Saubhagyavati - 15 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 15

१५) सौभाग्य व ती!
"काय चालल तायसाब?" कामाला आलेल्या विठाबाईने विचारले.
"रोजचेच. माझ्या कर्माची फळे."
"छकुल्या बाय ऊठल्या न्हाईत?"
"नाही ऊठली. विठाबाई, तू सुद्धा लपवलस ग?"
"मव्ह करम फुटलं. तायसाब, लपवलं आन म्या? त्ये काय?"
"हे...हेच... मला तरी कुठे सांगवते? मी लग्नाला गेले आणि ह्यांनी काय काय धुडगूस घातला ते..."
"ताईसाहेब, रोजचं मड त्येला कोण रड?..."
"रोजचे नाही गं. त्या सटवीसोबत ह्यांनी लग्न..."
"काय? जीभ झडो मही पर म्या काय ऐकत्ये तायसाब? म्या सपनात तर न्हाई? लगीन आन् त्येंच? त्वांडातून..."
"तुला तोंडातून काढवत नाही पण विठा, हे खरे आहे. मला सवत आणली ग त्यांनी. त्यांचे काय घोडे मारले ग मी? " असे विचारताना नयनला रडू कोसळले.
"न्हाई आस्स न्हाई. गुमान घ्या. घडू न्हाई ते घडलं. त्येला कोण काय करणार? भोग म्हन्त्यात त्यो ह्योच. बायाचा जलमच ह्यो आस्सा. ह्ये नौरे काय बी करतील अन्न बायांनी उघड्या डोळ्यांनी सम्द फात चूल आन् पोऱ्हं सांबाळायचे..."
"नाही. विठा नाही. मी हे सहन करणार नाही. आजवर मी अनेक सोसले. मरणापलीकडले दुःख झेलताना तोंडातून चकार शब्द काढला नाही. आता मी नाही करणार. अशी जिवंतपणी समाधी नाही घेणार."
"तायसाब, तुमी, बायमाणूस वर ही पोरगी गळ्यात. काय करशाल तुम्ही? आपलाच दाम खोटा मानून गप ऱ्हावा.आपलेच दात आन व्हट बी आपलेच..."
"नाही ग विठाबाई, नाही. बैल गाभण तर गाभण असे मी म्हणणार नाही."
"मालकीन, ऐका. बैल गाभण हाय आस्स म्हणताना बैल दूध देत्ये हे बी म्हणावं लागल. बायजी, या बारकीसाठी अन् सोत्तासाठी बी."
"विठाबाई नाही."
"पिसाळल्या कुत्र्यासंग खेटायच नस्तं."
"त्या पिसाळलेल्या कुत्र्यापुढे मी भाकरी वा हाडकाची नळी धरणार न्हाई तर त्याला गोळी घालीन."
"अशानं तुम्ही सोत्ताचा सौंसार मोडसाल, सोत्ताच्या पायावर धोंडा पाडशाल."
"संसार? मोडण्यासाठी आता काय शिल्लक आहे गं? पायावर धोंडा नाही तर आख्खा डोंगर कोसळलाय."
"आता कसं सांगू मालकीन? जिंदगानीतून ऊठाल."
"जे होईल ते पाहू. हा वाडा सोडावा लागला तरी बेहत्तर. या बंदीखान्यात, नजरकैदेत राहण्यापेक्षा बाहेरच्या जगात... मोकळ्या हवेतील समाजात..."
"खुल वातावरण? मोकळा समाज? तायसाब, मोकाट ढोरावानी जीण होते बगा. कुणी बी येते. सावरायच्या निमित्ताने दिलेला हात शरीरावरून फिरायला येळ लागत न्हाय आन् मग ढोरास्नी गजेघाटात घातल्यावाणी त्या बाईला गजेघाटात म्हंजे हिरव्या माडीवर जावे लागत्ये. त्या कुंटणखान्यात रातीतून असे कैक धनी येत्यात."
"मग मी काय करू विठा? मरू? मरणाला मी भीत नाही. रोज-रोज मरण्यापेक्षा एकदाच कायमचे मरावे असे नेहमी वाटते पण दरवेळी ही-ही छकुली आडवी येते ग..."
