Prarambh - 13 books and stories free download online pdf in Marathi

प्रारब्ध भाग १३

प्रारब्ध भाग १३

रोज रात्री न चुकता परेशचा व्हिडीओ कॉल येत असे .
तिचा तो मोठा नवीन रंगीत फोन आणि व्हिडीओ कॉल बघुन मामा मामी आणि मुलांना
सुद्धा गंमत वाटत असे .
परेश त्यांच्या सोबत पण बोलत असे .
किती मनमिळावु आणि समजूतदार जावई आहे असे वाटे त्यांना .
चार दिवस झाल्यावर सुमनची सासरी जायची वेळ झाली .
आता दोन तीन दिवस ती तिकडे राहणार होती मग परेश आला की त्याच्या सोबत
परत जायची होती .
फक्त शेवटच्या दिवशी दोघांना जेवायला बोलावले होते मामांनी
इथूनच ते बस मध्ये बसणार होते .
सुमनला सासरी सोडायला मामा स्वतः गेले होते .
गेल्यावर त्या लोकांनी मामांना जेवायला ठेऊन घेतले .
मामा नुकतेच मुंबईत जाऊन आल्यामुळे त्यांना मुंबईला कसे वाटले वगैरे चौकशी केली .
सुमनच्या मामांनी सुमनच्या घराची ,परेशच्या स्वभावाची खुप तारीफ केली .
‘सुमन कसे वाटले मुंबईचे घर आणि मुंबई ..
सगळे चकाचक आहे न परेशने ठेवलेलं ..?”
सासऱ्यांनी विचारताच सुमनने जास्त काहीच न बोलता फक्त मान डोलावली ..
“मुंबई बघुन झाली की नाही ..परेशला खुप हौस आहे सगळ्याची ..
दाखवले न सगळे तुला .?
परत असा प्रश्न सासऱ्यांनी विचारल्यावर परत तिने मान डोलावली.
ते असे प्रेमाने विचारत आहेत म्हणल्यावर सुमनने पण हौसेने काही बोलायला हवे होते
असे मामांना वाटले .
पण सुमनचा स्वभाव त्यांना माहित होता ,तिच्या मनात नसेल तर ती काहीच बोलत नसे .
थोडी आखडू आणि हट्टी होती ती !!
दोन दिवस शेजारी पाजारी भेटायला येणे ,मुंबईची चौकशी करणे वगैरे ..
सासरी पण हाच कार्यक्रम राहिला .

सुमनला पाहून ती पण माणसे चकित झाली .
तिचे कपडे ,तिची मोठी पर्स ,वेशभूषा यांची तिथेही मोहिनी पडलीच
“सुनबाई खरोखर देखणी आणि चांगली हाय बर का “
असे सगळ्यांचेच मत पडले ..
सुमनला इथे पण फार कंटाळा आला ..
सासु सासऱ्या सोबत पण ती जेवढ्यास तेवढे बोलत होती .
त्यांना वाटले बहुधा हिचा स्वभाव अबोल असावा ..
त्यात नवीन लग्न झाल्यामुळे थोडी बुजत असेल .
सासुबाईंनी पण तिच्या साठी वेगवेगळे आवडीचे पदार्थ केले ,कोडकौतुक केले .
शनिवारी दुपारी परेश आला .
रविवारी देवदर्शन ,नातेवाईक लोकांशी गप्पा वगैरे झाल्या .
रात्री सुमनच्या सासुबाईंनी एक डबा सुमनच्या ताब्यात दिला .
“हे तुझे दागिने आहेत तु जाताना दिलेले, माझ्याकडे हे ठेवून काय करणार ?
ठेव ते तुझ्याकडे आता .
तिकडे काही कारणाने घालायला लागतील .
तुमची ठेव आता तुमची तुम्ही सांभाळा .”
“आई मी बँकेत अर्ज केलाय लॉकरसाठी .
मुंबईत घरात हा ऐवज ठेवण्यात अर्थ नसतो ..आणि बाहेर पण नेहेमी नाही वापरता येत .
गर्दी खुप असते न तिकडे ...”परेश म्हणाला .
सुमनने तो डबा तिच्या पर्समध्ये ठेवला
दहा बारा तोळ्याचा ऐवज होता तो ..
सोमवारी सकाळी ते निघणार होते .
मामांच्याकडे जेवून दुपारी दोन वाजता मुंबई बस होती त्यांना .
सुमनला निरोप देताना सासूबाईंनी तिची ओटी भरली .
एक चांगली साडी दिली ,”शकुन” म्हणून पाचशे रुपये तिच्या हातात दिले .
“काळजी घ्या दोघे बर का ..असे म्हणुन तिची अलाबला घेतली .
दोघे मग त्यांच्या पाया पडले आणि सामान घेऊन निघाले.

मामींनी जावयाला मस्त मटणाचे जेवण केले होते .
शिवाय सुमन परतून यावी म्हणुन पुरणाचे मुरड कानवले केले होते .
जावयांना अगदी खुष करून सोडले.
जाताना परेशने चिंटू पिंटूच्या हातात पैसे ठेवले आणि मुंबईला यायचे असे सांगितले .
चिंटू पिंटूचा निरोप घेताना सुमनला भरून आले .
बसमध्ये सुमन फारशी बोलत नव्हती .
परेशने आठवडाभर काय केले याविषयी तिने काहीही विचारले नाही
परेश मात्र उत्साहाने तिने काय काय केले आठवडाभर असे विचारत होता .
“काय त्या खेड्यात करणार? ..कंटाळा आला मला ..”
असे ताडकन सुमन म्हणताच ..परेश गप्प राहिला .
तिचा हट्टी,लहरी स्वभाव त्याच्या पण लक्षात यायला लागला होता .
आता उगाच हिचा मूड नको जायला ..म्हणुन तो काही इतर बोलु लागला .
मुंबईला पोचल्यावर नेहेमीचे रुटीन सुरु झाले .
परेश कामात गुंतून गेला ..
सुमन परत दिवसभर टीव्ही ,सोशल साईट यावर गुंतून जाऊ लागली .
सध्या तिने स्मिता संतोषचा विषय अगदी बंद केला होता .
त्यांच्याकडे कधी गप्पा मारायला जायला पण तिला नको असे .
मग परेश पण फार आग्रह करीत नसे.
तोच अधुन मधुन जाऊन दोघांना भेटून येत असे .
असाच महिनाभर गेला ..
आता सुमनला त्या मोठ्या टीव्हीचा आणि मोबाईल वरील सोशल साईट चा
पण कंटाळा येऊ लागला.
तिचा स्वभाव “चंचल” होता ..फार काळ एखाद्या गोष्टीत तिचे मन रमत नसे .
तशात त्या मजल्यावर सर्वच लोक रोज कामावर जात त्यामुळे कोणाकडे जाऊन बसावे
अशी काही सोय नव्हती .
नवीन ओळखी करून देणारी स्मिता होती ,ती दुपारनंतर घरीच असे .
पण सुमनला आता स्मिता नकोशी झाली होती .
एके दिवशी संध्याकाळी चहा पीत पीत ती सहज म्हणुन मागच्या बाल्कनीत
गेली ..इथे तिचे येणे फारसे होत नसे .
बाहेर बघताना तिच्या लक्षात आले मागे एक खुप मोठी हौसिंग सोसायटी होती .
खुप उच्चभ्रू लोक राहत असणार .
ब्लॉक्स पण खुप मोठे मोठे चार पाच खोल्या असलेले दिसत होते .
खुप मोठ्या मेनगेट वर युनिफॉर्म घातलेले दोन गार्ड होते .
दारातून सतत मोठमोठ्या परदेशी बनावटीच्या गाड्या येत जात होत्या .
आतल्या बाजुला मोठे गार्डन होते .
त्यात अनेक लोक खुर्च्या टेबलवर गप्पा मारत होते .
खेळाच्या अनेक साधनांवर मुले खेळत होती .
बराच वेळ ती तिकडे पाहत बसली होती .
उत्तमोत्तम अद्यावत कपडे घातलेले अनेक स्त्रीपुरुष ,मुले गाड्यातून उतरत होती ,चढत होती
तासभर वेळ कसा गेला समजलेच नाही तिला .
चहाचा हातातला कप पार वाळून गेला .
ही इतकी छान करमणूक आपल्याला यापूर्वी पहायचे कसे सुचले नाही
याच तिलाच नवल वाटले .
आता तिला नादच लागला सारखे बाहेर जाऊन समोर काय चाललेय ते पाहत बसायचे .
सकाळी परेश गेल्यापासुन रात्री येईपर्यंत ती सारखी वेळ काढुन बाहेर पाहत बसे .
आता तिथला लहान बेड पण तिने खिडकीजवळ ओढुन घेतला .
स्वयंपाकाव्यतिरिक्त तिचा वेळ आता तिथेच जाऊ लागला .
आता ती अगदी खुशीत असायची .
ती आता तिथे रमून जाते हे रंगात आल्यावर परेशला तिने सांगितले सुद्धा.
लहान बेडची जागा बदललेली परेशच्या पण लक्षात आले होते .
सारखे तिकडे काय बघायचे असते असे त्याला वाटले ..पण
सुमनचा वेळ चांगला जातो ,ती मजेत असते हे पाहुन तो तसे काही म्हणाला नाही .
‘किती मोठी मोठी घरे आहेत न तिथे ..आणि गाड्या पण मोठ्या मोठ्या आहेत “
मला भारी आवडते त्यांची ती घरे पाहायला ..
“अग श्रीमंत लोकांची सोसायटी आहे ती ..
भरपुर पैसे बाळगणारे लोक आहेत तिथे ,आपल्यासारखी नोकरदार माणसे नाहीत ती “
हे ऐकुन सुमन म्हणाली ..
“मला पण एवढी श्रीमंती हवीय आयुष्यात ..
मोठी गाडी ,मोठे घर तुम्हीपण घ्यायला हवे बर का ..
नाहीतर आपल्या या रोजच्या जगण्यात काहीच मजा नाहीय “
सुमनचे बोलणे ऐकुन अचंब्याने परेश तिच्याकडे पाहतच राहिला.

क्रमशःइतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED