Ladies Only - 15 books and stories free download online pdf in Marathi

लेडीज ओन्ली - 15

|| लेडीज ओन्ली - १५ ||

( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन -

शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)


" लेडीज ओन्ली "

[ भाग - १५ ]


काही वेळापूर्वी नवऱ्याच्या दुखण्याने चिंतेत असलेल्या राधाबाईंचा मूड जेनीच्या सोबत शॉपिंगला जाण्याच्या कल्पनेनेच बदलून गेला. त्या एकदम फ्रेश झाल्या होत्या. लंडनमधली एक खूप शिकलेली गोरीगोमटी इंग्रजी पोरगी आज आपल्यासारख्या अडाणी खेडवळ बाईसोबत बाजार करतेय याचा विचार करूनच त्यांना जणू आतून कुठूनतरी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. हातातली पिशवी फिरवत, खांदे उंचावून ऐटीत चालत, गाणं गुणगुणत बाजारच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून त्या पुढे जात होत्या..
"मै चली मै चली.. देखो बाजार की गली.. मेरे साथमें है आज.. ये लडकी फारेनवाली.. " असं एक नवंच गाणं त्यांचं त्यांनी जुळवलं होतं. गुणगुणताना त्या मध्येच थांबल्या," जेनाबाई तुमास्नी वर्जिनल गाणं आयकायचं का? रिटन बाय राधा द गुलजार... "
" इरशाद... " जेनीने हसून मुजरा केला.
" तो अर्ज किया है.... " अन् राधाबाई 'राधा ही बावरी' या मराठी गाण्याच्या चालीवर त्यांचं गाणं गाऊ लागल्या,
" खंबाच ढोसतो फुल्ल पेऊनी
किसन मव्हा गरगरतो ऽऽ
मधीच पडतो, पडून उठतो
आणि सदा धडपडतो ऽऽ
तरी आपटत धोपटत, नंगा होवूनी
घरी आलेला पाहूनी होते..
राधा मी बारूळी..
किसनरावाची राधा मी बारूळी... "
गाणं ऐकून जेनीने खळखळ हसत टाळ्या वाजवल्या. राधाबाईंचं गाणं पुढे सुरूच राहिलं..
" इथल्या तिथल्या बारात
जाऊन बसतो बहादर
घोट घोट मंग ढोसताना
ठोका पडतो बाराचा
हा दरवळणारा वास घेऊनी
घराकडे मग येतो
हाणून मारून मला वरून
कुस्करून त्यो जातो
त्या काळजातल्या कळा दाबूनी
समदं सहन मंग करते...
राधा मी.. भावली...
खेळण्यातली..
राधा मी भावली... "
अन् गाणं म्हणता म्हणताच राधाबाईंचा कंठ दाटून आला. डोळे पाणावले. त्यांनी ते पदराने पुसले.
" व्हाट हॅपन राधामावशी? " जेनीनं विचारलं
" नथिंग जस्ट असंच.. " राधाबाईंनी बोलायचं टाळलं अन् लगेच विषयही बदलला, " लिसटन जेनाबाई... टुडे आयाम व्हेरी ह्याप्पी.. " आता गाणं बंद करून त्या जेनीशी गप्पा मारत चालू लागल्या," मोग्याम्बो.. भलताच खुश हुआय आज... "
" लेकीन व्हाय? इतकं खूश व्हायचं कारण तरी कळू द्या ? " जेनीला काहीच लक्षात येत नव्हतं." रिजन मंजी बगा... " राधाबाई समजावून सांगू लागल्या," मही लय तमन्ना व्हती.. जिंदगीत वन टायम तरी फारेनच्या मान्सासंगं विंग्रजीत टाक शो करावा... आन् टुडे.. माय डिरीम कम टुरू.. आयाम विथ फारेन गर्लं.. वाकिंग आन् टाकिंग बी... लय भारी वाटाया लागलंय आज.. " राधाबाईंचा आनंद जणू गगनात मावत नव्हता.." म्या यक आंगठेभादर.. थमसप लेडी.. अन् मह्यासंगं कोन चालतंय... ह्या देशावर ज्येंनी राज केलं त्या लोकायतली यक मेंबर... मला तर आसं वाटाया लागलंया की.. म्या येलिजाभेत राणीसंगं चलायले.. तिच्या हँडात हँड घालून... किवीन येलिजाभेत.. इंडियाच्या यका मंडियात यका अडाणी मथारडीसंगं आलू बटाटे खरेदी करताना... लय भारी न्यूज झाली गड्या ही तर.. " राधाबाईंची एक्साईटमेंट पार आभाळाला भिडली होती. अन् त्यांचं ते बोलणं ऐकून जेनीला खळखळून हसायला येत होतं. ती पोट धरधरून हसायला लागली होती.
पुढे जाताना रस्त्याच्या बाजूला एक पाणीपुरीचा गाडा दिसला . त्याभोवती गराडा घालून लोक उभे राहिलेले होते. पाणीपुरीवाला प्रत्येकाच्या हातातल्या प्लेटमध्ये एकेक पुरी ठेवत होता. लोक गपागप गिळत होते. ते दृश्य बघून जेनी थांबली. लहान लेकरागत त्या गाड्याकडे बघू लागली. तिच्या तोंडाला पाणी सुटलं होतं.
" इटायची का? " राधाबाईंनी जेनीच्या मनात काय चाललंय ते ओळखलं. जेनीनेही लहान मुलासारखी नुसती मान हलवली. दुसऱ्याच क्षणाला दोघीही पाणीपुरीच्या गाड्याजवळ होत्या." आजकी पार्टी मेरी तरफसे.. " राधाबाई ओरडल्या. त्यानंतर दोघींनीही मनसोक्त पाणीपुऱ्या वरपल्या. त्या तिखट चमचमीत मसालेदार चवीनं जेनीच्या नाकातोंडातून पाणी यायला लागलं. ती हासहूस्स करू लागली. पाणी पिलं अन् पुन्हा खायला सुरुवात केली.
" यू आर व्हेरी नाईस पर्सन राधामावशी.. " जेनी पाणीपुरी खाता खाता राधाबाईंचं कौतुक करू लागली.
" ठांकु ठांकु... बट जेनं कवतिक कराया पायजे त्यो मातर रातदिस शिव्या देत ऱ्हायतो... "
" तरीही तुम्ही आजिबात कुरकूर न करता संसाराचं ओझं डोक्यावर घेऊन चालत राहता.. "
" तेला इलाज नसतुय जेनाबाई... देवानं गडीमान्सायच्या मनगटात बळ देलंय.. अन् बाईच्या मनात. मनगट काय कवाबी मोडून पडतं.. पर मन न्हाई. मनाची ताकद लय मोठी आसती.. अन् ती मान्सापरीस बायात जास्ती...! " पाणीपुरी खात खात राधाबाई सांगत होत्या," आमच्याकडं येक ष्टोरी लै फेमस हाय जेनाबाई... गवर्धन परबताची. आमच्या किसनदेवाच्या गोकुळात येकदा लय पाऊस पडला म्हणं... घरं- दारं, झाडं- रानं चट वाहून जाया लागले. तवा किस्नानं गवर्धन परबत उचलला अन् शेडला 'आॅल गावकरी कम आंडर धीस..' लोकं आले. त्येहला वाटलं किस्नानं येकट्यानंच परबत उचलून धरलाय.. आपूनबी मदत करावा त्याला... मनून समद्यांनी आपापल्या काठ्या त्या परबताला टेकन म्हणून लावल्या... किस्नानं त्यो परबत आपल्या कनगुळीवर उचलून धरल्याला व्हता. लोक मनले 'देवा, हात दुखंल तुव्हा... घी काढून.. आमी काठ्या लावल्यात आता.. ' लोकायला गरवं झाला व्हता. देन आय टेल यू... किस्नानं जराशीक कनगुळी ढिल्ल्ली सोडली... अन् मंग काय लागला परबत पब्लिकच्या बोकांडी पडाया... लोकायच्या काठ्या - लाकडं पार मोडून पडले. मंग किस्नानं बोट नीट केलं.. अन् लोकं वाचले... "
" ओ माय गॉड... व्हेरी नाईस स्टोरी... "
" बट यू नो मॉरल आफ द ष्टोरी? "
" नो... प्लीज टेल मी... "
" देवानं समद्या पुरूषायला त्या लाठ्याकाठ्यायचं बळ देलंय... अन् बाईला किस्नाच्या कनगुळीतलं... गड्यायनं किती बी झकमारी करू द्या... संसाराचा गवर्धन उचलायला बाईच पायजे..!! " बोलता बोलता दोघीत मिळून चार प्लेट पाणीपुऱ्या संपवल्या होत्या त्यांनी.
" आयला गोऱ्या चमडीलाबी पानीपुरी खावा वाटती व्हय..." मागच्या बाजूला उडाणटप्पू पोरांचं एक टोळकं उभं होतं. त्यातला एकजण 'ख्या ख्या' करीत ओरडला . त्यांच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. पण राधाबाईंना ही टुकार पोरांची मोकार गँग होती हे लक्षात आलं. त्यांनी जेनीला खुणावलं. दोघींनीही पाणीपुरी खाण्याचा कार्यक्रम आवरता घेतला. हात धुतले. राधाबाई पैसे देऊ लागल्या. इतक्यात त्या पोरांपैकी एकजण जेनीजवळ येऊन उभा राहिला, " और.. अँजेलिना जोली.. आमच्या शिटीत कस्काय ब्वॉ.." आणि तो जेनीला धक्का मारण्याचा प्रयत्न करणार इतक्यात राधाबाईंनी त्याला धक्का दिला, "ऐ मुडद्या... कामधंदा न्हाई का काही, येता जाता पोरीबाळीची छेड काढण्याबिगर... व्हय बाजूला न्हायतर थुत्तर फोडीन.." राधाबाईंच्या त्या दमदार धक्क्याला अन् कडक धमकीला तो घाबरला. मागे सरकला. दोघीही आपल्या बाजारच्या वाटेला लागल्या.
" देश कोणताही असो... बाई सेफ नसतेच..असे अॅनिमल्स.. सगळीकडे सारखेच.. " चालता चालता जेनी बोलली.
"मनून तर बाईला ल्हानपनापासून शिकवितेत.. नीट ऱ्हाय.. जपून ऱ्हाय.. आबरू मंजी काचाचं भांडं.. घरात ऱ्हाय.. सातच्या आत घरात वापीस यी... तुमच्या देशात नसतेल ना आसे घरगुती कायदेकानून लेडीज लोकायसाठी? " राधाबाईंनी मनातला प्रश्न विचारला.
" नाहीत.. पण म्हणून तिथली बाई खूप आनंदात आहे असंही नाही... जगण्या वागण्याचं स्वातंत्र्य आहे.. अन् त्या स्वैराचाराचे साईडइफेक्ट्स अल्सो.. "
" मंजी जगाच्या पाठीवरल्या कोणत्याच बाईला सुख नसतंयच.. कोणाचा कमी तर कोणाचा जास्ती.. पण नशिबात छळ हायेच मनायचा.. "
" स्किनच्या, हेअरच्या कलरमधे थोडाफार फरक असेल.. पण बाई सगळीकडची सारखीच... कारण पुरूषांची तिच्याकडं बघण्याची नजर सारखीच असते.. जस्ट अ उपभोगाची वस्तू ..!! "
" खरंय गं जेनाबाई... हेरी टुरू... "
राधाबाई भाजीपाल्याच्या साताला पोचल्या होत्या. कांदे, वांगे, बटाटे.. एकेक भाजी नीट बघून त्या घेऊ लागल्या. इथे भाजीपाला विकणाऱ्यांची बरीच मोठी रांग बसलेली होती. गिऱ्हाईकांचीही दाटी होती.
" राधामावशी, रागावणार नसाल तर एक विचारू? " जेनीनं विचारले.
" आवो हे काय आस्कीनं झालं का? आस्का की खुशाल जे आसकायचंय ते.. " राधाबाईंचं जगणं म्हणजे 'खुली किताब' होतं. त्या जशा बोलायच्या बिनधास्त तशा जगायच्या वागायच्याही बिनधास्तच.!
" तुम्हाला तुमच्या हजबंडने नाही त्रास दिला कधी? " जेनीच्या या प्रश्नावर राधाबाईंनी डोक्यावर हात मारून घेतला.
" आवो कधी न्हाई देला ते इचारा... लगीन झाल्यापासून मला तरास देण्याबिगर मह्या हसबंड्यानं दुसरं काहीच केलं न्हाई बगा.. " राधाबाई त्यांच्या जगण्याची कथा सांगू लागल्या..
' गरीबाघरी पोरीनं जलमाला येणं मंजी पापच.. बापाचं घर मंजी आग अन् नवऱ्याचं घर मंजी फुफुटा.. अन् अशा पद्धतीनं गरीबाच्या लेकीचं लगन मंजी तिला जाळातून फुफाट्यात ढकलण्याचा सोव्हळा.. आसं म्हंत्यात भाकर करपू द्याची नसंल तर ती पलटावी लागंती... गरीबाच्या लेकीच्या नशिबाची भाकर करपून जळून खाक होवून जाती.. पर तिला कोणीबी पलटीत न्हाई... म्या बी त्या लाखखांड पोरीपैकीच येक... माघल्ल्या दलिंदर नशिबाच्या रेघा पुढं वढीत मव्हं किसनरावाशी लगन झालं... ते हामाली करायचे रेल्वे ठेसनावर... कमाई कमी अन् खर्चा जास्ती असा धंदा... जे काही कमवायचे तेच्यातली निम्मी कमाई दारूच्या गिलासात इरघळायची...
लगीन झाल्यावर नव्या नवरीची नवलाई दोन म्हयने बी टीकली न्हाई. घर संवसार चलवायला हातभार लावायचा मनून धुन्याभांड्याचं काम करायला सुर्वात केली. आधी दोन घरं.. मंग चार घरं...आमा गरीबायच्या रक्तात आयरन - हिमोगोलबीन पेक्षा इमानदारीच जास्ती.. तेच्यामुळं कामं भेटत गेले. दोहीकून दोघायची कमाई.. तेच्यामुळं सगळं चांगलं चाललं व्हतं.. पर पैसाच त्यो.. ज्याच्या खिशात वाजला त्यो गडी माजलाच मनून समजा.. आमच्या मालकाची दारूची सवय वाढत गेली. हमालीच्या कामावर जातानाबी मुताड पेऊन जायाला लागला गडी.. मंग काय.. हालणं डुलणं.. लोकायचा पसारा बोकांडी घेऊन पडणं सुरू झालं... हळूहळू काम मिळणं कमी झालं. मव्हा हात चालू व्हता मनून पैशाची चणचण जाणवत नव्हती. म्या कमविलेला समदा पैसा त्योच घेऊन जायाचा. दारूत घालायचा. अन् जे काही शिल्लक उरंल तितक्यात संवसाराला लागणारं सामान आणायचा. मी भांडायचे.. पैशे द्यायला नकार द्याचे.. मंग जनरली नवरे जे करत्यात तेच त्यो करायचा. हाणणं. मारणं. झोडणं. आमच्याकडच्या बऱ्याच बायांयच्या नशीबात हेच लिवल्यालं असतंय. राब राब राबायचं. नवऱ्याला खाऊ घालायचं. आपून त्याच्या शिव्या अन् मार खायाचा. वरून पुन्हा त्येला उरावर घ्यायाचं. हे समदं करताना कुठंबी तुमचा आवाज जरासाबी निघला नाई पायजे. जर निघला तर तुमचे पतिवरता पणाच्या परीक्षाचे मार्कं कापले जात्यात..!! " भाजीपाला घेत घेतच राधाबाई त्यांची चित्तरकथा सांगत होत्या. मध्येच आलेल्या या पतिव्रता शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे जेनीने त्यांना थांबवले, " पतिव्रता..? म्हणजे? "
" तसं ते मलाबी नेमकं ठावं न्हाय.. पर.. आपल्या नवऱ्यालाच देव मानावा..त्यो म्हनील सांगील तसं वागावा.. त्येच्याबिगर दुसर्‍या मरदाकडं बघूबी न्हाई... आशे काही जे नेमंनियमं आसत्यात ते पाळणारी बाई म्हंजी पतिवरता.. आता मलाबी आजूक हे समजल्यालं न्हाई की... ज्यो बाईच्याच मुतनळ्यातून पैदा होतू त्यो बाईचा देव कसा काय होऊ शकतू??? " राधाबाईंना जो अर्थ लागला होता तो त्यांनी सांगितला.
" ओके... मग जशा बायका पतिव्रता तसे पुरूषही पत्नीव्रता असतीलच की... " जेनीचा प्रश्न.
" असाया तर पायजेत.. पण नसत्यात... अन् ते तशे नसले तरी त्येंचं काही बिगडत बी न्हाई.. पुर्षाच्या जातीला सूट असती म्हणं... "
" आणि ही सूट दिली कोणी? "
" आता... ज्येंनी बाईच्या जातीला बांधून ठूलं त्येंनीचं पुर्षाच्या जातीला ढिल्लं सोडलं आसंल म्हना की... काय कमाल आसती बगा... गायीला येसण घालणं पाप असतंय.. बाईला मातर येसण पायजीच.. अन् बईल येसणीबिगर ठिवू न्हाई म्हंत्यात.. मंग हे दोन पायाचे वळू मोकळे कशामुळं?" राधाबाईंच्या मनातली सगळी खदखद आज बाहेर पडत होती.
"अशातच दुसरी पोरगी झाली." राधाबाई त्यांची कथा पुढे सांगू लागल्या, " छळ मांडायला नवं कारणच गवसलं.. आता ते येता जाता टोमणे देऊ लागले. पोरीच झाल्या. आमाला दिवा पायजे. नाव पुढं कसं चालावा? पाव्हने राव्हने येणारे जाणारे बी तेच तुणतुणं लावायचे.. पोरगं व्हाया पायजे.. पोरगं व्हाया पायजे.. मंग नवरा आजूकच चेकाळायचा... मारहाण वाढायला लागली. अन् मही सहनशक्ती बी... त्येच्या येका चापटीत रातभर रडत बसणारी मी आता.. त्यो पाठीवर लाकूड मोडूस्तोर मारायचा.. तरीबी मह्या डोळ्यात चिट्टाभर बी पाणी येत नव्हतं. आंग दगडाचं झालं व्हतं अन् डोळे खापराचे..!
तिसरीबी पोरगीच झाली. आता म्या तेच्या ववशाला दिवा देऊ शकत न्हाई याची खात्रीच पटली त्याला. तेच्या हिशेबानं म्या आता बिनकामी झाली व्हते. भाकड म्हणा ना. मारहाण लय वाडली. काहीच कारण नसताना जव्हा कव्हा तेच्या मनात यील तव्हा तव्हा मला मारणं सुरू केलं त्यानं. त्येचं काम करणं तर जवळ जवळ बंदच झालं व्हतं. संवसाराचा समदा भार मह्या खांद्यावर पडला. तान्ही लेक झोळणीत बांधून, झोळणी खांद्यावर टाकून म्या कामाला जाऊ लागले. त्योबी कुठंतरी जाचा. दारूपुरते, पत्ते खेळण्यापुरते पैशे आनायचा. घरासाठी दमडीबी देत न्हवता. म्या बी मह्या कमाईचे पैशे त्याला देनं बंद केलं. त्याच्या दारूपरास मह्या लेकीचं पोट भरणं मह्यासाठी जरूरी व्हतं. भांडणं आजूकच वाढले. म्या फकस्त सहीन करीत राहायची.
अन् येकेदिशी त्यो येक बाई घेऊन घरी आला. तेच्या वयाच्या आर्धी आसंल. पोरपण बी गेल्यालं नव्हतं तिचं. कुठली व्हती, कोणाची व्हती त्येची त्यालाच ठावं. झोपड्याच्या दाराशी येऊन उभा राह्यला न् मनला, "ऐ राधे.. ववाळ हिला... तुही सवत आणलीया.." अन् मव्हा स्वासच गळ्यात आडकला. आतालोक जेला पती परमेसर मानून त्येचा सगळा तरास सहीन करीत राह्यले. तेनं असा जिव्हारी घाव घातला व्हता. म्या मोडून पडले. बाईची जात कायबी सहीन करील.. आर्ध्या भाकरीत आर्धी वाटणी करून दील.. पर नवऱ्याची वाटणी पचविता येत न्हाई बाईला... मंग त्यो नवरा कसा का आसंना. मह्या दादल्यानं मला शिया दिल्या.. ढोरावानी मारलं.. उपाशी ठूलं.. समदं समदं सहीन करीत ऱ्हायले म्या. पर मह्या घरात दुसरी बाई.. म्या ठरिवलं.. आपून ह्या घरात ऱ्हायाचंच न्हाई. तिन्ही पोरी संगं घेतल्या. भाकरीचं गठूडं बांधलं अन् म्या घराभाईर पडले...
अन् यकदमच.. मला कायबी कळायच्या आत.. आजूक घरात पाऊल बी न टाकलेल्या मह्या दादल्याच्या त्या नव्या नवरीनं महे पाय धरले. धाय मोकलून रडाया लागली. मला काहीच समजंना. तिनं तर मह्या पायाला जणू मीठीच मारली व्हती. " आक्का... तुम्ही जाऊ नगा.. मला तुमची धाकली भईन समजून आसरा द्या.." मी जिला दुश्मन समजीत व्हते ती मला थोरली भईन मनू लागली. मी पाघळून गेले. शरण आल्याली ती पोरगी मह्यावानीच नशिबाची शिकार झाली व्हती. म्या तिला उठिवलं. ती मह्या गळ्यात पडली. म्या मनलं, "बाई कशाला आलीस गं ह्या वाळवंटात.. उपाशी मरायला? सवताचंच पोट भरायचे वांधे हैत ह्या मानसाचे... तू काय मनून भुललीस ह्या पेताडाला?"
" गरीब जीवाला नशीब भुलवित ऱ्हातंय आक्का... आपल्या हातात कशाचं काय आसतंय... ह्येनं मह्या दारुड्या बापाला धा हाजार रूपै देऊन मला इकत घेतलंय.. बिन मायीची लेक मी.. अन् बापबी तसा.. लै बाऱ्या वाटायचं जीव द्यावा कुठंतरी जाऊन.. पर पुन्हा वाटायचं कव्हातरी नशीब बदलंल... पण न्हाईच.. आपलं नशीब बी आपल्यासंगं बईमानच... " तीबी मह्यासारखीच व्हती. लै राग व्हता मनात तिच्याबद्दल.. पर समदा वसरला.. येकाच लांडग्याच्या गळ्यात बांधलेल्या आम्ही दोघी मेंढ्या आहोत आसं मला वाटलं.. म्या हातातलं बोचकं खाली टाकलं. घरातून भाकरीचा कुटका आणला. तिला ववाळलं. कुकू लावलं. मनलं," बाई सवत व्हवून आली असलीस तरी तुबी मह्यावानीच यक बाई हायेस.. मह्या नशीबातला जाळाची आहाळ तुह्या नशीबाला न्हाई लागू देनार बाई म्या.. "
तिला घरात घेतलं. ल्हान्या भईनीवानी तिचा संभाळ करू लागले. तिबी घरचं समदं काम करू लागली. मह्या पोरींलाबी संभाळू लागली. मह्यामागचा ताण बराच कमी झालता. येळ शिल्लक व्हता मनून धुण्याभांड्यासाठी दहा बारा घरं आजूक वाढविले. हातात पैसाबी जास्ती येऊ लागला. बाकी समदं ठीक व्हतं. पर रातर मातर मला तोडायला उठायची. एकाच खोलीचं झोपडं आमचं. तेच्यातच पडदा टाकून दोन भाग केले. आलीकडं म्या अन् मह्या तीन पोरी... पलीकडं मव्हा नवरा अन् त्याची बायकू... नाही मनलं तरी मला तिचा हेवा वाटतच व्हता. वाटायचं रातीतून उठावा अन् तिचं नरडं दाबावा.. पण म्या कायबी करू शकत नव्हते. त्येंचा आवाज कानावर पडला की मव्हंबी आंग फुटायचं.. वासना चेतायची.. पर म्या... निपचित पडून ऱ्हायाचे.. झोपड्याच्या मोडक्या डिळीकडं बघत..!
म्या नवऱ्यासंगं बोलणं सोडूनच देलं व्हतं. तरीबी त्यो बळंच बोलायला बघायचा. येकेदिशी नेहरी करता करता मनला, "तुला ठावं हाय का म्या दुसरी बायकू कामून केली ते?" म्या काहीच बोलले न्हाई. ल्हानी भाकरी थापीत व्हती. आमी दोघं खात व्हतो. म्या तुकडा मोडून गिळण्याचं काम करीत ऱ्हायले.
" तुह्याकून तर काही मह्या ववशाला दिवा भेटत न्हाई... तू काही पोरगं देत न्हाईस मला... मनून हिला आणली.. ही पोरगं देनार आता मला... " त्यो बोलला अन् इतके दिस गप्प ऱ्हायलेली मी चवताळून बोलले," बायकू मंजी पोरगं काढायची मशीन वाटली व्हय रं मुडद्या तुला? मला पोरगं झालं न्हाई मनुन ही आणलीस.. अन् हिला बी पोरीच व्हत ऱ्हायल्या तर काय करणार हायीस? तिसरी करशीन? आरं कोरभर भाकर मिळवायची ताकद न्हाई तुह्यात अन् कशाला पायजी रं तुह्या भिकारी ववशाला दिवा? चेतवून घ्यायला? आला मोठा बहादूर.. " म्या बोलले तसा त्यो बी फणफण करीत ताटावून उठला. 'व्हनार.. हिला पोरगंच व्हनार.. मह्या ववशाचा दिवा लागणार..' त्यो बडबडत घराभाईर पडला.
ल्हानी मातर घाबरून गेली व्हती. तिच्या डोळ्यात पाणी आलं व्हतं.. 'आक्का... खरंच मला पोरगं झालं न्हाई तर वो?' तिच्या सवालाचं उत्तर मह्यापाशी बी नव्हतं. तिला भेव व्हतं, उद्या पोरगं न्हाई झालं तर आपल्यालाबी उघड्यावर यावा लागंल का काय याचं. म्या काहीच बोलले न्हाई. आखर कोणाच्या नशीबात काय वाढून ठूलंय ते कोणाला ठावं असतंय..?
तिला दिवस गेले.. दिवस जात ऱ्हायले... नव म्हयने उलटले.. येका राती ती कळा देत इव्हळू लागली.. त्यो दारू पेऊन पडल्याला व्हता... गाढ झोपल्याला गडी.. म्या रिक्षा बलिवला.. तिला सरकारी दवाखान्यात घेऊन गेले.. कम वयाची पोरगी.. बेजार बेजार झाली... चार दोन घंटे कासाईस झाला तिचा अन् येकदाचं लेकरू भाईर पडलं.. अन् तिच्या कुडीतून तिचा जीव बी..!! मोकळी झाली बिचारी... सुटली यकदाची बाईपणाच्या जाळ्यातून.. पर जाता जाता मह्या पदरात लेकरू टाकून गेली... मही चौथी पोरगी..!!
मव्हा दादला आता खंगून गेला. लय खटपटी केल्या पर त्येच्या नशिबात काही पोराचा बाप व्हणं लिवल्यालंच नव्हतं. पोरगं त्याला व्हत नव्हतं अन् पोरीचा बाप त्याला व्हाचं नव्हतं...त्यो निराश झाला.. पचवायच्या ताकदीपरास जास्ती दारू ढोसाया लागला. व्हाचं तेच झालं. लिवरावर सूज आली. आता घरात पडून आसतो निसता. काडीचंबी काम व्हत न्हाई. आता म्या चार पोरीसंगं मह्या नवऱ्याची बी माय होवून बसले.
आता मरणपथाला लागलाय त्यो. उभ्या जिंदगीत काडीचंबी सुख देलं न्हाई भाड्यानं. पर नवरा हाये.. उभी जिंदगी देव मानून शेवा केली त्याची.. लय बाऱ्या वाटलं येकतर आपण जीव द्यावा न्हायतर त्येचा जीव घ्यावा.. पर खऱ्या जिंदगानीत दोहीबी करता येत नसतंय. भोग भोगीत ऱ्हावे.. जितकं सोसता यील तितकं सोशीत जावा.. आता त्यो मरणार हे म्होवरं दिसतंय.. तरीबी त्येला वाचविण्याची धडपड करावा लागतीया... डाकदर मनले आप्रीशन करा.. मी लागले आपली दारोदार भीक मागाया... साईतरीनं मेल्याला सत्तेवान जित्ता केला... आता जित्ता सत्तेवान जगविणं ह्यो आपला धरमच न्हाई का? "
राधाबाईंची कहाणी ऐकून जेनीच्या अंगावर काटा आला. 'कसल्या ह्या बायका? कुठून येतो इतका सोशिकपणा यांच्यात?' राधाबाईंचा भाजीपाला घेणे झाले होते. दोघीही परतीच्या मार्गाला लागल्या. दोघीही शांत स्तब्ध झाल्या होत्या. राधाबाई मनातलं सगळं रिचवून रिक्त झाल्या होत्या. अन् जेनी त्यांच्या वेदना जाणून रिक्त झाली होती. इतक्या दारिद्र्यात, संकटात, छळातही नवऱ्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या या बायकांच्या रक्तातून कोणते संस्कार वाहत असतील बरं?
त्या अर्धा रस्ता चालून आल्या असतील. दिवस मावळून गेला होता. अंधार पसरायला लागला होता. त्या अंधूक उजेडात मघाशी पाणीपुरीच्या गाड्याजवळ लगट करू पाहणाऱ्या पोरांचं टोळकं समोर दिसलं. राधाबाईंनी पुन्हा एकदा जेनीला खुणावलं. दोघींनीही चालण्याचा वेग वाढवला. पण त्या पोरांनी समोर येऊन रस्ता अडवला.
" ऐ मथारडे... लय दम भरलाय जणू तुह्यात.. " असं म्हणत एकाने राधाबाईंचा हात धरून पिरगाळला. त्या जोरात ओरडल्या. जेनीच्या लक्षात आलं, ही पोरं अशी आवरणार नाहीत. ती लगेच सज्ज झाली. कराट्याची पोज घेतली. पोरं ओरडू लागली. राधाबाईचा हात धरलेल्या पोराच्या तोंडावर जेनीने जोरदार लाथ मारली. त्याचं नाक फुटलं. भळाभळा रक्त वाहू लागलं. बाकीची पोरं चिडली. सगळ्यांनी सगळ्या बाजूंनी जेनीवर हल्ला चढवला. पण तीही चांगलेच हातखंडे शिकलेली होती. हातांनी काही, लाथांनी काही ती एकेकाला घायाळ करत होती. तिला एखादा फटका बसवणं तर दूरच पण ते तिच्या जवळपासही फिरकू शकत नव्हते. सात आठ तरणीबांड पोरं पण त्या पोरीने त्यांना घायाळ रक्तबंबाळ करून सोडलं. एकदा पाठीत - पोटात जेनीची लाथ बसलेला पोरगा पुन्हा काही उठून बसत नव्हता. जेनी तुफानासारखी एकेकाला झोडपून काढत होती. सगळेच घायाळ होवून विव्हळत जमीनीवर पसरले होते..
" आता उठा की रं मुडद्याहोत..." राधाबाई पडलेल्या पोरांना चिडवत बोलल्या, "पोरीसोरी पाहून लय मरदानगी जागी व्हती व्हय रं तुमच्यातली? आता कुठं गेला जवानीचा जोश तुमच्या? आपल्याकडच्या पोरी सैपाकपाणी, शिलाई धुलाई शिकत बसत्यात.. त्यापरीस ह्या जेनाबाईवानी मारामारी शिकीवली पायजी त्यास्नी... मंजी ह्या लांडग्यायच्या टोळ्यापासून सुरक्षित ऱ्हात्याल त्या... "
राधाबाईंनी खाली पडलेली बाजाराची पिशवी उचलली. जेनीचा हात हातात घेतला अन् दोघीही घरी जायला निघाल्या," तुम्हाला सांगते जेनाबाई... मह्याच्यानं पोरीला काही शिकवीनं होऊ का ना होऊ.. पर अशा वंगाळ नजरा वळखायला अन् अशा लांडग्यांयची शिकार करायला नक्की शिकविनार बगा म्या... "
" हे तर शिकवाच राधामावशी.. पण लिहिणं वाचणंही शिकवा... त्यांच्या नशिबाची भाकरी शिक्षणानेच पलटून जाणार आहे... काहीही झालं तरी त्यांचं नशीब तुमच्यासारखं करपून जाऊ देऊ नका... मला आज वचनच द्या तुम्ही... एकवेळ उपाशी राहाल.. पण पोरींना शिकवाल.. काहीही झालं तरी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार नाहीत... " जेनी पोटतिडकीने बोलली. राधाबाईंनी वचन देण्यासाठी जेनीच्या हातात हात दिला. अन्...
मघाशी जमिनीवर लोळत पडलेल्या एका पोराने मागच्या बाजूने एक दगड जेनीच्या दिशेने भिरकावला. तो थेट जेनीच्या डोक्यावर लागला. भळाभळा रक्त वाहायला लागले. ती चक्कर येऊन धाडकन जमिनीवर आदळली. मघाशी रक्तबंबाळ होऊन पडलेली पोरं चिडून धावत आली. खाली पडलेल्या जेनीला लाथाबुक्क्यांनी मारू लागली. जेनी बेशुद्ध झालेली होती. तिच्यावर त्याच अवस्थेत ते रानटी मुलं हल्ला करत राहिले. दोन चार लाथाबुक्क्या राधाबाईंनाही मारल्या. पण त्यांचा सगळा राग जेनीवर होता. ते जेनीला मारत राहिले... अगदी मरेपर्यंत..! ती काहीच हालचाल करत नाहीये हे लक्षात आल्यावर त्यांच्यापैकी एकजण ओरडला, 'अरे पळा.. मेली ही..' अन् ते तिथून पळून गेले.
बाजूला घायाळ होऊन पडलेल्या राधाबाई कशाबशा उठून धुळीत माखलेल्या जेनीपर्यंत गेल्या. त्यांनी तिच्या छातीवर कान ठेवून बघितला. धडधड जाणवत नव्हती. तिच्या नाकापुढे दोन बोटं नेवून बघितली. श्वास बंद झालेला होता. राधाबाई जोरात किंचाळल्या. आजूबाजूला कुणीही नव्हतं. त्या उठल्या. धावत सुटल्या. थेट घरी आल्या.
"बाईसायब... बाईसायब..." राधाबाईंना धाप लागली होती. तोंडातून नीट शब्दही फुटत नव्हता.
"काय झालं राधामावशी...? " अश्रवीही नुकतीच दुकानातून घरी आली होती.
" अश्रूताई... आपल्या.. आपल्या... जेनाबाई...तिकडं... बजारच्या वाटाला... " राधाबाईंनी एकदमच टाहो फोडला. विजयाताई अन् अश्रवी घाबरून गेल्या. आहे त्या स्थितीत घराबाहेर पडल्या. बाजारच्या त्या रस्त्यावर गेल्या. जेनी तिथेच धुळीत पडलेली होती. तिला बघताच अश्रवी तिच्या झेपावली. तिच्या छातीवर डोकं आपटीत जेनीने टाहो फोडला. विजयाताई तिला सावरण्याचा प्रयत्न करू लागल्या... पण ते शक्य नव्हतं..!!


© सर्वाधिकार सुरक्षित -

© शिरीष पद्माकर देशमुख ®


{ 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
'लेडीज ओन्ली' कथामालिका कादंबरीच्या संदर्भातली सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED