सौभाग्य व ती! - 33 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 33

३३) सौभाग्य व ती !

आसवांवर कुणाचेही नियंत्रण नसते. कारण ते स्थळ, काळ, वेळ, प्रसंग इत्यादी गोष्टींचे भान न ठेवता डोळ्यांमध्ये दाटी करतात. अश्रुंनी मात्र नयनला अहोरात्र साथ दिली होती. चांगल्या-वाईट कोणत्याही प्रसंगी ते नयनच्या सोबत असत. तितक्या चांगल्या, आनंदाच्यावेळी कौतुक करायला आसवं उपस्थित होतेच. त्या आसवांमध्ये त्यागाचे, सफलतेचे, कर्तव्यपूर्तीचे अनेक भावाचे मिश्रण होते. तो दिवस अत्यंत धावपळीत, आनंदात गेला. आशा, मीराही त्यात सहभागी झाल्यामुळे सर्वांना वेगळेच समाधान लाभले. चार केव्हा वाजले ते कुणालाच कळाले नाही. बरोबर पाच वाजता नयन, बाळू, मीना, मीरा, आशा सारे सभास्थळी पोहोचले. स्टेडियम अगोदरच माणसांनी फुलले होते. खांडरे साहेब आणि इतर प्रतिष्ठित पोहचायला वेळ होता. नयनला पाहताच आयोजक, शाळेचे शिक्षक आणि शाळेचे काही विद्यार्थी तिच्याजवळ आले. समोरील मैदानावर उपस्थित मुले, विद्यार्थी निश्चितत त्यांच्या बाईंचा सत्कार पहायला जमले होते. त्यामध्ये खरी आत्मीयता होती. निर्व्याज प्रेमाचा तो आविष्कार होता. त्यांना काहीही मागायचे नव्हते. त्यांना फक्त आपल्या लाडक्या बाईंना दोन्ही हातानी भरभरून द्यायचं होतं... टाळाच्या कडकडाटाच्या रूपाने! दुसरीकडे मोठ्या माणसांची जी गर्दी होती, तिथे स्वार्थ होता. होय! निर्वाचित आमदार खांडरेच्या सत्कारामागेही प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ होता.
भविष्यात कुणाला कशाचे लायसन्स, कशाची मान्यता असे एक ना अनेक! खांडरे साहेबांना जे हार पडणार होते त्या हारातल्या प्रत्येक फुलास लोभाचा सुगंध होता. ते फुल स्वार्थाच्या दोऱ्यामध्ये गुंफलं गेलं होतं.
पाच म्हणता साडेसहाच्या सुमारास खांडरेसाहेब आणि इतर प्रतिष्ठितांचे आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट होता. त्यामागे त्यांच्या आगमनाच्या आनंदापेक्षा प्रतिक्षा संपल्याचा आनंद अधिक होता. सारे प्रमुख अतिथी स्थानापन्न होताच सूत्रसंचालकाने माईकचा ताबा घेतला. त्यांनी नयनला व्यासपीठावर येवून बसण्याची विनंती केली. चष्मा सावरत नयनने व्यासपीठाच्या पायऱ्या चढण्यास सुरूवात करताच बाळगोपाळांनी टाळ्यांचा अभूतपूर्व कडकडाट केला. ऐकणारांच्या कानाचे पडदे जरी फाटले नसले तरी कान मात्र निश्चितच तृप्त झाले असणार. नयन खांडरे साहेबांच्या शेजारील खुर्चीजवळ येताच दोघांनी एकमेकांना हात जोडून अभिवादन केले. त्यात अनेक अर्थ होते... अभिनंदन! कृतज्ञता!! आभार!!! समाधानही!!!!
महापौरांच्या हस्ते सत्काराचे आयोजन होते. सूत्रसंचालकाने प्रथम खांडरे साहेबांचे नाव पुकारले. मात्र त्याचवेळी उपस्थित बाळगोपाळांनी 'बाई...बाई...बाई...'असा नारा लावला. खांडरेंनी त्यांचा मनोदय ओळखला. त्यांनी आयोजकांना तशी विनंती करताच सत्कार स्वीकारण्यासाठी नयन ऊठून ऊभी राहताच मुलानी वेगळ्याच तालावर टाळ्यांचा ठेका धरला. काही क्षणात उपस्थितांनीही नकळत त्यामध्ये स्वतःच्या टाळ्यांचा सूर मिसळला. भरजरी साडी, शाल, चांदीची सरस्वतीची मूर्ती, श्रीफळ व हार देऊन नयनचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने गायतोंडे यांनी नयनचा सत्कार केला. प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधींनी आपल्या बाईंना सत्कारीत केले. अनेक माजी विद्यार्थ्यांनीही सत्काररूपी कृतज्ञता व्यक्त केली. अनेक पालकांनीही सत्काराचे औचित्य साधले. अत्यंत शांततेने, शिस्तीने झालेला सत्कार पाहून सारेच भारावले. सर्वांचे सत्कार अत्यंत विनम्रतने स्वीकारून नयन खुर्चीवर बसली. तिच्यासमोर शेकडो हारांचा ढीग पडला होता.