"हां. तायसाब हां. आता हिच्यासाठी तुमास्नी सम्द सोसलं फाजेत..."विटा बोलत असताना त्यांच्याजवळ येत सदा म्हणाला,
"काय गाऱ्हाणे चाललेत?" ते ऐकून तापलेल्या तव्यावर पाणी पडावे तशी नयन कडाडली,
"लाज नाही वर तोंड करून विचारायला?"
"तू..तू माझी लाज काढतेस?" सदाने रागारागाने विचारले.
"मग भीते का? आजपर्यंत खूप सहन केले परंतु आता मी चूप बसणार नाही. तुम्हाला जनाची नाही पण मनाची तरी असावी ना?"
"काय म्हणालीस हरामखोर? पुन्हा लाज काढलीस?" असे विचारत सदाने हात उगारला परंतु त्याला अडवत विठाबाई म्हणाली,
"तुमास्नी मही आन हाय धनी. अव्हो, लई सोसत्यात हो ह्या. मालक काय बी करा पर..."
"तू कोण ग? चल निघ..."
"न्हाई मालक म्या गेल्यावर..."
"हरामखोर. चल निघ..." असे म्हणत सदाने विठाबाईस धरून फरफटत वाड्याबाहेर नेले. दाराला आतून कडी लावून पुन्हा नयनजवळ येत तो कडाडला,
"त्या सटवीच्या जोरावर तुझ्या उड्या.. बोल आता..."
"तुम्ही दररोज त्या घुबडीच्या साडीत लपत असताना मी काहीही बोलले नाही. आजवरचे तुमचे सारे चाळे, यातना मी सहन केल्या हो.. लग्नापूर्वी किती स्वप्ने होती माझी. स्वतःचे घर, सुखी संसार आणि पदोपदी प्रेम करणारा पती. ही स्वप्न पाहणं चुकलं का? लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री माझ्या स्वप्नाचा महाल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे तुम्ही उद्ध्वस्त केला. मी शब्दाने बोलले नाही. तुम्ही मात्र रोज रात्री स्वतःचा हक्क बजावत होता, ओरबाडून घेत होता त्यावेळी तसे सुख मलाही हवे असेल हे का विसरता? दोन बोटे लांब मंगळसूत्र आणि कुंकासोबत सौभाग्य दिले म्हणजे का सारे सुख मिळाले? माझ्याही सुखासंबंधी काही अपेक्षा असतील असा विचार तुम्ही कधी केलात? ज्याच्या विश्वासावर मी माहेरच्या माणसाना सोडून सारे विसरून तुमच्यासोबत आले. स्वतःचे शरीर तुम्हाला अर्पण करून मला काय मिळालं? तुरूंगयातना! दररोज रात्री तुमचा राक्षसी भोग आणि नरकीय यातनाच ना? तरीसुद्धा मी चूप राहिले. दररोज रात्री नशिबात असणारे मरणही गुपचूप स्वीकारले. पण तुमचा हा...हा धक्का मला नाही सहन होत. तुम्ही दुसरे लग्न केले आणि तेही मामीशी? नात्याने दूरचे असतीलही पण तुमच्या विकृतीआड येणाऱ्या मामांनाही तुम्ही संपवलंत..."
"काय म्हणालीस? जीभ हासडून देईन. आमच्या लग्नाला तू..तू होकार दिलास ना?..."
"तुमच्या लग्नासाठी मी होकार दिला?"
"ते बरे विसरलीस साळसूदपणे? आणू का ती कॅसेट?"
"बापरे! म्हणजे त्या रात्री गोड-गोड बोलून..माय गॉड! त्यापेक्षा मलाच का नाही संपवत? मामांना संपवलं.."
"जीभेला काही हाड तुझ्या?"
"ते कुणाच्याही नसते? तुम्ही राजरोसपणे मजा मारणार आणि मी रोज विषाचा प्याला पचवून गप्प बसू?"
"मग काय करशील ग? मारशील? खून करशील?"
"तसा आततायीपणा मी करणार नाही. तो माझा नाही तर तुमचा स्वभाव. मारा ना मला. लाकडाने मारा, चटके द्या. नाही तर कायमचे डोळे बंद करा आणि मोकळे व्हा त्या हडळीसोबत मजा मारायला..."
"क..काय तू तिला..."
"हडळ नाही तर काय? मी तिच्यापेक्षा शतपटीने सुंदर असताना तुम्हाला तिच्यामध्ये..."
"ते तुला नाही समजणार..."
"पण आता तुम्हाला तिच्यासोबतचे संबंध तोडावे लागतील."
"कुणी लग्नाच्या बायकोला सोडतो का ग?"
"माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये फरक नाही?"
"आगावूचे प्रश्न विचारू नकोस. सत्य तुला स्वीकारावेच लागेल. शिवाय तूच आमच्या लग्नाला परवानगी दिली आहेस. हे तू विसरू नकोस. या घरात तुझे स्थान आहे त्यापेक्षा तिचे स्थान किती तरी पटीने अधिक वरचे आहे."
"हां. हां. तिला आता या घरात आणा. पण लक्षात ठेवा, माझेही नाव नयन आहे. एक तर ती या वाड्यात राहील किंवा मी." नयन रागारागाने म्हणाली.
"घाबरू नकोस. ती या वाड्यात येणार नाही. या वाड्यात तू आणि तूझा तो... बाळू... दोघे मोकळे..." असे म्हणत हास्याचा गडगडाट करीत सदाशिव निघून गेला.
शेजारी वाड्याच्या दारात उभी असलेली प्रभा पुढे येत म्हणाली, "काय झाले रे सदा?"
"अशी कोणती हिंदुस्थानी स्त्री असेल जी सवत पसंत करेल? पण आज ती फारच टरटर करीत होती..." बोलत बोलत दोघेही एकमेकांच्या कमरेत हात घालून खोलीत आले. सोफ्यावर चिंताक्रांत बसलेल्या सदाला प्रभाने विचारले,
"काय विचार करतोस?"
"विचार नाही ग परंतु नयनचा आजचा अवतार फारच आक्रमक होता. वेळीच तिची नांगी दाबावी लागेल."
"नाही. सदा नाही. तिचाही थोडा विचार करावा..."
"म्हणजे प्रभा आपण चुकलो..."
"मला तसे म्हणायचे नाही. अरे, आपण सारेच परिस्थितीचे गुलाम झालो आहोत. त्यावेळी त्या स्थितीत तसे वागणे अपरिहार्य होते. आपण काय करतो, ते वाईट का चांगले याचा विचार करण्यासही वेळ न मिळता प्रत्येक कृती सहज घडत गेली. प्रत्येक वेळी आपण इतके अगतिक होतो की जे घडले त्यापेक्षा वेगळ काही घडवू शकलो नसतो आणि घडलेही नसते."
"म्हणजे आपण केलेला मामांचा..."
"चूऽप! भिंतीपलिकडे कुणी राहते आणि प्रत्येकाचे कान इकडेच लागलेले असतात हे विसरू नकोस."
"नाही. प्रभा नाही. नयन आता पूर्वीसारखी राहिली नाही. स्वतःच्या संसाराविषयी ती जास्तच जागरूक होतेय. ती एक अपमानीत होणारी शिक्षित स्त्री आहे. अशा स्त्रिया चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे असतात. वेळ येताच, संधी मिळताच त्या समोरच्या व्यक्तिचा कोथळा बाहेर काढायला मागेपुढे पाहत नाहीत. यांच्यासाठी एकच उपाय तो म्हणजे वेळीच त्यांचे दात त्यांच्याच घशात घातले पाहिजेत. तिला संपवायलाच हवं..."असे रागारागाने म्हणत सदा ऊठला. त्याचा आवेश पाहून घाबरलेली प्रभा पुढे होवून म्हणाली,
"नाही. सदा, नाही. मनातला विचार काढून टाक. मी तुला असे काहीही करू देणार नाही..."
"नाही. तिला संपवलेच पाहिजे. जोवर ती अवदसा दोघांमध्ये आहे तोपर्यंत आपला संसार सुखी होणार नाही. एखाद्या..."
"सदा, विचार कर. तिचा मृत्यू हा एकमेव उपाय नाही रे. अरे, तिचा मृत्यू आपल्याच संसारावर घाला ठरेल. तुला आणि मला फाशीकडे नेईल. तू दुसरा विचार..."
"मी करू तरी काय?..."
"जे आता करतोस तेच कर. रोजचा छळ वाढव. तिला भरपूर मार, डाग दे. तिला असे त्रासवून सोड की ती तो वाडाच काय परंतु हे गावही सोडेल आणि मग..."
"सुरू होईल...आपला राजाराणीचा संसार..." असे म्हणत सदाने प्रभाला मिठीत घेतले...
००००

इतर रसदार पर्याय