सौभाग्य व ती! - 19 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 19

१९) सौभाग्य व ती!
त्यादिवशी सकाळी नयन शाळेत जाण्याची तयारी करत असताना बाहेरून आलेले भाऊ आईला घाबऱ्या स्वरात म्हणाले, "अग...अग...चल..."
भाऊचा तसा घाबरा आवाज, अवतार बघून घाबरलेल्या आईने विचारले, "क...काय झाले हो?"
"अग, कमाचा नवरा सिरीयस आहे. मी येतानाच अण्णा, मंगल, शोभा, साधनाला सांगून आलो. चल लवकर..."
"शिव...शिव...शंकरा, हे काय आरिष्ट आणल रे बाबा, कृपा असू दे रे बाबा..." असे म्हणत म्हणत आईने जाण्याची तयारी सुरू केली. काही क्षणातच नयनच्या आत्या मंगल, शोभा, साधना, अण्णा, काकी, तिन्ही आत्यांचे यजमानही पोहचले. अवघ्या दहा मिनिटांत सारी मंडळी जीपमध्ये निघूनही गेली. कुणीही नयनला 'चल येतीस का?' असे विचारले नाही.
थकल्या पावलांनी नयन शाळेत पोहचली. पाहता-पाहता शाळा उघडून तीन वर्षे झाली होती. चौथीचा वर्गही उघडला होता. संस्थाचालक खांडरे नयनच्या कामावर खूश होते. चार वर्गात भरपूर विद्यार्थी होते. त्यामुळे दुसरे चार शिक्षकही नेमले होते. संजीवनीलाही पहिल्या वर्गात टाकले होते. पोरगी मोठी बुद्धिमान, एक पाठी होती. सांगितलेले पटकन समजून घेण्याची उपजत क्षमता तिच्याजवळ होती. त्यादिवशी कमाआत्याकडची बातमी ऐकल्यापासून नयन बेचैन होती. राहून
राहून तिच्या डोळ्यापुढे कमाआत्या आणि मामांचा चेहरा येत होता. भाऊ आणि मामांचे वय सारखेच म्हणजेच पन्नाशीचे होते. मामा अंत्यवस्थ ही कल्पनाच तिला करवत नव्हती. त्यांची मुलगी बेबीसुद्धा तिशी गाठून अविवाहित होती. मामांकडून हातऊसने घेतलेले पैसे भाऊ-अण्णांच्या घशामध्ये गेल्याप्रमाणेच होते. मात्र त्यामुळे मामांनी मिळवला होता दोन्ही भावांचा अबोला. रक्कमही भरपूर होती. अण्णा भाऊंच्या गरजेच्यावेळी केवळ एका शब्दावर मामांनी तेवढी रक्कम दिली होती, तीही कमाआत्याच्या मनाविरुद्ध! बेबीचे लग्नाचे वय झाले तेंव्हा मामांना पैशाची गरज होती. परंतु अण्णा-भाऊ पैसे देत नव्हते आणि दुसरा पैसा नसल्यामुळे बेबीचे लग्न लांबत असल्याचे पाहून मामांनी हाय खाल्ली होती. नयन स्वतःच्याच विचारात असल्याचे पाहून गायतोंडें नावाच्या शिक्षकाने विचारले,
"ताई, बरे नाही का?"
"तस नाही भाऊ. मामा अंत्यवस्थ असल्याचा निरोप आला..."
"सारी कामे राहू द्या. तुम्ही शांत बसून राहा. मी पाहतो सारे..."
संजीवनी जरी वयाने लहान असली तरी अनुभवाने ती बरेच शिकली होती. भाऊ, मामा, मावशी यांच्यासमोर ती फारशी जात नसे. आजीसोबत मात्र ती बसत असे. त्यादिवशी दुपारी नयन बसलेली असताना संजीवनी तिच्याजवळ येवून म्हणाली,
"आई, मला एक सांग ना ग?" नयन तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत असताना संजू पुढे म्हणाली, "मला मामा आणि मावशी का बोलत नाहीत ग? त्या छकुलीचे आजोबा बघ कसे फिरायला नेतात, तिचा लाड करतात मग आपले भाऊ मला का ग नेत नाहीत? आई, आपण माझ्या बाबांकडे जाऊ या ना. बाबा,कुठे आहेत गं? ते छकुलीचे बाबा की नाही ऑफीसातून आल्याबरोबर तिला सायकलवर फिरायला घेवून जातात. माझे बाबा मला नेतील का ग?" परंतु आई काहीच बोलत नाही आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं पाहून संजीवनी पुढे म्हणाली,
"आई, तू रडू नकोस ग, तू रडताना मलाही रडू येत ग. बर मी पुन्हा नाही..."
"माझी सोनी..." असे म्हणत नयनने संजीवनीस कवटाळले...
बाहेर मुलांचा गोंधळ ऐकू आला. शाळा सुटली होती. थकल्या पावलांनी, धडधडत्या अंतःकरणाने नयन घरी पोहोचली. तोपर्यंत जीप परतली होती. सर्वांचेच चेहरे काय घडले होते ते सांगत होते. जीप पोहचण्यापूर्वीच सारे आटोपले होते. मामांनी या स्वार्थी जगाचा निरोप घेतला होता. तरणीताठी, लग्नाची मुलगी आत्याच्या गळ्यात बांधून मामा मोकळे झाले होते. नयनला पाहताच तिन्ही आत्यांच्या अश्रुंचे बांध फुटले. नयनही स्वतःस सावरू शकली नाही. मामाच्या मृत्यूचा प्रचंड धक्का आई, काकीलाही बसला होता. आई, काकी आणि कमात्या यांच्यामध्ये नात्यापेक्षा मैत्रीचा धागा घट्ट विणला गेला होता. तिघीजणी जवळपास एकाच वयाच्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये वेगळाच सुसंवाद साधला गेला होता. प्रत्येक लग्नकार्यामध्ये कमात्याचा सिंहाचा वाटा असायचा. प्रसंगी अण्णा-भाऊसुद्धा तिचा सल्ला घेत असत. लग्नाचा असो, कोणत्या कार्यक्रमाचा असो वा सुट्ट्यांचे निमित्त साधून एकत्र आलेल्या कुटुंबाचा स्वयंपाक म्हणजे नाकीनऊ येत. परंतु काकी-आईच्या मदतीला कमात्या असली म्हणजे मग कुणी स्वयंपाकाकडे पाहण्याची गरजच नसे. भल्या मोठ्या कणकीच्या उंड्याची उंचच उंच पोळ्यांची चळद केंव्हा होई हे त्यांनाही समजायचे नाही. गप्पा, गाणी आणि विनोद यामुळे स्वयंपाकघर दणाणले जाई...
पंधरा दिवसांचा दुखवटाही संपला. मामांच्या गोडजेवणावरून सारे परतले. हळूहळू सारे स्वतःच्या कामात आणि शहरी वातावरणात रूळले. रोज येणारी मामांची आठवण नंतर कधीतरी प्रसंगोपात येवू लागली. मामांना जाऊन काही महिने होत नाहीत तोच भाऊंनी आशा आणि माधव दोघांचीही लग्ने ठरविली. दोन्ही लग्ने एकाच मांडवामध्ये उरकण्याचा त्यांचा विचार सफल झाला. शहरात स्थायिक झाल्यापासून पावलोपावली व्यवहार पाहणाऱ्या भाऊंनी तिथेही व्यवहार साधला होता. एकाच मांडवात, एकाच खर्चामध्ये दोन लग्न ऊरकण्याचा! तसे पाहिले तर भाऊंचा दृष्टिकोन बरोबर होता. गावी असताना उधळपट्टीमुळे वतनदारी गमावलेले भाऊ अनुभवातून शहाणे होत एक-एक पाऊल व्यवस्थित टाकत होते. दोन्ही लग्ने स्वतःच्याच घरात व्हावीत या भाऊंच्या विचाराने ऊसळी मारली आणि लगेचच त्यांनी शहराच्या मध्यभागी काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या प्लॉटवर बांधकाम सुरू केले. दिवसागणिक बांधकाम प्रगतीपथावर होते. माधवला मिळालेल्या हुंडयामधून भाऊनी सुनेसाठी चांगले दागिने बनवून घेतले. दुसरीकडे नयनच्या कोर्टाच्या कामासाठी तिचा एकेक दागिना घेऊनही ते तारखेला जाण्याचे टाळत असत. एखादेवेळी नागपूरला गेले तरी स्वतःजवळ पेसे नसल्याचे भासवून जाण्या-येण्याचा खर्च मात्र नयन जवळून घेत असत. घराचे बांधकाम आणि लग्नाची कामे असल्यामुळे भाऊंना वेळ नव्हता म्हणून नयन तारखेच्या दिवशी नागपूरला पोहचली. सकाळीच ती वकिलांच्या घरी गेली. तो प्रशस्त बंगला वकिलांचे ऐश्वर्य आणि त्यांच्या कमाईची साक्ष देत होता...
"नयनताई, तुम्ही स्वतःच्या तोंडाने त्यांच्या लग्नासाठी दिलेली संमती यामुळे केस भलतीच..." वकील सांगत असताना नयन मध्येच म्हणाली,
"पण आपण मार्ग काढू असे भाऊंना सांगितलं..."
"काऽय? मी असे सांगितले? अहो, केस सूर्यप्रकाशाप्रमाणे..."
"पण वकिलसाहेब, आपण त्यासाठीच अकरा हजार..."
"काय म्हणता? ताई, भलतेच आरोप करू नका. आजवर मला फक्त दीड हजार रुपये मिळालेत..." वकिलांचे ते बोल ऐकून नयनला प्रचंड धक्का बसला. याचा अर्थ भाऊंनी तिला...स्वतःच्या पोटच्या पोरीला फसविले होते. भाऊंकडून... प्रत्यक्ष जन्मदात्याकडून तिला ही अपेक्षा नव्हती परंतु शेवटी भाऊंनी प्रहार केलाच होता...
वकिलाच्या गाडीतून नयन न्यायालात पोहोचली. ती कारमधून उतरत असताना शेजारी थांबलेल्या गाडीतून उतरलेले जोडपे पाहून नयन दचकली... ते होते.. सदा आणि प्रभा! तिचे सर्वस्व! तिचा पती! नयनकडे तिरस्कारयुक्त दृष्टी टाकून एका मुलीच्या...जी लंगडी होती... हाताला धरून ते दोघे पुढे गेले. सदाशिव बराच स्थुल दिसत होता. नयन तिथे असतानाच त्याने प्रभाच्या सांगण्यावरून पिणे सोडले होते. त्यामुळे त्याची चालही सुधारली होती. तिच्या संसाराच्या थडग्यावर त्या दोघांचा संसार चांगलाच फुललेला दिसत होता. नयनची स्वतःची संसारवेल मात्र करपली होती. तिकडे संजीवनी वडिलांच्या प्रेमासाठी तडफडताना तिचेच बाबा तिच्या हक्काचे प्रेम तिच्या सावत्र बहिणीवर भरभरून उधळत होते. ती स्वतःच्या विचारात असताना न्यायालयाचे काम संपले. काय झाले? काय नाही ते तिला काहीच समजले नाही. तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. वकिलांनी तारीख पुढे ढकलली असे सांगताच नयन न्यायालयाबाहेर पडली आणि सरळ बसस्थानकावर आली. बस माहेराकडे धावत होती मात्र मन सासरभोवती घिरट्या घालत होते...
मी सासर सोडले आणि त्यांना रान मोकळे झाले. मामांच्या रूपातला काटा त्यांनी अगोदरच दूर केला होता आणि त्याच रात्री गोडीगुलाबीने माझी संमती घेऊन माझे हात तोडून टाकले होते. त्या रात्रीच सदा किती प्रेमाने वागला. ते त्याचं फसवं, मायावी रूप मी का ओळखू शकले नाही? त्याच्या त्या रूपाने माझ्या गोंधळलेल्या अवस्थेचा फायदा उचलत मला बरोबर जाळ्यात अडकवले. किती भयंकर चूक केली मी? त्याचे प्रेम तसे अचानक का उफाळले असा साधा विचारही माझ्या मनाला का शिवला नाही? एखादा दिवस थांबून... विचार करून आणि इतर कोणास नाही पण माझ्यावर बहिणीप्रमाणे प्रेम करणाऱ्या विठाबाईस मी का विचारले नाही...' ती विचारात गुरफटलेली असताना वाहक म्हणाला,
"बाई, तिकीट घ्या..." वाहक तिकीट देवून जाताच दुरावलेल्या विचारांच्या माशा पुन्हा घोंघावत आल्या ...
'कशी असेल विठाबाई, तिने मला किती सांभाळलं, जपलं? तिचा आधार होता म्हणून मी तेवढे दिवस सासरी राहू शकले. ती नसती तर मी फार पूर्वीच जीवाचे काही बरेवाईट केले असते किंवा सासर सोडून माहेरी गेले असते. मी निघून आल्यावर विठाबाई प्रभाकडे कामाला राहिली असेल? स्वाभिमानी विठाला तिथे काम करवले असेल? मी तिला न बोलता, न सांगता निघून आले तेंव्हा तिला काय वाटले असेल? का काही दिवसात तीही मला विसरली असेल? जिथे जन्मोजन्मीचे संबंध, ऋणानुबंध क्षणात तुटतात. आई, बाप, बहिणी, भाऊ, नवरा, बायको या नात्यांची शाश्वती राहिली नाही तिथे मानलेले नाते कुठवर लक्षात राहतील? आज सदाने तोंडदेखलं तरी विचारलं का? माझी, संजीची, माधीची साधी चौकशी केली नाही. तो तरी का विचारेल? संजीवनीवरून बाळूशी तसले संबंध जोडताना सदाला काहीच कसे वाटले नाही? अर्थात त्याला काय वाटणार?
एका पवित्र नात्याशी त्यानेच अपवित्र नाते जोडून घाणेरडे संबंध जोडले त्याला सारे नाते-संबंधात तसेच विकृत नाते दिसणार ' बसने मोठे वळण घेतले. बस एका स्थानकामध्ये शिरत होती. तिने खिडकीतून बघितले आणि मनाशीच म्हणाली,
'अरे, हे तर माझ्या सासरचे गाव...माझ्यासाठी नरक ठरलेले सासर! अपेक्षाभंग, मरणयातना देणारे हेच ते सासर! केवढी मोठ्ठी सांसारिक स्वप्ने घेवून पहिल्यांदा मी या गावामध्ये पाय ठेवले होते परंतु याच सासरने मला हताश, हतबल करून माझे सर्वस्व हिरावले होते. सासरचे अनेक घाव झेलून हळवी झाली होती. हेच का स्त्रियांचे जीवन? स्वतःचा, स्वतःच्या भावनांचा बळी देऊनच त्यांना संसार उभारावा लागतो. पुरुषांच्या मनाप्रमाणे स्त्रियांना चालावेच लागते. स्वतःचे अस्तित्व विसरून त्यांना पतीचे, मुलांचे व्यक्तिमत्व घडवावे लागते. परंतु मला तशी संधी माझ्याच नवऱ्याने दिली नाही. मला माझ्या संसाराचा बळी देवून सवतीचा संसार फुलताना पाहण्याचं दुर्भाग्य भोगावं लागलं...
००००