खांडरेसाहेबांचा सत्कार सुरू झाला. नयनचे लक्ष सभोवार गेले. लख्ख दिव्याच्या झगमगाटात स्टेडियम प्रकाशाने उजळत असताना स्वच्छ आभाळात चंद्राभोवती तारकांची शिवाशिवी सुरू झाली होती. मैदानात असंख्य तारे फुलले होते. शाळेचे अनेक विद्यार्थीही तिथे दिसत होते. त्यांच्या बाजूला शाळेचे शिक्षक, भाईजी, बाळू, मीना, आशा, मीरा, शोभाआत्या, मामा... आणि अण्णाही होते. सर्वांच्या डोळ्यातील चमचमणारे कौतुकाचे भाव नयनने दुरूनही हेरले. परंतु तेथे नव्हते भाऊ... नव्हती आई आणि माधवही नव्हता... आणि तिची संजीवनीही नव्हती... या सर्वांपासून काहीशा अंतरावर अत्यानंदाने टाळ्या पिटणारे माधवी आणि इंद्रजीतही होते.... तसेच तो... तो... ही नव्हता. पश्चातापाने होणारा, व्याधीग्रस्त सदाशिवही नव्हताच. तो असता तर... तर... परंतु त्याच्यामुळे तर ती तिथे होती. प्रभा-सदाशिव एकमेकांजवळ आले. वैवाहिक जीवन जगू लागले म्हणूनच नयन सदा यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि नयनचा छळही वाढला. त्याच छळाला कंटाळून तिने घर सोडले. सौभाग्याचे प्रतीक म्हणून रोज 'मरण गंध' भाळी लावण्यापेक्षा नयनने सासरच सोडले. ती दोघे एकत्र आली नसती किंवा नयनने घर सोडले नसते तिथेच पिचत पडली असती तर... तर... तो आगळ्यावेगळ्या सन्मानाचा दिवस तिला दिसलाच नसता... अशा विचारांच्या अश्वावर आरूढ़ झालेल्या नयनच्या कानावर टाळ्यांचा कडकडाट आला. वास्तवात परतून तिने पाहिले. सत्कार स्वीकारून खांडरे स्थानापन्न होत होते.
'बाप रे! किती चुकलो आपण? शाळेतर्फे साहेबांचा सत्कार करायला हवा होता...' या विचारात नयनने व्यासपीठावर मागे वळून गायतोंडेना बोलावून हळूच विचारले. ते म्हणाले,
"ताई, तुमचे लक्ष नव्हते. शाळेतर्फे,शिक्षकातर्फे आणि विद्यार्थ्यांच्यावतीनेही सत्कार झाला. तुम्ही सत्कारमूर्ती असल्यामुळे मीच साहेबाचा सत्कार केला."
"वा! वा! छान!" असे म्हणत नयन समाधानाने बसली. काही विद्यार्थी प्रतिनिधी, गायतोंडे व एका शिक्षिकेने विचार व्यक्त केले. नंतर राजकीय विचारांचे पर्व सुरू झाले. त्यात स्तुतीसुमनांची आवर्तने प्रामुख्याने खांडरे साहेबांसाठी असत. आवेशपूर्ण भाषणात खांडरेची कशी आणि किती आवश्यकता आहे ते पटवून देताना प्रत्येकाने आपआपली मागणी, स्वत:चा स्वार्थ पुढे ठेवला. भरजरी पैठणीला शेवटी रूपेरी काठ असल्याप्रमाणे...!
सूत्रसंचालकाने सत्कारास उत्तर देण्याची नयनला विनंती केली. नयन माईकजवळ येऊन ऊभी राहिली. सर्वत्र एक नजर टाकली. चष्मा काढून डोळ्याच्या कडा साफ करून म्हणाली,
"व्यासपीठावरील आदरणीय व्यक्ती, माझे सहकारी आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनो तसेच नातेवाईक, मित्रमंडळी व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक...
