प्रारब्ध भाग १७ Vrishali Gotkhindikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रारब्ध भाग १७

प्रारब्ध भाग १७

या पत्त्याच्या खेळाला “रमी” असे म्हणतात .
आणि त्यासाठी लावायला प्रथम हजार ,पाचशे पुरे असतात.
तुला रमी खेळुन पैसे कमवायचे असतील तर सांग .
हजार पाचशे हवे असतील लावायला तर मी देईन तुला.
हे बघ शेवटी तो “नशिबाचा” खेळ आहे ..बघायचे आजमावून ..
मी स्वतः रमी मध्ये भरपूर पैसे कधी हरले आहे तर कधी जिंकले पण आहे ..
त्यातून तुला माझे हे बोलणे पटत नसेल तर राहू दे ..”
असे मायाने म्हणताच सुमन म्हणाली ..
“अग रागावू नकोस अशी ..बरोबर आहे तुझे बोलणे ...पटले मला ..
तु म्हणतेस ते अगदी योग्य वाटते मला पैसे हे पैसेच असतात ..
आणि ते कमवायचा यापेक्षा दुसरा सोपा मार्ग नाहीच आहे माझ्याकडे .
मला शिकव कसे खेळायचे ..” आणि हजार पाचशे रुपये आहेत माझ्याकडे ..

“ओके डन ...दोन तीन दिवसात तुला एक्स्पर्ट करून टाकते रमीमध्ये .”
दोन दिवसातच सुमनला तिने रमीचा खेळ शिकवला .
सुमनकडे नवीन गोष्ट पटकन शिकायचे “कसब “होतेच !
मग संध्याकाळी दोघी क्लबमध्ये गेल्या .
गेस्ट म्हणुन मायाने सुमनला मेंबर करून घ्यायला सांगितले .
एक हजार रुपये मात्र सुमनने स्वतःचे भरले .
क्लबची वेळ संध्याकाळी पाच ते सात होती .
मेंबर झाल्याने माया नसली तरी सुमन एकटी सुद्धा खेळायला जाऊ शकत होती .
पहिल्या दिवशी सुमनने पाचशे रुपये लावले .
खेळात जिंकत जिंकत त्याचे बाराशे रुपये झाले .
सुमन एकदम खुष होऊन गेली ,तिला एक प्रकारचा “आत्मविश्वास” आला .
पहिल्या दिवशी सातशे रुपयाची कमाई तिच्यासाठी खुप होती .
आता रोज क्लबला रमी खेळायला जायचा तिला नवा छंद लागला .
एखादे दिवशी काही पैसे ती हरत असे ,पण परत तिला ते दुपटीने मिळत .
असे रोज खेळत राहुन तिच्याकडे पंधरा दिवसात पाच सहा हजार रुपये जमले.
आता तिला वाटले ..
वा !!!
हे तर खुपच छान झाले आता परेशकडे पैसे मागायची गरजच नाही .
त्यातले काही पैसे तिने मायासोबत हॉटेलला खर्च केले .
स्वतःसाठी एक दोन ड्रेस खरेदी केले .
माया रोज बंगल्यावर जात असल्याने तिला खेळायला यायला जमत नसे .
माया सोबत असो वा नसो सुमन मात्र रोज रमी खेळू लागली .
आता तिचा मुड एकदम “फ्रेश” राहू लागला .
एकदोन वेळेस तिच्या अंगावर नवीन वेगळे कपडे पाहिल्यावर परेशने विचारले
‘हा ड्रेस कुठला? ..तेव्हा तिने मायाने दिला असे तुटक उत्तर दिले .
आजकाल मायाविषयी परेशने काहीही सल्ला दिलेला तिला अजिबात आवडत नसे .
म्हणून तो काहीच बोलत नसे .
असेच एकदा खेळताना तिने पाच हजार लावले आणि ते दुप्पट झाले .
क्लबच्या बायकांना पण तिच्या नशिबाचा अंदाज होता .
दुसऱ्या दिवशी त्यांनी तिला “चीअरअप” केले आणि दहा हजार रुपयाची रमी खेळतेस का विचारले .
हा जर गेम जिंकला तर तिला दहापट पैसे मिळणार होते .
सुमन अगदी हुरळून गेली आणि तिने ठरवले हा गेम जिंकायचाच ..
आणि तिने आपल्याजवळचे दहा हजार लावुन गेम खेळायला सुरवात केली ..
आणि दुर्दैवाने यावेळी मात्र ती चक्क हरली ....!!
आता जवळचे दहा हजार जाऊन तिलाच एक लाख कर्ज झाले .
सुमनला एकदम उंचावरून जमिनीवर आदळल्या सारखे झाले .
जिने हा डाव जिंकला होता ती त्याच सोसायटीत रहात होती .
तिच्याकडुन सुमनने दोन दिवसाची मुदत मागुन घेतली हरलेले पैसे द्यायला .
लाखोमध्ये खेळणाऱ्या त्या बायका असल्याने तिने अगदी सहज हे मान्य केले .
सुमन मात्र खुपच “अस्वस्थ” होऊन घरी आली .
आता ही हरलेली रक्कम ती कोठून देणार होती ..तिला काहीच सुचेना .
इतके पैसे ती मायाकडे पण मागु शकत नव्हती कारण आधीच माया तिच्यासाठी
खुपच खर्च करीत होती .
बर समजा तिने दिले असते तर ते फेडायचे कसे हा प्रश्न होताच ..
त्या दिवशी ती फार म्हणजे फारच अस्वस्थ होती जेवण ,झोप कशात तिचे लक्ष लागेना .
रात्रभर ती फक्त कूस बदलत होती ..
परेशला पण तिची अस्वस्थता जाणवत होती पण काही विचारले तर उत्तर काय मिळेल सांगता येत नव्हते .
त्याला ऑफिसची गडबड होती तो आवरून निघून गेला .
परेश जाताच तिने मायाला फोन लावला .
मायाला कालचा प्रकार समजला होताच ..
सुमनने तिला हे सगळे सांगताच तिने सुमनला फैलावर घेतले .
इतका मोठा गेम खेळताना ..निदान विचार तरी करायला हवा होतास असे म्हणाली .
सुमनच्या डोळ्यात पाणी आले ..ती हुंदके देऊ लागली .
“माया खरेच चुकले ग माझे ..आता तुच सांग मी काय करू ..?
तिचे रडणे ऐकुन माया म्हणाली ,
”बर जाउदे आता रडून काही उपयोग नाहीय .
माझ्याकडे पण तुला इतके पैसे उसने द्यायला सध्या नाहीत.
मी विचार करते काय करता येईल ते ..”
असे बोलून तिने फोन ठेवला ..
सुमन “अस्वस्थ” होऊन तिच्या फोनची वाट पहात बसली .
बऱ्याच वेळाने तिचा फोन आला ..
“सुमन तुझ्याकडे तुझे दागिने असतील ना ?...किती तोळे सोने आहे तुझ्याकडे ?”
“दागिने आहेत ग दहा अकरा तोळ्याचे ...पण ते मी कशी विकु ?
आणि घरात काय सांगणार ?..सुमन म्हणाली
“तुला दागिने विक असे कोण सांगतेय ?
हे बघ माझ्या ओळखीचा एक सोनार आहे .
त्याच्याकडे हे दागिने आपण गहाण ठेऊ ,एक लाख तरी सहज मिळतील .
ही रक्कम नंतर कशी फेडायची ते बघू पुढे ..
सध्याचा तर प्रश्न मिटेल ..इतकाच मार्ग मला सुचतो आहे “
हे ऐकल्यावर सुमनला होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता .
नाहीतरी इतके पैसे ती कसे आणि कुठून गोळा करणार होती ?
संध्याकाळी दोघीही सुमनचे दागिने घेऊन सोनाराकडे गेल्या .
त्याचे एक लाख दहा हजार मिळाले .
सुमन जरा निर्धास्त झाली ,सध्याचा तरी प्रश्न सुटला होता .
संध्याकाळी क्लबला जाऊन ती तिचे हरलेले पैसे देऊन आली .
आता तिचा परत खेळायचा सध्या तरी “मूड” नव्हता .
ती घरी आली आणि थोड्याच वेळात परेश ऑफिस मधून आला .
“सुमन एक आनंदाची बातमी आहे बर का ...”
सुमनचा खरेतर मूड ऑफ होता पण हे दाखवुन चालणार नव्हते म्हणून
तिने कोरड्या आवाजात कोणती बातमी असे विचारले .
“अग बँक लॉकरसाठी मी अर्ज केला होता ना तो मिळाला आपल्याला .
खरे म्हणजे वर्षभर वेटिंग असते त्यासाठी ...
पण ऑफिसमधल्या एका सुबोध नावाच्या नवीन मित्राची
बँक म्यानेजर सोबत चांगली ओळख आहे .
त्याने शब्द टाकला आणि काम झाले .
आता मी उद्या दुपारी लवकर येतो घरी.
मग जाऊ आपण दोघे बँकेत आणि दागिने लॉकरमध्ये ठेऊन येऊ .”
हे ऐकल्यावर सुमनला क्षणभर काहीच सुचेना ..
“का ग गप्प का ?..
तिच्याकडे बघत ..असे परेशने विचारल्यावर ती चटकन भानावर आली आणि म्हणाली .
“अहो दागिने माझ्याजवळ नाहीयेत ..
म्हणजे ..?
परेशच्या या प्रश्नावर काही एक क्षण सुमनला काही सुचेना
पण मग ती पटकन म्हणाली,”दागिने तर मामीकडे ठेवलेत मी ..”
“कधी तिथे ठेवलेस ? आणि मला याबद्दल काहीच बोलली नाहीस ते ?
असे विचारताच सुमन म्हणाली ..
“आपल्याकडे लॉकर नव्हता ना मग मी विचार केला मामीकडेच ठेवावे .
कशाला आपल्याला सध्या जोखीम ?
लॉकर मिळाला की नंतर आणता येतील “

क्रमशः