघांना धुडगूस घालण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तर आहेच शिवाय मी सदाला त्या संबधात काहीही बोलत नाही, टोकत नाही मग त्यांना रस्त्याच्या बाजूस पडलेला दगड हलविण्याची गरजच काय?' विचारांची तशी अनेक गलबते एका-मागोमाग एक मेंदूवर आदळून फुटत असतानाच तिच्या खोलीमध्ये बाळूने लगबगीने प्रवेश केला. त्याला पाहताच सदाने रात्री बोललेले वाक्य तिला आठवले. बाळू आल्याबरोबर म्हणाला,
"नयन, तू त्यादिवशी पाहिलेले खरे आहे..."
"काय?" नयने विचारले खरे पण बाळू म्हणाला ते ऐकून नयनच्या संतापाला जणू पाण्याची फोडणी बसली.
"मी आत्ता इकडे येताना ती दोघे नटूनथटून बाहेर जाताना माझ्याकडे पाहून हसत होती आणि... आणि तिच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र होते..." ते ऐकून नयनच्या शरीरातले रक्त जणू गोठल्या गेले...
००००