आज आपण केलेल्या सत्कारामुळे मी माझे शब्द हरवून बसलेय. वास्तविक शिक्षकांना शब्दांची वाणवा जाणवू नये. परंतु काही प्रसंग असे असतात की, तिथे तुम्ही-आम्ही काय, परंतु स्वतः परमेश्वरही गोंधळतो. इच्छामरणाची व्यवस्था असती तर ते मी या क्षणी स्वीकारले असते. या परिसरापेक्षा स्वर्ग तो वेगळा काय असणार? या सत्कारापेक्षा बाळगोपाळांच्या चेहऱ्यावरील समाधान, त्यांच्या दृष्टीमध्ये दिसणारा आदर हाच खरा आमचा सत्कार असतो. माझ्या या यशामागे खांडरेसाहेब, माझे सहकारी, माझ्या विद्यार्थ्यांची जिद्द, प्रोत्साहन आणि मेहनत सारे सारे दडलेले आहे. ज्या परिस्थितीतून, प्रचंड जिद्दीने साहेबांनी शाळेचे रोपटे लावले त्याचा आज वटवृक्ष झालेला आपण पाहत आहात. खोटे विद्यार्थी, खोटी कागदपत्रं देऊन केवळ स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठी, कुठे तरी कोपऱ्यात शाळेचा बोर्ड लावून शिक्षण महर्षी म्हणवून घेताना शिक्षणाचाच बाजार करणारासाठी खरे तर खांडरेसाहेब आदर्श ठरावेत. गेली अनेक वर्षे सरकारकडून एका पैचीही मदत मिळालेली नसताना आमच्या पगाराची एक तारीख कधीच टळली नाही. शिवाय शाळेची प्रचंड इमारतही ऊभी केली. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते. माझ्या सहकाऱ्यांबाबत काय बोलावे? अत्यंत कमी पगारात त्यांनी काम करताना खांडरे साहेबांनी लावलेला वेल मेहनतीने जोपासला म्हणून माझ्या या सत्काराचा मानकरी माझा प्रत्येक सहकारी आहे अगदी भाईजीसुद्धा!
शाळेतील विद्यार्थ्यांवदल काय बोलावं? त्यांना आम्ही आमच्या कल्पनेप्रमाणे रूप दिलं, आकार दिला...खूप वेळ झालाय. शिक्षक बोलायला उभा राहिला, की त्याला वेळेचे भान नसते. परंतु मी पुनश्च एकवार..." नयनचे पुढचे शब्द टाळ्यांच्या गडगडाटात विरून गेले...
"मित्रानो, वीस वर्षांपूर्वी एक स्वप्न ऊराशी बाळगून मी संस्था काढण्याचा संकल्प केला. योगायोग असा की, त्याचवेळी नयनताई भेटल्या. त्यांना नोकरीची आणि आम्हास कमी पगारामध्ये काम करणाऱ्याची आवश्यकता होती. आमची शाळा म्हणजे नयनताई आणि नयनताई म्हणजे आमची शाळा! त्या आमच्या शाळेचा आत्मा आहेत. त्यावेळी ताई भेटल्या नसत्या तर कदाचित शाळा काढण्याचं स्वप्न हवेतच विरल असत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर आम्हीसुद्धा कदाचित शिक्षणसम्राट झालो असतो. यापूर्वी झालेल्या भाषणात अनेकांनी माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती करणाऱ्या आश्वासनाचीही ते अपेक्षा बाळगून आहेत. परंतु मित्रांनो, मी या क्षणी कोणतेही आश्वासन देऊन पळवाट शोधणार नाही. माझ्या आश्वासनाने टाळ्यांचा गजर होईल. मित्रांनो, टाळ्या कुणाला नको असतात? मलाही टाळ्या घेण्याची भूक आहे परंतु नुकत्याच नयनताईंना जशा टाळ्या मिळाल्या तशा निःस्वार्थ आणि आदरयुक्त भावनेतून जो कडकडाट झाला त्या टाळ्यासाठी मी भुकेला आहे. धन्यवाद!"
शेवटी आभारप्रदर्शनाची लांबलचक यादी व शेवटी राष्ट्रगीत झाले. 'भारत माता की...जय' च्या निनादात निसर्गालाही मोह आवरला नाही. ढगाच्या गडगडाटाने जणू आकाशवाणी आणि रिमझीम पावसाच्या रूपाने पुष्पवृष्टी सुरू झाली...
००००