सौभाग्य व ती! - 23 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 23

२३) सौभाग्य व ती!
कार्यालयात बसलेल्या नयनपुढे भाईने चार पत्रे आणून ठेवली. त्यातील एका पत्रावरील पत्ता पाहताच तिचा चेहरा आनंदला. टप्पोरं, मोत्यागत अक्षर असलेलं ते पत्र संजीवनीचं होतं. सुरुवातीपासून संजीवनीचे अक्षर अत्यंत सुंदर, वळणदार होते. बाकीची पत्रं बाजूला करून नयनने संजीवनीचे पत्र उघडले. संजीवनीने सुंदर, वळणदार अक्षरात लिहिले होते...
'आई, आज सकाळीच तुझे आणि माधोचे पत्र मिळाले. मामींच्या त्रासामुळे तुम्ही घर सोडलत हे समजल. राहून राहून मला एक प्रश्न पडतो की तुझ्याच मागे नशीब का हात धुवून लागलेय? किती वर्षे सर्वांचा छळ सहन करणार आहेस? माहेरी राहूनही तू किती दिवस सासुरवाशीणीप्रमाणे भोग भोगणार आहेस? तू असे कुणाचे काय वाकडे केलेय की सारे तुलाच त्रास देतात. मामीचे सोड, पण माधवमामाही सतत तुझा पाणउतारा करत असतो. आजी, तर असून नसल्यासारखी आहे. भाऊ! माझे आजोबा, तुझे वडील! पण त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांच्याशी आपल्या असलेल्या नात्याची कधी जपणूक झालेली दिसलीच नाही ग. जाऊ दे. आधीच तू दुःखी असतेस मी अजून तुला कशाला दुःख देऊ? पण आई, घाबरू नकोस. आता मी माझे शिक्षण संपवते आहे. मी कुठेही नोकरी करेन मग आपण आपल्या लाडक्या माधोसह वेगळे राहून मजेत राहू. आपण तिघी सोबत असलो म्हणजे कुणालाही घाबरायची भीती नाही. आई, आपण वेगळे घर घेतले ना की, मग मी तुला असे सुखात ठेवीन ना की तुला मागचे दिवस आठवणारही नाही...' वाचता वाचता पत्रातील सारी अक्षरे अंधूक झाली.
'का बरे असे? चष्मा लागतो की काय? परवाच तर डोळे तपासले होते' असे प्रश्न डोकावत असताना नयनला गालावर आलेला ओलावा जाणवला.
'अच्छा! संजीवनीने लिहिल्या सुंदर आणि स्वप्नाळू पत्रामुळे डोळे भरून आले आहेत आणि म्हणून अंधूक दिसतेय तर. एवढीशी माझी पोरगी पण किती हुशार झालीय. परिस्थितीची जाण तिला किती लवकर आलीय. परिस्थिती माणसाला घडवते म्हणतात तेच खरे. भाऊची, माधवची, मीराची बोलणी, प्रसंगी मार खात संजीवनी सारे शिकली होती. पुढे काय लिहिले आहे, संजीवनीने?'... असे म्हणत डोळे स्वच्छ करीत नयनने पुढे वाचायला सुरुवात केली. संजीवनीने लिहिले होते,
'आई, काल सहामाहीचा निकाल लागला. आनंदाची गोष्ट म्हणजे मी वर्गातून आणि शाळेतून पहिली आले आहे. आई, अजून एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी 'आईचे प्रेम' या विषयावर लिहिलेल्या निबंधातही शाळेत पहिली आली आहे. आई, तुझ्या आशीर्वादाने हे यश मला मिळाले आहे. आई, खरे सांगू का, तो निबंध लिहायला तर घेतला पण काय लिहावे ते समजत नव्हते, सुचतही नव्हते. मग अचानक काही तरी आठवले आणि तुझा फोटो काढला. त्याला नमस्कार केला. त्या फोटोला म्हणजे तुला समोर ठेवून मी तो निबंध लिहिला होता. परीक्षकांनी, शिक्षकांनी खूप स्तुती केली, कौतुक केले. बक्षीस समारंभ पंधरा दिवसांवर आहे. पण काल प्रार्थनेच्यावेळी माझ्या बाईंनी मला तो निबंध वाचायला लावला. तो वाचत असताना माझे जाऊ देत पण माझ्या शिक्षिकाही डोळे पुसत होत्या तर काही शिक्षक महत्प्रयासाने अश्रू आत दाबत होते.
आई, माझ्या मुख्याध्यापकसरांची इच्छा आहे, की त्या कार्यक्रमासाठी तू यावं. शाळेतर्फे तुला आज किंवा उद्या फोन येईलच. 'आदर्श माता' म्हणून तुझाही सत्कार करण्याची सर्वांची इच्छा आहे. माझीसुद्धा इच्छा तीच आहे. आई, येशील ना ग?...' पुन्हा डोळ्यासमोर अंधार झाला. रूमालाने डोळ्याच्या कडा टिपत नयन पुटपुटली,
'येईन हं बाळा. निश्चित येईन. अग, अशीच मोठी झालेली, आकाशाला गवसणी घालणारी संजू मला पाहायची आहे... मला खूप खूप आनंद झाला आहे ग बाळा.' संजीवनीने पुढे लिहिले होते,
'आई, तू एक लक्षात ठेव हं, तुला यायचे आहे. तू येईपर्यंत मी कार्यक्रमासाठी जाणार नाही. तू आली नाहीस तर मी बक्षिसही घेणार नाही. ये हं. मी वाट पाहतेय. मामाकडे राहताना काळजी घे. काम जास्त करू नको. बरं झाल, माधव मामा, मीरामामीची बोलणी कमी झाली. तुला आता बरे वाटत असेल.'
'नाही ग राणी, मला परत माधवमामाकडेच यावं लागलं. तुला कस सांगू, समाजात सारेच माझ्याकडे एक नारी, भोगवस्तू म्हणूनच पाहतात...'
"कुणाचे पत्र आहे?" नयनच्या कार्यालयात आलेल्या गायतोंडेंनी विचारले.
"संजूचे! ती सहामाही परीक्षेत पहिली आलेय. निबंध स्पर्धेतही शाळेतून प्रथम क्रमांक मिळालाय. मला बक्षीस समारंभाला बोलावतेय आणि संजीवनीने लिहिले आहे की, तिचे शिक्षक माझा आदर्श माता म्हणून सत्कार करणार आहेत."
"व्वा! योग्य व्यक्तिचा सत्कार होतोय तुम्ही सत्कार स्वीकारला ना तर त्या पुरस्काराचा सन्मान वाढेल. पुरस्काराचीही शान वाढते. जा. ताई, जा. लेकराचे कौतुक स्वतःच्या डोळ्यांनी पहा. असे आनंदाचे क्षण पकडून ठेवा. अशाच शिदोरीची तुम्हाला आवश्यकता आहे. तुम्ही पुन्हा भाऊंकडे आलात वाटते?"
"हो. मागे तुम्ही म्हणालात तेच बरोबर आहे. त्या रात्री तुमचे म्हणणे पटले जेव्हा सख्खा मावस भाऊच..."
"म्हणजे?..." गायतोंडेंनी मध्येच विचारले.
"नाही! सुदैवाने तसे घडले नाही. त्या रात्री त्याचा हेतू ओळखून दोन वाजल्यापासून सकाळी चागलं फटफटेपर्यंत मी दारातच बसून होते म्हणून वाचले. त्याला माहित होते, माझ्या गळ्यातील मंगळसूत्र नामधारी, बुजगावण आहे. त्याचा काडीचाही आधार नाही. माहेरकडून तशी बहिष्कृतच आहे म्हणून रात्रीच्या काळोखात त्याने तोंड काळे करण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्याचा हेतू सफल होऊ दिला नाही..." नयन बोलत असताना भाईजी आत आल्याचे पाहून नयनने विचारले,
"भाई जी, क्या बात है?"
"बाईसाब, ये लेटर अध्यक्षसाहबने भेजा है..." म्हणत भाईने दिलेले पत्र नयन वाचत आनंदाने म्हणाली,
"भाऊ, आनंदाची बातमी आहे आपल्याला मॅट्रिकची परवानगी मिळाली आहे."
"वा! वा! ताई, अभिनंदन! तुमची मेहनत फळाला आली. कुणाला सांगितलं तर खरे वाटणार नाही परंतु आज दिसणाऱ्या या प्रचंड वृक्षाचे रोपटे तुम्ही लावले आहे. एका मुलापासून तुम्ही शाळा सुरू केली आणि आज-आज तुमच्यामुळे... तुम्ही घेतलेल्या प्रचंड मेहनतीतून शाळा मॅट्रिकपर्यंत झाली आहे. हजारो विद्यार्थी आले गेले. तीसपेक्षा अधिक कर्मचारी आज कार्यरत आहेत. या साऱ्या प्रवासाचा मी साक्षीदारच आहे. याचा मला अभिमान आहे. बस..आता फक्त एकदा का अनुदान
मिळाले, की गंगेमध्ये घोडे नाहले. ताई, तुमचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे..."
"मिळेल! भाऊ, मिळेल. ग्रँटसुद्धा मिळेल. पूर्ण पगार आणि थकबाकीही मिळेल. एक लक्षात ठेवा. तुम्ही नुसते साक्षीदारच नाही आहात तर भागीदारही आहात. प्रत्येक सुख दुःखात वाटेकरीसुद्धा आहात. कमी पगार आहे म्हणून अनेक शिक्षक मध्येच सोडून गेले परंतु तुम्ही मात्र कायम सोबतीला आहात म्हणून या यशात तुमचाही सिंहाचा वाटा आहे... "
"हा तुमचा मोठेपणा झाला ताई..." गायतोंडे बोलत असताना पुन्हा अचानक आत आलेला भाईजी म्हणाला,
"ताईजी...ताईजी.. आपके भाई साहब आ रहे है... साथ मे एक जीप भी है।"
"काऽय? माधव? शाळेत? जीप घेऊन? काय झाले असेल? आपने ठिक से देखा..."नयन आश्चर्याने विचारत असताना आत आलेला माधव घाबऱ्या आवाजात म्हणाला,
"ताई... ताई..." माधवच्या तोंडून अनेक वर्षांनी ताई हा शब्द नयन ऐकत होती. गेली अनेक वर्षे त्या दोघांमध्ये तसा अबोलाच होता. प्रसंगी दोघे एकमेकांशी तिऱ्हाईतपणे संबोधत असत. नयनला तशी गप्प पाहून माधवच पुढे म्हणाला,
"ताई, चल लवकर संजीवनीला अपघात झालाय..."
"काऽय? कुठे? माधव, हे तू काय म्हणतोस? तुला कुणी सांगितले?"
"ताई, चल वेळ घालवू नकोस. लवकर निघायचे आहे." माधव म्हणाला.
"भाऊ, मी निघते..." ती गायतोंडेना म्हणाली.
"जा. लवकर जा..." गायतोंडे म्हणत असताना भाईजी माधवीला तिच्या वर्गातून घेवून आला.
भाई म्हणाल्याप्रमाणे माधव जीप घेऊनच आला होता. जीपमध्ये बरेच पाहुणे होते. डोळे भरलेले असल्यामुळे नयन त्यांना ओळखू शकली नाही. तसेच तिला कुणी बोलायचाही प्रयत्न केला नाही. परिस्थिती कशी वेगळीच निर्माण झाली होती. कुणी बोलावे? कुणास बोलावे? बरे, तिथे काय घडले ते तरी कुणाला पूर्ण माहिती होते असेही काही नव्हते. सारे कसे अचानक, विपरित घडले होते. जीप तिच्यावेगाने धावत होती... त्यापेक्षाही अधिक वेगाने नयनच्या विचारांचा अश्व धावत होता...
००००