लेडीज ओन्ली - 16 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेडीज ओन्ली - 16

|| लेडीज ओन्ली - १६ ||


( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन -

शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)


" लेडीज ओन्ली "

[ भाग - १६ ]


जेनीला जाऊन आता काही दिवस उलटले होते. ती गेल्यानंतर लगेच अश्रवीने जेनीच्या आई वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल कळवले. त्यावर त्यांनी एका वाक्यात दिलेलं उत्तर अश्रवीच्या काळजाची अन् माणूसकीचीही पार चिरफाड करून टाकणारं होतं. ते म्हणाले... "हू इज जेनी??"
अश्रवी मात्र अजूनही जेनीच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरली नव्हती. ती अगदी शांत राहायला लागली होती. सतत कुठल्यातरी विचारात गुरफटल्यागत असायची. विजयाताईंशी सुद्धा व्यवस्थित बोलत नव्हती. घराच्या बाहेर जाणं तर बंदच केलं होतं तिनं. सतत आपल्या मोबाईल लॅपटॉप मध्ये स्वतःला गुंतवून घेतलेलं असायचं तिनं. ना नीटपणे काही खात होती ना पीत होती. रात्र रात्र छताकडे बघत डोळे सताड उघडे ठेवून जागायची. कधी मध्येच उठून फेऱ्या घालायला लागायची. कधी चिडत नव्हती. ओरडत नव्हती. पण तिचं मौन भयावह होतं. विजयाताईंना पोरीची ही अवस्था पाहून काळजी वाटायला लागली होती. त्यांनी एकदा दोनदा डॉक्टरला दाखवण्याचा विषयही काढला तिच्यापुढे. पण ती म्हणायची, " मला वेड लागलंय असं वाटतंय का आई तुला? मी अजूनतरी पूर्ण भानावर आहे. आणि माझ्या मनावर माझं कंट्रोल आहे..!" त्यानंतर तो विषय थांबवण्यावाचून विजयाताईंपुढे पर्याय नसायचा.
" निघालात का राधाबाई?" धुणीभांडी आवरून परत निघालेल्या राधाबाईंना विजयाताईंनी प्रश्न केला.
"हॉव बाईसायब... आवरलं समदं.. " कमरेला खोचलेला पदर नीट करून त्याला हात पुसत राधाबाईंनी उत्तर दिलं.
" किसनरावांची तब्येत कशी आहे आता? आणि मागे तुम्ही पैशांचं म्हणाला होतात.. पुन्हा काही विषयच काढला नाहीत..? " राधाबाईंना पैसे द्यायचे राहूनच गेले होते.
" तब्बेत काय... तोळा मासा व्हतच ऱ्हाती... पाव्हण्याकून पैशाचं काम झालं मनून पुन्हा तुमास्नी मागण्याची गरज न्हाई पडली.. तुमच्याबी मागं निवडणूक, त्येचा खर्चं... वरून पुन्हा हे आसं.... त्यो देव बायालाच इतकी तकलीफ व्हाय देत आसंल वो बाईसायब? "
" हं... अगदी अचूक प्रश्न विचारलात राधाबाई... " विजयाताई बोलल्या," जगातली सगळी दुःखं पचवायची ताकद बाईच्या अंगात असते. म्हणून कदाचित. बघा ना लेकराला नऊ महिने पोटात वाढवण्याचा त्रास अन् प्रसूतीच्या वेदना बाईलाच. ज्या मायबापांनी जपलं, पालनपोषण केलं त्यांना, स्वतःच्या हक्काच्या घराला लग्नानंतर सोडून परक्या घरी जाण्याची वेदनाही बाईसाठीच... हे सगळं दुःख सहन करण्याची ताकद बाईमध्ये असते म्हणून कदाचित.... "
" आहो कशाचं काय... " राधाबाईंना ते पटलं नव्हतं," गॉड लेडीज लोकायला तकलीफ देतो कारण त्यो सवता म्यान असतो.. पुरूष आसतो त्यो.. दुनिया चलविन्याचा कारभार इश्नुला न देता लक्षिमीला देला आसता तर तिनं बाळतपन, सासरवास असे पोगराम पुर्षाच्या मागं लावले आसते... परलयाचं डिपारमेंट शंकराऐवजी पारबतीकडं आसतं तर बाईला छळणाऱ्या आन् मुताड पेऊन झोडणाऱ्या गड्यायला दुपाराच खलास केलं आसतं. आॅल माजेल गडीमानसं गोणीत भरभरू नरकात नेऊन झोकले आसते.. पर हितंबी पुरूसपरधान अन् तिथं देवादिकात बी..! परधान बी तेच अन् राजंबी तेच... मंग बाईच्या हाताला काय लागनार.. बुढी के बाल? " राधाबाईंच्या दिलखुलास बोलण्याचं विजयाताईंना हसू येत होतं. त्यांची भाषा गावंढळ होती. त्या शिकलेल्या नव्हत्या. पण अनुभवातून आलेलं शहाणपण त्यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होत होतं.
" आजूक येक सांगायचं व्हतं बाईसायब.. " राधाबाईंचा आवाज नरमला. मान खाली गेली.
" अहो बोला ना.. "
" न्हाई ते... मालकास्नी आडमिट करायचं हाय.. हासपिटलात.. आज उंद्या... चार दोन दिसात आप्रीशन करू मनले डाकदर... तर मंग.. मला.. " राधाबाई अडखळू लागल्या.
" सुट्टी हवीय का तुम्हाला..? " विजयाताईंनी त्यांची प्रश्न विचारताना येत असलेली अडचण दूर केली.
" अं.. हो.. हो.. आठ पंधरा दिस... "
" अहो मग अडखळायला काय झालं.. अगदी निश्चिंत मनाने जा तुम्ही.. आणि हो तुम्ही कामावर नाहीत म्हणून मी इतक्या दिवसांचा खाडा धरेल असंही समजू नका.. एकही दिवसाचा पगार कपात होणार नाही... आणि मीच नाही तर इतर सगळ्यांनाही मी स्वतः सांगीन हे... तुम्ही फक्त तुमच्या दादल्याकडे लक्ष द्या... " विजयाताईंनी जणू राधाबाईंच्या मनातल्या सगळ्या शंका ओळखल्या होत्या. अन् त्या समजून घेऊन त्या शंकांचे निरसनही केले.
" लय.. लय उपकार झाले बाईसायब तुमचे... " राधाबाईंनी त्यांना हात जोडले," तुम्ही मह्यावरच्या परतेक संकटात देवावानी धावून येता.. दरबारीस...! म्या तुमचे हे उपकार कव्हाच इसरणार न्हाई... "
" उपकार कसले हो त्यात... माणसानं माणसाच्या उपयोगी पडणं हाच खरा माणूसधर्म... मी तो पाळते इतकंच.. " विजयाताईंना कधीच मोठेपणाची भुरळ पडली नाही. ना त्यांनी कधी कोणत्याही गोष्टीचा मोठेपणा स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला.
" म्या येऊ का बाईसायब..? " राधाबाईंनी परवानगी मागितली.
" हो या.. आणि काही लागलंच तर हक्काने कळवा... किसनरावांची, लेकरांची अन् तुमची स्वतःची देखील काळजी घ्या.. किसनराव ठणठणीत बरे होणार आहेत..! चिंता करीत बसू नका.. सगळं काही चांगलंच होणार आहे.. " राधाबाईंनी निरोप घेतला. त्या निघून गेल्या.
अजूनपर्यंत झोपलेली अश्रवी उठली. तिने तोंडावर पाणी मारलं. दैनिक वर्तमानपत्र येऊन पडलेले होते. तिने ते उचलले. पानं उलटू लागली.
" ब्रश कर ना बाळा.. मी चहा टाकते तुझ्यासाठी.. " विजयाताई म्हणाल्या.
" हो करते... " जांभई देत अश्रवी बोलली," आई आज बुक स्टोअर वर जाऊन बसावं म्हणतेय मी.. "
" अगं कशाला उगीच... " काही दिवसांपूर्वी अश्रवीने स्टोअर चालवावं असा विजयाताईंचाच आग्रह होता. पण आज..? काळ सगळं बदलत राहतो! "आणि आता तू तुझ्या जॉबचं बघ जरा... माझं दुकान चालवण्यासाठी तुला फॉरेनला नाही पाठवलं मी शिकायला... " काही दिवसांपूर्वी अश्रवीनं बोललेलं वाक्य आज विजयाताईंच्या तोंडी आलं होतं," कुठंतरी अप्लाय कर.. नोकऱ्यांची माहिती घे... घरी बसून बसूनही मेंदूला गंज चढतो माणसाच्या... "
" हं.. " दरवाजामागे ठेवलेला ब्रश अन् पेस्ट घेत अश्रवी बोलली," केलंय चार दोन ठिकाणी अप्लाय... बघू.. काय रिप्लाय येतोय तो त्यांचा.. चांगली जॉब आॅफर मिळाली तर बघू.. "
" नव्या जमान्यात हे एक फार चांगलं झालंय बाई... सगळी अर्जबाजारी.. घरी बसल्या करता येते.. " विजयाताईंना नव्या तंत्रज्ञानाचं कौतुक वाटायचं.
" हे बघितलंस का आई? " ब्रश करता करता अश्रवीची नजर पेपरातल्या एका कोपऱ्यातल्या बातमीवर पडली," ते सगळे नराधम पकडल्या गेलेत.. " तिने ब्रश बाजूला ठेवला. पेपर दोन्ही हातांनी पकडून बातमी काळजीपूर्वक वाचू लागली.
" हो वाचलीय... " विजयाताईंची शांत आणि तितकीच गंभीर प्रतिक्रिया.
" ह्या राक्षसांना फाशी व्हायला हवी.. " अश्रवीचं रक्त सळसळायला लागलं होतं. ती थरथरायला लागली होती," यांनी.. माझ्या जेनीला माझ्यापासून दूर केलंय... यांना जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाही.. आई.. आई आपण चांगल्यातला चांगला वकील लावू.. लागेल तितका पैसा खर्च करू.. पण जेनीला न्याय मिळायला हवा.. या नराधमांना फाशी व्हायलाच हवी... होय.. फाशीच.. " अश्रवी पुन्हा एकदा बेभान होत आहे हे विजयाताईंच्या लक्षात आले. त्यांनी जवळ जाऊन तिचे दोन्ही खांदे घट्ट पकडले. तिच्या हातातला पेपर घडी घालून बाजूला ठेवला.
" होय.. आपण जेनीला न्याय मिळवून देऊ.. त्यासाठी जे जे काही करता येईल ते सगळं करू... " विजयाताई अश्रवीला समजावण्याचा प्रयत्न करू लागल्या. ती थोडीशी शांत झाल्यावर त्या बोलल्या," आपण जेनीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावून देऊ बाळा... पण न्याय मिळेलच अशी फारशी अपेक्षा ठेवू नकोस.. कारण अपेक्षा भंगाचं दुःख त्रासदायक अन् निराशेच्या गर्तेत ढकलणारं असतं.. कदाचित जेनीला न्याय मिळेलही.. त्या सैतानांना फाशी होईलही.. पण त्यासाठी लागू शकतात दोन वर्षे.. चार वर्षे.. आठ वर्षे.. दहा.. वीस... तीस... कितीही वर्षे.. या देशात न्यायाइतकं हतबल अन् बेभरवशाचं दुसरं काहीच नाही..!! तरीही आपण न्याय मिळवण्यासाठी झगडत राहणार आहोतच.. अगदी शेवटपर्यंत..!! शेवट.. मग तो आपला असू शकतो.. अन्यायाचा.. किंवा न्यायाचाही..! " विजयाताईंच्या बोलण्यात प्रचंड नैराश्य होतं. जे आतापर्यंत अश्रवीला कधीच जाणवलं नव्हतं.
" असं का म्हणतेयस गं आई? " अश्रवीने विचारलं.
विजयाताईंनी डोळ्यावरचा चष्मा काढले. डोळ्यांत आसवांचं धुकं दाटलं होतं. त्यांनी पदराने चष्मा पुसला. अन् न भिजलेले डोळेही. चष्मा पुन्हा डोळ्यांवर चढवला. अन् एक प्रश्न विचारला ," माझ्यावर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांचं पुढे काय झालं माहितीये तुला अश्रू? " अश्रवीने नकारार्थी मान हलवली. विजयाताईंच्या चेहऱ्यावर एक भयानक करूण स्मितहास्याची रेषा उमटली अन् त्यांनी सांगितलं," साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे कोर्टाच्या असे लक्षात आले की माझ्यावर बलात्कार करणारे ते सगळे गुन्हेगार अल्पवयीन होते... म्हणून त्या सर्वांची बालसुधारगृहात रवानगी करण्याचा निर्णय देण्यात आला..!
मला अजूनही कळलेलं नाही.. ज्यांना बलात्कार करता येतो.. ते अल्पवयीन कसे काय असू शकतात???"

© सर्वाधिकार सुरक्षित -

© शिरीष पद्माकर देशमुख ®

{ 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
'लेडीज ओन्ली' कथामालिका कादंबरीच्या संदर्भातली सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®