Saubhagyavati - 21 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 21

२१) सौभाग्य व ती !
"काय ताई, संजीवनी गेली का?" नयन नेहमीप्रमाणे शाळेत पोहचताच गायतोंडेनी विचारले.
"हो भाऊ. तिला सकाळच्या बसमध्ये बसवून दिले."
"ताई, संजीवनीच्या बाबतीत मात्र तुम्ही चांगला निर्णय घेतलात."
"काय करू भाऊ, एक वेळेस वाटले, आपली मुलगी आपल्या हातांनी घडवावी परंतु तिच्या भावनांचा कोंडमारा होऊ लागला. मन मारून तिला घरात राहावे लागे. कधी कुणाचे कौतुकाचे चार शब्द नाहीत. पाठीवर शाबासकीची थाप मिळण्याऐवजी रट्टा मात्र मिळत असे."
"संजीवनीची ती शाळा आणि वसतिगृह नावाजलेले आहे. तिथे तिच्या भावनांना, गुणांना चांगले उत्तेजन आणि व्यासपीठ मिळेल. संजीवनी तिथे नक्कीच नाव कमावेल..." असे म्हणत गायतोंडे त्यांच्या वर्गावर गेले...
जुलै महिन्याचा पहिला आठवडा सुरू होता. बाहेर पावसाची रिपरिप सुरु होती. आकाशात काळ्या ढगांनी केलेल्या दाटीप्रमाणे नयनच्या मनातही नाना घटनांची दृश्यं सजीव होत होती...
लग्न झाल्यापासून मीराने माधवला स्वतःच्या मुठीत जणू बंद केले होते. माधवच्या लग्नानंतर काही दिवसांनंतर घडलेला प्रसंग! नेहमीप्रमाणे त्यादिवशी सकाळी साडेपाचला नयन उठून न्हाणीघराकडे जात असताना माधवच्या खोलीतील कुजबूज तिच्या कानावर पडली.
"अहो, ह्या आपल्या घरी किती दिवस राहणार आहेत?" मीराने विचारले.
"कुणाबद्दल बोलतेस तू?" माधवने विचारले.
"दुसरे कोण? नयनताई! त्या समोर दिसल्या की आपल्या राशीला शनी आल्याचा भास होतो. स्वतःच्या संसारावर पाणी सोडून आल्यात आणि आता आपला संसार बुडवतात की काय ? नेहमी रागातच. आठ दिवस झाले आपले लग्न होऊन परंतु कधी प्रेमाचा चकार शब्द बोलल्या असतील तर शपथ! जणू त्यांच्या आजच्या दशेला मीच कारणीभूत आहे. नाही बोलल्या माझ्याशी तर माझे काही खेटर अडणार आहे का? परंतु शांत तरी बसतात का? डोळ्यातून सदानकदा पाण्याच्या धारा वाहतात. अशा नेहमीच्या रडण्याने आपल्याकडे एखादी वाईट घटना घडली तर?"
"अग, जाऊ दे ग. शांत बस."
"कशामुळे शांत राहू? तुम्ही काय दिवसभर घंट्या मारत फिरता. इथे मला सारे सहन करावे लागते. आजकाल तीन-तीन माणसांचा खर्च परवडतो का? आपल्या अंगणात का पैशाचे झाड आहे? आपण का धर्मशाळा काढलीय? आपला संसार आता कुठे सुरू होतोय. हळूहळू बाळसेही धरेल. आत्तापासून असा अवाढव्य खर्च परवडेल? काट्ट्या तरी धड आहेत? हे दे, ते दे, हे फोड, ते फोड सारखी कटकट सुरू शिवाय पोरींना बोलायचीही सोय नाही. नयनताई, समोर आल्या की मला तर बाई भीतीच वाटते. साधे बोलतानाही आवाज केवढा असतो. स्वतःच स्वतःचा संसार मोडून आल्यावर गुमाने मिळेल तो तुकडा गिळावा का नाही? असेल भाऊ-अण्णांची चूक, पण आपण त्याचे प्रायश्चित्त का करावे? हे बघा, तुम्हाला सांगते, एक तर तुम्ही सांगा, नाही तर मी त्यांना स्पष्टपणे बजावून सांगते. काय होईल? नणंदेला घराबाहेर काढले म्हणून मीच बदनाम होईन ते चालेल मला..."
"हे बघ, माझ थोडं ऐकून घे."
"त्यांच्याबाबतीत मुळीच ऐकणार नाही. मी शेवटचे सांगते, माझ्या संसारात मला कुणाची लुडबुड चालणार नाही. भाऊ-आई माझ्या आईबाबांप्रमाणे. मी त्यांचा सासुरवासही सहन करेन..." तो संवाद ऐकणारी नयन संतापाने लालेलाल झाली. त्याच फणकाऱ्यात सारे आटोपून ती शाळेत गेली. गायतोंडे आधीच पोहोचले होते. त्यांना नयन म्हणाली,
"भाऊ, मला एक चांगली खोली पाहून द्या..."
"ताई, अचानक हा असा आततायीपणा..."
"शहाणपणाचा निर्णय म्हणा! सोनाराने कान टोचल्याप्रमाणे मी जागी झाले..." असे म्हणत नयनने सकाळी ऐकलेला संवाद गायतोंडेंना सांगितला. ते ऐकून गायतोंडे म्हणाले,
"सगळं खरे असले तरीही मी तुम्हाला वेगळे राहण्याचा विचार करू नका हेच सांगेन..."
"प..पण का?"
"मी पूर्ण विचारांती बोलतोय. ताई, गळ्यात मंगळसुत्र आहे पण पती नाही हे समजूनही नावाला का होईना बाप, भाऊ आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात."
"भाऊ, तुम्हाला काय म्हणायचे आहे?"
"ताई राग मानू नका. भाऊ म्हणताय म्हणून सांगतो, नवऱ्यापासून वेगळी राहणारी स्त्री या समाजात उजळ माथ्याने राहू शकत नाही. अशी बाई समाजात येताच ह्या समाजामध्ये टपून बसलेले लोक तिच्यासाठी स्वतःची शयनगृहं उघडी करतात आणि मग काही महिन्यांनी कुंटणखान्याची दारे तिच्यासाठी खुली होतात. तुमच्यामागे हे दुष्टचक्र अजूनपर्यंत लागले नाहीत त्यामागे आहेत तुमचे भाऊ-वडील."
"अहो, पण.."
"कसेही असले तरी ते तुमचे जन्मदाते आहेत. माधव तुमचा पाठचा भाऊ आहे. भलेही ती माणसे, त्या घरात तुमचा छळ करत असतील पण समाजाला ते माहिती नसेल किंवा असले तरीही समाज फक्त हेच पाहतो, की तुमच्या मागे कोण आहे? उद्या समाजाला हे समजले, की नवऱ्यासोबत बाप-भावाचे छत्रही नाहीसे झाले आहे त्यावेळी टपून बसलेले लांडगे झडप घालतील. काही वर्षानंतर मुली मोठ्या होताच..."
"भा..ऊ..." नकळत नयनचा आवाज चढला.
"मी तुमचा हा राग समजू शकतो परंतु मी जे म्हणालो, त्यावर तुम्ही विचार करा.. एक-दोन-तीन दिवस शांतपणे विचार करून निर्णय घ्या..." असे म्हणत गायतोंडे कार्यालयातून बाहेर पडले...
"तायसाब..." शाळेच्या शिपायाने आवाज देताच नयनची विचार शृंखला भंगली.
"भाई जी, बोला..." सावरत नयन म्हणाली.
"बायसाब, आपली संजूबेटी गावाला गेली का?"
"हो. सकाळीच गेली. भाई, दुसरे काही काम होते का?"
"बहेनजी, मनातले ओळखता हो. उद्या रमजान आहे तेव्हा म्हटलं शंभर रुपये मिळतील का?"
"घ्या..." असे म्हणत नयनने शंभराची नोट दिली.
"जुग जुग जियो, मेरी बहन! शुक्रिया ताईजी...' असे म्हणत भाई बाहेर पडला.
त्या दिवशी दिवसभर नयन सकाळी भाऊ- भावजयीचा संवाद, गायतोंडेसोबत झालेली चर्चा यावर विचार करीत होती. शेवटी तिला गायतोंडे यांचे म्हणणे पटले. घरीच... मीराच्या हातावर दरमहा पाच-सातशे रुपये देवून पडेल ते काम केले तर त्या बदल्यात चारित्र्याला तर डाग राहणार नाही. वेगळी खोली केली आणि विनाकारण चारित्र्यावर शिंतोडे उडाले तर? आजकाल 'पेईंग गेस्टचे' फॅड निघालेच आहे. बापाकडेच या नव्या रूपात राहावे. काम थोडे जास्त करावे लागेल. नाहीतरी स्त्रियांच्या जातीला घरातली कामे चुकलीत का? ती पाचवीलाच पुजल्याप्रमाणे कायम मनगटी बसलेली असतात. गायतोंडे म्हणाले ते बरोबर आहे. भाऊंकडे छळ होत असला तरी आपल्या चारित्र्याकडे बोट दाखवायची कुणाची छाती तर होत नाही ना. त्याच सायंकाळी नयनने दोन्ही वेळेची भांडी, धुणी ही कामे स्वतःकडे घेतली. दोन-तीन दिवसानंतर तिचा पगार झाला तेव्हा तिने सर्वांसमक्ष पाचशे रुपये मीरापुढे ठेवले कारण घरातले सारेच निर्णय मीराच घेत होती. नयनने दिलेले पैसे मीराने हलकेच उचलले. विनाऔषधाचे खांडूक फुटतेय या विजयी नजरेने तिने माधवकडे पाहिले. नयनने धुणी, भांडी करण्याचे सुरू केल्यापासून सकाळचा चहा मीरा करीत असे. नयन आणि तिच्या मुलींचा चहा लालभडक तर इतर सर्वांसाठी 'स्पेशल चहा' करून मीरा स्वत: दूध घेत असे.
"मामी, मला दूध दे ना आणि ब्रेडपण..."माधवी म्हणाली.
"जा तिकडे. मोठी आली दूध, ब्रेड मागणारी. बापाने जणू म्हैसच पाठवून दिलीय."
"ते काही नाही. मला दूध दे..." म्हणत माधवीने रडायला सुरूवात केली. अगोदर मीराचा आणि नंतर नयनचा रपाटा खाऊन तिने भोकाड पसरले...
शाळेची घंटा वाजली. आठवीपर्यंत वर्ग असलेल्या मुलानी एकच गर्दा केला. हाशहुश्श करत शिक्षक स्टाफरूममध्ये आले. खांडरेसाहेबांनी नयनच्या मदतीने रोपट म्हणून लावलेल्या शाळेने वृक्षाकडे वाटचाल सुरू केली होती. शिक्षक संख्याही वाढली होती. एक शिपाईही होता मात्र ग्रँट मिळत नव्हती. अनुदानाचे घोडे कुठे पेंड खात होते ते समजत नव्हते. तुटपुंज्या पगारावर शिक्षकही जास्त काळ टिकत नसत. पाच-सहा महिने, एखादे वर्ष काम केल्यावर इतरत्र कुठे चांगल्या पगाराची नोकरी मिळताच खांडरेंच्या शाळेच्या निरोप घेत असत. नयन आणि गायतोंडे मात्र टिकून होते. नयन शाळेबाहेर आली. इतर शिक्षक-शिक्षिका भरभर घराकडे निघाले होते. त्यांचा संसार त्यांची वाट पाहत होता. नयनची वाट कोण पाहणार? शाळेच्या फाटकाजवळ माधवी तिच्यासाठी थांबली होती. पाहता-पाहता पोरगी बरीच वाढली होती. पोरीच्या जातीला वयात यायला वेळ लागत नाही. आठव्या वर्गात शिकणारी माधवी वयाच्या मानाने थोराड वाटत होती. कदाचित परिस्थितीमुळे ती अकालीच शहाणी झाली असावी. घर जवळ आले असताना दुरूनच त्याना घरासमोर थांबलेल्या ट्रकमधून सामान उतरताना दिसले. भाऊंनी माडीवरच्या खोलीमध्ये भाडेकरी ठेवला असावा. त्या दोघी घराजवळ पोहाचल्या. स्वयंपाकघरात आईजवळ बसलेल्या कमात्याला बघताच नयनने विचारले,
"कमाआत्या, कशी आहेस?"
"ठीक आहे."
"बेबी कशी आहे?"
"बेबी आणि तिची मुलगीही चांगली आहे."
माधवच्या लग्नानंतर काही महिन्यांनी बेबीचे लग्न झाले होते. तिला चांगला पती, घराणे मिळाले होते. अण्णांच्या किशोरने एक पुस्तक प्रकाशनसंस्था काढली होती. त्यात त्याला चांगली कमाई होत होती. अल्पावधीत त्या मिळकतीतून किशोरने टुमदार बंगला बांधला होता. बेबीचे लग्न ठरले त्यावेळी अण्णांनी म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून किशोरने पंधरा हजार रुपये कमात्यास परत दिले होते. पंधरा-अठरा वर्षानंतर बेबीच्या लग्नाच्यावेळी मुद्दल तरी मिळाले आणि बेबी चांगल्या घरात नांदायला गेली यामुळे कमाआत्या बरीच खुश होती परंतु त्या पैशांमुळे मना-मनामध्ये द्वेष निर्माण झाले, नाते दुरावले आणि धास्तीमुळे मामाचा जीव गेला...
त्यादिवशी सकाळी थोडे उशिरा उठलेल्या नयनने स्वयंपाकघराचा आदमास घेतला. आत कमाआत्या आणि मीरा बोलत होत्या. मांजराच्या सावधानतेने नयनने कान टवकारले. तिचा अंदाज खरा ठरला. मीरा म्हणत होती,
"बघा आत्या, तुम्हीच पहा बाईसाहेबांचे उठणे सात वाजताहेत. साडेआठला बाईसाहेब बाहेर पडतात. उठल्यानंतर वेळ स्वतःचेच आवरण्यात जातो. घरातल्या कामाचे तर सोडा परंतु माधवीचे तरी पहावे की नाही. नुसत्या खायला काळ आणि भुईला भार! इथे दडी मारून राहायचे ना, मग थोडेसे काम करावे ना पण नाही. कशा कशाला हात लावत नाहीत. आत्या, आम्हालाही आमचा संसार आहे. दोन महिन्यात मलाही मूल होईल. एवढे सारे असूनही शांत बसत नाहीत. तोंडाला येईल ते बोलतात..." मीराचे पुढचे बोल नयनला ऐकवले नाहीत. उद्ध्वस्त मनाने ती खोलीत परतली. तिला आठवले...
सहा महिन्यांपूर्वी नयनचा मावसभाऊ बदली होऊन अमरावतीला आला होता. भेटण्यासाठी म्हणून नयन त्याच्याकडे गेली असताना तिच्या भावजयीने फारच सहानुभूती दाखवली त्यावेळी खूप दिवसांनी प्रेमाचा ओलावा मिळाल्यामुळे नयनचे दुःख उफाळून आले. तेव्हा वहिनी म्हणाली, "कधी फारच करमल नाही, फार त्रास वाढला तर अधूनमधून राहायला या... बदल म्हणून..." वहिनीने दाखविलेला मनाचा मोठेपणा आठवत तिने क्षणात निर्णय घेतला...
शाळेत निघताना नयन मुद्दाम मोठ्या आवाजात म्हणाली,
"आई, शाळा सुटल्यावर मी दोन-चार दिवसांसाठी दादाकडे जात आहे..." कुणाला काही बोलण्याची संधी न देता ती माधवीसह बाहेर पडली..."
००००

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED