Saubhagyavati - 22 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 22

२२) सौभाग्य व ती!
"ताईसाहेब..." आत येत भाई म्हणाला.
"काय भाईजी?" नयनने विचारले.
"चेअरमन साहेब..." भाईजी म्हणत असताना खांडरे आत आल्याचे पाहून नयनने उठून त्यांचे स्वागत केले. खुर्चीत बसत साहेब म्हणाले,
"काय म्हणते शाळा आणि आपले शिक्षक? पगाराबाबत कुरकुरत असतील..."
"नाही. तसं काही नाही..."
"ताई, आम्हाला माहिती आहे तुम्ही नाहीच म्हणणार पण तुम्हाला होणारा त्रास आम्ही जाणून आहोत. या महिन्यापासून सर्वांना... अगदी भाईजी तुम्हालाही पन्नास रूपये पगारवाढ करत आहोत. काही दिवसातच दोन खोल्याचे बांधकामही सुरू करत आहोत. क्या भाईजी, पगार बढी, खुश हो, चाय चाय पिलाओगे की..."
"अभी लाया साहब..." असे म्हणत भाई बाहेर गेला.
"ताईसाहेब, कन्या काय म्हणते?"
"सर, संजीवनीला हॉस्टेलमध्ये ठेवलंय आणि लहानी माधवी आपल्याच शाळेत आहे."
"हे चांगल केलं तुम्ही. नाही तरी शाळेसंदर्भातले तुमचे निर्णय चांगलेच असतात. तसे विचारू नये.... केसचे काय झाले?"
"केस चालू आहे. निकाल लागेल तेव्हा खरे." नयन म्हणाली.
"कोर्टाच्या कामाचे असेच असते. गंमत म्हणून सांगतो, मागच्यावेळी कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही पडलो पराभव झालेला राजकारणी गप्प कसा बसेल? मी हायकोर्टात धाव घेतली आणि..."
"आणि काय?"
"अहो, त्यानंतर पाच वर्षांनी झालेली निवडणूक आम्ही जिंकलो. पण अजूनही त्या पहिल्या निवडणुकीच्या केसची सुनावणी चालूच आहे. तारखावर तारखा, कोर्ट म्हणजे विचित्र..."
"हां साब, कोर्टाचा एक ज्योक सांगतो. एका तरूणीवर कुणी तरी आगावूपणा केला. त्या तरूणीने कोर्टात केस केली..." चहा घेऊन आलेला भाई म्हणाला.
"मग भाई, त्याला सजा मिळाली?" खांडरेंनी विचारले.
"कैसी सजा और क्या? परसों तारीख थी, वो स्त्री और कहर ढानेवाला दोनों भी कोर्ट में आये थे। दोनों भी डंडे के सहारे चल रहे थे..." भाई म्हणाला तसा फुललेला हास्याचा धबधबा ओसरताच खांडरे म्हणाले,
"ताई, रागावू नका एक गोष्ट सांगू का? अस माहेरी राहणं चागलं नाही. आता ठीक आहे. पण उद्या आईवडील गेल्यावर भाऊ - भावजयीचे काही खरे नाही अशावेळी कुणीतरी आपलं हक्काचं असावं. माझे ऐका, अहो, सारेच तसे नसतात. एक भाऊ या नात्याने सांगतो, कुणी ही तुमच्या वयाचा, प्लीज ऐका रागावू नका, शांतपणे विचार करा..."
"मेरे मुँह की बात छीन ली साब। मै ही बोलनेवाला था लेकिन मै पडा नौकर। छोटा आदमी होकर बडी बात कैसे कहूँ? खामोश रहा। ताईसाब, तुम सोचो, जबतक हाथपाँव में ताकद है, तुम घर के काम संभालती रहोगी, नौकरी शुरू है तब तक सभी संभालेंगे बाद में दुत्कारते हुए निकाल देंगे।"
"सर, खर सांगू का, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे पण माझे सारे लक्ष आता मुलींवर केंद्रीत आहे. त्यांना शिकवून मोठ केलं आणि त्यांची लग्नं झाली की मला कुणाचीही गरज भासणार नाही. स्पष्ट बोलू का? लग्न करायचे कशासाठी? शरीरसुखासाठीच ना? मला त्याच सुखाची घृणा वाटतेय. ज्याला तुम्ही आणि समाज सुख म्हणता ना तोच माझ्यासाठी नरक ठरलाय भाई, नरक ठरलाय. जिवंतपणी मरणासन्न अनुभव आहे माझ्यासाठी ते. माफ करा साहेब, भावनेच्या आहारी..."
"नाही तसे नाही. उलट तुमच्या भावना दुखावल्याचे पाहून आम्हालाच वाईट वाटले. बरे येतो मी." असे म्हणत खांडरे आणि पाठोपाठ भाईजी बाहेर गेले. त्याचवेळी गायतोंडे तिथे आले. नयनला भावनाविवश स्थितीत पाहून ते परतू लागल्याचे पाहून तिने विचारले,
"भाऊ काय झालं?"
"खांडरे साहेब काही म्हणाले का?"
"भाऊ, तसे नाही पण खूप दिवसांनी कुणीतरी मायेची फुंकर घातली आणि हळव्या मनाला पूर आला आता कस स्वच्छ वाटते. बरे, तुमचे काही काम होते का?"
"ताई, चार दिवसाची रजा पाहिजे होती."
"काही विशेष?" नयनने विचारले.
"ताई, सकाळीच निरोप आलाय. मला दुसरा मुलगा झाला..."
"अरे वा! एवढी आनंदाची बातमी इतक्या उशिरा देता? भाईजी, जा. एक किलो पेढे आणा."
"वा! वा! सरजी, बहोत अच्छा! आज बडा खुशी का दिन है। पगार बढी.. आपको लड़का हुआ! मास्टरजी, आपका लडका बडा शुभ है, आतेही हमारी पगार बढ़ी। एक बात कहता हूँ साब, अब बंद कर दो। हम दो हमारे दो। बहेनजी, मैने भी आपरेशन किया है... दो लड़कियों पर..."
"काय म्हणतोस? अरे पण तुमच्या..."
"धरम अपनी जगह, नमाज के वक्त! क्या करेंगे जी, पाँच-सात बच्चे पैदा करके, बेकारोंकी फौज! मैने तो किया, साथही औरोंको भी बोलता हूँ। क्या करने के ज्यादा बच्चे? सुबह उठकर घुमते है कुछ ना कुछ बेचते हुए गांवभर। जिस उमर में उनको खेलना-कुदना है उस उमर में वे लोगोंकी दुत्कारें सुनते है। क्यों उनके नसीब में ये पल। उससे तो अच्छा है एक-या दो के बाद बंद कर दो। इन्ही को अच्छा पढाओ...कलेक्टर ...तहसीलदार... डागदर बनाओ। उनकी जिंदगी तो सुधर जाएगी और साथ ही अपना बुढ़ापा भी खुशहाल बनेगा। नही तो बुढ्ढा होने के बाद भी बैठना पड़ेगा... कपडे की दुकान पर मीटर पट्टी लेकर या नही तो लोहा लोखंड खरीदते-बेचना पडेना..."
"भाई, अरे किती छान बोलतोस. अरे, तुझ्यासारखे दहा-बारा आणखी तयार झाले ना तर हा लोकसंख्येचा..."
"मैं भी उसी दिन की राह देख रहा हूँ... बाप रे! स्कुल छुटने का वक्त पाँच मिनट उपर गया। सारे स्टाप के लोग चिल्लाते होंगे।" म्हणत भाईजी लगबगीने बाहेर गेला.
"कोण म्हणते भाऊ, की मुस्लीम बांधवांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटले नाही म्हणून..."
"हो ना! आता एक भाई तयार झालाय, पाठोपाठ अनेक येतील! तो दिवस मला जवळ दिसतोय..." म्हणत नयन बाहेर पडली...
"भाई, झोपा काढत जावू नकोस. निदान शाळा सुटल्याची घंटा तरी वेळेवर वाजवत जा..." एक शिक्षक म्हणत असताना नयन कार्यालयातून बाहेर आल्याचे दिसताच चपापून निघून गेले.
"देखो, ताईजी। देखो...ये है हमारी लोकशाही। कोई पाँच मिनिट भी ज्यादा देने को तैयार नहीं। क्या होगा देश का?" असे बडबडत भाईजी कुलूप लावू लागला...
कुलूप उपडून नयन पाठोपाठ माधवीही घरात शिरली. समोर कलर टि.व्ही.वर नयनच्या मावस भाऊ भावजयीचा फोटो होता. दोघेही किती प्रेमाने खेटून बसले होते. या जगात तसे क्षण नसलेली नयन एकटीच होती का? तिच्या जीवनातले सारे सुख काय दुसऱ्यांनीच वाटून घेतलय का? इतरांचे सारे दुःख का देवाने नयनच्याच झोळीत टाकलेय का? हातपाय धुवून ती पलंगावर टेकली.
"आई, आज तू जास्तच थकलेली दिसतेय. बस तू. मी चहा करून आणते आणि स्वयंपाकाचेही बघते. मामा येईलच आता..." असे म्हणत माधवी आत गेली. तिची माया पाहून नयनला गलबलून आले. तिचा हाच हळवा स्वभाव भाऊ, माधव आणि मीराला आवडत नसे. माधव-मीराने तिला वारंवार बजावलं होत. मीराच्या सततच्या टोमण्यांनी आणि वागण्याला कंटाळून नयनने भाऊचे घर सोडले होते. पहिल्याच भेटीत 'आपलच घर समजून केव्हाही राहायला या' अस हक्काने सांगणाऱ्या वहिनीने नयनला बघितले तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मात्र तिने तोंडदेखले स्वागत केले. परंतु त्यात आपलेपणा ममत्व नयनला जाणवले नाही. दुसऱ्याच दिवशी नयनला जाणवले की, कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच! पहिल्याच रात्री शेजारच्या शयनगृहामध्ये चाललेला संवाद तिच्या कानावर पडला. नयन आणि माधवी झोपल्यात अस समजून ती दोघे बोलत होती. माधवीचा डोळा लागला होता. परंतु नयन जागी होती. रात्र म्हटली की, अनेक वर्षानंतरही तिच्या अंगावर काटा यायचा. तिला सदाशिवसोबतच्या त्या वेदनामयी रात्री आठवत. हलक्या आवाजातली धुसफुस तिला ऐकू आली.
"अहो, ही पीडा कायमची राहायला आलीय म्हणे."
"मला का सांगतेस? मी बोलावल? पुन्हा या. त्रास झाला... आठवण आली, की राहायला या. अस कोण म्हणाल..."
"मला काय माहीत हो? ही बया पडत्या फळाची आज्ञा घेऊन घोरपडीप्रमाणे चिकटेल ते..."
"अग, कुणी चिखलात फसलय म्हणून हात द्यायला जावे तर तो हात देणाराचेच मनगट पकडून खाली ओढतो..."
"नाही तर काय? या बयेला आता घराबाहेर कसं काढायचं ते पहा..."
"आली तशी राहू दे दोन दिवस. तू उद्या माहेरी जाणार आहेस. माझी सोय तर होईल..."
जग किती फसवं आणि मायावी असते हे लक्षात येताच नयनला प्रकर्षाने विठाबाईची आठवण झाली. तिला खूप राग आला. सकाळी तिने परत भाऊंकडे जाण्याची तयारी केली परंतु स्वार्थापोटी भावाने त्याची बायको येईपर्यत थांबण्याचा आग्रह केला...
"आई, चहा घे..." माधवीच्या आवाजाने ती भानावर आली. चहाचा पहिलाच घोट घेताच चहा खूप छान झाल्याचे तिच्या लक्षात आले. छोट्या वयात माधवी स्वयंपाकही चांगला करीत असे. स्वार्थापोटी का होईना पण मीराने माधवीला स्वयंपाकामध्ये चांगलेच तरबेज केले होते. छोटीशी चूक झाली तरी शिव्याची लाखोली ठरलेली असायची. म्हणून माधवीसुद्धा डोळ्यात तेल घालून काम करीत असे. बाहेर मोटार सायकल थांबल्याचा आवाज आला तशी नयन 'आला वाटते, मामा...' असे म्हणत उठून बसली.
रात्रीच्या जेवणानंतर दूरदर्शनवरील सिनेमा पाहत असताना पलंगावर माधवी झोपल्याचे नयनच्या लक्षात आले. तिने आवाज दिला तसा दादा म्हणाला,
"झोपू दे. कशाला उठवतेस? उठवू नको. मी आत झोपतो..." असे म्हणत त्याने सिनेमावर लक्ष केंद्रित केले. सिनेमा संपला तेव्हा बराच उशीर झाला होता. तिचा दादा चक्क घोरत होता. त्याची झोपमोड नको म्हणून त्याला न उठवताच नयन काहीशा अंतरावर कलंडली. काही क्षणात तिलाही झोप लागली...
रात्री कुणाच्या तरी स्पर्शाने नयनला जाग आली. कुणी तरी एकदम जवळ झोपले होते.
'कोण? मी कुठे आहे? सदा इथे कसा?' असे पुटपुटत तिने खाडकन् डोळे उघडले. खोलीत गुडुप अंधार होता. क्षणात तिला आठवले... हे घर तर दादाचे आहे म्हणजे? तो हात दादाचा? विजेचा शॉक बसावा त्याप्रमाणे ती उठण्याचा प्रयत्न करीत असताना दादा म्हणाला,
"उठू नको..."
"दा.. दा... हे हे काय? मी नयन ...तुझी बहीण..."
"कोण बहीण? कुणाचा दादा? तू अनेक वर्षापासून उपाशी. मला या क्षणी तुझी गरज आहे. तुझी-माझी गरज आणि नाते एकच... नर.. मादी..." तो तसे म्हणत असताना नयनला कुठून बळ आले ते तिलाही समजले नाही. आपल्या बोलण्याचा...स्पर्शाचा परिणाम होतोय हे पाहून तिचा दादा गाफील राहिला. त्याचा फायदा घेऊन त्याला ढकलून देत धडपडत नयन उठली. अंधारात तिने चाचपडले आणि तिचा हात विजेच्या बोर्डवर पडला. दुसऱ्याच क्षणी खोली प्रकाशाने न्हाऊन निघाली. एकदम झालेल्या प्रकाशाने तो जास्तच गोंधळला. नयनने दसऱ्याच क्षणी दार उघडले आणि ती दाराबाहेर येऊन उभी राहिली...
००००

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED